bye..!लांब कुठे दिसलीस तरी आख्खा दिवस भारी वाटायचं, आजचा दिवस लवकर संपून उद्या व्हावा आणि पुन्हा तू दिसावीस सहज अस वाटायचं. कधीतरीच आपली नजरा-नजर व्हायची. पण हि नजर पुन्हा भेटवी यासाठी आठवडा-आठवडा वाट बघत बसायचो. रंगाने सावळा आहे मी, माणूस दोन गोष्टींनी काळा होतो, एकतर सारखा चहा प्यायला तर किंवा मग उन्हात जास्त फिरलं तर. मला चहाशिवाय जमत नाही आणि तुझ्यामागे फिरल्याशिवाय राहवत नाही. आणि अस हि प्रेमात रंग मधे
येतो कुठे ? आणि म्हणून तू जिथे जिथे जायचीस तुझ्यापासून प्रत्येक शंभर मीटर वर मी असायचोच. पाय दुखले तरी चालत, कधी पेट्रोल संपल, पेट्रोलला पैसे नसले तर मित्राची गाडी आणून तुझ्या मागे यायचो पण यायचो.
आपल्या इथे मुली काय कमी आहेत का ? पण कधी कुणाकडे बघू वाटल नाही. तू आवडायचीस. तुझ्यावर प्रेम होत. तुझ्यावर प्रेम यायचं. सगळ कस तुझ्यासाठी असायचं. तीन वर्ष इतकी धावपळ करून शेवटी मनातल तुला सांगून टाकल. आणि तुझा होकार मिळाला. विश्वास बसत नाही पण हो हेच खर आहे. तू होकार दिलास. मला दोनच डोळे देवाने दिलेले आहेत पण जगाला हजार डोळे आहेत विसरून गेलो होतो मी. मी तुझ्यामागे फिरायचो तुला लपून बघायचो. तुझ्याबद्दल इतरांशी बोललो नाही तरी तुला बघून माझ्या चेहऱ्यावर बदलणारे हावभाव मला दिसत नसले कळत नसले तरी हे जग बघत होत. आणि त्या जगतले बरेच तुला ओळखणारे होते. आणि तुला केव्हाच माझा पत्ता लागलेला. आणि मी ? तुझ्या पत्त्यावर रोज येऊन  तुला बघून घरी जायचो. असो, शेवटी आपण एक झालो.
प्रेमाला सुरुवात झली. प्रेम सगळ्याचं सारख असत म्हणतात. माहित नाही पण आपण जे जगलो ते वेगळ होत नक्कीच. आणि या वेगळ्या प्रेमाचा शेवट कुठेच नव्हता. लग्न करून पुढे या प्रेमाला अजून नवीन वळण द्यायचा निर्णय तू आणि मी घेतला. पण प्रेम मिळवण्या इतके कष्ट हा निर्णय घेताना काहीच झाला नाही. कष्टाशिवाय काहीच नाही या जगात हेच खर. कमी किंवा आयत म्हंटल तरी चालेल असा हा निर्णय लवकरच विचारातून निघून गेला. आणि तूला दुसरा कुणी आवडायला लागला. माणूस आहेस तू हि. समजू शकतो मी. आवडू शकत दुसर कुणी. माझ बोलन, माझा आवाज, माझा चेहरा, माझी सोबत, माझी मिठी, माझ्यासोबत सेक्स, सगळच माझ आवडाव तुला हि जबरदस्ती झाली. आणि प्रेमात जबरदस्ती असेल तर प्रेम टिकत नाही म्हणतात. मी समजून घेतल तुला पण तुला हे समजलच नाही. तू त्या माणसासोबत खुश व्हायला लागली. आणि मी तुला त्रास वाटायला लागलो. मी लांब व्हायला लागलो. आणि तू मला बघायला हि टाळत राहिलीस. तीन वर्ष घेतलेला त्रास असा आठवड्याभरात कित्येक पटीने मला परत व्हायला लागला. एखादा जुना रोग औषध गोळ्यांचा डोस संपल्यावर पुन्हा सुरु व्हावा तसा. पण तरी मी सहन केल. कारण तुझ्याकडे पुन्हा येऊन तुला त्रास देण्यापेक्षा आणि तुला त्रास होतो म्हणून मी स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा हा सगळा त्रास मी एकट्यानेच सहन करायचा ठरवल.
आठवा महिना सुरु आहे, आपण एकमेकांपासून वेगळे होऊन. आणि अचानक तू आज भेटलीस मला. मला वाटल होत तोंड फिरवून जाशील तू. पण नाही, रस्त्यापलीकडून मला ओळख दाखवून, रस्ता अलीकडे करत माझ्यासमोर येऊन थांबलीस. मला वर पासून खालपर्यंत एकटक बघत राहिलीस. दाढी चांगली दिसतीय म्हणून कौतुक केलस, पण केस विस्कटलेत म्हणून सांगितलस. पुन्हा तब्येत चांगली झालीय म्हणून म्हणालीस पण स्कीन डार्क झालीय म्हणून बोलून गेलीस.
मी फक्त विचारल कशी आहेस ? आणि कुल.... म्हणून स्माईल दिलीस. तुझ्या ओठांना बघून माझे बारीक झालेले ओठ बघून हाच प्रश्न तू मला मुद्दामहून नाही विचारलास. असो,
बराच वेळ शांत राहून जेव्हा मनाची तयारी केली मी आणि बोलायला शब्द घशाशी आणले मागून तुझा तो आला. आणि तू मला ‘बाय’ म्हणून निघून गेलीस. दोघातल पाच मीटरच अंतर एकशे पंचवीस किलोमीटर झाल. आणि मी अजून हि त्या पाच मीटरच्या विचारात दोन किलोमीटर चालत घरी गेलो. जिथ गाडी, विमान, रॉकेट अस कोणतही वाहन जात नाही त्या विचारांच्या रस्त्यावर मी पाच मीटरच्या पुढे जाऊच शकलो नाही. वाटल होत, बोलशील तू. आपण बोलू. पण नाही जमल. प्रेमाआधी आणि प्रेमात खूप बोलता येत. पण नंतर सगळ संपल्यावर बोलायला शब्द नसतात. असले तरी ते मनातून घशाशी येऊ शकत नाहीत. आले तर तोंड उघडल जात नाही. आणि उघडल तरी मधे इतका वेळ निघून जातो कि सगळे शब्द घशातून पुन्हा घसरून मनात जातात आणि जिभेवर उरतो एकच शब्द.
“बाय”.


copyrighted@2020

0 टिप्पण्या