नक्की वाचतू आणि मी प्रेम केलं. जगासाठी ती चूक असली तरी आपल्यासाठी आपण ठरवलेलं ते बरोबर एक काम होत. तू मला सांभाळून घेताना मी तुला साथ देत आपण पहिले काही म्हणजे निदान चार वर्षे आपण प्रेम केलं. आणि मग चार वर्षांनी जेव्हा अस वाटलं की आता विरह होणार आपण पळून जाऊन लग्न केलं. तू आणि मी त्रासात होतो. पण तू मला खुश राहून दाखवलंस आणि मला धीर दिलास. तू बोलली होतीस मला की तुझ्यासोबत मी कोणत्याही परिस्थिती राहीन. तू राहिलीस. पुढे मी नोकरी केली. तू तुझं शिक्षण आणि नोकरी केलीस. गरज असून पण गरज कमी केल्या आपण. पैसे जमवून ते साठवून वेळ घेतला पण आपण भाड्याच घर सोडून स्वतःच घर घ्यायच धाडस केल. खूप त्रास झाला होता तेव्हा. घराचा हप्ता आणि तुझ्या पोटात वाढणार बाळ. यात बराच खर्च होत चाललेला. पण हे आपल्या प्रेमासाठी आपण पूर्ण करत होतो. आपण आपल्या हक्काच्या घरात रहावं आणि आपल्या बाळाच्या भविष्याची तजवीज म्हणून ते घर घेतलेलं.
आपल्याला मुलगा झाला आणि तू खूप खुश झालीस. तुला भाऊ नव्हता त्यामुळे कायम तुला मुलगा असावं असं वाटायचं. तू खूप त्याला जपलं. मी त्याच्यासाठी पुढची स्वप्न बघायला लागलो. मुलगा झाला यातून तू सावरत असताना मी तुम्हा दोघांच्या भविष्यासाठी पुन्हा कामाला लागलो. तरी तू बसल्या बसल्या घरी शिकवण्या घेऊन मला हातभार लावत होतीस. पुढे मला बढती मिळाली. आणि सगळे कष्ट निवांत झाले. गरज नव्हती तरी तू मन रमवण्यासाठी शिकवण्या घेतच राहिलीस. मी नोकरी करत राहिलो. या इतक्या वर्षात आपण आपल्या मुलाला मोठं करण्यात इतकं गुंगून गेलो की. अलीकडे बारा एक वर्षात तर मी तुला मिनिटाच्या वर मिठीत घेतलेलं आठवत नाही. मुलगा मोठा होत गेला तस आपल्यातल अंतर वाढत गेल.  ही शरीराची आवड सुरुवातीला राहिली. अस वाटलं होतं. आयुष्यभर असच चालेल पण मुलगा झाला आणि आपण त्याच्या आयुष्यासाठी जगत राहिलो. आपलं आयुष्य बाजूला ठेवून. विसरून गेलो तू आणि मी की आपण ही आहोत. आपलं ही आयुष्य आहे पण हेच तर प्रेम असत ना.केलं तर निभवाव, जगवाव, वाढवावं लागत. मुलगा मोठा झाला. शिकून नोकरी करायला लागला. घराचं आपल्या अजून मोठं घर झालं. बाजूने आणि वर घर वाढवून घेऊन त्याने आपल घर अजून मोठं केलं. मुलगा माझ्यापेक्षा कित्येक पटीने जास्त कमावतो हे बघून बर वाटत. तू हवी होतीस हे बघायला अस मी म्हणणार नाही निदान मला बघायला तरी तू हवी होतीस. तू होतीस तोपर्यंत मी उन्हाचा घरात बसून टीव्ही बघायचो किंवा एखाद रोज  पुस्तक वाचायचो. पण तू गेलीस तस मला घरी राहूच वाटायचं नाही. मी तुझ्या विचारात हरवून जायचो. मन रमवायला मी इथेच आसपास सकाळी बाहेर फिरायला लागलो. एक दिवस फिरून थकून आलो घरी. तहान लागलेली आणि भूक सुद्धा. दाराला कुलूप होत. मग पुन्हा इकडे तिकडे भिकाऱ्यांसारखं रस्त्याने फिरत संध्याकाळी घराजवळ आलो. कुलूप काढलेलं दिसलं. मी दार वाजवल. मुलाने दार उघडलं आणि मी आत गेलो.दुसऱ्या दिवशी मुलगा आणि सून दोघे दारात माझी वाट बघत होते. मी बाहेर जायची. मी पण त्यांच्यासोबत बाहेर गेलो. आणि त्यांनी कुलूप लावून चावी मुलाने खिशात ठेवली. आणि निघून गेला तो. गेली सहा महिने तो माझ्याशी अस वागतोय. खूपदा प्रयत्न केला त्याच्याशी बोलायचा पण जीभ रेटत नाही. तू असतीस तर तो अस वागला नसता अस नाही पण वागला असता तर तू तरी सोबत माझ्या असतीस. करमल असत मला. बर वाटल असत मला. तुला सांगावं म्हणून कित्येकदा मनात तुझ्याशी मी बोलत असतो तुला ते ऐकू येत का नाही काय माहीत. बहुतेक तुला ऐकू आलंच नसेल. ऐकू आल असत तर मधे इतके सहा महिने गेले नसते. उद्या तुझं पहिलं वर्षश्राद्ध बहुतेक उद्या ही मला असच बाहेर जावं लागेल. म्हणून हे पत्र लिहून मी तुझ्या फोटो पुढे  ठेवल आहे. अस बोलतात श्राद्धाला पित्र खाली येतात.हे खरं असेल तर. हे पत्र नक्की वाच. आणि वाचलं तर. मला शोधायला ये.

Copyrighted@2020

Post a Comment

2 Comments

close