|| श्री शिवसत्य ||


राजाचे बालपण,,
एके दिवशी, पंडितांच्या सभेत काही पंडितांनी थोर पंडित कवींद्र परमानंद यांस राजांचे बालपण याविषयी काही माहिती विचारली असता, त्यांनी काही गोष्टी सांगितल्या ज्या ऐकण्यासाठी सर्व पंडित शांत चित्त घेऊन कवींद्र परमानंद यांसमोर बैसले.
कवींद्र म्हणतात कि,
पृथ्वीवर यवनांचा हाहाकार मजला असता त्रस्त पृथ्वीदेवता प्रभू विष्णूकडे गेली व आपला त्रासिक भाव विष्णूस कथन केला. त्यावर विष्णूने असे कथन केले कि प्रभूअवताराची वेळ समीप आली आहे. तेव्हा पृथ्वीने चौकस इच्छेने विचारले असता प्रभू विष्णूने जाधवांची कन्या जिजा आणि मृशबल ( भोसले ) यांचे पुत्र शहाजी यांचे नाव सुचवले. पृथ्वीदेवता आपला त्रास घेऊन पुन्हा पृथ्वीवर आली. “शालिवाहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी उत्तरायण शिशिर ऋतूत, फाल्गुन वद्य तृतीयेस शुक्रवारी रात्री ( सायंकाळी ) शुभलग्नावर, अखिल पृथ्वीचे साम्राज्यवैभव व्यक्त करणारे पांच ग्रह अनुकूल व उच्चीचे असताना जिजाने बाळास जन्म दिला. बाळाने टाहो फोडला तत्क्षणी बाहेर हजारो नगारे झंडू लागले. कैक वाद्ये सोबत वाजू लागली. लोक आनंदी झाले. दिशा व नद्या स्वच्छ झाल्या. अग्नी प्रसन्न झाली.
श्रुति, स्मृति, घृति ( धैर्य ), मेघा ( बुध्दी ), कांति, शांति, क्षमा, दया, लज्जा, विद्या, प्रीती, कृती, किर्ती, सिध्दी, लक्ष्मी, सरस्वती, तृष्टी, पुष्टी, शक्ती, सन्नति ह्या सर्व देवता त्या देवाभवती ( बाळाभोवती ) जमल्या. थोर पुरोहितांकरवी पुत्राचे जातकर्म विधिवत केले गेले. पुत्र प्राप्तीच्या सुखाने शहाजीने कैक ऐरावत हत्ती, घोडे, मौल्यवान रत्ने, द्रव्य दान केले. पुरोहितांनी पाचव्या, सहाव्या, आठव्या आणि नवव्या दिनी गणपती, जन्मदात्री षष्ठी देवी ( सटवाई ), जिवंतिका ( जिवती ), कार्तिकस्वामी, नारायण, कृष्ण, बलराम, नांगर, धनुष्यबाण, तलवार व नानाविध शस्त्रांची व देवांची विधिवत पूजा केली गेली. बाळाचे रक्षण करावे या हेतूने पुरोहितांनी देवांसमोर हात जोडले. सोबतीस राक्षस, दिग्पाल, योगिनी, भुते यांना घराबाहेर अनेक प्रकारचे बळी दिले गेले.
पिवळी वस्त्रे नेसून त्यावर मौल्यवान रत्ने चढवून जिजा बाळास मांडीवर घेऊन बसली. दोघांस न्हाऊ घातले गेले. काही दिवसांत बाळाचे भविष्य सांगण्यास वाड्यात थोर मोठे ज्योतिषे बोलविले गेले. त्यांचे तोंडून बाळाची विजयी कृत्ये भाकीत म्हणून सांगितली गेली. बाळाची पत्रिका बनवत असता “शिवा” असे नामकरण करण्यात आले. देव      ( बाळ ) जसा रांगता झाला त्याचा मोहकपणा वाढला. बाळ गोंडस दिसू लागले. त्याचे डोक्यावर सोन्याचे कुंचडे उठून दिसे. नानाप्रकारची रत्नजडीत दागिने त्याचे अंगावर असत. डोक्यातील मोत्याच्या हाराच्या टोकास लोंबणारे सोन्याचे पिंपळपान खेळताना कपाळावर सारखे हलत. गळ्यात काळी पोतीला पाचेने जडित टोकदार वाघंनख होत. पोवळी आणि नीळ जडित सुवर्ण मनगट्या दोन्ही हातात शोभून दिसत. कमरेत कमरगोटा अगदी दिव्य शोभून दिसे. पायात लखलखणारे वाळे आणि रत्नजडीत चाळे कायम असत. चतुर स्त्रियांच्या डोळ्यांचे काजळ त्याचे गाल व कपाळ यांवर लावले जाई. त्यास ते शोभून हि दिसे. अशा या सुंदर हसमुख बाळास कई दाया प्रेमाने सांभाळत असे.
कितीदा ते रांगत जाणारे मुल आपलेच प्रतिबिंब घट्ट पकडू पाहण्याचा प्रयत्न करे. स्फटिकाच्या भिंतीतून येणारे सूर्यकिरण पाहून “हे मला हातात घेऊन दे” असा हट्ट करत जिजासमोर रडे. शहाजीचे खरे मत्त हत्ती व घोडे यांत पसंत नापसंत करते समयी ते मुल मातीचे हत्ती व घोडे यांसोबत खेळणे पसंत करी. लहान वयापासूनच मोर, पोपट, कोकिळा यांची हुबेहूब नक्कल ते मुल करी. अशी नक्कल करी कि प्रत्यक्षात पक्षी ओरडत असल्याचा भास होई. कधी-कधी जिजाच्या जवळ उभे राहून अचानक वाघाचा आवाज काढून तिस घाबरवून सोडे. कधी उगाच पळत असे. घोड्यासारखे खिंकाळत असे. हत्तीसम कधी चित्कारत असे. कधी मुलांकडून मातीचे किल्ले बनवून घेऊन “हे माझे गड” असे म्हणत असे. मोरपिसाच्या आवडीपायी मोरांच्या कळपामागे खूप दूरवर धावत जाई.

कधी लपंडाव खेळे. वाड्याच्या कोपऱ्यात लपून बसने त्यास आवडे. आणि कुणी त्यास धरले असता हसत कोपऱ्यातून बाहेर येत असे. कधी हातातून पडलेला चेंडू उड्या मारताना त्या चेंडूला हाताने खाली पडण्याचा प्रयत्न करे. कधी आकाशात चेंडू फेकून तो झेलण्यासाठी चेंडूकडे एकटक बघत त्यास झेले. बाहेर खेळत असताना कधी तिथली मऊ माती खात असे. “खा म्हंटले कि खात नसे. पी म्हणता पीत नसे. झोपी जा सांगता झोपत नसे” जो प्रभू ( विष्णू ) सात जागांवर राज्य करतो तो मात्र इथल्या अवतारात ( शिवाजी महाराज ) सकाळी आईचे बोट धरून झोपेतून उठतो. असा बालक विष्णू अवतार आहे आणि तो आपल्या पोटी जन्मास आला आहे हे मात्र राजाच्या माता-पित्यास जराही जाणवले नाही.
तारुण्यकळी,

पुत्र शिवाजी निरक्षर असल्याचे काही मत हल्ली इतिहासकारांमध्ये आहे पण तसे नसल्याचे इतिहास तपासता जाणवते. महाराजांच्या हाताने लिहिलेली पत्रे, आणि स्वतः रेखाटलेली स्वाक्षरी महाराज साक्षर असल्याची साक्ष देतात. हि नोंद करण्याची बाब. बरे, पुत्र जेव्हा बारा वर्षाचे झाले, तत्समयी शहाजीस भगवान शंकर दृष्टांत देतात. त्याचे असे झाले कि एके दिनी घरी, शहाजी राजा भगवान शंकराची पूजा-अर्चा करून शांत प्रसन्न मुद्रा चेहऱ्यावर घेऊन निजले असता, स्वप्नात भगवान शंकर प्रकट झाले. पाच प्रसन्न मुखें, दहा हात आणि तीन नेत्र असलेले भगवान शंकर मनमोहक दिसत आहेत. कपाळावर त्यांचे भस्म फासून त्यावर चंद्रकोर कोरलेली दिसते आहे. गळा अगदी पाचूसारखा हिरवा गार चमकत आहे. गळ्यात जिवंत विषारी सापांची आभूषणे धरण केली आहेत. कमरेखाली ब्याघ्रचम्र ( वाघाचे कातडे ) नेसून आहे. सोबत सुंदर पावर्तीस बघून शहाजी स्वप्नातच खुश झाले. आनंदाने आणि भक्तीपोटी शहाजी राजा भगवान शंकर आणि पार्वतीसमोर नतमस्तक होतात. वीर शहाजीस भगवान शंकर बघून खुशीने त्यासोबत वार्ता करतात कि, हे सूर्यवंशी, महाबली शहाजी, आता मी काही तुजला भाषण देतो ते ऐक, तुझा धाकटा मुलगा शिवाजी सुलक्षणी आहे. तो पराक्रमी आहे. तो सामान्य नाही विष्णू अवतारी आहे. त्याकारण त्यावर भार सोपविल्यास त्याचे सार्थकच होईल. त्याची विघ्ने तो स्वतः दूर करू शकेल. कारण तो विष्णू अवतारी आहे. त्याचे हातून काही दोष झाले तर त्याची काळजी आम्ही घेऊ. तुझा पुत्र, शत्रूंचा संहार करून या पृथ्वीचा दाह शांत करेल. जगभर आपला नावलौकिक करून आपल्या अवताराची अनुभूती तो सर्व मनुष्यप्राण्यांस देईल. शिवाजी, कायम अजिंक्य राहील. असे बोलून शंकराने मोत्याचा हार शहाजीच्या गळ्यात घातला. आणि शहाजीस पहाटे जाग आली. दुसरे दिवशी स्वप्नातील हकीकत प्रभाकर नावाच्या पुरोहितास शहाजी राजाने सांगितली. आनंदाने त्या पुरोहिताने धाकटे पुत्र शिवाजी यांस त्याचे शिक्षण संपवून पुणे, येथे आणण्याची योजना केली. पुत्र शिवाजी पुणेस आले असता त्यास शहाजी पुण्याचे अधिपत्य देऊन सोबत काही घोडे, हत्ती, पायदळ आणि काही विश्वासू मंत्री, अमात्य सोबत देऊ करतात. पुत्र शिवाजी आता पुण्याचे अधिपती शोभून दिसू लागले. त्यांचे नीट कारभार करणे बघून शहाजीस विशेष आनंद झाला. भगवान शंकर विष्णूच्या या अवताराचे पार्वतीसमवेत कौतुक करू लागले. राष्ट्राचे हित बघणाऱ्या आणि यवनांचा अंत करू पाहणाऱ्या या पुत्रास कुणी जाणले नाही. पुढे अनुकूल मंत्र्यांच्या सहाय्याने पुत्र शिव, लोकांना आनंद देऊ लागला. त्यासोबत त्यांची कीर्ती वाढू लागली आणि यश मिळू लागले. राष्ट्राला वाढवण्याच्या स्वप्नात रंगलेल्या पुत्र शिवाची कुमारअवस्था संपून नवयौवन प्राप्त झाले. मदन-लावण्य अंगी खेळत असतानाच सुंदर, सुशील अशी पवार कुळातील कन्या तिचे सोबत पुत्र शिवाजीचे लग्न झाले. कृष्णास राधिका मिळाली तेव्हा जसा आनंद झाला तसा या विष्णू अवतारास लक्ष्मी मिळाल्याचा आनंद झाला. मागच्या जन्मीचे नाते दोघांना ज्ञात असल्या कारणाने दोघांच्यात प्रेम फुलू लागले. स्त्री सोबत मिळाल्याने पुत्र शिवाजी आपल्या कामात अजून लक्ष देऊन जणतेसाठी झटू लागला. बेनाम राष्ट्रास महाराष्ट्र हे नाव पुत्र शिवाजी ठेवून टाकतात.          


अजिंक्य अरुण भोसले Copyright © 2020

( अभ्यास करून आपल्याला हि माहिती ( इतिहास ) पोहोचता करत आहे. त्याचा मान राखून इतरत्र कुठेही हा अभ्यास प्रसिद्ध करू नये. असे केल्यास आपणास पाच वर्षांची कैद होऊ शकते. आपण सुज्ञ आहात. आपण इथे आलात म्हणजे नक्कीच महाराजांचे प्रेमी असाल. महाराजांचा मान राखून निदान असे गैरवर्तन करू नका. आभारी आहे )      

0 टिप्पण्या