Unblock-Call


कॉलेजमध्ये असताना तू दिलेला मला तुझा स्वतःचा मोबाईल नंबर अजून मी जपून ठेवलाय. त्या आधी तुझ्या मैत्रिणींच्या मोबाईलवर मी कॉल करायचो आणि मग आपल बोलन व्हायचं. तू बारावी पास झालीस आणि पप्पांनी तुझ्या तुला नवीन मोबाईल आणि सिमकार्ड तुझ-तुला घेऊन दिल. त्या नंतर तू पहिला कॉल मला केलास. तेव्हा मी तुझा नंबर सेव्ह करून ठेवला होता. त्या नंतर वर्षभरात माझा दोनदा मोबाईल बंद पडला तेव्हा मी तुझा नंबर तोंडपाठ करून ठेवला. नंतर काय तर मी मोबाईलच बदलला. पण तुझा तोच नंबर त्यात सेव्ह केला. कित्येक मेसेज त्यावर आपले साठलेले. कित्येक कॉल, मिसकॉल, रिसीव्हकॉल दिसत होते. आपली मैत्री त्यानंतर प्रेम मग कित्येक चोरून भेटी, आणि कित्येक ठरवलेल्या भेटी आणि त्याचे सगळे प्लान ऑडीओ रेकॉर्डिंगमध्ये सेव्ह होते. इतके कॉल झाले आपले कि माझ लग्न झाल तेव्हा बायकोने मला नवीन मोबाईल गिफ्ट दिला म्हणून माझा जुना मी विकून टाकला. बरेच नंबर कित्येक दिवस माझ्याकडून सेव्ह करायचे राहिले, पण  त्या मोबाईलमध्ये बायकोचा आणि तुझा नंबर पहिला सेव्ह केला. किती तरी माझे बेस्ट फ्रेंड आहेत त्यांचे पूर्ण दहा आकडे मला आठवतच नव्हते, अजून हि आठवत नाही. नावाने नंबर शोधूनच मला कॉल लावावा लागतो. आणि कधी कधी बायकोचा पण नंबर शोधून लावावा लागतो. तिचा सिंपल सिरीज नंबर आहे. तुझ्या तर नंबर मध्ये सगळे आकडे होते तरीही मला इतके वर्ष लक्षात आहे. तुझ लग्न झाल. तुझी मी वर्षभर वाट बघितली. पण तू आली नाहीस माझ्याकडे. जेव्हा दिसलीस तेव्हा वाढलेल्या पोटाची तू दिसलीस. मग मला सहन नाही झाल आणि मीही लग्न करून टाकल माझ.

आजच्या दिवशी आपला शेवटचा कॉल झाला त्याला मोजून सहा वर्ष पूर्ण झाले. मोबाईलवर मी दरवर्षी काही ठराविक रिमाइंडर लावून ठेवतो त्यात ह्या दिवसाचा हि असतो. मला माहित आहे, मी मनात बोललेलं तुला नाही ऐकू येणार. प्रेमात असतानाच एकमेकांची मन समजता येतात. प्रेम नसेल तर काहीच नसत. तरी मी सहा वर्ष झाले तुझी आठवण आली कि तुझ्याशी बोलतो. काल मी फेसबुकवर अशाच मित्रांच्या पोस्ट वाचत होतो आणि नेमका कॉल आला. आणि मला सुचायचं बंद झाल. हृद्य गरमा-गरम झालेलं जोर-जोरात धडकून. अग तो नंबर तुझा होता. तू मला कॉल केलास. इतक्या वर्षांनी. आणि मी कसे तरे श्वास ताब्यात ठेवून तो कॉल उचलला.

मी : हेल्लो ?

: हा कोणाचा नंबर आहे ?

मी : का ?

: हे सिमकार्ड मी दोन वर्ष झाल घेतलय. पण हा नंबर तुमचा अननोन म्हणून सेव्ह झालाय मोबाईलमध्ये. आज विचारेन मग विचारेन करत राहून गेल. आत्ता आठवल म्हणून विचारल.

मी : हा नंबर ऐश्वर्याचा आहे ना ?

: नाही. सतीश बोलतोय मी.

मी : पण ट्रू-कॉलरला तर ऐश्वर्या नाव येतय.

: हो बरेच जण बोलतात मला, पण माझा साधा मोबाईल आहे. त्यात ते ट्रू-कॉलर नाहीये त्यामुळे आधीच्या मालकाच नाव दिसतय.

मी : बर माझा नंबर डिलीट केला तरी चालेल.

: होत नाही ना.

मी : मग आता ?

: जाऊदे. माणसाचा नंबर आहे ना. मग काय हरकत नाही. बाईचा वैगरे असता तर अवघड झाल असत. बर फोन ठेवतो.

मी : बाय.

इतक्या वर्षांनी पुन्हा नंबरच्या मार्फत आलेली तू सत्याच्या मार्गाने गेलीस. जायची चांगली सवय आहे तुला. आणि तुला क्षणभर जगून आठवणीत साठवायची वाईट सवय मला आहे.       

0 टिप्पण्या