तरुण प्रेम

 

तिच्यासोबतची त्याची ओळख नवीन नव्हती. आत्ता दोघ ज्या मंडईच्या पार्किंग जवळ बसलेले ज्या कट्ट्यावर, तो जुना नव्हता. आधी तिथे मंडईसुद्धा नव्हती. सरकारी शाळेच ते पटांगण होत ते. तिथ शेवटच भेटून दोघांना किमान सतरा अठरा वर्ष झाले असावेत. त्या आठवणीला उगाळत तो तिला त्या कट्ट्यावर बसायला सांगतो. ती हळू अशी बसते. तरी तो हळू बस अस नकळत बोलून जातो. ती हि मग त्याला बसायला सांगते. त्या आधी ती तिच्या साडीच्या पदराने कट्ट्यावर एक हात मारते. तो बसतो. घरून लागलीच सुनेचा फोन येतो. भाज्यांची लिस्ट ती सांगत असते. हि इकडे ऐकणारी ती लक्षात ठेवून घेत असते. एका पिशवीत मावणार नाही इतक्या भाज्यांची नाव ती इतक्याश्या डोक्यात लक्षात ठेवत असते. मोबाईल स्वतःपासून वेगळा करत ती त्याच्याकडे बघते. 
तो तिच्या पिशवीतून कापडी पर्स उघडून त्यातले पैसे मोजू लागतो. गर्दीत मोठ्या नोटांचा घोळ नको म्हणून शंभर आणि पन्नासच्या नोटा बाजूला करून लागलीच वीस तीस रुपयाचे चिल्लर हि घेऊन तो उठला. ती हि जागची उठली. दोघ पार्किंगमधून वर भाजी आणायला गेले. भाजी घेतली. तो फक्त पिशवी उचलून धरायचा. ती पैसे द्यायची. उरलेले ती त्याच्या वरच्या खिशात ठेवायची. मी घेऊ का पिशवी अस ती सतत विचारायची. आणि तो जड पिशवी किती हलकी आहे दाखवायला ताकदीने छातीपर्यंत उचलून दाखवायचा. भाजी घेऊन झाली. बाहेर येऊन रिक्षाची वाट बघत. एकदाची रिक्षा आली. रिक्षात आधी पिशवीसकट त्याला बसायला सांगून मग ती बसते. त्याच्या हातात असलेले पिशवीचे बंद त्याच्या हातातून सोडवत ती त्याच्याकडे बघते. तो तिचा हात धरतो. आणि ती हि पकड घट्ट करते. रिक्षा गर्दीतुन वाट काढत पळत असते. वेळ जात असतो. जो तो आपल्या वाटेने जात असतो. घरी जाऊन भाजी पिशवीतून काढून ती फ्रीज मध्ये लावून ठेवेपर्यंत तो तिच्या सोबत होता. आणि सगळ काम झाल्यावर ती जरा बसली तर तिच्या हाताला बाम लावून देताना तो फक्त तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्याकडे बघत एवढाच विचार करत होता कि, दोन महिन्याच्या ओळखीला मी हिला माझ प्रेम बनवल. प्रेमाने आम्हाला एकमेकांच बनवल. लोक एक प्रेम शोधत आख्ख आयुष्य संपवून बसतात आणि मला मिळालेलं प्रेम मला आयुष्य संपवून टाकायचं कारणच देत नाही. या विचाराने खुश होत तो तिला बाम लावत होता. तिच्या हात दुखण्याचा त्याला आनंद होतो कि काय म्हणून तिला राग आला. पण राग दाखवायला ती बालिश उरली नव्हती का तो राग घालवायला तो लहान होणार नव्हता. पण तरी तिने हात बाजूला केला. आणि त्याने दुसरा हात धरून त्याला बाम लावायाला सुरुवात केली. ती लाजली. तो हसला. 

copyrighted@2022


2 टिप्पण्या