घाणेरडा तू आणि तुझ प्रेम | toulouse lautrecजिच्या अंगाला कित्येक ओठ टेकून प्रत्येक तोंडाच्या वासाला तिच्या शरीराने  आपल्यात सामावून घेतेलेल. कोणताच नवीन स्पर्श तिला आता सुगंधी करू शकत नव्हता. प्यायला पाणी हव असेल तर ते हि नशिबी नव्हत. कुणा एकाचा हात धरून किंवा अचानक रस्त्यात कुणा इसमाला अडवून त्याच चुंबन घेऊन त्याला बदल्यात   दारूची मागणी करायची आणि पाण्याऐवजी दारू पिऊन सोबत सिगरेट ओढून रस्त्याच्या आडोशाला बाजूला कुठे तरी आतड सुकवत पडून रहायचं किंवा कुणाच्या तरी उघड्या शरीरावर रात्रभर झोपून राहायचं. अंघोळ केव्हातरी करायची का तर गोर कातड. गोऱ्या कातड्याला रोज अंघोळ लागत नाही. नुसते केस सावरून ओठ रंगवून मळकट जुनाट कोणता तरी एकच ड्रेस रोज घालणारी त्या ड्रेसने नाही किंवा त्या तोंडाकडे बघून तिच्याकडे पुरुष आकर्षित व्हायचे नाहीत म्हणून ती छातीला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न त्या ड्रेसमधून करायची. आणि स्त्रीची छाती बघून कोणता पुरुष स्वतःच्या मनाला ताब्यात ठेवू शकतो ? मी हि पुरुष आहे म्हणून हे विधान मी ठोसपणे बोलतोय. जिच्या शरीरात रक्त कमी अब्सिंथ ( दारू ) जास्त आहे. जिच्या मांसल छातीत दुध नाही पण सिगरेटच्या धुराचे साठे असतील. तिच्या डोळ्यातून पाणी ती रडताना कधीच येत नाही. इतक पाणी तिच्यात कमी आहे. पण ती तरूण आहे. आणि तरूण स्त्री ती कशीही असो संभोगासाठी उत्तम असते. आणि त्याच तिच्या तारुण्याने तिला इतके दिवस जगवलेल. उपाश्याला खाऊ मिळाला कि तो विसरून जातो खाऊ देणाऱ्याला, तो खाऊ नशिबी आणून देणाऱ्या देवाला आणि आधीच्या भुकेला. तसच ती विसरून होती स्वतःच अस्तित्व जे तिला नव्हतच. हेन्री तुलुझ लोत्रेक अस माझ नाव आणि आडनाव असलेल संपूर्ण नाव तिला मात्र तीच फक्त एकेरी नाव माहित होत. मी तिला माझ नाव देऊ पाहिलं. मी तिच्यात कुठेतरी आत लपलेलं सौंदर्य बघितल तिने माझा पैसा बघितला. पैसे म्हणजेच सगळ नसत. आणि सौंदर्य म्हणजे पण सगळ अस काही नसत.
माझ्या सोबत रात्र घालवणारी सकाळी तिच्या प्रियकरासोबत बेडवर असायची आणि उरलेली दुपार कुणा गिऱ्हाईकाच्या शोधात गावात फिरायची. तरी मी तिच्यावर प्रेम करू लागलो. माझ्या प्रेमात कमी काहीच नव्हती, पण सौंदर्यात होती. मोमान्त्रामध्ये नावजलेल्या चित्रकारांमध्ये मोने, माने, गोगैं, आणि व्हान गॉग यांपेक्षा हि माझ नाव अदबीने घेतल जात. हेन्री तुलुझ लोत्रेक. पण तिला चित्रातल त्यातल्या सौंदर्याबद्दल जराही अक्कल नाही. आणि म्हणूनच तिने माझ्यासारख्या पावणे चार फुटाच्या चित्रकारावर पैसे लुटण्यासाठी खोट प्रेम केल. आणि मी ते खर मानल. सगळ मी त्यागतो, तिच्या तोंडून होणारा माझा क्षणा-क्षणाला अपमान सोसतो. तिच्यावर झोपलो असताना तिच्या खालून ओठांपर्यंत मी पुरलो जात नाही तर माझ्या अपंगावर शेरे मारत ती तिच्या प्रियकरासोबत कसा प्रणय करते हे अगदी आनंदाने सांगते. मी सहन करतो. कारण माझ तिच्यावर प्रेम आहे आणि तीच तिच्या प्रियकरावर. दोघांची प्रेम खरी पण दिशा वेगळ्या. पण तरी ती बोलेल ते तिच्या समोर हाजीर करून तिला खुश ठेवणारा मी. तिला आत्ता मगाशी मिठीत घेतल तर दारूच्या नशेत अहोरात्र बुडणारी दारुडी ती मला घाणेरडा माणूस म्हणून घराबाहेर निघून गेली. का तर माझ्या तोंडाला दारूचा वास येत होता आणि तिला तिच्या प्रियकराने नुकताच तिला सुंदर वासाचा कुणीतरी वापरलेली अत्तराची बाटली आणून दिलेले आणि ते लावून ती मिजासीमध्ये माझी घरी आलेली. घाणेरडा तू आणि तुझ प्रेम म्हणणारी स्वच्छ जागेत जन्माला हि आली नाहीये पण ते हि विसरलीय. खऱ्या प्रेमाला खूप वेदना सोसाव्या लागतात. आणि मला वेदनाच हव्या आहेत. उद्या जेव्हा ती माझ्याकडे येईल तिला मी एक ड्रेस भेट देईन. कारण माझ तिच्यावर प्रेम व्यक्त करून मी तिला खुश करेन आणि ती मला त्रास देऊन वेदना देईल. ती मिळालेल्या खुशीने घाणेरड्या तिच्या नशिबातला एक सुंदर दिवस जगेल आणि मी तिच्यामुळे मिळालेल्या वेदनेत लूव्हरला लागेल अस एक पेंटिंग तयार करीन.  


महान डच चित्रकार तुलुझ लोत्रेक. copyrighted    

                   

0 टिप्पण्या