H E L L O !


हेल्लो, माझ्याशिवाय जगू न शकणारी तू, आज नशिबात असलेल्या आयुष्यापेक्षा जास्त चांगली जगत आहेस. हा बदल तुझा एकट्याचा नाही. तू माझ्याशी असलेल नात तोडल म्हणून हा बदल झाला नाही. तुझ्या नशिबात हे दिवस होतेच अस हि नाही. तुला मिळाली साथ त्याची, ज्याने तुला त्याची भुरळ पाडली. तुला हव ते देऊन, हव तिथे नेऊन, तुझ्यासाठी हव ते करून बदल्यात दिवसा बेडवर घेऊन जे काही त्याने केल, त्याला प्रेम म्हणून तू त्याच्यासोबत खुश झालीस. घरी हि मिळत नव्हत इतक सगळ त्याच्याकडून मिळत असताना तू घरी हि कमीच राहायला लागलीस. कॉलेज आणि क्लास नंतर पुन्हा नवीन एक्स्ट्रा क्लास आणि नवे काल्पनिक फ्रेंड्स जन्माला आले. कायम ऐंशी नव्वद पर्सेंट मोबाईलच चार्जिंग ठेवणारी, तुला कॉल केला तर ऐकू यायचं “तुम्ही लावलेला क्रमांक सध्या बंद आहे, कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा”. घरासमोर चकचकीत असणारी तुझी व्हेस्पा गाडी मी तुझ्या घरासमोरून जायचो तर धूळ खात पडलेली दिसायची.

तुझ्या फ्रेंड्सना मी माहित होतो. मी कुठे हि दिसलो तरी तुझा पत्ता सांगायचे. मी जेव्हा त्यांना जाऊन तुझा पत्ता विचारू लागलो ते मान हलवत “नाही माहित” एवढच खुणावायचे. तुझ्याकडे कोणते मेसेंजर नव्हते. पण तू इंस्टाग्राम वापरायची. आपण सोबत असताना ते हि कित्येक दिवस बंद होत. मी तर इंस्टाग्राम हि डिलीट केलेलं. पण तु हरवलीस आणि तुला शोधायला मी पुन्हा इंस्टाग्राम सुरु केल तर तू तिथे दिवसातले कित्येक तास ऑनलाईन दिसत होतीस. मी मेसेज केला तर माझा मेसेज तुझ्यापर्यंत पोचतच नव्हता. दुसऱ्या नावाने अकाउंट काढून तुला मेसेज केला तरी तुझा लवकर रिप्लाय नाही मिळाला.

बरेच दिवस मित्र विचारत होते अरे तुमच भांडण झालंय का ? मम्मी विचारत होती तिच्याशी बोलत नाहीस का ? पण मी विषय बदलत होतो. किती तरी वेळा मी ठरवल तू माझा विचार सोडला तर मी हि तेच कराव आता, तुझ्याबाबतीत. पण जमत नाही.

तू दिलेलं पाकीट मी त्यात तूच दिलेल्या नोटा तशाच जपून ठेवलेल्या. तुझी आठवण म्हणून. ते असतील पाचशे रुपये वैगरे.

परवा रविवार होता. सकाळी उठून बाहेर गेलो. दारूच्या तीन बाटल्या आणि सिगरेटस घेतल्या. गेलो एका शांत ठिकाणी. खूप दारू प्यायलो. त्याची नशा अजून चढावी म्हणून सिगरेट ओढल्या. हालत मग अशी झाली कि जागच उठता येत नव्हत. बराच वेळ त्या शांत ठिकाणी जमिनीवर पडून राहिलो. जेव्हा जाग आली, अंधार पडलेला. जमिनीला धरून मग झाडाला धरून मिळेल त्याचा आधार घेत उठून उभा राहिलो. गाडीवर बसलो. गाडी तुझ्या घराकडे आणली. गाडीच्या स्पीडपेक्षा चालणाऱ्या माणसाच स्पीड जास्त असेल. असा कसाबसा तुझ्या घराजवळ आलो. नेमक्या त्या तुझ्या घराजवळच्या चिंचेच्या झाडाखाली तू आणि एक मुलगा एका फोर व्हीलरमध्ये दिसलात. तू त्याला जवळ घेत होतीस. अगदी तशी जशी मला घ्यायचीस. तुम्हाला बघून मी गाडीवरून उतरायला गेलो. आणि माझा तोल गेला. मी गाडीवरून पडलो. तुझ लक्ष माझ्याकडे गेल. तू मला ओळखून पण अनोळखी केलस. आणि तो अनोळखी गाडीतून उतरून मला मदत करायला येणार होता तर तू त्याला अडवलस. तू काहीतरी बोललीस त्याच्याशी आणि तू गाडीतून उतरून तुझ्या घरी निघून गेलीस. आणि तो गाडी घेऊन तिथून निघून गेला. तुला मागून मी किती हाका मारल्या पण तू वळून एकदा हि बघितल नाहीस. थोड्यावेळाने दोन पोर तिथ आली आणि त्यांनी मला उचलून पाणी वैगरे दिल. मग मी तिथून तसाच घरी जाऊन झोपलो. सकाळी शुध्दीवर आलो तर गुढग्याला लागलेलं दिसल. त्यात जीन्स तिथ जखमेवर चिटकून बसलेली. पाय खूप दुखत होता. तरी तू नजरेसमोरून जात नव्हती. म्हणून मी तुला कॉल लावतोय कालपासून. पण तू उचलत नाहीयेस. आणि उचलू हि नकोस. माझ्याशिवाय तू जगणार कि नाही हा प्रश्न मला कायम पडायचा. मिळाल मला उत्तर. तू जगतीयस आणि जगशीलसुध्दा.

मेसेज वाचलास तर वाचून डिलीट कर.      

कायम तुला मी मिस करेन. गुड बाय.

copyrighted@2020

2 टिप्पण्या