राजवडा ते तिचं घर.


प्रतापसिंह महाराजांचा राजवडा. त्याला लागून बसलेले फळ विकणारे. तिथून पुढे जात असताना लागलेली कबाबचा गाडा तिथून पुढे दोन पाणीपुरीचे गाडे मग जरा पुढे आईस्क्रीमची मोठी गाडी आणि पुढे उत्तप्पा-डोसा आणि शेवटी कोपरऱ्यात अप्प्याची गाडी. मी काय खायला गेलो नव्हतो. पण सहज तिकडून जाताना अस वाटल एक फेरी मारावी चौपाटीवर. मुंबईत समुद्रकिनारी चौपाटी असते. आणि साताऱ्यात समुद्र नसला तरी राजवाड्यासमोर चौपाटी आहे. मी चालत होतो. कित्येक लोक समोर येताना आणि माझ्या मागून पुढे निघून जाताना बघत होतो. मी हळू चालत होतो. मला घाई नव्हती. कित्येक लोक बहुतेक जोडीने आलेले. मला क्षणभर वाटल किती भारी असत न त्याचं आयुष्य ज्यांना सोबत कुणाची तरी असते.

हक्काने हातात हात घालून अस चौपाटीवर फिरताना किती तो प्रेमळ भाव चेहऱ्यावर आनंद बनून दिसत असतो. पाणीपुरीच्या इथे आल्यावर राहावल नाही म्हणून एक प्लेट पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी एक प्लेट खाऊन भागत नाही कधी. दुसरी प्लेट भरायला सांगणार तेवढ्यात कोपऱ्यावरुन वळताना मला ‘ती’ दिसली. मी पैसे दिले आणि पटकन तिच्या मागे निघालो. थोड अंतर ठेवून तिला बघत मी चाललेलो. रस्त्यावर खूप लोक होते. कित्येक दुकान उघडी होती. दुकानातली रोषणाई दिसत होती. दोन घोडे रस्त्याने फिरत होते. कित्येक आवाज कानाशी जमा झालेले. कित्येक उजेड आणि रस्त्यावरच्या खांबावरचा पिवळा प्रकाश आणि त्यात गाड्यांच्या गर्दीत नक्की काय बघायचं आणि काय ऐकायच अशी प्रत्येकाची मनस्थिती असताना ती हे सगळ ऐकत आणि बघत पुढे चालली होती. आणि मी फक्त तिला बघत होतो. राजवाड्यापासून ती मोतीचौकाकडे निघाली. फुटपाथवरून चालताना इतकी गर्दी होती त्यात मधेच फुटपाथवर रुमाल-टोप्या-कुलूप-चपला विकणाऱ्यांनी केलेली गर्दी त्यामुळे लोक एकमेकांना चिटकून चाललेले. मला माझ काही नव्हत. पण तिला जेव्हा कोणी स्पर्शून जात होत राग येत होता. माझा राग तिला जाणवला कि काय माहित पण ती फुटपाथ वरून उतरून खाली रस्त्यावरून चालायला लागली. आणि मग बरोबर मोती चौकातून रस्ता ओलांडून ती तांदूळआळीतून वर निघाली. जाताना पालेकर बेकरीत थांबून तिने काहीतरी घेतल. आणि ती निघाली. मी पुढे जाऊन थांबलेलो. ती माझ्या समोरून गेली. तिला जाणवल मी तिच्या मागावर आहे.( बहुतेक ) माझी धडधड वाढली पण ती लपवत मी अजून जास्त अंतर दोघांत ठेवून चालत राहिलो. या रस्त्यावर अंधार बराच असतो. अशात ती रस्ता बघून चालत होती नीट. आणि मी फक्त तिला बघत चालत होतो. ती अधी-मधी मोबाईल बघत चालत होती. माझा माझ्याकडे होता पण तो खिशात ठेवलेला तो अजून हातात घेतलाच नव्हता. मी तिलाच बघत होतो. फुटका तलावापासून वर समर्थ मंदिर रस्त्याकडे जाताना तिला तिच्या ओळखीच्या कोणीतरी भेटल्या. त्यांच्याशी ती बोलत होती. आणि मी अलीकडेच एका चारचाकीच्या आड थांबून गाडीच्या मागच्या काचेतून तिला बघत होतो. येणारी जाणारी माणस मला अस वाटेत गाडीमागे उभा राहिल्यामुळे संशयाने बघत होती. मी मात्र तिला बघत होतो. तीच बोलन झाल आणि ती पुढे निघून गेली. समर्थ मंदिरपासून खाली एक रस्ता विश्वेश्वर मंदिराकडे जातो त्या रस्त्याने ती चालत घराच्या दारात पोचली. दारात तिची आई आणि काका उभे होते. दारात तिची ती प्लेजर गाडी लागलेली. तिला बघून तिची आई पायरीवरून उठली. तिच्यासोबत आई आत गेली. मी हळू-हळू चालत होतो. मी तिला घरात जाताना बघत होतो. जेव्हा ती पूर्ण आत जाऊन दिसायची बंद झाली तेव्हा मला समजल तिचा काका मला बघत होता. आणि मग मी तिथून निघून गेलो. सगळ भरलेलं हे शहर. त्यातल्या या पेठा, वस्त्या, रस्ते, गल्ली आणि अंधारे बोळ चालत असताना सगळ सोडून मी फक्त तिला बघत होतो पण,

पूर्ण या प्रवासात तिने एकदा पण मला वळून बघितल नाही.     


copyrighted@2020

0 टिप्पण्या