काळजी घे...बाय

 

मी : खर होत का ते प्रेम ?

ती : हो.

मी : मग आत्ता का नाहीये ?

ती : वेळेनुसार माणूस बदलतो प्रेम तर साधी भावना आहे.

मी : हे साधेपण प्रेमाला, प्रेमात असताना नव्हत कधी.

ती : जी गोष्ट मिळत नाही तो पर्यंत त्याला महत्व असत. मिळाली ती गोष्ट कि किंमत शून्य होऊन जाते. प्रेमाच हि तसच आहे.

मी : पण मुळात प्रेमाची किंमत हि नसतेच ना ?

ती : असते. खूप असते. ज्याला करायला जमते तो करतो. प्रेम जगतो. हव तेव्हा, हव तेवढ घेतो. आणि ज्याला जमत नाही त्याची किंमत मोजण ते फक्त करत राहतात. एकतर्फी.

मी : आपल प्रेम दोघांच्या मर्जीने होत. पण एकमेकांवर प्रेम करण थांबवण मर्जीविना होत.

ती : बंधन घालून प्रेम करत राहण्याला प्रेम म्हणायचं का ?

मी : नाही.

ती : मग ? जितक जमल तितक मीही दिलच कि तुला प्रेम. पण मग ज्या प्रेमाची ओढ, आस होती त्या प्रेमाच्या सहवासात राहून मग त्याच प्रेमाचा उबग यायला लागला मला. आणि कंटाळवाण्या गोष्टीत रमणारी मी नाही.

मी : हा झाला तुझा विचार, माझ काय ?

ती : दीड वर्ष झाल ना, आपल्याला वेगळ होऊन.

मी : हो.

ती : या दीडवर्षानंतर पण तू इथ डोळ्यासमोर नीट दिसतोयस म्हणजे तू जगलास. माझ्याशिवाय. कसा ?

मी : जशी तू शिकलीस. जे आयुष्य माझ्याशिवाय तुझ्या नशिबात पण नव्हत ते आयुष्य तू आत्ता जगतेयस, आणि जे आयुष्य मी कधी विचारात हि आणल नव्हत ते मी जगतोय.

ती : झाल तर मग, आणखी काय हव ? प्रेमात असताना प्रत्येक गोष्ट आपण ठरवून करत होतो. आता जे घडतय ते विचाराच्या हि पलिकड होतय, हि चांगली गोष्ट नाही का ? अरे इतकी सवय लागलेली तुझी कि माझी सवय तुटून मी तुझ्या बरोबरीने उठायला लागले, तुझ्या वेळेत झोपायला लागले, माझी गावची भाषा सोडून तुझ्यासारखे शब्द बोलायला लागले, तुझ्या वेळेत जेवण करायला लागले. इतकि मी बदलले कि मी मला सावरून पण तुझ्याइतक तुझ्यावर प्रेम करायला लागले, ठराविक शब्दांनंतर स्वल्पविराम आणि पूर्णविराम अगदी तुझ्यासारखेच द्यायला लागले, तुझ्या आवडीला माझी आवड म्हणायला लागले, नकळत तुझ्यासोबत तुझ्या इतके श्वास घ्यायला लागले. इतक हे प्रेमाच ओझ होईल माझ माझ्यावर वाटल नव्हत. आणि हे कुठ तरी थांबायला हव होतच ना अजिंक्य ?

मी : का ?

ती : प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीला शेवट आहे. प्रेमाला हि आहे. कुठलच प्रेम अमर नाही. कारण कुणीच इथ अमर नाही. इथे काय शे-दोनशे लोक नाहीत. करोडो लोकांत कोण इथ तुझ माझ प्रेम लक्षात ठेवणार. ते प्रेम मी जपलं काय तू निभावल काय ? कोणाला काय फरक पडणार आहे तुला मला सोडून ? अस हि काय फरक पडला तुला मला ? एकमेकांपासून लांब होऊन ?

मी : एक तर भ्रम स्पष्ट झाला, प्रेमाच्या विरहात जाऊन माणूस जगू शकतो. नशिबात नसत त्याहून जास्त चांगल.

ती : हेच प्रेम आहे. आणि हेच ते प्रेमातल आयुष्य आहे. जे प्रत्येक जण इथ जगत असतो. असो, सोड हा विषय, तू इथे कसा ?

मी : आलो होतो, जुन्या आठवणीत रमायला. कारण सध्याच्या जगात वावरताना सगळ नव नव बघून कंटाळा आला. म्हणून म्हंटल जुन्या आठवणीत एकदा रमून याव. तू इथे भेटशील वाटल नव्हत.

ती : भेट नाही हि, चुकून दिसलो आपण एकमेकांना.

मी : बर, तू काय करतेयस इथ ?

ती : वाट बघत आहे. ते बघ आलाच तो. शंभर वर्ष आयुष्य...

मी : कुणाला ?

ती : माझ्या नवऱ्याला.

मी : त्याच्यावर प्रेम असेलच मग ?

ती : हे काय विचारण झाल का ? हं...

मी : काळजी घे...बाय.

copyrighted@2021


1 टिप्पण्या