एक होत प्रेम !

 

मला तू आवडायचीस. तुला मी आवडायचो. आवड मग सवय झाली. सवयी कधी सुटतात का लवकर ? तेच झालं. सुरुवातीला थोडं थोडक चॅटिंग नंतर कॉल आणि कित्येक सारे तुझे माझे फोटो एकमेकांना शेअर करून जेव्हा मोबाईलची मेमरी भरली तेव्हा मी माझे स्वतःचे फोटो डिलिट करून तुझे तसेच ठेवले. माझ्याशी कमी बोलणं झालं तर तुझ्यासाठी तो दिवस बेकार असायचा. हे सगळं प्रेम आहे  हे तुला माहित होत आणि हे मला हि कळत होत. पण बोलून काय होणार होत ? व्यक्त व्हावं माणसाने मान्य पण ज्या गोष्टीला व्यक्त करून फक्त कल्पनेतच जगावं लागणार असेल तर अव्यक्त राहिलेलंच बर म्हणून तू हि कधी बोलली नाहीस आणि मी हि तुला विचारलं नाही. मी लांब आणि माझ्यापेक्षा तू अजून लांब होतीस. त्यामुळे आपली भेट रोज व्हाट्सअप, कॉल आणि व्हिडिओ कॉल एवढ्यावरच असायची. प्रत्यक्ष भेटण्याची स्वप्न फक्त बाकी सत्यात मात्र तू तुझ्या आणि मी माझ्या घरी. तुला जवळ घेऊन तुला मिठी मारावीशी कित्येकदा मला वाटलं असेल. माझ्यासमोर बसून बोलावं अस तुला कितीतरी वेळा वाटलं असेल. पण कल्पनेत जगताना सत्यातल एक ऑनलाइन नात आपण बनवत चाललेलो. ज्या नात्याला अर्थ तसा बराच होता पण ते अर्थ हि फक्त ऑनलाइन पुरते मर्यादित होते. या समाजात आणि खऱ्या आयुष्यात त्याला काहीही महत्व नव्हतं. 
तू आणि मी दिवस दिवस एकत्र घालवत होतो. तू माझ्यात मी तुझ्यात हरवत होतो. सकाळी डोळे उघडल्यावर तुझा पहिला मेसेज मला माझ्या मोबाईलवर आलेला दिसायचा. आणि तू सकाळच काम करून फ्री झालीस कि माझा फोटो बघून खुश व्हायचीस. किती तरी खोलवर एकमेकांबद्दल वाटणार प्रेम कुठेतरी आता प्रत्यक्षात व्यक्त व्हायला अतुरलेल. आपली भेट झाली. आपण भेटलो. भेटल्यावर बोलणं कमी आणि कित्येक स्पर्शांनी आपण संवाद साधला. जगासाठी हे चुकीचं असेल पण स्पर्श म्हणजे पण प्रेमच असत ना ? आणि प्रेम हे एक तर करतात किंवा ते समजत. बाकीचे जे शब्द प्रयोग मराठी व्याकरणात आहेत ते प्रेमासाठी लागूच नाहीत. तुझ्या गोड ओठांची चव घेऊन मग तुझ्यापासून लांब झालो. पुन्हा तू लांब मी लांब. मग ऑनलाइन नात एकदाच सत्यात हि जुळलं याचा आनंद होता.
कितीही आपण जवळ आलो तरी रोज रोज भेटणं बोलणं अस स्पर्श करून तुझा अनुभव घेणं रोज जमणार नव्हतं. पण केव्हा का होईना जेव्हा भेट होईल तेव्हा ते थकलेले, राहिलेले स्पर्श तुला करण्यासाठी ओढ कायम असायची. मला नव्हतं कोणतंच बंधन. मला नव्हती कसलीच जबाबदारी. मला नव्हती आवड दुसऱ्या कुणाची. माझ्यावर नव्हता दबाव कुणाचा. मला होता खूप सारा वेळ. आणि माझं फक्त तुझ्यावरच प्रेम होत. तुला होती कित्येक बंधन. नवऱ्याची, सासू सासरे, दीर नंदेचे. तुला वेळ मिळायचा थोडाच कधी तोही तू माझ्याशी बोलून संपवायचीस. तुझं हि होत प्रेम माझ्यावर. पण फक्त माझ्यावर नाही. तुझं प्रेम वाटलं गेलेलं तुझ्या नवऱ्याला, मुलाला, मुलीला आणि मग उरलेलं मला. पण तेही मला आवडत होत. ऑनलाइन प्रेम खऱ्या आयुष्यात अनुभवताना कुठेतरी कल्पनेत बरच काही जागून घेतलं. आणि तो अनुभव तुला हि देण्यासाठी जेव्हा तुला मी तुझी साथ मागितली, माझ्यासाठी काहीही करू शकणारी तू, तेव्हा मात्र तुझ्या संसारात अडकलीस. आणि मी मोकळा असून हि तुझ्याकडे येऊ शकलो नाही. 
आणि जेव्हा हे सत्य आपल्या दोघांना हि पटलं तू तुझ्या संसारात रमून गेलीस आणि मी तुझ्या विचारात हरवून गेलो. बाकी...? तुझी आठवण काढतो अधून मधून. आणि बघतो तुझे ते सगळे फोटो. आणि पुन्हा कल्पना करतो तुझा पुन्हा मेसेज आला तर ?

Copyrighted©2020


2 टिप्पण्या