कैफती समोरची खिडकी.... 
भाग ०१
अर्णव मोबाईलमध्ये ब्लॉग वाचत बसलेला. आज रविवारमुळे नोकरीला सुट्टी होती त्याला. अश्लेषा केस पुसत बाहेरच्या खोलीत आली.
अश्लेषा : आवरा तुमच. माझ झाल कि जाऊ आपण.
अर्णव तिला बघतो. ती त्याला बघते.
अश्लेषा : काय ?
अर्णव : काही नाही.
अश्लेषा : नक्की न ?
अर्णव : हो.
ती आरशाकडे तोंड आणि अर्णवकडे पाठ करून केस पुसत होती. अर्णव तिच्या एकसारख्या हालचालीला बघत होता. मोबाईल बाजूला ठेवत तो तिच्या जवळ गेला. आणि आरशातून तिच्याकडे बघत,
अर्णव : अस म्हणतात लग्नानंतर सहा महिने, वर्षभरच सगळ सुंदर वाटत. तो तिला. ती त्याला. आपल्या लग्नाला आता दोन वर्ष होतील. तरी मला तू अजून सुंदर वाटतेस. आणि पुढे अजून तीस-चाळीस वर्ष वाटशील.
अश्लेषा : खरच ?
अर्णव : हो. या सुंदर डोळ्यात मी मला दिसतो ना खर सांगू खूप भारी दिसतो मी. या ओठांच्या चवीवर तुझ्या कायम मी फिदा आहे. तुझ्या या मऊ हाताच्या स्पर्शाने मी कायम मला नाजूक समजत राहतो. या सुंदर चेहऱ्यावर सोडलेले मोकळे केस, ऊफची आठवण करून देतात. माझ्या आयुष्यातल्या तुझ्या प्रेमाचा कैफ, कधी विरस नाही होणार आणि होऊ नये असच वाटत. हा कैफ कैक वर्ष असाच टिकवून मला त्यात रमून जायचं आहे.
अश्लेषा मागे फिरून अर्णवकडे बघते. अर्णव तिला बघतो. तिला जवळ घेतो. दोघ शांत श्वास घेत एकमेकांच्या मिठीत उभे असतात. ती मिठीतून निघून आत जाते. अर्णव आरशात बघून परफ्युम शर्टवर मारतो. केसातून जरासा हात फिरवल्यासारख करतो. ती थोड्यावेळात आतल्या खोलीतून आवरून येते. दोघ गाडीत बसतात.

गाडी एका दवाखान्यासमोर थांबते. दोघे आत जातात. डॉक्टर अश्लेषाला तपासून तिला काही गोळ्या देतात. दोघे पुन्हा गाडीत बसून पुढे निघून जातात.
अर्णव : काय त्रास होतोय का ?
अश्लेषा : नाही मळमळतय जरास.
अर्णव : काय खायचं आहे का ?
अश्लेषा : नको. कस तरी होतय. मी ती गोळी खाते डॉक्टरांनी दिलेली पित्ताची.
तिने पित्ताची गोड गोळी तोंडात ठेवली.
अर्णव : आनंद पण होतोय पण वाईट पण वाटत तुझा त्रास बघून.
अश्लेषा : असुदे. त्रासाशिवाय आनंद नाही. आपल बाळ आल कि सगळ विसरून पण जाईन मी हा त्रास.
अर्णव : पण तोपर्यंत त्रास होणारच ना.
अश्लेषा : असुदे.
तिने त्याच्या हाताला धरल. त्याने हि तिच्या हाताला घट्ट पकडल.
दोघे एका अपार्टमेंटच्या जवळ पोचले.
अर्णव नारायण राव नावाच्या एका माणसाला कॉल करतो.
अर्णव : आम्ही आलोय इथे डायमंड अपार्टमेंटपाशी.
नारायण : आलात का तुम्ही. मी शेजारच्याच सोसायटीमध्ये आहे. आलोच. मला एक दहा मिनिट द्या. आलोच. तुम्ही कसे आलायत ?
अर्णव : चारचाकी आहे.
नारायण : हा मग ठीक आहे. आलोच.
अर्णव : हो.

अर्णव आणि अश्लेषा दोघ नारायण रावची वाट बघत थांबतात.
भाग ०२
बारा मिनिट वाट बघत थांबून दोघांना कंटाळा आला. गाडी तापल्यामुळे दोघांना गरम होत होत. त्याने ए.सी. लावला. नारायण तिथे आले. गाडीच्या काचेला त्यांनी हाताने थाप दिली. अर्णव गाडीची काच खाली करतो.
नारायण : अर्णव ?
अर्णव : हो.
नारायण : चला.
अर्णव आणि अश्लेषा गाडीच्या बाहेर येऊन नारायणच्या मागे चालत असतात.
नारायण : तुमच्या घरापासून किती वेळ लागला इथे यायला ?
अर्णव : अर्धातास लागला.
नारायण : तरी तुमच्या घरापासून इकडे यायला माझ्यामते रहदारी सहसा नसते.
अर्णव : हो. म्हणून तर लवकर पोचलो. नाहीतर इकडच्या बाजूला रविवारी वैगरे आलो ना दुसऱ्या रस्त्याने तर एक-सव्वा एक तास जातो.
तिघे लिफ्टमधून बाराव्या मजल्यावर गेले.
नारायण : सोसायटी असल्यामुळे इथे सगळ्या अपार्टमेंटस जवळ जवळ आहेत. पण तुम्हाला ज्या दाखवणार आहे ना रूम्स तिथे सगळीकडून प्रायव्हसी आहे. तुम्ही बघाल तर म्हणाल ह्याच रूम्स बेस्ट आहेत.
अर्णव : बर.
नारायण : चला सर.
तिघे लिफ्टमधून बाहेर आले.
नारायण हातातल्या चावीने कुलूप उघडतात. सरळ दोघांना आत जाऊन मोठी बेडरूम दाखवतात. आतल्या बाल्कनीतून दिसणार नजरेच्या रेषेतल शहर आनंदाने दाखवतात. मग किचनमध्ये येऊन किचन मधला उजेड आणि खिडकीतून येणारी खेळती हवा याची सगळी माहीती सांगत किचन ट्रोली, वाटर प्युरीफायर मशीनची माहिती, बाजूला असलेल्या बाथरूम, त्यात असलेल गिझर वैगरे दाखवून बाहेरच्या हॉलमध्ये येतात.
नारायण : साहेब, आवडल्या का रूम्स ? कार्पेट एरिया धरून साडेसातशे स्क्वेअर फुट आहे. पण त्याहून मोठा वाटतो. हो न ?
अर्णव : हो मोठी आहे जागा.
अर्णव खिडकी जवळ गेला आणि त्याने आधीचा जो पडदा होता तो बाजूला सारला आणि त्याने समोर नजर टाकली.
नारायण : पाण्याची इथ कमतरता नाही. दोन बोअर मारलेत खाली त्यामुळे पाणी चोवीस तास असत. लाईटपण कधीच जात नाही इथे. वर दोन पवनचक्क्या आहेत. लाईट गेली तर त्याची लाईट सुरु होते. आजूबाजूला आपल्या तोलामोलाची लोक राहतात. कुणी कुणाच्यात जात नाही. कुणी कुणाशी वाद घालत नाही. एकदम सुकून आहे इथे. रात्री गाड्यांचा आवाज फारसा येत नाही कारण आतल्या बाजूला आहे अपार्टमेंट. सगळ कस तुम्हाला हव तस आहे पण कस आहे ना, सगळच आपल्याला हव अस मिळत नाही. म्हणून इथे हि एक गोष्ट जरा तुम्हाला पाळावी लागेल.
अश्लेषा : काय ?
नारायण : हि खिडकी सहसा उघडी ठेवू नका.
अर्णव : का ?
नारायण : समोर एक जोडप राहत. त्यांचे वाद होत असतात रोज. आणि कधी कधी तो माणूस त्याच्या बायकोला हाणमार पण करतो. आधीचे होते त्यांनी सांगितल कि कधी कधी ते सगळ्या खिडक्या उघड्या ठेवून सेक्स पण करतात. इथे आधी राहायचे त्यांचा पाचवीतला मुलगा होता त्याने दोनदा त्यांना त्या अवस्थेत बघितल म्हणून तर त्यांनी ह्या रूम्स सोडल्या. आता तुमच्यात लहान कुणी नाही. त्यामुळे काय टेन्शन नाही पण तरी काळजी घेतली तर तुम्हाला त्रास होणार नाही.
अर्णव : बाकीच्यांना त्यांचा त्रास होत नाही का ?
नारायण : याच रूम्सना फक्त त्यांची खिडकी आणि त्यांच्या घरातल स्पष्ट दिसत बाकीच्यांच्या खिडक्या या वेगळ्या दिशेला आहेत.
अर्णव : रूम्स चांगल्या आहेत. ती समोरची खिडकी. ती सोडली तर सगळ चांगल आहे. आगाऊ भाड किती द्यायचं तुम्हाला ?
नारायण : आगाऊ अस नाही या महीन्याच बारा हजार भाड आणि माझे आठ हजार कमिशनचे.
अर्णव : उद्या देतो.
नारायण : चालेल.
अर्णव : अश्लेषा निघायचं ?
अश्लेषा : हो.

तिघे पुन्हा दार बंद करून लिफ्टने खाली आले. नारायण निघून गेला अर्णव आणि अश्लेषा घरी निघून आले. 
भाग ०३
घरी...
अश्लेषा बेडवर उशीला टेकून बसलेली. खालच्या बाजूला अर्णव त्याच्या शर्टला इस्त्री करत होता.
अश्लेषा : काय आजकाल चाललय लोकांच. खरच अवघड आहे.
अर्णव : काय झाल ?
अश्लेषा : अरे कॉलेजमध्ये शिकणारी पोर घरातून विरोध होईल त्यांच्या प्रेमाला म्हणून आत्महत्या केली त्यांनी. असल कसल हे प्रेम. केल तर ते निभवायचं ना. हे अस अर्धवट आयुष्य जगून प्रेमाला पूर्णत्व मिळत का कुठे. आणि हे अस जीव देऊन कुणाच प्रेम सिध्द होत ?
अर्णव : पण हेच तर खर प्रेम आहे ना.
अश्लेषा : कस काय ?
अर्णव : सोबत राहणारे कितीपत खर प्रेम करतात आजकाल एकमेकांवर ? देवळातला देव दगडाच्या पायात तिथच अडकून राहतो. भले त्याच पावित्र्य तिथ टिकून नसेल पण माणसाला वाटत आपल्यासाठी तो देव पावतोय. आणि देव वाट बघत असतो त्या मूर्तीतून बाहेर पडण्यासाठी मिळणाऱ्या योग्य कारणाची. आहे जिवंत म्हणून देवाला मानायचं आणि माणूस करतोय सेवा म्हणून देवाने माणसाला पावायचं असच नात आहे. आणि तसच माणसा-माणसात सध्या सुरु आहे. कित्येक नवरा बायको फक्त नावाला नवरा बायको आहेत. बायकोच मन कुणात अडकलेल असत. नवरा कुणाच्या तरी मागावर असतो. घरी मात्र दोघ असेच असतात दोन्हीकडे दोन तोंड करून. आणि जगासमोर उत्तम जोडी बनून वावरत असतात. सगळ खोट. काल्पनिक असत. अशात कुणी कुणावर प्रेम करत आणि विश्वासाने एकमेकांसाठी जीव देत खरच प्रेम आहे ना ते. जिवावरच्या शरीरावर प्रेम करणाऱ्या पिढीत कुणी अस जीवावर प्रेम करणार असेल तर त्यांच्यासारख नशिबी कोण नाही. पण म्हणून जीवावरच प्रेम जीवाशी खेळून सिध्द करण चुकीच आहे. आणि त्यांना वाटल होत फक्त कि त्यांचे आई वडील परवानगी देणार नाहीत त्यांच्या प्रेमाला...... पण काय माहित दिली असती तर ? किंवा यांनी पण प्रयत्न करायला हवे होते ना परवानगी मिळवायला ?
अश्लेषा : बघ ना. अवघड आहे. सगळ.

अर्णव : पण एक गोष्ट आपण म्हणतो कि आजकाल जगातून खर प्रेम संपत चाललय. पण रोज पेपरमध्ये अशा प्रेमासाठी जीव देणार्यांच्या किमान एक दोन तरी बातम्या असतातच. दिवसाला एक म्हंटल तर वर्षाला तीनशे पासष्ठ. आणि अशी गणती केली तर एक दिवस सातशे करोड आजची लोकसंख्या आहे इतकी संख्या फक्त खर प्रेम करणाऱ्यांचीच असेल.
अश्लेषा : होना. कसल भारी ना ?
अर्णव : हो. आपल पण प्रेम आहे खर पण ते सिध्द करायची गरज नाही.
अश्लेषा : हो.
अर्णव : आय लव्ह यु बायको.
अश्लेषा : आय लव्ह यु हबुडी.
अर्णव : तुझ्या त्या ड्रेसला इस्त्री करायचीय ना ?
अश्लेषा : मी करते नंतर.
अर्णव : आता इस्त्री आहे गरम तर करतो ना. कुठय सांग ड्रेस ?
अश्लेषा : आत कपाटातच आहे. काळा.
अर्णव जाऊन ड्रेस आणतो आणि इस्त्री करायला लागतो.
अर्णव : तुला खरच आवडल्या का त्या रूम्स ?
अश्लेषा : हो खूप. तू नसलास कधी तर बेडरूमच्या बाल्कनीतून बघत बसेन नजरा. किती मस्त दिसत ना सगळ शहर तिथून. आपली आरामखुर्ची ठेवू तिथे. बसेल न तिथे त्या जागेत ?
अर्णव : हो. मग पैसे देऊन टाकू ना त्यांना ?
अश्लेषा : हो.
अर्णव : चालेल देतो उद्या. बर मला सांग काय बनवू तुला खायला ?
अश्लेषा : मला ना मिरचीची भजी खाऊ वाटतेय.
अर्णव : बर थांब. मी खालून लादीपाव घेऊन आलो. आणि लगेच बनवतो. ओके ?
अश्लेषा : हा. लवकर बनव...

अर्णव तिच्या ड्रेसची घडी घालून खाली दुकानात जातो. 
 भाग ०४
अर्णव लादीपाव घेऊन आला. आत जाऊन भजीसाठी पीठ बनवून मिरची त्यात बुडवून भजी तळताना अश्लेषा आत आली, आणि खुर्चीवर बसली.
अर्णव : अग, मळमळ करेल तुला वासाने.
अश्लेषा : नाही या वासाने उलट भूक वाढलीय.
अर्णव : हा पहिला घाना झालाय. थांब हा.
त्याने तिला भजी एका ताटलीत देऊ केल्या. पावासोबत भजी खात ती तिथेच अर्णवला बघत होती. अर्णवने अजून भजी दिल्या पण दोनच घेऊन तिने बाकीच्या भज्यांना नकार दिला. त्या अर्णव तिच्यासोबत खात बसला.
अर्णव : झाल्यात न चांगल्या ?
अश्लेषा : खूप मस्त. अशाच हव्या होत्या मला.
अर्णव : तुला जे जे खाऊ वाटेल ते मला सांग. सगळ करून देईन तुला.
अश्लेषा : हो. आपल घर कधी होईल रे ?
अर्णव : हे एक एवढ वर्ष तुला बोललो न मी, बाळ आपल नवीनच घरात वाढेल. काही दिवस फक्त आपण त्या नवीन रूम्स घेतल्या तिथे राहू मग मी लोन काढून आणि सातारची जमीन विकून तिथं घर घेईन. थोडा वेळ दे मला फक्त.
अश्लेषा : हो दिला. आय लव्ह यु.
अर्णव : आय लव्ह यु टू.
अश्लेषा : आपण उद्या जाऊ पैसे द्यायला भाड्याचे. मला ती बाल्कनी आवडली. तिथे बसेन मी. आपण दोघ बसू चालेल ?
अर्णव : हो. चालेल उद्या जाऊ सोबत.
दोघांनी भजी खाल्ली. अर्णव तिला घेऊन बेडरूममध्ये जाऊन झोपवतो. आणि स्वतः आत जाऊन भांडी घासत बसतो.
संध्याकाळी..... रस्त्यावरून चालत असताना.....
: तुझ लग्न झाल तर तू इथेच असणार आहेस, माझ तस नाही. मी कुठ असेन मला माहित नाही. आणि मला माहित पडल तरी तुला ते कळवण मला जमणार नाही. भीती, जबाबदारी, बंधन सगळ लादल जाईल माझ्यावर. अशात माझा संसार आणि माझ प्रेम यात मला संसार सांभाळावा लागेल. तेव्हा उशीर झालेला असेल. आणि एक सांगू शब्दांचा खेळ म्हण किंवा वस्तुस्थिती म्हणून बघ. उशीर हा कायम वेळेत होतो. आणि वेळ कायम उशिरा येते. तेव्हा वेळ गेल्यावर काहीच होऊ शकणार नाही. जे काही आत्ता सगळ करू शकतो आपण. आपण आपल प्रेम व्यक्त नाही सिध्द करू शकतो. लग्न करून. नववीपासून तूझ माझ प्रेम आहे.
: पहिल प्रेम.
: पहिलं प्रेम कधी मिळत नाही म्हणतात. इतके वर्ष होऊन पण आपण सोबत आहे. हि सोबत कायम टिकवायची आहे मला. पहिल प्रेम मिळत नाही आपण मिळवून दाखवायचं.
: माझ हि हेच स्वप्न आहे. मला केल तर तुझ्याशीच लग्न करायचं आहे. पण आत्ताच बघितल न माझ्या बहीणीन कसा उद्योग केला. तिने पळून जाऊन लग्न केल. त्या धक्क्यात आहे अजून आई. एकतर बाबा नाहीत त्यामुळे आईला त्रास होऊ नये कसलाच म्हणून मी काळजी घेत असतो. कारण तिच्या वयाच दुःख ती माझ्या वयाच्या मुलाशी बोलून व्यक्त नाही करू शकत. तिच्या वयाचा जोडीदार जे करू शकतो ते मी नाही करू शकत तिच्यासाठी. मी फक्त तिला सुख आनंद देऊ शकतो आणि त्याचेच प्रयत्न सुरु असतात माझे. पण नेमक दीदीने अस केल. आणि मी हि असच केल आणि आईला काय झाल तर मला नाही सहन होणार.
: पण मी पळून जाऊ अस म्हणतच नाहीये.
: मग ? घरी सांगून करायचं का ? नाही होणार... जात एक असली तरी आपली परिस्थिती सारखी नाहीये. आणि मुळात मलाच अस वाटत कि, जी तू आहेस, जशी तू आहेस त्याहून जास्त किंवा तसच अगदी तुझा मी सांभाळ करावा नवरा म्हणून. आत्तापेक्षा कमी तुझ्यासाठी करून तुला त्रासात नाही ठेवायचं मला. आणि तसे दिवस आणायला मला थोडा वेळ लागेल पण करेन नक्की. माझ घर. दोनचाकी, चारचाकी आणि पुरेसे साठवलेले पैसे सगळ मी मिळवेन आणि जास्त उशिरापण नाही. पण मिळवेन.
: माझ्याकडे वेळ नाही.
: आणि मला वेळ हवाय.
: कस शक्य आहे ? तू मुलगा आहेस तुला वयाच बंधन नाही. मला आहे.
: स्थळ आली तर नकार दे. दोन वर्ष तरी.
: मी देईन पण पुढून होकार आला तर ?
: मला काही सुचत नाहीये.
: मी तुला सुचवतेय तर ते तुला नकोय.
: बर तुला वाटत आपण तस करू.
: काय ? घरी सांगायचं ??
: हो.
: मी जाते.
: कुठ ?
: घरी जाऊन सांगते.
: लगेच ?
: हो.
आणि ती निघून गेली.
 भाग ०५
तो तिच्या मागे गेला. तिचा हात धरून तिला थांबवल.
: काय झाल ?
: आत्ता बोललीस लगेच चाललीस. नको लगेच निर्णय घेऊ कोणताही.
: मग कधी निर्णय घ्यायचा ?
: थांब ना थोडे दिवस. काहीतरी करू. होईल काहीतरी.
: पण तूच म्हणालास ना ? नकार येईल म्हणून. आणि तूच आता म्हणतोस कि काही तरी होईल. तू तुझ्या निर्णयावर ठाम रहा. मी माझ्या आहे. मी सांगते आज घरी.
: आणि ?
: जे होईल ते होईल. मारून तर टाकणार नाहीत मला पप्पा. एकतर मला ओरडतील. मग समज काढतील आणि नाहीच ऐकल मी तर दुसऱ्याशी लग्न लावतील. पण मला आता काहीतरी बघितल पाहिजे. कळतय मला तू नाही तुझ्या घरी आत्ता काही सांगू शकत पण म्हणून आले दिवस घालवून चालणार नाहीत.
: प्रेम असून चालत नाही नुसत. ते निभवाव लागत. आणि ते म्हणून नाही त्यासाठी बरच काही करून ते निभवाव लागत. कायम. सतत. आणि दररोज. आपली भेट एक दिवस नाही झाली तर आपण होणारा मानसिक त्रास सहन करतो तो एक दिवस. तेव्हा आपण सतत तोंडासमोर असू. आत्तासारखी ओढ, नसेल तेव्हा पण ते सोडून जे काही असेल ते सगळ प्रेम असेल. आणि तेच जपताना मी कुठ कमी पडायला नको इतकच वाटत मला.
: माझा विश्वास आहे तुझ्यावर.
: उगीच विश्वास ठेवला तुझ्यावर अस वाक्य आल तुझ्या तोंडून कधी तर ?
: नाही येणार.
: माणूस गरज पूर्ण नाही झाली कि बदलतो.
: त्याच असलेल कुणावरच प्रेम नाही ना बदलत. त्याच त्या व्यक्तीवर राहत ना. बस थोडाकाळ त्या प्रेमाच्या जागी राग किंवा रुसवा येतो पण त्याच्या शेवटी प्रेमच असत.
: मी घरी सांगतो माझ्या आधी. मग तू तुझ्या घरी सांग. आईने तुला बघितल आहे. ती नकार नाही द्यायची शंभर टक्के, पण जरा बहिणीच्या त्रासामुळे तिला समजावून सांगायला हव.
: बर मग तू कधी सांगणार आहेस ? तस मी माझ्या घरी सांगायला मानसिक तयारी करते. आणि ऐक.
: काय ?
: मला घरून नकारच आला तर नेशील का मला इथून घेऊन ?
: आई ?
: त्यांना पण घेऊन जाऊ.
: मी माझ्या आईला मामाकडे पाठवतो. मग आपण जाऊ.
: चालेल.
: तू नको काळजी करू.
: मला काळजी नाहीये. मला दोनच गोष्टी सध्या समजतात. एक कि माझ्यावर तुझ प्रेम आहे आणि म्हणून मला तुझी काळजी वाटते. माझी काळजी मला उरलीच नाही. ती तू घेशील अस वाटत.
: आणि त्या काळजी घेण्यात मी कमी कुठेच पडणार नाही. आणि मी कधीच कोणत्या मुलीशी लग्न करणार नाही जर तू नसशील माझ्या आयुष्यात तर.
: वेड्या अस होणारच नाही ना. आपले त्यासाठीच प्रयत्न चाललेत ना हे. मग ?
: चल मी तुला घराच्या अलीकडे सोडतो.
: चल. उद्या आपण कांदाभजी खायला जाऊ. चालेल ?
: हो.
: मला न तू बनवलेली खूप आवडते. आपल लग्न झाल ना कि तू मला दर रविवारी सकाळी चहा आणि भजी बनवून द्यायचीस, नाहीतर मार खाशील.
: हो देणार ना. मार खायला अंगात जोर नाही आला माझ्या.
दोघ एकमेकांचे हातात हात घेऊन पाय जमिनीशी रेंगाळत चालत होते.
तिच्या घराच्या अलीकडे दोघे पोचले. तिने त्याच्या हातातून हात सोडवला. त्याने पटकन तिचा तोच हात घट्ट पकडून तिला जवळ ओढून आजूबाजूचा अंदाज घेऊन पटकन तिच्या ओठांना ओठ टेकवायला गेला.
अर्णवच्या हातातून तेलकट कढई घासताना बेसिनमध्ये पडली. अर्णव ती उचलून पुन्हा घासायला लागला.

भाग ०६
कढई पडल्याच्या आवाजाने अश्लेषाला जाग आली. ती अर्णवच्या शेजारी उभी राहिली.
अश्लेषा : काय झाल ?
अर्णव : काही नाही. अग तू उठलीस का ? जा जाऊन झोप. चुकून हातातून निसटली कढई.
अश्लेषा : मी जागी असताना अस झाल असत तर मानल असत. पण मी झोपल्यावर  खिडकीतून येणार वाऱ्याचा सोडलास तर कसलाच आवाज तू होऊ देत नाहीस.
अर्णव : अग चुकून झाल. तू झोप. ऐक तुला काय देऊ का ?
अश्लेषा : नको. माझ्याशी बोल येऊन चल. ठेव बाकीच आवरायचं. नंतर आवरू आपण.
अर्णव हात धुवून तिच्यासोबत आत गेला.
अश्लेषा : कसल टेन्शन आलय का तुला ?
अर्णव : नाही.
अश्लेषा : नक्की ना ? हे बघ काय लपवू नकोस. जे असेल ते बोल. तू कितीही विचार केलास तरी त्यातून मार्ग निघणार नाही माझ्याशी बोललास तर निदान मन तरी मोकळ होईल.
अर्णव : अस काही नाही. मागच्या काही गोष्टीना आठवल कि झालेल्या चुका आणि काही करायचं उरल त्याला करण आता शक्य नाही. बर आता त्याचा काही उपयोग पण नाहीये पण तरी ते विचार येत राहतात डोक्यात.
अश्लेषा : नक्की कसल टेन्शन आहे तुला ? आपल्या बाळाच ?
अर्णव : नाही.
अश्लेषा : मग कोण काय बोलल का तुला ?
अर्णव : नाही.
अश्लेषा : आता तुला माझी शप्पथ आहे सांग लवकर काय झाल ?
अर्णव : लग्न व्हायच्या आधी माझ एका मुलीवर प्रेम होत. तिचा विचार येतो हल्ली अधूनमधून मनात.
अश्लेषा : आता आपल्याला बाळ होणार आहे अर्णव. खऱ्या अर्थाने आपला संसार सुरु झाला आहे. आणि आता तिची आठवण काढण चुकीच नाही का वाटत तुला ?
अर्णव : मी काढत नाही आठवण येते. आणि ती विसरण्यासाठी प्रयत्न केला तर पहिलं सगळ आठवत राहत. माहित नाही का अस होत. पण मला हे विचार डोक्यातून काढून टाकायचे आहेत. कसे आणि काय करून ते जातील डोक्यातून समजत नाहीये.
अश्लेषा : ऐक, माझ्याशी बोलून टाक सगळ. बर वाटेल तुला. आणि पुन्हा नाही विचार येणार.
अर्णव : नको.
अश्लेषा : का ? मी काय परकी आहे का ? बायको आहे तुझी.
अर्णव : म्हणूनच नको.
अश्लेषा : हे बघ मन मोकळ कर माझ्याकडे. जे तू सांगणार आहेस ते सगळ झालेलं असणार आहे. त्यामुळे त्याचा आत्ता आपल्या नात्यावर काही फरक पडणार नाही. आणि मीही पडू देणार नाहीये. मला फक्त इतकच वाटत कि तू असा टेन्शन मध्ये नसावस.
अर्णव : मला पण नको आहेत हे विचार पण. तिचे हे सारखे विचार का येतात याच कारण मला समजत नाहीये. ती कुठ आहे कशी आहे कुणासोबत आहे काहीच माहित नाहीये मला. लग्न झाल्यावर पण कधी तिची जास्त आठवण आली नाही. मी तुझ्यासोबत तिला अगदी सहज विसरून गेलो पण ती हल्ली का इतकी विचारात येतेय कळत नाहीये मला. खूप त्रास होतो. ती आठवणीत येतो याचा नाही. मी चुकीचा वागतोय तिचा विचार करतो म्हणून. तुझ्यासोबत असताना मी तुझा आणि आपल्या बाळाचा विचार करायला हवा.
अश्लेषा : अस काही नाहीये. तू बोल माझ्याशी. वाटेल तुला बर. आणि तुम्ही प्रेम खर केल होत का एकमेकांवर ?
अर्णव : हो. दोघांच आयुष्यातल पहिलं प्रेम होत. आणि तेच शेवट करायच्या नादात पहिल्या प्रेमाचा शेवट पण नीट करता आला नाही.
अश्लेषा : तिला हि तुझी आठवण येत असेल किंवा तिला तुझी गरज असेल म्हणून तुला तिचा विचार येत असेल. खऱ्या नात्यातला संवाद मोबाईल आणि फेसबुकने नाही होत. तो असा विचारा-विचाराने होतो.
अर्णव : हे माझी बायको मला सांगतीय. हे चुकीच आहे. जाऊदे हा विषय.
अश्लेषा : नाही. तू बोलून मन मोकळ कर तेव्हाच मला तुझ्याशी बोलता येईल. नाहीतर मनात सतत तुमचे विचार येतील आणि संशय जन्माला येईल जो कि वाईट आहे आपल्या दोघांसाठी.

अर्णव : मी तुला बघायला घरी आलेलो तेव्हा मी आणि आई आत होतो तुमच्या घरी पण बाहेर काही लोक हि होते जे आम्हाला तिथ जबरदस्ती घेऊन आलेले. 

भाग ०७
अर्णव : प्राची. शाळेपासून आम्ही एकत्र. खूप प्रेम करायचो आम्ही. आम्ही ठरवलेलं तस न करता तिने माझ्या आधीच तिच्या घरी सांगितलं. तिला तिच्या वडिलांनी खूप मारलं. पण ती ऐकायला तयार नव्हती मग त्यांनी मला धमकावल. आम्ही एक आठवडा भेटलो नाही. मी तर पूर्ण घाबरलेलो. हे अशी भांडण हाणामारी असल्या गोष्टींची मला भीती वाटते. आणि त्यांनी सोबत आणलेली पोर बघून मला भीती वाटलेली तेव्हा. रात्री दारात बसलेलो मी आकाशाकडे बघत. आणि तेव्हा समोर मला प्राची दिसली. घरी खोट सांगून मला भेटायला आलेली. तिला बघून भीती सगळी हरवली. आई आत होती. मी प्राचीला तिथंच मिठी मारली. माझ्यापेक्षा जास्त तिने मला घट्ट पकडलेल. मी दोन वेळा तीच नाव घेतलं पण ती सगळं विसरून फक्त मला कवटाळून उभी होती.
मी ही मग पुढे काय बोललो नाही. मागून एक गाडीचा प्रकाश तोंडावर पडला आणि हृद्यच थांबलं एक क्षण. तिचा भाऊ तिला माझ्यापासून ओढून घेऊन गेला. दुचाकी होती त्यामुळे ती त्या गाडीवर बसली नाही आणि तिला जबरदस्ती धरून बसायला मागे कोणी नव्हतं. त्याने तिथेच गाडी आमच्या दारात लावली आणि तिला घट्ट दंडाला धरून घरी नेलं. मी चप्पल घातली आणि त्यांच्या मागे गेलो. तिच्या घरापर्यंत. ती केव्हाच आत पोचलेली. तिचा भाऊ बाहेर आला. त्याने मला बोलावलं मी गेलो. दोघे आम्ही एकमेकांना बघत होतो. तो रागाने आणि मी भीतीने पण काहीही झालं तरी आता प्रेम व्यक्त करायचं म्हणून मी भीती घालवून ताकद मनात एकवटली. आणि तोंडातून शब्द पडणार तेवढ्यात मला मागून कुणीतरी धरलं आणि तिच्या भावाने मला बाजूची हॉकी स्टिक घेऊन त्याने मारायला सुरुवात केली. मी ओरडत होतो. आणि ती दारातून मला बघत होती. दाराच्या पुढे तिचे बाबा उभे होते. खूप मारलं मला. मला चालता येत नव्हतं. तिच्या भावाने मला गाडीवर बसवलं माझ्या मागे अजून एक जण होता. त्याने मला धरलेलं मी तर अर्ध्या शुद्धीत होतो. माझ्या घराच्या दारात मला सोडून ते निघून गेले. मी तिथेच पायरीवर झोपलो. सकाळी जाग आली तर आई रडत माझ्या शेजारी बसलेली. शेजारच्यांनी मला उचलून आत आणून ठेवलेलं. मला तर जागच हलता येत नव्हतं. मी अख्खा दिवस झोपून होतो. रात्री तिच्या घरचे आणि काही लोक आले. त्यांनी मला आणि आईला गाडीत बसवलं आणि एक मुलीच्या घरी नेलं. पण सुजलेला चेहरा बघून त्या मुलीने मला नाकारलं.
मग त्यांनी मला दवाखान्यात नेलं. तिथे तीन दिवस मला ठेवलं आणि मग तुझ्या घरी आणलं. मी आणि आई आत होतो पण बाहेर 10 वैगरे लोक होते. तू मला होकार दिलास. आणि मी आत्महत्या करायचं ठरवलं. रात्री घरी येऊन मी माझ्या जेवणात पीक फवारणीच औषध टाकल. शेवटच आईला बघावं म्हणून बाहेरच्या खोलीत आलो. आई तुझा फोटो बघत होती मोबाईलमध्ये. मी आईला विचारलं तुला आवडली का ही. आणि आईने होकार दिला. आई म्हणाली मला आता काही नको बस तुझं लग्न झालेले बघायचं आहे. प्रेम आहे हे. ही तुझ्या आयुष्यात आली तर तिच्यावर ही तुला प्रेमच होणार आहे. ही काय आणि ती काय. प्रेम सारखच. माझं ऐक तू हिच्याशी लग्न कर. आईचे ते डोळे बघून माझे तर सगळेच विचार बंद झाले. भूक मेली. आणि मी आईशेजारी किती तरी वेळ शांत बसून होतो. मी आईला होकार सांगितला. आत जाऊन ते ताटातल जेवण गटारात टाकून आलो. आपलं लग्न झालं. त्याच्या नंतर दोन दिवसांनी तीच लग्न झालं. एवढंच कळाल मला. बाकी कुठं कुणाशी काहीच मला तिच्याबद्दल माहिती नाही. आणि हे पण माहीत नाहीये मला की तिची आता का आठवण येतोय मला. मला असं वाटतंय आतून ती खूप त्रासात आहे.
आश्लेषा : तुझं माझ्यावर प्रेम आहे ?
अर्णव : खूप.
आश्लेषा : मग माझं ऐकणार का ?
अर्णव : हो.
आश्लेषा : आपल्या बाळासाठी तिला विसरून जा. आपल्या बाळावर याचा परिणाम होतोय.
अर्णव : हो कळतंय मला. सॉरी.
आश्लेषा : चल आता भांडी घासू.
अर्णव : नको मी घासतो.
आश्लेषा : झोप झालीय माझी. असु दे घासता दोघ. मला मदत करु फक्त.
दोघे आत गेले.

भाग ०८
भांडी घासून झाल्यावर आश्लेषा जाऊन टीव्ही बघत बसली. अर्णव आतल्या खोलीत जाऊन बेडवर बसला. बसल्या बसल्या त्याला झोप लागली. घराचं दार वाजलं. आश्लेषा जाऊन दार उघडते. दारात एक अंग सुजलेली आणि गालावर व्रण उठलेली, खांद्यावर जरा फाटलेला ड्रेस पण केस व्यवस्थित बांधलेले. लिपस्टिक ओठांवरुन बाजूला फिस्कटलेली पण कपाळावर टिकली जागेवर. हातातल्या घड्याळाची काच फुटलेली पण हातातल्या बांगड्या ठिकठाक अशी एक मुलगी उभी होती.. आश्लेषा हा तिचा काल्पनिक अवतार बघून विचारते कोण हवंय. ती आश्लेषाला बाजूला सारून आत निघून आली. घर रोजच्या बघण्यातल असल्यासारखं न अडखळता ती आतल्या खोलीत आली. अर्णव बेडवर झोपलेला. ति त्याला बघत उभी राहिली. डोळ्यातून त्याला बघताना एकसारखं पाणी यायला लागल. आश्लेषा पण आत आली. ती मुलगी अर्णवजवळ जाऊन बसते. आणि त्याला मिठीत ओढून घेते.
अर्णवला झोपेतच तो ओळखीचा केसांचा वास आला. त्याने झोपेतच तिला ही मिठीत घेतल. ती त्याच्या कानाला ओठ टेकवून डोळ्यातलं पाणी त्याच्या गालाला पुसत त्याला घट्ट जवळ ओढत होती. त्या मिठीने गर्मी वाढली आणि अर्णवने डोळे उघडले. प्राची त्याला मिठीतुन बाजूला करून पाणी भरलेल्या डोळ्याने त्याला डोळे भरून बघते. अर्णव तिच्या डोळ्यात बघून स्वतः ही रडायला लागला. त्याला रडताना बघून प्राची पुन्हा त्याच्या जवळ गेली. अर्णव तिला घट्ट मिठीत घेतो. तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवून डोळ्यातलं पाणी पापण्या दाबून मिटून घेऊन डोळ्यातून जाऊन देतो आणि दारात उभी असलेली त्याला आश्लेषा दिसते. जेवढ्या ताकदीने त्याने प्राचीला मिठीत घेतलेलं त्याच्या दुप्पट ताकदीने त्याने तिला बाजूला केलं. आणि तो उठून आश्लेषा जवळ गेला. आश्लेषा शांत त्याला बघत होती. काय चाललेलं हे तिलाच कळत नव्हतं.
अर्णव प्राचीला विसरून आश्लेषाला मिठी मारून तिची माफी मागत होता. आश्लेषा त्याच्या मिठीत होती पण तिचे हात त्याला मिठीत ओढायला तयार नव्हते. प्राची उठून दोघांजवळ गेली.आश्लेषा तिला बघते. अर्णव वळून मागे बघतो.
प्राची : माझ्या नंतर कधीच कुणाशी लग्न करणार नाही म्हणाला होतास ना ?
अर्णव : पण तू केलंस ना दुसऱ्याशी...?
प्राची : हो.
अर्णव : हा मग मी पण केलं. आणि आता माझं फक्त आश्लेषावर प्रेम आहे.
प्राची : माझं लग्न झालंय पण माझं तुझ्यावरच प्रेम आहे अजून. हे बघ, ( त्याचा हात स्वतःच्या सुजलेल्या गालावर धरून ठेवत ) मी नाही केलं माझ्या नवऱ्यावर प्रेम म्हणून, बघतोयस ना त्याच माझ्यावरच प्रेम ? तुझा माझ्यावर विश्वास नव्हता का ? का केलीस घाई लग्नाची. मी आज ना उद्या येणारच होते ना तुझ्या आयुष्यात ? मला बोलला होतास तुझी काळजी घेईन. तुझ्यावर प्रेम करीन. फक्त तुझ्यावरच प्रेम करीन. लग्न केलं तर तुझ्याशीच करीन. काय झालं त्या वचनांचा ?
अर्णव : प्रेमात घेतलेल्या वचनांच्या फक्त आठवणी राहतात आयुष्यात. वचन पुर करता येत नाही. कारण आपलं प्रेम आपल्या सोबत कधीच राहत नाही. तू...तू  निघून गेलीस माझ्या आयुष्यातून. मी तुझा होतो पण तूला माझं बनता नाही आलं.
प्राची : प्रेमात स्वतःला सिद्ध करावं लागतं असेल तर ते प्रेम कसलं अर्णव ?
अर्णव : स्वतःला नाही निदान आपल्या प्रेमाला तरी सिद्ध करायचं होतं. तुझ्यासाठी मी तुझ्या भावाचा मार खाल्ला पण तूला माझ्यासाठी त्या मुलाला नकार नाही देता आला ?
प्राची : माझ्यावर त्याने आधी बलात्कार केला आणि मग माझ्याशी लग्न केलं. अस असताना पण तू केलं असत माझ्याशी लग्न ?
अर्णव : हो. 
प्राची : मग कर माझ्याशी लग्न. मला जगायचं नाहीये त्याच्यासोबत. आणि मला तुझ्याशिवाय मारायचं पण नाहीये.

भाग ०९

अर्णवला जाग आली. झोपेत पडलेलं हे स्वप्न अगदी खर वाटत होत त्याला. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याने पहिला खोलीचा दरवाजा बघितला. आश्लेषाला नजर शोधत होती. पण काही क्षणात जेव्हा तो पूर्ण जागा झाला तेव्हा आश्लेषा शेजारी झोपलेली दिसली. दरवाजा तर खोलीचा बंदच होता. अर्णव तसाच काही वेळ बसून राहिला.

मग उठून तो तोंडावर पाणी मारून आला. हे विचार का येतायत त्याला काहीच समजत नव्हत. तो आश्लेषाजवळ बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघ, नारायणरावकडे पैसे द्यायला गेले. अर्णव नारायणरावांशी बोलत बाहेरच्या खोलीत उभा होता. आश्लेषा बेडरूमच्या बाल्कनीच्या कट्ट्याला धरून उभारलेली. समोर दिसणार संपूर्ण शहर बघून ती हरवून गेलेली. अर्णवशी बोलण झाल्यावर त्याकडून पैसे घेऊन नारायणरावांनी त्या रूम्सची चावी अर्णवला दिली आणि ते निघून गेले. चावी खिशात ठेवताना, थंड वार अर्णवच्या मानेला लागून गेल. अर्णवच लक्ष मागे गेल. ती खिडकी जराशी उघडी होती. पडदा बाजूला सरकलेला. अर्णव तिथे जाऊन पडदा बाजूला सरकवतो. आणि खिडकी लावायला जातो. त्या समोरच्या खिडकीत एक माणूस जोर जोरात ओरडताना त्याला दिसतो. त्या माणसाचा आवाज येत नसला तरी त्याच्या हावभावावरून तो भांडत असताना दिसत होता. पण तो कुणाशी भांडतोय हे त्याला दिसत नव्हत.

त्याने दुर्लक्ष केल. खिडकी बंद करून पडदा ओढून घेतला. आतल्या खोलत जाऊन तो आश्लेषासोबत बाल्कनीतून दिसणारा नजारा बघत बसला. तासभर तिथेच बसल्यावर दोघांना हि कंटाळा आला. मग त्याने तिकडच सामान इकडे ठेवण्यासाठी एक ट्रक ठरवला. तो तिकडे कॉलवर बोलत असताना आश्लेषा अशीच तिन्ही खोलीतून फिरत होती. एक एक कोपरा बघून काढत होती. बाहेरच्या खोलीत आल्यावर तिची नजर खिडकीवर पडली. खिडकीतून वार येत होत. ती तिथे जाऊन पडदा बाजूला करते आणि खिडकीची खिट्टी लावते. समोर एक मुलगी दिसते जी तिच्या एवढी वयाने असावी. तिला तिचा नवरा कानाखाली मारतो. आणि ती बेडवर पडते. तो तिच्या खांद्यावरचा पदर ओढून तिच्या छातीवर बुक्क्या मारतो आणि निघून जातो. आणि ती मुलगी रडत राहते. रडता रडता तीच लक्ष आश्लेषाच्या खिडकीकडे जात. आणि ती मुलगी रडतच उठून निघून जाते. आश्लेषाला कस तरी वाटत. हे अर्णवलादिसायला नको. म्हणून ती पटकन पडदा ओढून खिडकी बंद करते.

अर्णवच कॉलवर बोलण झाल. आणि तो आश्लेषा सोबत बाहेर आला. दाराला कुलूप लावल आणि दोघ खाली आले. गाडीत बसून दोघ घरी आले. अर्णवने आश्लेषाला खायला बनवून दिल आणि तिला फिल्म लावून दिली. अर्णव बँकेत गेला. आश्लेषा फिल्म बघून झाल्यावर. अर्णवसाठी जेवण बनवते. आणि अर्णवची वाट बघत बसते. 

भाग १०

अर्णव घरी आला. नंतर थोड जेवून त्याने घरातल्या वस्तू एकेक गोळा करून बॉक्स आणि पोत्यात भरायला सुरुवात केली. आश्लेषा त्याला कोणती गोष्ट कशात भरायची ते काळजीपोटी सांगत होती. दुपारी उशिरा आलेला अर्णव रात्री बारा वाजेपर्यंत सगळ सामान भरून ठेवत होता. मध्ये फक्त एकदा जेवायला थांबलेला. एव्हाना आश्लेषा झोपून गेलेली. दुसऱ्या दिवशी, सकाळी दहालाच ट्रक आला. कामगार लोक घरात येऊन थोड थोड सामान ट्रकमध्ये भरत होते. सगळ सामान भरून झाल. आणि ट्रक सांगितलेल्या पत्त्यावर गेला. अर्णव आणि आश्लेषा या घर मालकाला घराची चावी द्यायला गेले. तिथ बराच वेळ गप्पा झाल्या. चावी देऊन दोघ नव्या घरी गेले. ते तिथे जाईपर्यंत निम्म सामान तर वर पोचलं होत. सगळ सामान जेव्हा घरात ठेवल गेल तेव्हा अर्णवने ट्रक मालकाला गाडीचे आणि कामगारांचे पैसे दिले. मग दार लावून घेऊन तो जरा वेळ बसला.

आश्लेषा हळू हळू किचनमध्ये सामान लावायला लागते. इकडे अर्णव मोठ्या मोठ्या वस्तू लावायला घेतो. संध्याकाळी सगळ सामान लावून झाल. या एवढ्या कामात दोघांना खायची शुध्द नव्हती. दोघांना अगदी कडकडून भूक लागलेली. अर्णवने बाहेरून जेवण मागवल.

ते येईपर्यंत दोघ शांत एकमेकांजवळ बसलेले. समोर चमकणाऱ्या सगळ्या लाईट्स बाल्कनीतून दिसत होत्या. हवेमुळे त्या लुकलुकत होत्या. खालून येणारे लोकांचे गर्दीचे बारीकसे आवाज हवेने वर घुमत होते. किती ते सुंदर वाटत होत. थंड गारवा होताच पण अर्णवने तिच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ ओढून घेतलेलं. आणि आश्लेषा त्याच्या खांद्यावर डोक ठेवून शांत बसलेली.

इतकी शांतता. किती दिवसांनी मिळाली होती. घरी जरी कुणी नसल तरी कायम दोघ बडबड करत असायचे. पण आत्ता सगळ एकदम शांत होत.

आश्लेषा : किती सुंदर वाटतय ना ?

अर्णव : हो.

आश्लेषा : या इतक्या गाड्या, हायवे आणि अपार्टमेंटमध्ये झाड जरा दुर्मिळच आहेत.

अर्णव : हम. पाणी, झाड आणि प्रेम सगळ हळू हळू दुर्मिळ होत जाणाऱ्या गोष्टी आहेत. याची सवय करून घेतली पाहिजे आपल्या मनाने आणि डोळ्याने.

आश्लेषा : कृत्रिम झाड आणि पाणी बनवण्याच्या शोधात संशोधक आहेत. पण प्रेम दुर्मिळ नक्कीच होणार आहे. कारण ते वाचवण्यासाठी कुणाचे प्रयत्न सुरु नाहीयेत.

अर्णव : जगात प्रेम हे दुर्मिळ नक्कीच आहे, पण ते आहेच. त्याच अस्तित्व आहे. त्यावर संशोधन करायची गरज नाही फक्त त्याला समजून घ्यायची गरज आहे. पण आपण, बाकीच्यांचा विचार करून नाराज होण्यापेक्षा आपण आपल्या प्रेमाकडे लक्ष दिल तर ते दुर्मिळ न होता नक्कीच वाढीला लागेल.

आश्लेषा : हो.

पुन्हा दोघ शांत बसून पुढे लांबवर चमकणाऱ्या लाईट्स बघत बसले. बऱ्याच वेळाने दाराची कडी वाजली. बेल अजून काही यांनी बसवली नव्हती.

अर्णव जाऊन दार उघडतो. पार्सल घेऊन पैसे देतो आणि दोघ जेवायला बसतात.  

  

   

 

         

सावधान....! या कथेला ऑनलाईन रजिस्टर करण्यासाठी सबमिट केले आहे. त्यामुळे हि कथा किंवा यातील कोणताही भाग, प्रसंग वा संवाद लेखकाच्या परवानगीशिवाय कुठे हि प्रसिद्ध करणे किंवा दाखवणे गुन्हा ठरेल. असे केल्यास आपल्याला तीन वर्ष कैद किंवा पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक दंड लेखकाला द्यावा लागेल.  
  

0 टिप्पण्या