हुंदके देणारं मन !

 

गहिवरलेल मन जेव्हा हुंदके देऊन रडायला लागत काय सांगू, याहून मोठ दुःख जगात कोणत नसेल किंबहुना नाहीच. जगाययची इच्छा खरी तेव्हा वाढते जेव्हा एकतर्फी प्रेमाची सुरुवात अगदी मध्यात येऊन पोचते. श्वास आपले सुरू असतातच. त्याच काय कौतुक. पण जेव्हा याच शरीराला कृत्रिम श्वास पुरवले जातात तेव्हा त्याच महत्व अगदी कायमच लक्षात राहत. त्याआधी ते श्वास हेवत कैक उत्सर्जन करत राहतात. ज्याच आपल्याला काहीही वाटत नाही. प्रेमात पडलेल्या त्या व्यक्तीच्या जेव्हा आपण अगदी आणखी प्रेमात पडत जातो आणि ते प्रेम फक्त एकतर्फी असेल तर तो प्रवास संपावा वाटतो लवकर. पण लवकर तो संपत नाही. कारण मनाला एक भीती कायमची असते की, शेवट गोड होऊन प्रवास हा संपावा पण, हा ती व्यक्ति कोणाच्या प्रेमात हरवून त्याच्यातला आणि आपल्यातला अव्यक्त वाटेवरचा प्रवास आणखी वाढु नये. प्रवास तसा हा खूप काही शिकवणारा असतो. एक आई जन्म देते, ती जगायला शिकवते, त्यानंतर पुन्हा एकदा आपण याच एकतर्फी प्रेमात जगायला नव्याने शिकतो. या आधी ना आपण आईचे आभार मानतो ना कधी त्या व्यक्तीचे जी आपल्याला नव्याने जगायला शिकवते.

आठवण बनवत जाणाऱ्या प्रत्येक दिवसाला विसरून चालत नाही. आठवणीला, आठवण म्हणून भूतकाळ करावासा वाटत नाही. जे चालू आहे ते तसच अगदी रहाव वाटत. पण प्रत्येक गोष्ट इथे आपल्या मार्जिने चालते कुठे ? एकतर्फीचा हा भावपसरा घेऊन मनावर एक अपूर्ण अस ओझ घेऊन जगत असताना भीतीच ओझ सर्वात जास्त असत. अस म्हणतात जो विचार माणूस सर्वात जास्त आणि सारखा करतो. नेमक तसच काहीस त्याच्या आयुष्यात घडत असत. बाकी ‘आयुष्य, भविष्य ह्या गोष्टी मानल्या तर खऱ्या नाहीतर खऱ्या प्रेमासारख्या काल्पनिकच.’ हो, खरच ज्या गोष्टीच ओझ जास्त मनावर असत तेच घडत. ओझ मिरवताना मनातल्या गोष्टी अव्यक्त राहतात आणि मग कित्येक शब्द नि वाक्य अबोल राहतात. इतिहास होत जाणाऱ्या भावना आणि वाक्य, नंतर कोणा दुसऱ्याच्या तोंडी दिसून जातात. ती व्यक्ती व्यक्त होणाऱ्याच्या मिठीत आपली मिठी सामावून उभी बघताना, मन निःशब्द होत. काय माहीत कुठे जात ते मनावरच ओझ ? कुठे जातात ते अव्यक्त शब्द नि वाक्य ? कुठे निघून जाते भीती आणि स्वप्न. कुणास ठाऊक?????

मन गहिवरून येत. आणि मग मेंदू बघत असलेल सगळ खोट आहे अस मनाला समजाऊ लागत. पण मन काहीच ऐकायच्या मनस्थितित नसत. आणि मग ते गहिवरून येत. मे महिन्यात जोराने वारा सुटून जुलै महिन्यासारखा पाऊस रस्त्यावर धो-धो पडावा. रस्त्यावरून वाहून जात नाले सगळे साफ करत सगळच कस गच्च आणि ओल किचच करून जाव तसच अगदी मन गहिवरून बघून जात. आणि मग हृदयावर असा काही जोर येतो की तो अनावर होतो आणि मग डोळ्यातून वाहणार पानी मेंदूला एकच सांगत की एक गहिवरलेल मन हुंदके देत रडत आहे. आणि ज्याच्यासाठी ते रडत आहे, तो समजावायला येतच नाहीये.

आणि येणार ही नाहीये..

“कधीच नाही..!”        


Copyrighted@june2022


2 टिप्पण्या