सोबत कशाला हवी ?

 

तू जेव्हा एवढा-एवढास होतास. तेव्हा जास्त गरज तुला माझी होती. आणि त्याहून जास्त आधाराची गरज मला त्याची होती. काय म्हणून मी केल नाही ? कितीतरी विचार करून रात्र रात्र जागून तुझी काळजी घेतली. तुला संभाळल. मनातल्या सगळ्या विचारांना मागे ठेवून पुढची सगळी स्वप्न विसरून जाऊन फक्त तुला लहानाच मोठ करण्यात मी माझ आयुष्य पणाला लावल. आणि एक आयुष्य झुरणीला लावल. तो परत येईल या एका विचाराने. तोच हवा होता. त्याच्या सारखा असा कोणी नकोच होता. हा येत होते ना, मागे मागे बरेच. मला अस विस्कटलेल बघून. तुझे एवढेसे हात पाय बघून, माझ्या हातांना धरण्याचा प्रयत्न कित्येकांनी केलायसुध्दा.

कित्येकदा तर रात्रीची दारं वाजलीयत. रात्री त्या आवाजाने धडकी भरायची म्हणून तुला जवळ घेऊन बसायचे. तुला झोपवायचे आणि मी मात्र जागायचे. सकाळी तुझ सगळ बघून काम करायला लागायचे. आईकडे कधी गेले तर आठवड्यातून एकदा फक्त काय ती एक तासभर झोप मिळायची शांत, नाही तर बाबा आले कि तुला घेऊन पुन्हा आपल्या घरी यायचे. त्या छोट्या खोलीत तू एवढासा आणि तब्येतीने नाजूक झालेली मी, तरीपण ती एक खोली राजवाड्यासारखी इथून तिथून मोठी दिसायची. एक बल्ब होता त्यात तो हि अंधार पडला कि काजव्यासारखा कमी वाटायचा. मनात भीतीने इतका अंधार होत जायचा कि तो बल्ब हि तेवढा प्रकाश नाही पाडायचा.

तुला बघून फक्त एक जगायची इच्छा असायची. तू नसता तर मी जगायची काही कारणच उरली नव्हती. कित्येकांनी मला जवळ घेतल आहे फक्त नजरेने नजरेत त्यांच्या. कित्येकांच्या शेजारी मी झोपलेली दिसली आहे दोन लोकांच्या गप्पांत रंगलेल्या. मी तरी सगळ गप्प गिळून त्याच लोकांसमोरून तुला घेऊन गेली आहे बाळा. आज तुला मोठ झालेलं बघून तीच लोक म्हणतात, दिवस किती भरा-भरा जातात. किती हा मोठा झाला. दिवस भराभरा गेले नाहीत. मी ते दिवस विसरू शकत नाही. पण त्या दिवसात मी कोणाकडेच लक्ष दिल नाही. कोणत्याच मोहात बळी पडले नाही. मीही स्त्री आहे.

तू आत्ताशी एकविशीत आहेस. तर तुला गर्लफ्रेंड वैगरे असावी अशी इच्छा होते आहे. तुझ वय आहे इतक मी तर माझ शरीर, कोणत्याही पुरुषाच्या स्पर्शाशिवाय जपलं आहे. जपलं कसल व्यर्थ घालवल आहे. मला हि इच्छा झाली या दिवसात. नाही अस नाही. पण तुला समोर बघून तो मोह टाळत राहिले. तुझ्या भविष्यात तुला कुणी माझ्यामुळे कमीपणा द्यायला नको म्हणून मी मला या सगळ्यापासून दूर ठेवत गेले. तुला मोबाईल, गाडी इतक्यात घेऊ शकत नाही महागडी पण घेऊ शकले असते. नाही अस नाही. पण त्यासाठी तुझ्या आईची तुझ्या समोर मान झुकलेली राहावी हे तिला नको होत. सगळे मोह, प्रेम, आधार सगळा मी विचारापलीकडे नेऊन ठेवला. सगळ्या त्या दिवसांना वाढत्या वयासोबत मी विसरत गेले. एवढासा होतास तू. दोन तळहातावर मावणारा. आता तुला जवळ घेताना पण मला माझी ताकद कमी वाटते. किती मोठा झालास नारे माझ्या बाळा.

या समाजात राहताना तुम्ही पुरुष आहात किंवा स्त्री आहात याबद्दल वाद काहीच नाही. समाजाचे नियम पाळून किंवा धुडकावून जगणारे सगळे आहेत. आणि आणखी हि पुढे जन्माला येतील पण जेव्हा आईचा विचार येतो, बाळा, तिच्यासारख आयुष्य कुणाच्या वाट्याला येत नाही. आणि जिला नवरा नाही तिचे नवरे हे शाब्दिक खूप असतात बाहेरचे हि आणि नात्यातले हि. पण लक्षात घे तिला हि आधाराची गरज असते पण ती मोडलेल्या आयुष्याने तिच्या बाळाच्या भविष्याला आधार देत राहते. तिला हि शरीरसुखाची इच्छा आणि गरज असते, पण ती तीच शरीर कामात गुंतवून तिच्या मुलासाठी पुढची तजवीज करण्यासाठी झिजवत राहते. त्यात तिला सुख काहीच नसत. आणि एवढ सगळ करून जेव्हा मुलगा हाताशी येतो. तीच आई शेवटच्या घटकेला येऊन पोचलेली असते..      

copyrighted@2021


0 टिप्पण्या