आई असतेच सोबत पण..

 

प्रत्येक घटनेला आता आई आठवते. चपातीचा आकार जरा जरी गोलाकार नसला तर किती ओरडायची. दोन अडीच मिनिट लाटून केलेली चपाती पाटावरून उचलून त्याचा गोळा बनवून पुन्हा लाटायला लावायची. भाजीत मीठ कमी पडल आणि  ज्यादाच आणून तिच्या ताटावर धरलं तर रागावायची. ताट बाजूला घेऊन मीठ नाकारायची. सकाळी उठल्यावर मोबाईल, आरसा या दोन गोष्टींपासून लांब रहायला सांगून आधी घर साफ करायला सांगायची. रोज मी सहाला उठते. तरी लवकर उठ म्हणून बोलययची. मला जाग तिने सकाळी भांडी घासायला सुरुवात केली की, त्या आवाजाने यायची. माझा अलार्म तोच होता. सोफ्यावर वाकड तिकडं बसलं की अदब तिनेच शिकवली ते पण ओरडून. काम मी ठीक नाही अगदी बरोबर तिला पाहिजे असायचं तसच झालं की मग पुन्हा ती लाडाने प्रेमाने बोलायची. कधी तिचा राग जास्त वेळ टिकला नाही आणि म्हणूनच माझी काम ही जास्त वेळ माझ्या अंगवळणी पडली नाहीत.
तरी मी करायचे. कधी कंटाळा आला तर चाक-चूक करायचे. पण आईला बघून करू वाटायचं. तिच्यासाठी. तीच कौतुक ऐकण्यासाठी. उन्हाळ्यात ऊनच असत फक्त. पण उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होत. फ्रिजमध्ये ठेवलं तरी काही न काही खराब होत. हे माहीत नव्हतं ते तिने शिकवलं. पावसात कपडे वाळत नाहीत तर कपडे पिळण्याची पद्धत पण तिने शिकवली. हिवाळ्यात गरमागरम नवीन पदार्थ सांगून माझ्याकडून करवून घेतले. हे सगळं ह्या सगळ्या सवयी आई तू मला लावल्यास. जन्मापासून कळेपर्यंत तू मला तुझी सवय लावलीस. आई आठवतय माझं लग्न होत तू दोन दिवस आधी बोलली होतीस, मी सांगितलंय तुला तस वाग तिथे. ते कसं पण वागायला आपलं घर नाही. काही चुकलं कमी पडलं राहील तर बोलतील आईने काय शिकवलं नाही पोरीला या. त्या शब्दाचा मान राखत मी या घरात रुळून गेले. या घराची ही सवय लागली. जशी आपल्या घराची लागलेली. आणि अजून आहे. तुझी ही सवय होती आई मला. का सोडून गेलीस ? मला बोलायचीस चांगल्या सवयी लावून घ्यायच्या शरीराला. लावल्या की त्या मोडायच्या नाहीत. अगदी काही ही झालं तरी. तुझी सवय होती मला. काय  करू आता मी ?  आई  असतेच सोबत पण कुणाला सांगताना "नाही" म्हणूनच सांगावं लागत मला. जीभ रेटत नाही खोट बोलायला पण खोट बोलावत लागत मला. चपात्यांचे आकार बदलले तरी पुढच्या चपातीचा गोळा पाटावर यायला उशीर करत नाही. सगळा संसार सुरू असला तरी आई तुझी सारखी बडबड, चिडचिड, आणि प्रेम कुठं समोर जाणवतच नाही. सकाळी तू स्वप्नात आलीस माझ्या. ध्यानी ना मनी, मला म्हणालीस काळजी घे. आणि निघून गेलीस. माझी मला काळजी घेता आली असती तर मी तुझ्या पोटी जन्म का घेतला असता आई. 


0 टिप्पण्या