CADBURY

त्याच्यासाठी तिने कॅडबरी विकत घेतली. तशी त्याला कोणती आवडते तिला माहित होत. पण तरी तिने तिच्या आवडीचीच कॅडबरी घेतली. ती घेऊन ती रस्त्याने चालत तिच्या-तिच्याच नादात चाललेली. रस्त्यावर वर्दळ होती तशी, पण मनात विचार असले ना खूप जास्त, कि बाकी सगळ विसरायला होत. ती येऊन पोचली शेवटी आणि समोर त्याला शोधायला लागली. तो आलाच नव्हता. तिला एक क्षण हि थांबायची सवय नव्हती. आणि तिच्यासाठी तो किती तरी वेळ येऊन थांबायचा ठरलेल्या ठिकाणी.

तिने लगेच त्याला कॉल केला. तो वाटेतच होता. गाडीवर होता तो, त्याने कॉल उचलला नाही. तिने पुन्हा कॉल केला. पुन्हा तसच. तिला राग आला. ती ठरलेल्या ठिकाणापासून पुढे जरा जाऊन थांबली. थोड्या वेळात तो तिथे आला. ठरलेल्या वेळेच्या पाच मिनिट नंतर आणि ठरलेल्या ठिकाणी. पण ती नव्हती तिथ. तो नेहमीसारखा तिची वाट बघत गाडीवर बसला. मोबाईल वाजला. तिचा कॉल होता. त्याने पटकन उचलला.

तो : हेल्लो, मी पोचलोय ? तू कुठ आहेस ?

ती : मी पण आलेय.

तो : मला तर दिसत नाहीयेस ? कुठ थांबलियस ?

ती : तू आधी सांग माझा कॉल का उचलला नाहीस ?

तो : गाडी चालवत होतो. आणि हेडफोन कानात नव्हते. त्यामुळे समजल नाही. सॉरी ना.

ती : सॉरी बोलून काय होणार आहे का ? मी तुझी वाट बघत किती वेळ इथ थांबलेय.

तो : सॉरी ना, तू आता अशी चिडणार आहेस का माझ्यावर ? कुठ आहेस सांग ना.

ती : हो, अशीच चिडणार तुझ्यावर. आणि मी नाही सांगणार कुठ आहे ते. शोध तू मला.

तो : बर, मी शोधल्यावर मला हे चिडलेल तोंड नाही बघायचं तुझ.

ती : मग ?

तो : तुझी एक स्माईल बघायची आहे.

ती : बर.

तो : बर काय ? देणार ना एक स्माईल फक्त, माझ्याकडे बघून ?

ती : बघू, आधी तू शोधून तरी दाखव मला.

तो : तुला शोधायला माझ हृद्य बस आहे. जिथ तू जवळ माझ्या आसपास असतेस हृदयाची धडधड वाढते. मी आता गाडी चालवेन जिथ हृद्य जास्त धडधड करेल तिथ तू असशील.

ती : आणि नाहीच झाली तशी धडधड तर ? आणि झाली आणि तिथ मी नसलेच तर ? मी या जगातूनच गायब झाले तर ?

तो : माझ्या आयुष्यातली तू खूप महत्वाची व्यक्ती आहेस. तू फक्त एकटी. तू फक्त एक. आणि हे जग पण एकच आहे. तुला कुठून हि शोधून आणेन पण आणेन. आलोच मी तुझ्याकडे.

ती : हम..बोलायला मात्र चांगल जमत तुला. पण वेळेत बोलावल तर यायला नाही जमत. हो ना ? माझे कॉल पण उचलायला नाही जमत.

तो : सॉरी ना. काय करू मी म्हणजे तुझा राग जाईल ?

ती : काही नको करू.. नाही जाणार हा राग. तू येणार आहेस का जाऊ मी आता सांग ?

तो : जिथे आहेस तिथेच थांब. आलोच मी.

ती : नाही मी चाललेय पुढ. तू शोधलस तर ठीक नाहीतर मी घरी पण जाऊ शकते. आणि घरी गेल्यावर मी परत बाहेर नाही येऊ शकत.

तो : नाही, तू अस नाही काही करणार. मी आलोच.

इतक्या वेळात त्याने गाडी लावून चालण सुरु ठेवलेलं. एका ट्रकच्या मागे ती उभी होती. ते त्याला केव्हाच दिसलेलं पण तो हि बरच अंतर ठेवून स्वतः एका सुमो गाडीच्या मागे थांबून तिच्याशी बोलत होता. तो गाडीच्या अडून बाहेर आला.

तो : यार, नाही सापडतेस तू. मी काय करू आता ?

ती : मगाशी तर जगभर शोधाणार होता ना ? काय झाल त्याच ?

तो : हो, शोधलं मी पण नाही सापडली तू.

ती : गप खोटारडा, मी जाते...

तो : कुठ ?

ती : कुठ पण जाईन. तुला काय ? तुला नाही ना सापडली मी. मग आजची भेट कॅन्सल.

तो : आणि मी तुला शोधलं तर ?

हे ऐकल्यावर ती ट्रकपासून अजूनच आतल्या बाजूला गेली.

ती : काय हवय ?

तो : एक स्माईल, एक तू आणि एक तुझी मिठी.

ती : रस्त्यावर ? वेडा आहेस का ?

तो : हो. तुझ्यासाठी वेडा आहे मी.

ती : आधी शोध तरी मग बघू.

आणि मागून तिच्या दोन हात तिच्या पोटाशी आले. आणि तिने डोळे मिटून घेतले. उघडे ओठ बंद झाले आणि डोळे मिटून तिने हातातली कॅडबरी त्याच्यासमोर धरली.

त्याने तिला मिठीतून वेगळ करून लगेच त्या कॅडबरीचा कागद काढून एक तुकडा घेतला आणि बाकी सगळी तिला दिली. कारण ती कॅडबरी तिच्या आवडीची होती त्याच्या नाही. आज सकाळी दोघांनी भेटायचं ठरवल होत तेव्हाच तिला समजल होत रोजच्यासारख त्याला आज येताना कॅडबरी घेऊन यायला जमणार नाही. तो रोज तिला कॅडबरी द्यायचा. म्हणून मग तिनेच त्याच्यासाठी कॅडबरी घेतली पण स्वतःच्या आवडीची. आणि जेव्हा तिने त्याला ती दिली. त्याने एक तुकडा घेऊन बाकी सगळी तिला दिली. आणि रोजची त्याची तिला कॅडबरी द्यायची सवय पूर्ण झाली.        

copyrighted@2021 

WRITHOLIC.studio

0 टिप्पण्या