MISS YOU

 

आत्ताच दहा मिनिट झाले. जेवलो मी. दिवसभर इतक काम झाल, कि रात्री जेवण ठरवून पण कमी जेवलो नाही. जेवण झाल आणि बसलो उशीला टेकून. कानात हेडफोन लावून गाणी लावली. डोळे मिटले. शांत प्रेमाची गाणी सुरु होती. डोक्यात कामाचे विचार होते. कानात गाणी सुरु होती. मनात एकांत होता आणि हाताची बोटं गाण्यासोबत वळवळ करत होती. आखडलेले पाय सरळ व्हायला तयार नव्हते. मांडीवरची उशी मांडीवरून उतरून बेडवर पडायच्या तयारीत होती. खोलीतली लाईट बंद असली तरी रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांच्या लाईटीचे प्रकाश खिडकीतून घरात यायचे प्रयत्न करत होते. सगळे नुसते प्रयत्न आणि हालचाली यात एक मन माझ फक्त काहीही करत नव्हत. एकदम शांत होत ते.

एक गाण संपल दुसर लागल. दुसऱ्याच तिसर लागल. बाहेरून एक चक्कर टाकून यावी म्हणून जागचा उठलो. गाणी सुरु होतीच. चप्पल घातली आणि बाहेर आलो. रस्त्यावर शांतात होती. शांत रस्त्यावर चालताना कानात वाजणारी गाणी. आणि त्या गाण्याच्या चालीवर धुंदीत चालत चालत मी बराच पुढ आलेलो. इतका वेळ माझ लक्ष नव्हतच माझ्याकडे. मगाशी जेवल्यापासून मला सलग दहा मिनिट झाले उचक्या लागत होत्या. जेवल्यावर ढसा-ढसा पाणी प्यायची सवय मला आहेच. पण आज इतक जास्त पिल नव्हत. आता घरी जाऊन पाणी प्यावं म्हणून घराकडे निघालो. गाण संपल दुसर लागल. गाण्यासोबत माझे मूड बदलत चालले होते. आणि त्यात तुझी आठवण आली. मला उचकि लागली कि कायम मला म्हणायचीस मीच तुझी आठवण काढते. मी तुझा कॉल कधी उचलला नाही तर मेसेज करून सांगायचीस माझा कॉल उचलला नाहीस न आता बघ मी तुझी इतकी आठवण काढणार आहे ना कि, आख्खा जग भरून पाणी पिलास तरी उचकी तुझी थांबणार नाही. तू तशी मज्जा करायचीस माझी पण खरच उचकी लागली मला तर साखर, खडीसाखर, पाणी, सरबत आणि काय काय खाव, प्यावं लागायचं.

पण आत्ता आलेल्या या उचकीला काही कारण नव्हत. आपण वेगळे होऊन झाले आता दीड वर्ष. तेव्हापासून तुझा माझा काही पत्ता नाही. अस नाही. तुझ लग्न झाल. पण आपण फेसबुकवर होतोच. पण कधी बोलन झाल नाही. बहुतेक तुझ्या नवऱ्याला चालत नसेल तू कुणाशी बोललेलं. पण तू अधून मधून नवऱ्यासोबत काढलेले फोटो टाकतेस ते मी लाईक करत नसलो तरी बघतो नक्की. पण अलीकडे तीन चार महिने झाले तू फेसबुकवर दिसलीच नाहीस.

आत्ता या सगळ्या गोष्टीचा विचार करून उपयोग काय. घराजवळ आलो. घरात आलो. किचनमध्ये पण आलो. पाणी प्यायलो. आणि जाऊन परत माझ्या खोलीत बसलो. पुन्हा मघासारखा अंधारात शांत गाणी ऐकत बसलो. अधूनमधून रस्त्यावरच्या गाड्यांचा प्रकाश खोलीत ये जा करत होता. गाणी ऐकता ऐकता हरवून गेलो मी. बाहेरचे सगळे आवाज कानात यायचे तर बंद केव्हाच झालेले. शांत बसून पाच मिनिट झाले पण पुन्हा थांबलेली उचकी सुरु झाली. परत जाऊन पाणी पिऊन आलो. जराशी थांबली उचकी. बेडवर बसून मग फेसबुक उघडल. आणि त्यात पोस्ट बघत बसलो. कानात गाणी सुरु आणि तोंडातून उचकी सुरु आणि हे दोन्ही सुरु असताना फेसबुकवर पोस्ट बघण सुरु होत. एक पोस्ट दिसली त्यात.

आदित्य बाबासाहेब ***

 पोस्ट जस्ट नाऊ फिलिंग लव्हली.

“फ्रेंड्स मी बाबा झालो. प्रिन्सेस जन्माला आली.”

आणि उचकी थांबली. मी कानातले हेडफोन काढले. उचकी माझी थांबली.

तुझा नवरा, आदित्य.. त्याने हि टाकलेली पोस्ट. आत्ता समजल तू तीन चार महिने का फेसबुक वापरत नव्हतीस. कारण तुला मुलगी झालीय. वा..छान. आपल लग्न झाल्यावर आपल्याला मुलगी हवी होती आणि तुला मुलगी झाली आपल्याला नाही. आणि म्हणून बहुतेक तुला माझी आठवण येत असणार. नक्कीच.. आणि म्हणूनच मला इकडे उचकी लागतेय हे आत्ता मला समजल. आता मला माझ लग्न झाल्यावर मुलगा झाला तरी चालेल आपल स्वप्न मी नाही निदान तू तरी पूर्ण केलस आणि त्या निमित्ताने का होईना तुला माझी आठवण आली. यातच मी खुश झालो. आणि मी गाणी बंद करून डोळे मिटले. उगीच पाणी डोळ्यातून येऊ नये म्हणून.   


Copyrighted2020

0 टिप्पण्या