नाजूक रोपट.

 

भकास आणि गडद अंधार. आजूबाजूला शुकशुकाट. डोक्यावर चंद्राचा प्रकाश तो हि खाली अंधारापर्यंत येताना काळोख बनलेला. जमिनीवरचे पाय असे काही हरवलेले कि पाय आहेत हि फक्त जाणीव मनाला. बाकी ते दिसणे अशक्यच. हातात मोबाईल असून उपयोग काय ? त्याला चार्जिंग जरा हि नाही. एक बारीकसा केशरी प्रकाश ओठांशी. एक फिकट पांढरा धूर नाकातून बाहेर. हृदयाची धडधड वाढत चाललेली. धाप लागत आणि वाढत चाललेली. सोबतचा कुत्रा पुढचा माग काढत पुढे पळत होता. मागून हा पुढे जात होता. लांब कुठेतरी मिणमिणते दिवे दिसत होते. एक कालवा आला. त्या कालव्याच्या बाजूला एक लोखंडी बोर्ड लावलेला. त्या बोर्डपासून तेरा पावल एक दगडाचा कठडा होता. त्या कठड्याच्या उजव्या बाजूला लागून एक फुटभर झाड उगवलेल. जे आत्ता दिसत नव्हत पण ते त्याला माहित होत. तो अंदाजानेच कठड्यावर बसला. सोबतचा कुत्रा उजवीकडे जायला लागला तसा त्याने त्याचा पट्टा हाताने ओढून त्याला डावीकडे वळवल.

तोंडाजवळचा केशरी रंग संपला. कोरडे ओठ तापायला लागले. तोंडातली सिगरेट बाजूला फेकून खिशातून दुसरी काढून ती पेटवताना काडीतून जी ज्वाळा पेटली त्यात कठड्यावरचे दोन छोटेसे दगड दिसले. सिगरेट पेटवून तोंडातून तसे धूर पुन्हा सुरु झाले. काडी बाजूला पायाशी टाकून उजव्या हातात बाजूचे ते दोन छोटे दगड उचलून त्याने पुढच्या कालव्याच्या पाण्यात टाकले. जड थंडीच्या वातावरणात पाण्यात पडलेले ते दोन दगड हि आवाज करून गेले. तिला पहिल्यांदा इथे आणलेलं. तेव्हा पौर्णिमा होती. त्यानंतर प्रत्येक पौर्णिमेला त्याने तिला इथे आणलेलं. त्या चंद्राच्या प्रकाशात अंधारलेल काळ पाणी जेव्हा पाण्यात लावलेल्या लाईटसारख दिसायचं त्या पाण्यात दगड टाकून अंगावर उडणाऱ्या पाण्याला बघून हसणारी ती आणि तिला तस खुश बघून मिठीत ओढून घ्यायला उतावीळ होणारा तो. आणि त्या दोघांच्या प्रेमाचा साक्षीदार तो पौर्णिमेचा चंद्र.

तो एकदा या दोघांना बघून पुढे कित्येक दिवस आकाशात यायचाच नाही. आणि यायचा तेव्हाच, जेव्हा हे दोघ भेटायचं ठरवायचे. आज तो आला खरा पुन्हा तिथेच पण आज पौर्णिमा नाही. तो आहे पण ती नाही. म्हणूनच तो चंद्र देखील पूर्ण आला नाही. ती असेल आज कुणासोबत चंद्रप्रकाशात चंद्र बघत. टेरेसवरून. हा होता मात्र अंधारलेल्या वातावरणात तिच्या आवडत्या ठिकाणावर येऊन. हि देखील सिगरेट संपली. कुत्र शांत बसून होत पण तोंडातून जीभ बाहेर काढून धापा टाकत त्याचा आवाज सुरु होता. तिसरी सिगरेट काढली ती पेटवली. आणि तो उभा राहिला. वर बघून त्याने ठरवल आता इथ पुन्हा कधीच नाही यायचं. कोणत्याच कालव्याजवळून जायचं नाही. तिचे सगळे मेसेज डिलीट करून तचे व्हिडीओ, एमएमएस, फोटो सगळ डिलीट करायचे. तिने दिलेलं गिफ्टस फेकून द्यायची. त्याच एक प्रेम ती वाढवू शकली नाही आयुष्यभर मग त्या दोघांनी लावलेलं एक रोप जे त्या दगडाच्या कठड्यापाशी लावलेलं.

ते त्याने धरून उपटण्याचा प्रयत्न केला. पण ते निघाल नाही. दोनदा प्रयत्न झाला पण व्यर्थ. तिने लावलेलं इतक नाजूक रोप जर निघू शकत नव्हत तर मग तिने केलेलं प्रेम सहज कस हृदयातून वेगळ झाल ? या विचारात त्याच्या डोक्यातून कळ आली. तिची आठवण आणि तिचा विचार नकोच म्हणून त्याने कुत्र्याला जायला सांगितल. त्याने तोंडातली सिगरेट ओठातून दातात धरली. खिशातली काडेपेटी काढून त्याने काडी पेटवली. झाडाजवळ जाऊन त्याने त्या प्रकाशात त्या झाडाची नाजूक पान बघितली. तिच्यासारखीच ती नाजूक पान पण अरे हट्ट, नाजुकपणा फक्त बघायचा असतो असा विचार करून त्याने ते रोपट पेटवून टाकल.

कुत्र पुढे थांबलेलं. तिथ जाऊन तो पुन्हा दोघ घराकडे निघाली. उजेडाच्या रस्त्यावर जेव्हा तो आला. त्याने एक रोपट विकत घेतल. आणि घराच्या कुंडीत लावलं.        

copyrighted@2020


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Hollywood Movies