अजिंक्य.


मी तुला शोधताना किती वेळ घालवला. मी,  इतका हरवलो या लोकांच्या गर्दीत की तुला शोधताना इतका वेळ लागला. किती गल्ल्या शोधल्या. तुझी गल्ली पहिल्यांदा, तिथे आलो. तिथून सुरुवात करून कित्येक गल्ल्या शोधत मी मुख्य पेठेत पोचलो. कित्येक पेठा भरलेल्या त्या लोकांनी. प्रत्येकाचे चेहरे वेगळे. प्रत्येकाचे कपडे वेगळे. प्रत्येक जण मागून दिसताना वेगळा दिसतो. प्रत्येकीला समोर जाऊन बघत बघत किती तरी वेळ असाच मधे गेला. इथल्या कोणत्या ही पेठेत तू राहत नाही कळल्यावर मी शहर पिंजून काढलं. या शहरातले एकेक रस्ते एकेक बोळ अस काहीच उरल नाही. अगदी प्रत्येक घर आणि घरावरची पाटी वाचून दारात उभी राहिलेली स्कुटी शोधून त्यावरचा 4272 हा नंबर शोधत भटकत राहिलो. उन्हाळा गेला पावसाळा आला. निम्मा दिवस चालून उन्हाने घमजलेला पायाचा तळवा पावसात पूर्ण चिखलात बरबटलेला तसाच रस्त्याने घासत चालत रहायचो. हिवाळ्यात तुझ्या ऊबेच्या शोधात जरा जास्तच फिरायचो. किती शोधल तुला. किती जणांना विचारलं तू कुठेस ? प्रत्येकाने काय माहीत म्हणून मला डावलल. त्यांना खरच माहीत नव्हतं की तू त्यांना सांगून ठेवलं होतंस ?

दिवसाला तुझ्या शोधात फिरत रात्री थकून पण स्वप्नात तुझा शोध घ्यायचो. सकाळी जिथे मी माझ्या पायांनी पोचू शकत नव्हतो तिथे स्वप्नात पोचायचो. प्रत्येक घराच बंद दार बघायचो आणि पुढे जायचो. सगळ्या घरांच्या आणि झाडांच्या सावल्या अशा रस्त्यावर पसरलेल्या. पण माझी सावली मात्र माझ्या पायाशी हरवलेली. कुणाचं प्रेम सध्या माझ्यावर नव्हतं. कुणी सध्या माझ्या सोबत नव्हतं. तरी उगाच शोधत होतो मी तुला. कारण कधीतरी तू सापडशील या एका विचाराने. तुझे कित्येक जवळचे भेटले. ज्यांना मी ओळखत होतो. पण त्यांनी मला ओळखायला नकार दिला. कित्येक ती वळण रस्त्यावरची. तुझ्या अंगाला स्पर्श करणारे त्या वळणावरची छोटी झाड. मी जवळ गेलो तर ती प्रत्येक फांदी सुकलेली दिसली. मोकळ्या रस्त्यावर किती ते आता खड्डे पडलेले दिसले. खांबावरचे चालू दिवे आता काळाकुट्ट प्रकाश टाकत उभे होते. रोज उठून तुझ्या शोधात मी निघायचो. घरी येऊन पुन्हा स्वप्नात रात्री तुला शोधायचो. माझ्या आजूबाजूचं सगळं सोडून दिलेलं मी जग बघणं. एकच ध्येय होत तुला शोधन.

असे कित्येक दिवस रात्री महिने वर्ष गेली. पण तू सापडली नाहीस. तू हे शहरच सोडून गेली असशील का ? जगात खूप शहर आहेत. मी तिथे येऊ का शोधायला तुला ? म्हणून मी अंदाजे लावली. पण मन म्हणत होत तू सातारा सोडलाच नाहीस. पण मग आता कोणता गल्ली-बोळ आणि रस्ता-पेठ उरलेली. सगळंच तर बघून शोधून झालेलं. सहज मग एके सकाळी ही लोक त्यातल्या एकाला ही न बघता रस्त्याला बघत नजर खाली करून बाहेर निघालो. खूप फिरलो आणि वाटेत तहान लागली म्हणून एका मेडिकलमध्ये गेलो. बिसलेरी मागितली. मेडिकल ओळखीचं होत. खिशातून वीस रुपये काढले. नजर अजून तिरकी खालीच होती माझी. मी नोट काउंटरवर ठेवली. पुढून एक गोरा हात नजरेसमोर आला. हातात बिसलेरी होती. मी नोटेवरचा हात काढून बिसलेरी ताब्यात घेतली. वर सुरू असलेल्या पंख्याने नोट उडाली. मी नजर उचलली तू नोट पकडली. तू माघारी वळून नोट गल्ल्यात टाकलीस. आणि मी....

बिसलेरी घेऊन घरी आलो. आणि माझ्या कपाटात ठेवली. माझा शोध संपला. मी रोज पुन्हा त्या मेडिकलमध्ये येण सुरू केलं. आणि रोज एक छोटी मोठी गोष्ट वस्तू गोळ्या औषध घेऊन तुला बघायचं सुरू केलं. आज, माझ्या घरात मला काय झालं तर जागेवर बसून हवं ते औषध कपाटातून घेता येत. पण तरी मी त्यांचा वापर करत नाही. कारण त्यांना तुझा स्पर्श झालाय. स्पर्शासाठी प्रेम करणारे सगळे असतात मी स्पर्शविना तुझ्यावर प्रेम करतो. एकदम खर करतो. आणि ते असच टिकवून ठेवण्यासाठी तुला व्यक्त ही करत नाही. बस असाच आहे मी वेडा.

तुझ्यासाठी झालेला आणि तुझ्यामुळे बनलेला.

copyrighted@2020

Post a Comment

4 Comments

  1. अप्रतिम लिखाण आहे तुमचं. खुपच सुंदर 👌👌👌👌

    ReplyDelete
  2. प्रेम फक्त स्पर्शाने च नाही तर मनाने ही होत हे या story मध्ये दिसून आलं... खूपच छन लिहिलय तू....

    ReplyDelete

close