Busy Call


बायकोने सकाळी थोडफार सामान आणायला सांगितल. मी गाडी काढली आणि जाऊन सामान आणल. घरी आलो, तिला मदत केली आणि आतल्या खोलत येऊन माझ काम करत बसलो. ऑफिसमधून सरांचा कॉल आला. काही मेल नवीन क्लायंटला पाठवायचे होते. पण त्यांचा मेल आयडी माझ्याकडे नव्हता. बायको गरोदर आहे म्हणून प्रत्येक गोष्टीत तिला मदत करतो. क्लायंटला कॉल लावायचा होता तेवढ्यात तिने हाक मारली. तिला अंघोळीसाठी गरम पाणी बादलीत ओतून द्यायचं होत. आत जाता जाता मी नंबर सर्च केला. प्रियांक. बायकोला पाणी काढून दिल. बादली उचलून बाथरूममध्ये ठेवली आणि मोबाईलच्या स्क्रीनकडे न बघता अंदाजे कॉल लावला. कारण प्रियांक नावाचा एकच नंबर सेव्ह होता. हात ओला होता. स्क्रीवर पाणी लागलेल. मी मोबाईल कानाला लावून आतल्या खोलीत गेलो. ‘तुम्ही लावलेला नंबर सध्या व्यस्त आहे, कृपया लाईनवर रहा, किंवा पुन्हा प्रयत्न करा’. मी कॉल कट केला. आणि माझ काम करत बसलो. अर्ध्या तासाने सरांचा कॉल आला. पुन्हा मी डायल केलेला नंबर लावला, पुन्हा व्यस्त. किती वेळ हा माणूस कुणाशी बोलतोय म्हणून डोक फिरलं. मग शेवटी मी सरांना मेल पाठवले आणि सांगितल काम झालय, तुमच बोलन झाल त्यांच्याशी तर पाठवा पुढे मेल. सरांचा रिप्लाय, ओके आला. आणि मी कॉम्प्युटर बंद करून सोफ्यावर बसलो. बायको अंघोळ करून आली. आरशात ती तिला बघत होती. आणि मी तिला. तिच्या जवळ जाऊन मी तिला माघून मिठीत घेतल.

होणारी आई खुश दिसत होती. आरशातून माझ्याकडे बघत लाजत होती. खरच प्रत्येक स्त्री किती सुंदर दिसते लाजताना. मी तिची लाज अजून वाढवण्यासाठी तिच्या ओलसर उजव्या कानाला ओठांत पकडून अजून ओलसर करत होतो. तिने मला बाजूला केल आणि लाजून बाहेरच्या खोलीत गेली. मी आरशात स्वतःला बघितल तर माझे ओठ पण लाजलेले स्पष्ट दिसत होते. सरांचा कॉल आला. मी उचलला. त्यांनी मेल पाठवला होता पुढे. कॉल कट झाला आणि मी मोबाईल खिशात ठेवला. तेवढ्यात मोबाईल वाजला. क्लायंटचा कॉल असेल म्हणून तो घाईत मी उचलला.

मी : हा, सर तुम्हाला मेल आला असेल प्लीज चेक करा.

ती : काय ?

मी मोबाईल बघितला आणि सुचायचं बंद झाल. प्रियांक नंबर सर्च केलेला मगाशी मी पण ओल्या हातामुळे प्रियांक वरून पाणी ओघळून प्रियांकावर घसरल आणि तिला कॉल लागला. आणि तो ‘बिझी कॉल’ तिचा होता. ती तिकडून हेल्लो हेल्लो करत होती. मला काय बोलाव समजत नव्हत.

मी : चुकून लागला तुला कॉल.

ती : चुकून का ? बर.

मी : कशी आहेस ?

ती : ठीक, बर ऐक मला कुणाचा तरी कॉल येतोय. नंतर बोलू बाय.

तिने कॉल कट केला. दीड वर्ष झाल एकमेकांपासून लांब होऊन. आज चुकून बोलन झाल. पण पुन्हा त्या जुन्या आठवणी डोक्यात यायला लागल्यात. काय करू मी आता ?


copyrighted@2020

0 टिप्पण्या