वेळ महत्वाची आहे !

मी शिकून मोठ व्हाव आईला वाटत. वयान आणि उंचीने सगळीच मुल वाढतात. पण शिक्षण घेऊन चांगली नोकरी करून लग्न वयात केल तर उरलेलं आयुष्य सुखात वाढत अस तीच मत होत. तिच्या नशिबाने वडिलांसारखा प्रेमळ नवरा मिळालातिला. पण वडील हि जास्त शिकलेले नव्हते, आईच हि लग्न लवकर लाऊन दिलेलं. 

त्यामुळे दोघांनी आयुष्यभर काम करून मन मारून एक एक गोष्ट पैसे साठवून घेतलेली. भाड्याच्या घरातून थोडीशी जागा घेऊन त्यावर छोटस घर बांधून आयुष्य सुरक्षित केल. खरतर हे सगळ करण्यात घरातली एक अन एक वस्तू मिळवून अखेर घर आणि एक गाडी हे सगळ जे काय त्यांनी मिळवल ते त्यांच्या आयुष्यातल्या स्वप्नातल्या गोष्टी होत्या, पण खर हे एवढस मिळवण्यासाठी दोघांच अख्ख आयुष्य निघून गेलेल. बांधलेल्या घरातल्या कपाटावरच्या आरशात दोघांनी कधी काळी, केस पांढरी झालेली बघितलीच नाही. आणि त्यांची हि स्वप्न जी साकार झाली ती सगळी मला आयती वापरायला मिळाली. आणि या आयत्या गोष्टींचा वापर करताना त्याची मिजास यायला नको म्हणून आणि सगळ कमावलेल पुन्हा त्या सगळ्याच स्वप्न व्हायला नको म्हणून आईला कायम वाटायच मी चांगल खूप शिकून नोकरी करावी. वेळेत लग्न कराव. प्रेम वैगरे हे विषय आमच्यात कधी झाले नाहीत. पण असेलच काही अस तर ती नकार देणार नाही हे मात्र नक्की. माझ लक्ष वयात आलेल्या मुलासारख बाहेर सगळ. आई जे बोलेल ते सोडून सगळ चांगल. आई सोडून जे कोणी मला सल्ला सांगेल ते करायला मी हरदम तय्यार. पण आई हि माझ्यावर कधी दबाव टाकत नाही. ती समजून घेते. मी वाया जाणार नाही. ती चांगली म्हणून तिच्यासाठी मी हि तिचा चांगला मुलगा आहे. तिचा तिच्या संस्कारावर विश्वास आहे. सगळ कस नीट सुरु होत. माझे दंड वाढत जाताना आईचे दुखणारे खांदे, त्याचा त्रास मला जाणवला नाही. जिममध्ये जास्त व्यायाम झाला तर अंग दुखायच तेव्हा माझ मला दुखण कळायचं. पण कधी कधी तिच्या भेगा पडलेल्या टाचेला स्वःहून आठवणीने आणलेली क्रीम लावून दिली कि ती शांत झोपते.असा मी शहाण्यासारखा वागलो, तिला कामात मदत केली कि तिला वाटायचं मी असच कायम वागाव आणि मग मला दिलेले सगळे सल्ले माझ्यासारखी ती हि विसरून जायची. माझ लक्ष शिक्षण सोडून दुसरीकडे जास्त होत. शिक्षण केल पण तिच्या मनासारखं माझ शिक्षण झाल नाही. पुढे लग्न झाल. सोबत आम्ही संसार हि छान करतोय. एक मुल हि आहे.

 आईला आज्जी झाल्याच सुख हि आहे. पण जे मला आईकडून मिळाल ते घर आणि घरातल एकूण एक भांड तिच्याकडून मला मिळालेलं. त्यात मी फक्त काही गोष्टी अधिक केल्या. जेव्हा या जबाबदार वय झालेल्या टप्प्यात आलोय, काही गोष्टींसाठी मला कधी बायकोला कधी मुलाला हि मन माराव लागत. तेव्हा अस वाटत आईच ऐकायला हव होत आपण. पण आता पुन्हा मागे जाऊन चूक सुधारू शकत नाही. परवा आई गेली. घर शांत मोकळ झालय. ती दिसत नाहीये समोर. असही हल्ली आई जास्त बोलत नव्हती. लग्न झाल्यापासून तर तिने मला काही सल्ले सहसा दिले नाहीत. तिची जागा बायकोने घेतली. पण आता तेच पुन्हा सगळे सल्ले तिच्या तोंडून ऐकायची इच्छा होतीय. तिचे दुखणारे खांदे दाबून तिचे पाय दाबून ती सांगेल तस वागावस वाटतय. पण शक्य नाही. हा जन्म जाऊन पुन्हा पुढच्या जन्मी तिचा तो आवाज ऐकण्यासाठी मला वाट बघावी लागेल. माझ आयुष्य सुरु आहे तोपर्यंत ती अजून एक आयुष्य जागून घेईल. तिथेहि ती तिच्या दुसऱ्या मुलाला समजावून सांगेल, सल्ले देईल. तो हि ऐकेल का तीच ??

बर, ऐक ना आई तुझी खूप आठवण येतेय....!   


copyrighted@2020


 

0 टिप्पण्या