LOCK SCREEN

 

कॉम्प्युटरच्या प्रकाशात आजूबाजूचा अंधार कळला नव्हता. काम उरकून एकदाच शांत झोपायचं ठरलेलं. आत्ताशी नऊ वाजलेले पण गेले तीन चार आठवडे झोप काय ती नीट झाली नव्हती त्यामुळे मग काम पटपट उरकून लवकर झोपायच्या तयारीत असताना गरम व्हायला लागल. खोलीतली खिडकी उघडी होती तिरकी. पण वार त्यातून यायचं नाव घेत नव्हत. मग जेव्हा पंखा सुरु करायला खुर्चीवरून उठलो तर डोळ्यापुढे अंधारीच आली. एकतर एकसलग स्क्रीनसमोर तोंड करून बसल्यामुळे आणि तिथून उठून खोलीतल्या अंधाराने डोळ्यांना त्रास झाला त्यामुळे. नक्की डोळ्यापुढे अंधारी आली का भुकेमुळे चक्कर आली समजल नाही पण झाल तसच काहीस. चाचपडतच भिंतीजवळ गेलो. अंदाजाने बटन दाबल आणि पंखा सुरु झाला.

हा... बर वाटल. पुन्हा खुर्चीवर येऊन बसलो. डोळ्यावरून हात फिरवून पुढच काम करायला कि-बोर्डवर बोट ठेवल आणि पंखा बंद झाला. यु.पी.एस.वाजायला लागला. लाईट गेलेली. डोक फिरलं. पण उरलेल्या थोड्यावेळात काम होईल तेवढ करून ठेवायचं म्हणून पुन्हा लक्ष कामाकडे द्यायला गेलो आणि मोबाईल वाजला. कॉल आलेला. पुण्यातल्या एकाचा. कधीतरी एकदा त्याच्यासोबत त्याच्या प्रोजेक्टवर काम केलेलं. तेव्हा त्याच्याशी चांगली ओळख झालेली. माझ्या लक्षातून ते गेलेलं पण मी केलेल्या मदतीमुळे त्याच्या लक्षात मी पक्का होतो. त्याचा कॉल आलेला बघून मी तो उचलण्याचे कष्ट घेतले नाही. कारण त्याच्याशी बोलण्यात वेळ गेला असता तर तो पर्यंत कॉम्प्युटर बंद झाला असता. आणि या माझ्या विचारात मोबाईल वाजायचा बंद झाला. मला बर वाटल. आणि मी पुढे लक्ष दिल तर पुन्हा मोबाईल वाजला. म्हणून मग मी मोबाईल हातात घेतला. कॉल उचलला.

मी : हेल्लो.

तो : हाय, सर बिझी आहात का ? काय कुठे आहात संपर्कात नाहीत. लक्षात आहे ना मी तुमच्या ? तुम्हाला आमंत्रण द्यायचं होत म्हणून कॉल केले एकसलग माफ करा हं.

मी : अरे काही हरकत नाही. आणि तू लक्षात आहेस. लक्षात ठेवण आणि विसरून जाण ह्या गोष्टी फक्त बोलायच्या असतात. मुळात कुणी काहीच विसरत नाही. आणि ज्या गोष्टी विसरलेल्याच नसतात त्या आठवण्याची धडपड कोण बर करत असेल ? बोल कसल आमंत्रण आहे ?

तो : माझ लग्न ठरल अखेर. पाच सहा मुलींशी जुळवून बघितलेलं पण जुळल नाही. आईला ओळखता तुम्ही माझ्या, तिचा स्वामींवर खूप विश्वास आहे, तिला वाटत सगळ कस पत्रिका वैगरे बघून कराव. देवाधर्माच कराव. त्या पत्रिकेच्या नादात बघितलेल्या मुलींशी माझ जुळल पण पत्रिका जुळली नाही त्यात दोन वर्ष गेली आणि एका मुलीच स्थळ आल. तीच माझ जुळल आणि पत्रिका पण. आता येत्या तीस जूनला आमच लग्न आहे. त्याआधी या महिन्यात आमचा साखरपुडा आहे. ठराविकच लोकांना आमंत्रण दिलय. तुमच्यामुळे तर माझी हि नोकरी टिकलीय. म्हंटल तुम्हाला चुकवून चालणार नाही. म्हणून आज वेळ काढून कॉल केला.

मी : खूप छान झाल. अस हि आईंना तुझ्या लग्नाची काळजी होतीच. कशा आहेत त्या ? आणि बाबा कसे आहेत ?

तो : होना. आता आनंदात आहे. सगळ्यांना सांगत असे कॉल करून लग्न ठरल माझ ते. ती आता आहे आनंदात. सावरलीय या आनंदाने. बाबा गेले चार महिने झाले.

मी : कसे काय ?

तो : आजारी होते. छातीत वैगरे दुखत असायचं अधून मधून. औषध सुरु होती पण अचानक त्यादिवशी सकाळी पोहे खाल्ले माझ्यासोबत. मी कामाला गेलो आणि वाटेत असतानाच आईचा कॉल आला. बाबांना काहीतरी झालय. घरी आलो मी तसा दवाखान्यात गेलो पण उशीर झालेला. तेव्हापासून आई अशी अलिप्त झालेली. सगळ्या गोष्टींपासून. आत्ता कुठे सावरलीय. मग आईला हि मी काही बोललो नाही. तिला आवडली मुलगी मग मीही म्हंटल तिच्या आनंदासाठी कराव लग्न.

मी : खूप चांगली गोष्ट केलीस. काळजी घे आईंची आणि स्वतःचीहि. कारण आता अजून एक जबाबदारी वाढणारे तुझी. मुलगी कुठली आहे ?

तो : इथलीच पुण्यातली. नोकरी करते. आय.टी. मध्ये. माझ्याहून एक वर्षाने लहान आहे. तीही कमावती आहे आणि मीही त्यामुळे सगळ व्यवस्थित जुळून आल आहे. तिच्या हि घरी परिस्थिती उत्तम आहे. आई वडील लहान भाऊ सगळ ठीक आहे. त्यांनी हि लग्नाची घाई दाखवली. पण म्हंटल पैशाची जुळवाजुळव करायला थोडावेळ हवा म्हणून मी काही महिने मुदत मागितली आणि तिने तीस जून तारीख दिली. आम्ही पत्रिका बघितल्या. जुळल्या आणि लग्नाची तारीख हि शुभ आहे म्हणून मग तीच पक्की केली.

मी : खूप छान झाल. माझा वाढदिवस हि त्याच दिवशी असतो. खूप चांगल आयुष्य जगा. नक्की येईन मी लग्नाला. आणि साखरपुड्याला हि.

तो : मला खूप आनंद होईल माझ्या आनंदात तुम्ही सहभागी झालात तर सर.

मी : नाव काय आहे होणाऱ्या बायकोच ?

तो : सायली. मला आवडत हे नाव म्हणून लग्नात हेच ठेवणारे.

मी : बर.

तो : मी माझ्या जवळच्या लोकांबद्दल सांगितल तिला. तेव्हा असच एकदा तुमचा विषय निघाला आणि मी तिला तुमच्याबद्दल सांगितल. तेव्हा ती म्हणाली कि तुम्हाला हि बोलवायचं म्हणून मग मी कॉल केला. आत्ता मगाशीच तिचा मेसेज आला तेव्हा तिला सांगितल कॉल करतो त्यांना आमंत्रण द्यायला. म्हणून मग तुम्हाला कॉल केला.

मी : मी नक्की येईन.

तो : सर, मला तुमच्या स्टाईल मध्ये एखादी कविता लिहून द्याल का आमच्या दोघांवर ?  

मी : नक्की.. मला दोघांचा फोटो पाठवा. पाठवेन वेळ मिळाला कि.

तो : हो चालेल सर. बाकी तुम्ही कसे आहात ?

मी : मी एकदम ठीक. कामं सुरु आहेत. त्यामुळे बाकी जास्त काही करण्यात बघण्यात वेळ पुरत नाही.

तो : तुम्ही कधी करणार लग्न सर ?

मी : हातातली काम संपली कि. लग्न झाल तर बायकोला वेळ तर देता आला पाहिजे मला. त्यासाठी हा आधीचा वेळ कामात गुंतवलेला रिकामा करतोय. लग्न झाल कि तिच्यात आणि संसारात गुंतवायचा. आयुष्यभरासाठी.

तो : भारी विचार आहेत.

मी : हम.. बाकी मी येणार आहे पुण्यात काही दिवसात तेव्हा भेटून जाईन.

तो : नक्की भेटू सर. आणि महत्वाच राहील सर. साखरपुडा पुढच्या आठवड्यात आहे. बारा तारखेला. नक्की या. मी पत्ता मी पाठवतो तुम्हाला. रहायलाच या. आईला हि छान वाटेल.

मी : हो प्रयत्न करेन. पाठव मला.

तो : चला तुमचा वेळ घेत नाही तुम्हाला माहिती पाठवतो लगेच. ठेवतो सर. भेटू लवकरच.

मी : हो नक्की. काळजी घे.

कॉल कट झाला. मोबाईल पुन्हा टेबलावर ठेवला. आणि पुन्हा वाजला. त्याचा मेसेज आलेला. त्याने पाठवलेला पत्ता वाचला आणि एका मागोमाग तीन फोटो आले त्या दोघांचे. आणि आता तर पूर्ण अंधार झाला डोळ्यांपुढे. एव्हाना कॉम्प्युटर आणि यु.पी.एस. बंद पडला. आणि फोटो बघून मोबाईलची स्क्रीन बंद केली. पुन्हा एक मेसेज आला आणि स्क्रीन उघडली गेली. त्याने जो फोटो पाठवलेला त्यातल्या “तिचा” फोटो या मोबाईलच्या लॉकस्क्रीनवर दीडवर्षापासून होता. आणि त्या भर अंधारात डोळ्यांत पाण्याची भर झाली... तिच्या आठवणीत......

Copyrighted@2021

  


0 टिप्पण्या