सांगणार कधी ?

 

एका गावातली गोष्ट. ज्या गावात मी राहायचो पण त्या गावाला ओळखायच कारण तिथे तू राहायची. त्या गावात गल्ली बोळ अनेक. पण प्रत्येक रस्त्याला जाणारा एक मुख्य रस्ता तुझ्या घरापासून लागून जायचा. त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडी तुझ्या घराच नाव असायचं. पहिल्यांदा मी इथे आलो होतो तेव्हा मी घेतलेल्या नव्या घराकडे जाताना मी रस्ता चुकलो. तेव्हा नीट पत्ता विचारला तेव्हा पहिल्यांदा एका माणसाकडून तुझ्या घराच नाव ऐकल. मग गाव फिरताना कित्येक ठिकाणची माहिती काढताना तुझ्या घराच नाव ऐकू आल. मग इथेच वर्षभर राहून मी हि या गावचा झालो. मग नवीन कुणी येणारा जेव्हा वाटेत अडवून मला पत्ता विचारे मीही मग तुझ्या घराच नाव घेऊन त्याला पत्ता सांगू लागलो.

गावात राहून बरच काही बघून घेतल पण ज्या तुझ्या घरामुळे या पूर्ण गावाची ओळख झालेली ते घर आणि त्या घरातली माणस बघायचा क्षण आला नव्हता. येत नव्हता. गावची जत्रा आली. सबंध गाव तिथ होत. तुझी आई वडील दोन भाऊ आणि तू देखील होती. जेव्हा मला एका बोर्डवर फोटो बघून समजल कि त्या घरातले माझ्या समोर आहेत. मी तुझ्या कुटुंबाला बघुन घेतल. नजर एक एक व्यक्ती बघून पुढे जात होती आणि जशी माझी नजर तुझ्यावर आली. पुढे गेलीच नाही.

तुझ्यावर नजर बसली. आणि मग जीव हि बसला. पुढे मग तुझ्या घरापुढून येण-जाण वाढत गेल. आणि मग तू केव्हा केव्हा दारात, खिडकीपाशी, टेरेसवर असतेस या सगळ्या वेळा मला कळून चुकल्या. मग तू बाहेर जातेस कधी. घरी येतेस कधी. कुठे जातेस. का जातेस सगळी कारण आणि त्यांच्या वेळा मला कळून गेल्या. माझ सगळ रुटीन बदलून मी तुझ्या रुटीन प्रमाणे माझ रोजच जगण सुरु केल. तुला कळू नये असा लांब राहून तुझा माग काढणारा मी, तुला हे कळूनसुद्धा न कळल्यासारख वागणारी तू. जोडी इथच आपली जुळली.

सहा महिने हा चाललेला कार्यक्रम एकदा तुला एका मुलासोबत बोलताना बघून थांबला. बस, आता उशीर अजून झाला तर अवघड होईल म्हणून मग एकदा तुला कळेल असा तुझा माग धरून दिवसभर तुझ्या मागे फिरत राहिलो. तू कळूनसुद्धा माझ्याकडे एकदा हि नाही बघितल. संध्याकाळी घरी जाताना मग मी हिम्मत मनाशी जुळवून तुला अडवल. मनातल सांगितल. तू नकार देणार होतीस म्हणून मनाची तयारी केव्हाच करून आलेलो. आणि तू नकार दिलास. माझ्या प्रेमाला.

मी माघारी फिरलो. पाठमोरा असतानाच तुला सॉरी म्हणून चालू लागलो. तू म्हणालीस. प्रेम कुणी पण करत. लग्न करून प्रेम करणार आहेस का ? मी होकार दिला आणि तू हसून घरी निघून गेली. मी वेडा जगून गेलो कित्येक रात्री आणि दिवस तुझ्यासोबत त्या एका क्षणात. पुढे मग कितीदा तुला भेटण्याचा आणि मग शोधण्याचा प्रयत्न केला पण तू दिसली नाहीस. बाहेर मग महिन्याभराने विचारपूस केली तुझी तेव्हा समजल तुझ्या नावाची या गावात मुलगीच कुणी नाहीये. एक होती जिला मरून किमान पन्नास वर्ष झालीयत. मी खुश झालो. आणि मग रात्र आणि दिवस शोधणारा तुला मी पूर्ण दिवस शोध घ्यायला लागलो तुझा. आणि तू मिळालीस मला शेजारच्या गावात कुणा एकाला होकार देताना. मी तुला तिथच अडवल. आणि मिठीत ओढून तुझ्या ओठांना माझ्या ओठांच्या ताब्यात घेतल. आपल्याला अस बघून तो रडत निघून गेला. बिचारा. तु माझ्यात हरवून गेलीस पण जेव्हा तु भानावर आलीस माझा हात घट्ट धरलास आणि मग मला म्हणालीस,

तू हि जिवंत नव्हतास तर सांगणार कधी ?

आणि आपली अजून मिठी घट्ट झाली. 

copyrighted@2020

    


0 टिप्पण्या