Friend Request


रात्री झोपायच्या तयारीत होतो मी. एक वाजायला आलेला. बाजूला बायको शांत झोपलेली. मी फेसबुकवर दोन तीन चांगले पेज लाईक करून ठेवलेत त्यावरच्या पोस्ट बघत होतो. म्हंटल तेवढ बघून झोपावं. पोस्ट वर ढकलत-ढकलत मला एक फोटो दिसला मैत्रिणीचा. मी फोटो लाईक केला. फोटो वर लिहिलेलं , ‘@गावच्या शेतातून’. लाईक करून ती पोस्ट वर ढकलली. पण मला एक चेहरा त्यात ओळखीचा दिसला म्हणून पुन्हा पटकन ती पोस्ट खाली आणली. त्यात तू दिसली. मी पटकन फोटो झूम करून बघितला. सुंदर दिसत होतीस. तिने काही लोकांना तो फोटो tag केलेला. मी ती लिस्ट उघडली. तुझ नाव नव्हत त्यात. त्या फोटोला दोनशे अडतीस लाईक मिळालेले. मी ते उघडले आणि एक-एक नाव बघायला लागलो. मला माहित होत तू हा फोटो लाईक केलाच असणार. तुझा फोटो यावर आहे म्हणजे तू फेसबुकला पण असणार. एक, दोन,...दोनशे, करत-करत सगळे लाईक बघून झाले. पण तू नव्हतीस त्यात. आता काय कराव म्हणून मी ठरवल आता प्रत्येकाचा डीपी बघायचा तुला फोटो काढायची आवड आहे. माहितीय मला चांगलच. तुझ्या प्रोफाईलला तुझा डीपी असेल म्हणून मी दोनशे अडतीस प्रोफाईल तपासून बघितले पण त्यात हि तू नव्हतीस. तरी किती नाही म्हंटल तरी चार वर्षांनी आज तुझा फोटो दिसला आणि तू पुन्हा आठवलीस. पूर्ण विसरलेलो मी तुला. या रोजच्या कामात आणि संसारात कितीतरी आठवणी आपण विसरून जातो. कितीतरी लोक आपल्या नजरेआड होतात आणि ते विचारातून हि निघून जातात. आणि इतक्या वर्षांनी तू दिसलीस तर आता तू सापडत नाहीयेस. त्रास व्हायला लागला. मन लागत नव्हत. तुला कस शोधाव समजत नव्हत. माहित होत नाही सापडणार तू, कारण हे आधी खूप वेळा मी करून बघितलेलं तरी आत्ता पुन्हा प्रयत्न केला. सर्च मध्ये लिहील ऐश्वर्या xxx. खूप नाव आली. पण त्यात हि तू नव्हतीस. जवळ-जवळ आता तीन वाजायला आले. कंटाळा आलेला पण झोप पूर्ण उडून गेलेली. शेवटी मग मी त्या मैत्रिणीच्या प्रोफाईलवर जाऊन तो फोटो डाउनलोड केला आणि झोपलो.सकाळी उठून बायकोला घर आवरायला मदत केली. मग माझ आवरून मी बसलोच होतो चहा पीत आणि नॉटीफिकेशन आल. मी फेसबुक उघडून बघितल तर त्या कालच्या फोटोला काही कमेंट आलेल्या. आणि मला पुन्हा तू आठवलीस. मी पुन्हा त्या सगळ्या कमेंट वाचून काढल्या पण त्यात तू नव्हतीस.मैत्रिणीलाच विचाराव म्हणून मेसेज लिहिला पण तिला काय वाटेल या विचाराने सगळा लिहिलेला मेसेज खोडून मी पुन्हा चहा पीत बसलो. थोड्यावेळाने मी टीव्ही बघत बसलेलो पण कसले रटाळ ते कार्यक्रम बघून कंटाळा आला म्ह्णून फेसबुकवर गेम्स खेळायला फेसबुक सुरु केल आणि नऊ नॉटीफिकेशन्स आलेले दिसले मला. मी उघडले आणि पूजा xxx या नावाने माझ्या नऊ फोटोंना लाईक केलेलं मला दिसल. आता हि कोण ? म्हणून मी तीच प्रोफाईल उघडल. डीपी आणि कव्हर पिक दोन्हीवर एका बाळाचा फोटो होता. हा फोटो काल त्या लाईक केलेल्या लोकांच्या यादीत बघितलेला आठवला. मी प्रोफाईल वाचायला सुरुवात केली.

पूजा xxx

lives in मुंबई.

married with amit xxx

followers 110

मी मग त्या प्रोफाईलमध्ये फोटोजवर क्लिक केल. मग प्रोफाईल फोटो बघितले तर त्यात सगळे त्या एका बाळाचे वेगवेगळे फोटो होते. मग मोबाईल अपलोडस बघितले तर त्यात पहिलाच फोटो दिसला. तुझा आणि तुझ्या अमितचा. आणि तुझ नाव ऐश्वर्याच पूजा कस झाल ते आत्ता समजल. लग्नानंतर मुलीच नाव बदलतात आपल्यात. आणि हे आज पहिल्यांदा मला आठवल. मी पटकन तुला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. आणि तो पर्यंत तुझे सगळे फोटो बघून काढले. तेवढ्यात मोबाईल व्हाईब्रेट झाल.मी बघितल तर आता आपण फेसबुक फ्रेंड झालेलो. काय गंमत आहे, आधीपासून असलेले फ्रेंड पण पुन्हा नव्याने इथे फ्रेंड होतात. मी पटकन मेसेज वर क्लिक केल आणि मेसेज केला, "hi... aishwarya !" आणि 

पुढून मेसेज आला, "?????"

ती विसरून गेली तिच्या नावाला आणि मी विसरून गेलो कि ती ऐश्वर्या नाही पूजा आहे आता.


COPYRIGHTED@2020

0 टिप्पण्या