हमखास.

आज आठवण आली तुझी. कारण ? सहजच. तुझ्यावर प्रेम होण्यासाठी काहीच कारण लागलं नाही. तुझं अस कधी कधी विचारात येणं त्याला ही काही कारण लागत नाही. मी आपला विचार करत रहायचं. त्या विचारातून मला माझ्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करायचा. वेळ मिळाला की तुझं विचारात येणं हमखास नक्की असत. मग तो सगळा माझा वेळ मी तुझ्या विचारात घालवून पुन्हा मला दिवस पुरतच नाही म्हणून मोकळं व्हायचं असच चाललं आहे माझं चार  महिने झालं. तुला माझा पत्ता नाही. मला पण तुझा पत्ता नाही. माझ्या विचारात तू येतेस. तुझ्या विचारात मी आहे की नाही मला नाही माहीत. पण तुझा अजून या चार महिन्यात एक मेसेज नाही आला म्हणजे नाहीच. मी नाहीच आलो तुझ्या विचारात कधी. आलो ही असेन पण तू तुझ्या विचारातून अगदी पटकन वेगळं केलं असशील. पण मी तसा वागत नाही. जसा प्रत्यक्ष वागायचो विचारात ही तुझ्याशी तसाच वागतो. तू येण्याची वाट बघतो. आणि तू जाताना रडवेला असतो. तुझ्या आठवणीत रमून वेळ जातो फक्त. जो मला माझ्यासाठी हवा असतो. विचार संपतो तू जातेस आणि मला वेळ अजून हवा असतो. मी माझा इतका जगत नाही जितकी तू माझ्या विचारात जगून घेतेस माझ्यासोबत. हवं ते करून घेतेस माझ्याकडून जे मी प्रत्यक्षात इतक्या कमी वेळच्या सोबतीत करू शकलो नाही. इतके लाड तुझे मी केले आता विचारात तू माझे करतेस. बर वाटत. निदान या विचारांत तरी. शेवटच्या दिवशी तू म्हणाली होतीस काय केलस तू माझ्यासाठी ? जे केलं ते तुझ्यासाठी केलंस. तुला वाटलं, तुला हवं होतं म्हणून केलंस. ऐकून वाईट वाटलं पण तुझ्याबद्दल मनात कधी राग आला नाही. आलं फक्त प्रेम. आधी होत. सोबत असताना केलं आणि तू नाहीस तरी करतच आहे.
भाबड कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा 
 मूर्ख आहे मी. त्रासात जगुन खुश असल्याचा आव आणून कुणाला मी हा अजिंक्य दाखवत असतो मलाच नाही माहीत. आरशासमोर मी उभारलो तर लालसर डोळे भिजलेले दिसतात. खर सांगू तुझ्या डोळ्यात बघून तुला किस करताना मी डोळे मिटले नव्हते कधी पण मी मलाच बघताना पापणी मिटून उघडल्यावर बघू हि नाही शकत. ह्या डोळ्यातला त्रास माझा मला बघवत नाही. आणि तुला हा त्रास वर वरचा वाटला. खर प्रेम कुणाला मिळत या जगात ? मिळवणारे हरवून असतात आणि हरवलेले कुणा बिनकाम्याच्या वाट्याला गेलेले असतात. मी माझा मला असा सावरून जगत आहे. आतून खचून डोळे भिजवून बाहेर जाताना आवरून जातो आहे. पुन्हा कधी प्रेम होईल मला नवीन काय माहीत. पण तुझी आठवण तेव्हा ही येईल. हे नक्की. तू विसरलीस म्हणून मी विसरणं हा खोटेपणा होईल. आणि मी प्रेम खर केलंय. आणि ते तसच खर टिकवून ठेवायचं आहे मला. मी तुला कधीच विसरणार नाही. एक एक क्षण तुझ्या विचारांनी वर्ष वर्ष करून तुझ्या नावे काही वर्षे करून मी माझ्या कवितेत तुला लिहून अमर करेन. मी नसेन. माझं नाव कुणाला माहीत नसेल. कुणा हाती लागल्या या कविता शायऱ्या तर लोक तुला शोधतील. तुझा शोध घेता घेता त्यांचं तुझ्यावरच प्रेम वाढेल आणि ते जेव्हा टोकाला पोचेल तेव्हा त्यांचा हिरमोड होईल कारण तेव्हा त्यांना तुझ्या शोधात माझा शोध लागेल. आणि लोक राधा कृष्ण विसरून तुला मला लक्षात ठेवतील. जे मला वाचतील तुला शोधतील. बस बाकी काही नाही. आत्ता ही तुझ्याच विचारात होतो
म्हणून हे लिहायला सुचलं. बाकी काही नाही.

0 टिप्पण्या