मी वेडा नाही.


प्रेमाची वेळ फक्त एक रात्र. सकाळी तू माझा कोण ? अस ती मला म्हणते. पण त्या रात्री नंतर कित्येक दिवसाला चित्र काढण्याआधी तिची आठवण काढून चित्रात तिला शोधणारा मी. तिच्या ओठांना माझ्या जड ओठांत घेताना माझ्या मिश्या आणि दाढीच्या केसांना हि तोंडात घेणारा मूर्ख मी दाढी मिशी कापायच्या हि नादाला लागत नाही. मी तब्येतीने खराब आहे. पण ती माझ्याहून नाजूक. जगाशी खुन्नस झाली तर एका बुक्कीत हवा माझी निघून जाईल पण तिला बेडवर मिठीत घेताना तिचा जीव गुदमरू नये म्हणून आहे तसाच खराब तब्येत घेऊन जगणारा मी. तिला जेवण मिळत असेल का वेळेवर म्हणून कित्येक वेळ विचार करून स्वतः उपाशी राहणारा मी. तिला भेटायला जायला आठवड्या आठवड्याने माझे दिवस संपवणारा मी. ती तासातासाने तिचे दिवस संपवते. तिच्या मोकळ्या केसांना बघण्यासाठी तरसणारा मी तिला जाताना माझे केस धड विंचरत देखील नाही. तिच्या डोळ्यात मला बघण्यासाठी मी कित्येक मैल चालत तिच्याकडे जायचो आणि नेमका तेव्हा संध्याकाळीचा अंधार व्हायचा. आणि तिचे डोळे मला त्या अंधारात क्वचितच एक क्षण दिसायचे. धांदरट आहे मी. माहित आहे मला. माहित आहे तिला. तरी मी माझ्यात बदल करत नाही. आणि तिला हि कोणता माझ्यात बदल नको आहे कारण ह्याच धांदरट स्वभावावर तीच प्रेम आहे. खर......
खरच तिच्या मऊ छातीला दाबताना मनगट आणि बोटात येणारी ताकद दुसऱ्या दिवशी चित्र काढताना कुठे निघून जाते माहित नाही. रंगात ब्रश बुचकळताना ब्रश कित्येकदा खाली पडतो. तिच्या पोटावर माझा भार देऊन तिला माझ्यात ओढताना पूर्ण शुध्दीत असतो मी पण त्या वेळेनंतर कुठल्या धुंदीत असतो मी काय माहित. लोक मला वेडा म्हणतात. मी वेडा नाही. पण शहाणे लोक मला वेड म्हणून चिडवताना वेडपट वाटतात मला.
शिळ्या पावाच्या तुकड्यासोबतची काळी कॉफी आणि त्या नंतर ओढलेली सिगरेट यात जस सुख आहे तस तिला भेटण्यात पण मिळत मला. हे सगळ विकत घ्यायला पैसे लागतात आणि तिला भेटायला सुध्दा. शिळा पाव, काळी कॉफी, सिगरेट घेण्यापेक्षा  मग मी पाच फ्रांक मध्ये तिच्यासोबत एक रात्र काढतो. उरली सुरली अंगातली ताकद तिच्यात ओतून सकाळी पायरीच्या बाजूच्या भिंतीला धरून एक एक पायरी खाली उतरून येतो. त्रास होतो पण आनंद हि होतो. ती मला फुरू म्हणते ते चालत मला. पण बाकीचे बोलतात तर मी त्यांना हातात असेल ते फेकून मारतो. मी जोकर नाही. प्रियकर आहे. मी वेडा नाही चित्रकार आहे. पण कुणाला हे कळतच नाही. माझी किंमत कुणालाच नाही. तेओ सोडला तर. तेओ आणि मी भाऊ-भाऊ नाही तो माझी आई आणि मी त्याच लाडकं मुल आहे. पण तो सोडून या जगात माझी किंमत फक्त तिला आहे. आणि म्हणूनच तिला माझा आवडलेला कान मी तिला कापून दिला आणि ती चक्कर येऊन पडली. पुढच्या एका आठवड्याने मी तिच्यासोबत एक रात्र काढली. आणि पुन्हा आमची भेट झाली नाही. तिला हि माझी किंमत नाही कळली. प्रेमाची किंमत या जगात मुळीच कुणाला कळत नाही. प्रेम अमुल्य आहे. आणि ज्यांना ते मोजता येत ते खोटारडे आहेत अस मला वाटत. मी प्रेम करतो. खर करतो. मी वेडा नाही पण वेड्यासारखं प्रेम करतो. मी खर प्रेम सिध्द करतो. आणि लोक मला वेड सिध्द करतात. ते सिध्द होतात आणि मी हरून जातो. हेच सतत होण्यापेक्षा मी कायमचा आता मरून जातो. पण भविष्यात लोक सांगतील कि एके दिवशी एक व्हान गॉग इथल्या जगात जगून गेला.

महान डच चित्रकार व्हान गॉग.  copyrighted@2020    

0 टिप्पण्या