WARNING..!

ब्लॉगवरील कोणतेही लेख कॉपी पेस्ट करून स्वतःच्या नावाने शेअर करू नये तसेच कोणतीही कथा किंवा त्यातले प्रसंग वा संवाद कोणत्याहि वेब मालिकेत, फिल्ममध्ये विनापरवाना वापरू नये तसे आढळल्यास 5,000,00 रुपयापर्यंतचा दंड कायदेशीररित्या भरावा लागेल,आणि/किंवा तीन वर्ष कैद होऊ शकते.

रोज-रोझ डे.

 


रोज रोज तीच आणि त्याच भेटण अस होत नाही. कधी तरी केव्हा तरी भेटण आणि बोलण अस होत. रोज रोज भेटून तरी काय अस बोलणार ? बोलायला विषय खूप असतात त्याच्याकड पण वेळ तेवढा पुरत नाही. तसा पाऊस काय रोज पडत नाही. ढगाळलेल वातावरणहि रोज होत नाही. त्याला तिला भेटण्याचा आनंद आणि तिला त्याच्याशी बोलण्याचा आनंद होण हि गोष्ट देखील रोजची नाही. आनंद फार कमी मिळतो आपल्याला रोज ( च्या ) या आयुष्यात. दुःखाचा खच पडलाय आपल्या या रोज ( च्या ) या दिवसांत. अस सगळ असताना ती  त्याला भेटायचं ठरवते. ठरवते म्हणजे काय तर सांगतेच. रोज काय काम असतच कि पण आज वेळ काढते अस ती त्याला सांगते.

वेळ आणि ठिकाण ठरत. नवीन तो असतो त्या शहरात. ती रोज तिथच राहत असते. ठरलेली वेळ होऊन जाते तरी तिचा पत्ता नाही. काही न काही निरीक्षण करत एका बागेत बसून तो काही जोडपी बघत असतो. कोण कुणाच्या मिठीत. कोण कुणाच्या मांडीवर कोण कुणाच्या शेजारी. कोणी डोक टेकवलेल होत त्याच्या मजबूत खांद्यावर. कोणी डोक ठेवल होत तिच्या माऊ माऊ मांड्यांवर. कोण फिरवत होत हात त्याच्या रंगवलेल्या राठ केसातून. कोण फिरवत होत हात तिच्या सिल्की केसांमधून. मधेच कोण छक्का येऊन पैसे मागत. कोणी भेळ वाला भेळ घेण्याचा आग्रह करत. कोण मागत होत भिक. आणि येणारे-जाणारे बघत होते हे सगळ अ-अश्लील प्रेम. मुळात हे अश्लील नाही अस माझ मत आहे. फरक फक्त एवढच कि आपल्याला हे अस उघड्या डोळ्यांनी बघायची सवय नाही किंवा आपली तेवढी स्वतंत्र मानसिकता नाही. बाकी विचारात आपण कोणावर अगदी बलात्कार हि करत असतो पण ते विचार अश्लील नसतात. का-तर ते आपले विचार आहेत. मग दुसर्याच्या बाबतीत का अस आपण समजायचं ? तर....

ती बाग रोज ( च्या ) सारखी किंवा जरा जास्तच आज भरली होती. त्यान या आधी हि त्या बागेत वेळ घालवला होता. पण आज या प्रेमी जोडप्यांना बघून मनातला विचारांचा कहर वाढत गेला. भेटायची वेळ टळून किमान दोन तास झाले होते. पण तिचा काही फोन आला नाही. मनात खूप राग असताना हि तिला माफ करत होत त्याच मन. बहुतेक मोठ्यामनाचा होता तो. फोन वाजला. आणि एकच छातीत भूकंप झाला. तिचाच फोन असणार या आनंदान मोबाईल हातात घेतला पण तो कॉल तिचा नव्हता. पुन्हा त्याच मन हिरमुसल. अस त्याच्या बाबतीत रोज होत असत त्यात काय नवीन नाही. 

त्यान मग तिथून निघून तिच्यासाठी दोन गुलाब घेतले. काही चॉकोलेटस आणि दोन कॅडबरी अस काही काही घेतल. आणि ठरलेल्या ठिकाणाच्या अजून जरा पुढे तो निघाला जेणे करून तिला तिथे यायला पुन्हा वेळ लागायला नको म्हणून. वेळ महत्वाचा असतो आपल्यासाठी रोज. पण आज खूपच महत्वाचा वेळ होता. फोन वाजतो. तो उचलतो. आणि ती सांगते मला अजून वेळ लागेल. मनाला सावरत घेऊन तो तसाच चालत राहतो. एक-दोन-तीन-चार आणि साडेचार इतका तास तो वेळ घालवल्यावर ती येते. उदास हताश होऊन. कारण तिला खूप महत्वाची काम असतात. कसली ते माहित नाही. दोघ बोलू लागतात एका ठिकाणी जाऊन. तिला समोर बघून घालवलेला वेळ. आणि आलेला कंटाळा सगळ बाजूला ठेवून तो तिच्याशी बोलतो.आणि बोलता बोलता तिला दोन कॅडबरी देतो. ती खुश होते पण इतकी नाही.

तिला बघून तोही खुश होतो पण नेहमी सारखा नाही. तिच्या साठी घेतलेली चॉकलेटस तो कुठे त्या रस्त्यात गरीब मुलाला देऊन टाकतो. दोन कॅडबरीना रस्त्यावरच टाकून देतो. कारण त्या इतक्या वेळात पाघळून गेलेल्या असतात. आणि ते रोझ,........ ते दोन गुलाब जे रोज टवटवीत असतात त्या पारड्यात पण त्याच्यासोबत तिची वाट बघता बघता सुकून गेलेले असतात.

रोज रोज असे ते मुळीच भेटत नाहीत. रोज रोज भेटण्यासारख कारणही त्यांच्याकड नाही. पण रोज रोज रोझ डे हि येत नाही. हे मात्र त्या वेडीला कळालच नाही. पण आता हा रोझ डे त्याला रोज रोज आठवेल हे मात्र नक्की.

Copyrighted@2020

0 Comments