TIME PASSED

 


वेळ तसा खूप होता माझ्याकडे, मला जगण्यासाठी. कुणाला द्यायला किंवा कुणासाठी माझा वेळ काढायला तस कारण काहीच नव्हत. तू माझ्या आयुष्यात आलीस. सुरुवातीला ओळख होती. मैत्री कधी झाली काय माहित पण प्रेम झाल तेव्हा हळू हळू कळायला लागल होत. मलातरी. तू सांगत नव्हतीस. अखेर दीड महिन्यानंतर मी तुला कबुली दिली. त्या नंतर होकार द्यायला तू आणखी एक महिना लावलास. तुझा हि होकार आला आणि मग सगळच माझ आयुष्य बदलल. सकाळी उठल्यावर फेसबुकवर व्हिडीओ बघायचो. मग चहा वैगरे प्यायचो. माझ्या स्टोरी किती जणांनी वाचल्या काल, ते बघायचो. मग आवरून ऑफिसला जायचो.

पण आता डोळे उघडले कि तुझा मेसेज आलेला बघून तुला रिप्लाय द्यायचो. मेसेज तुला करून मागे येतो न येतो तोच तुझा मेसेज यायचा. आणि मग तुझ्याशीच बोलत चहा व्हायचा. अंघोळ करताना पण मोबाईल बाथरूममध्ये असायचा. ओल्या हाताने मेसेज करताना कित्येकदा स्पेलिंग चुकायचे. पण चुकलेल्या शब्दातले भाव मात्र तू नेमके हेरायचीस. तिथून मग ऑफिसला जाताना पण सफर तुझ्याशी बोलत व्हायची. एरवी ऑफिसला लवकर जायचो. पण तुझ्याशी बोलता जास्त याव म्हणून लांबच्या रस्त्याने जायला लागलो. ऑफिसमध्ये परवानगी नव्हती मोबाईल वापरायची म्हणून जी-मेल वरून तुला मेल करायचो. जास्त तुझी आठवण आली तर माझ्या वेबसाईटवरून तुला डायरेक्ट मेसेज करून फक्त तुझ्याशीच बोलायचो. पण बोलायचो. कामाचा वेळ, ऑफिसचा वेळ, माझा वेळ फक्त तुलाच द्यायचो.

जेवताना दुपारी पण एक एक घास मोजून खायचो. तू सांगायची. समजवायची इतकी कि वाटायचं तूच भरवत आहेस मला. खर सांगू त्या सहा महिन्यात माझ वजन वाढल होत. मनापासून जेवलो होतो मी. जेवण झाल कि पुन्हा काम करत तुझ्याशी बोलत संध्याकाळ कधी झालीय समजायचं नाही. लख्ख प्रकाशाच्या ए.सी. ऑफिसमधून जेव्हा बाहेर यायचो गरम वाफा अंगावर आणि डोळ्यासमोर रस्त्यावरचा पिवळसर अंधार यायचा तेव्हा कळायचं कि बाबा संध्याकाळ झाली आहे. इतका मी तुझ्यात हरवलेलो असायचो. बर बाहेर येऊन पण मी मला सापडायचो कुठ ? गाडीला चावी लावली आणि गाडी सुरु केली कि तुझा कॉल यायचा. तिथून बोलयला सुरुवात केली कि गाडी पुन्हा लांबच्या रस्त्याने घराकडे जायची. उशिराने घरी आल्यावर थोड आवरल कि मग तुझ्याशी बोलून मग काहीतरी नवीन वेबसाईटवर लिहायला बसलो कि सगळ मन मोकळ असायचं. तुझ्या नादात सहा महिने ते मी काहीही लिहील नव्हत. सगळ सगळ मन मोकळ होत माझ. रोज लिहायचा प्रयत्न करायचो आणि रोज तसाच लिहायचा प्लान सोडून तुला कॉल करून तुझ्याशी बोलून मग जेवण करून मग रात्री पुन्हा झोप येई पर्यंत तुझ्याशीच बोलायचो. झोप लागली माझी कि तू कॉल करून मला उठवायचीस आणि मला पुन्हा बोलायाला लावायचिस. मग खूप वेळ बोलून जेव्हा रात्रीचे एक दोन वाजायचे आणि मला झोप सहन व्हायची नाही तेव्हा दोघ हि बोलन थांबवून झोपायचो. आणि रात्र ती थोडीशी लगेच सकाळ होऊन जायची आणि तुझा मला मेसेज यायचा.

काय बोलायचो आपण ? माहित नाही. मी कमी पण तू जास्त बोलायचीस हे हि विसरता येत नाही. तुझा पहिला हाय मेसेज ते शेवटचा बाय अजून जसाच्या तसा लक्षात आहे. कोण म्हणत खर प्रेम फक्त मुलीच करतात ? मुल हि प्रेम करतात मुलींपेक्षा जास्तच. बस व्यक्त करताना कुठेतरी मुल कमी पडतात. प्रेम मिळवण्याचा हट्ट जास्त करतात. त्यात कुठे चुकतात. प्रेमाला मुकतात. पण प्रेम जराही कमी होऊ देत नाहीत. विसरू देत नाहीत. मीही नाही विसरलो. पण गेले दोन वर्ष मी विसरलो तुला. मुद्दामहून. कारण लिहायला सुचत नव्हत. जो पर्यंत माझ्या लक्षात होतीस. आता तुला विसरलो तर बघ लिहायला खूप सुचतय. माहित आहे मला तू मला वाचत नाहीस. पण म्हणून मी लिहायचं सोडत नाही. तू आठवतेस कधी कधी. पण तुझा राग येत नाही. प्रेम ? ते हि येत नाही पण हा गेलेला वेळ तुझ्यासोबतचा तो गेलाच. माणूस मरून जावा तसा. कधी न परत येण्यासारखा. त्याच दुःख आहे. त्याचा त्रास होतो. त्याच मी आता काय करू ????    

copyrighted@2021

1 टिप्पण्या