Line
रोज सकाळी ११:३९ दारा समोरून जायची. या तिच्या परफेक्ट टायमिंगला दाद
द्यायला हवी. ती केव्हा पासुन इथून जातेय मला माहित नव्हत. पण एकदा बाहेर जाताना
मी गाडी सुरु केली आणि ती शेजारून गेली. माहित नाही काय झाल पण शेजारून ती पुढे
गेली आणि तिच्या अभासाने छातीत थोडस धडधडल्यासारख झाल. मी तिला मागूनच बघितल त्यादिवशी.
काळा पंजाबी ड्रेस आणि त्यावर सोनेरी ओढणी. कानात हेडफोन आणि हातात मोबाईल.
नजर खाली पायाकडे आणि सगळ जग हरवून चालत जाणारी ती कोणत गाण ऐकत असेल तिलाच माहित.
मी गाडी सुरु केली तिच्या शेजारून गेलो. तिच्याकडे बघितल नाही. त्या नंतर चार एक
दिवसांनी मी बाहेर जाताना आमची वेळ जुळून आली. आज अलीकडे उभा होतो गाडीच्या आणि ती
समोरून येत होती. तिला मी ओळखल. लांबूनच जरा. चेहऱ्यावरून नाही पण ड्रेसवरून. खूप
सुंदर दिसत होती ती. एक मुलगी कशी असते ? ह्या विषयावर आजवर ज्या लेखकांनी, कवींनी
लिहील आहे ती कल्पना माझ्याकडे येत होती तेव्हा. गोरीपान होती ती. पिवळसर घारे
डोळे होते तिचे, त्यात ऊन लख्ख पडलेलं त्या प्रकाशात तर आणखीनच ते घारेपण उठून
दिसत होत. ओठ नाजूक एकदम आणि वर गुलाबी लालसर. आजकाल ट्रेंड आहे तशीच होती ती स्लिम.
एकदम झीरो फिगर. तेव्हासारखाच हातात मोबाईल आणि कानाला हेडफोन लावून ती चालत येत
होती. माझ्याकडे तिने बघितल चुकून आणि मी तिला बघत होतो रोखून.
ती त्यावेळेस हि तशीच शेजारुन निघून गेली. मी तिच्याकडे बघत राहिलो.
त्यानंतर पुढे एक महिना मी तिच्या वेळेत काही काम नसताना घराबाहेर येऊन थांबायला
लागलो. रोज ती मला बघायची आणि निघून जायची. खुपदा वाटायचं तीच्यामागे जाव तिचा
नंबर घ्यावा. पण तिला बघण्यातच इतक सुख मिळत होत कि नंबर घेऊन दुसर अस काय सुख
मिळवणार होतो मी ? उन्हाळ्याच्या दिवसात पाऊस अलीकडे नवीन नाही. पाउस येत होता. मी
जर्किंग घालून उभा होतो. ती आली पूर्णपणे भिजलेली. ओल्या केसांमधून पाणी तिच्या
चेहऱ्यावर येत होत. एकसलग अगदी. मेकअपची तिला गरज नव्हती इतकी सुंदर होती ती. पण
भिजलेल्या त्या अवस्थेतहि ती चालत होती. मला कसतरी वाटायला लागल. एकक्षण मीच मला
भिजलेल बघत होतो. मी तिच्या मागे गेलो. जर्किंगची टोपी मीही डोक्यावर घेतली नाही.
गेलो तसाच तिच्यामागे. बरीच पावल अंतर मागे ठेवून तिच्यापासून लांब असा मी चालत
होतो.
ती एका पतसंस्थेत गेली. आणि खुर्चीवर जाऊन बसली. आणि काम करायला लागली. मी
तिथ बाहेर दहा मिनिट थांबलो. नंतर आतली लोक मला बघायला लागलें तेव्हा मी निघून आलो
घरी. वाईट वाटत होत. जी आवडते मला जिच्याशी माझ काहीही एक शब्द बोलन झालेलं नाही तिच्यासाठी
जीव तुटत होता आणि मला ती आवडत असली तरी तिच्यासाठी मी काही करू शकत नव्हतो. घरी
येऊन मी डोक पुसलं. जर्किंग काढून ठेवल. अस म्हणतात भिजलेल्या अवस्थेतली
स्त्री-मुलगी खूप सुंदर दिसते. मला हि तिला तस बघायला आवडल असत पण त्या वेळेस तिचा
तो नाराज भिजलेला चेहरा बघून चेहऱ्याच्या पुढे खाली मला काही बघायलाच जमल नाही.
संध्याकाळी जेहा मी बाहेर म्हणून गेलो तिचाच विचार येत होता. तिची सकाळची वेळ मला
माहित होती पण संध्याकाळी ती कधी घरी जाते हे माहित नव्हत. मी गेलो त्या
पतसंस्थेपाशी. सात वाजले असतील तेव्हा. ती कुलूप लावून निघाली दुसऱ्या रस्त्याने
घरी. अरे, हा म्हणूनच संध्याकाळी ती कधी मला घरासमोर जाताना दिसली नाही.
मी तिला बघितल. तिचे केस एकदम सिल्की झालेले. सकाळी भिजलेले ना म्हणून. आणि
कपडे. चुरगाळलेले. दिवसभर काम करून अंगावरच कपडे तिने वाळवलेले. डोळ्यात पाणी आल.
भावना ताब्यात ठेवून मी तिच्यामागे गेलो. हाच एक मनात विचार करून कि मी हिच्याशी
लग्न करून हिचा त्रास मी लांब करेन आणि खूप प्रेम देईन. मी या प्रेमाच्या विचारात
हरवून कधी माझा चालण्याचा वेग वाढवून बसलो समजल नाही. तिच्यात माझ्यात अंतर बरच
कमी होत. एक रस्ता आला जिथे ती रस्ता पार करणार होती. माझ्या लक्षात आल नाही. मी तिच्याकडेच
चालत राहीलो. तिला समजल. तिने घाईत रस्ता पार केला आणि भर भर चालायला लागली. मी हि
तिच्या मागे चालायला लागलो. समोरून जे.सी.बी. एक आला. त्याचा एवढा प्रकश पडला कि
त्या अंधाऱ्या रस्त्यात पूर्ण प्रकाश पसरला. आणि माझ लक्ष तिच्या हाताकडे गेल.
हातावर तिच्या शहारा आलेला. मी मागे जात होतो त्या भीतीने किंवा दिवसभर भिजलेल्या
अंगाच्या थंडीने. मी थांबलो. जे.सी.बी. गेला. तीही गेली. तिने मागे बघितल वळून
एकदा. मी लांब आहे बघून तिने तिचा वेग कमी केला. आणि मी......माघारी फिरलो. पुन्हा
ती घरासमोरून कधी गेलीच नाही.
COPYRIGHTED@2021
1 टिप्पण्या
Dolyat pani aaaaal ,��
उत्तर द्याहटवा