Miss You Husband

लोक म्हणतात मागच सगळ सोडून पुढ जायला हव. कारण जावच लागत. जग आणि जमाना हा पुढे जात असतोच. आपण मागे राहिलो तर पुढे न्यायला आपल्याला कुणी येत नाही. जगात राहतो म्हणून आपण एक समाजाचा हिस्सा असतो पण शेवटी प्रत्येकजण इथे एकटाच आहे. लाख म्हणत असतील लोक हे सगळ, पण नाही ना जमत. दिवाळी तोंडावर आलीय मुलांना नवीन कपडे घेऊन बाकीच्या वस्तू आणि फटके घेऊन रोज मिळेल वेळ तसा आठवडाभरात सगळा फराळ बनवून टाकला. दिवाळीला लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी-वस्तू बाजारात जाऊन आणून ठेवल्या. सगळ लक्ष कामात गुंतवून मुलांना आवडते म्हणून मी हि मग ह्या दिवाळीच्या तयारीला लागले. मुलांना तसा किल्ला बनवायला हि आवडतो. मागच्या वर्षी माती आणताना बरीच धावपळ झाली. म्हणून मग या वर्षी त्यांना तयार किल्लाच विकत घेऊन दिला. बोटा एवढी खेळणी त्यावर मांडून मुल आत्ता पासूनच घरात दिवाळी साजरी करतायत. येता-जाता जेवण कमी आणि फराळ खाऊन पोट भरत आहेत.

काय लागल सवरल मला मागतायत. दुकानात पण आई हा ड्रेस नको तो हवा. त्यासाठी चार चार दुकान फिरवून एक ड्रेस घेतला. त्यावर शोभणारा बूट घ्यायला पुन्हा अजून बरीच दुकान फिरलो. फटाके तर विचारूच नका. काय काय ते नवीन फटाके आलेत. ज्याची मला नाव माहित नाही त्याची यादी तोंडपाठ करून मुल तिथ दुकानात एकेक फटाके शोधून मला घ्यायला लावत होती. मुलांच्या आनंदापेक्षा दुसर अजून काय हव असत एका आईला ? आणि त्यांचे हट्ट पुरवणारी त्यांची आई असताना मी हि त्यांच्यासाठी कर्तव्य ते केलच पाहिजे. फराळ सुरु करण्याआधी सगळ घर साफ-सुफ करून ठेवलेलं. परत लागालाग नको म्हणून. जेव्हा साफसफाई सुरु केली तेव्हा पासून तुझी आठवण यायला लागली. अस वाटायला लागल आत्ता मला तुझी किती मदत झाली असती. खालच-खालच मी केल असत सगळ स्वच्छ पण वरच सगळ तू साफ केल असत. बाहेर जाऊन सामान आणून परत घरी येऊन मुलाचं बघून फराळ करण्यापेक्षा तू मला सामान आणून दिल असत तर किती माझ्यावरचा भार हलका झाला असता ?

मुलांचे कपडे आणताना जो हात माझा मुलांनी धरलेला घट्ट त्या गर्दीत. एक हात मी हि धरला असता तुझा गर्दीत. समोरून येणाऱ्या माणसांच्या गर्दीतून वाट काढताना जड होणारे श्वास माझे मोकळे झाले असते तुझ्यासोबत. मुलांनाच कपडे घेतेले मी. मी मला काही घेतल नाही. घेऊच वाटत नाही. तू असता तर हक्काने तुला सांगून मला हवी ती साडी मागून घेतली असती. पण माझी खरेदी मीच कशी करणार ? आणि केली तरी दाखवू कुणाला हा प्रश्न हि आहेच. माझा फराळ मुल खातायत पण तो फराळ खाऊन खूप छान झालंय म्हणून आणखी जरा चकली मागून खायला तू हवा होतास अस वाटत. लक्ष्मी पूजनाला व्यवस्थित पूजा करायला तू हवा होतास. गेले आठवडाभर तुझी कमी वाटतेय. खूप तुझी आठवण येतीय. लोक म्हणतात मागच सोडून सगळ पुढे गेल पाहिजे. मी आलेय रे पुढ. पण हे असे सण-वार आले कि तुझी कमी भरून नाही ना रे निघत. खूप आठवण येते अशा वेळेस. पण मुलांकडे बघून त्यांच्या आनंदात मी माझ दुःख विसरून जाते. त्यांच्यात तुला बघते, शोधते. पण तरी तू त्यांच्यात तसा कमीच भेटतोस. असो, पुढच्या जन्मी तरी पूर्ण आयुष्यभरासाठी माझ्या आयुष्यात ये. तुझी आठवण येतेय. तुझीच बायको...आणि समाजासाठीची नवरा नसलेली बाई.    

copyrighted@2020


 


0 टिप्पण्या