आणि पाऊस..

मगाशी जोरात पाऊस येऊन गेला. पण अजून हवेत गारवा टिकून आहे. पाऊस येण्याआधी गरम होत. इतकं की सहन होत नाही तो उकाडा. पाऊस आला की अंगात थंडी भरते. अगदी घरात बसून असलो तरी. आणि पाऊस गेला की अस वाटत आता ऊब हवी तर तेव्हा मात्र हवा थंडच राहते.
 पुन्हा मग उकाडा उरत नाही. बर हे अस वागणं फक्त हवेच आहे अस नाही. उकाडा सुरु असला की मन बैचेन होत असत. मनात काही विचार नसतात पण असत मन बैचेन. पाऊस आला की बरेच विचार डोक्यात जमा व्हायला लागतात. पण जसा बाहेर पावसाचा जोर वाढतो तसा डोक्यात माझ्या फक्त तुझ्या विचारांची रांग लागते. पहिल्या दिवशी ऍक्सेप्ट केलेली फ्रेंड रिक्वेस्ट पासून ते पहिला केलेलं हाय मेसेज आणि त्याला आलेला हॅलो रिप्लाय. हाय हेल्लोच्या पुढे ही बरीच वाक्य रोज शब्दांनी एकमेकांना पाठवून एकमेकांचे डीपी बघून एकमेकांना ओळ्खताना प्रत्यक्षात भेटून एकमेकांना स्पर्श करून जाणून घेण्यापर्यंत सगळं आठवत. बाहेर उजेडाचा अंधार झालेला असतो ढगांमुळे आणि त्या अंधारात आठवतात किती तरी आपले किस. भले माझे तेव्हा डोळे उघडे असतील पण तुझ्या बंद डोळ्यांना माझ्या उघड्या डोळ्यांचा उजेड मिळावा म्हणून मी उघड्या डोळ्यांनी तुला किस करायचो. पण आत्ताच्या या अंधारात उजेडाची गरज वाटत नाही. मातीच्या वासाची जागा नंतर कुणीच घेत नाही पाऊस इतका वाढतो की ती मातीच पाण्यात वाहून जाते. तुझ्या आठवणी ही तशाच काहीश्या वेळेसोबत भर भर डोक्यातून पुढे पुढे निघून जातात. तुझ्या आठवणी काय एक दोन आहेत का ? अग आपण सहा महिने सोबत असलो तरी त्या सहा महिन्यांच्या आठवणींवर मी आता अख्ख आयुष्य जगणार आहे. आणि अशा या आठवणी मनात डोक्यात असताना पावसाचा गारवा मला बोचत नाही अंगाला. 
मी तरी प्रयत्न करतो की तुझी आठवण कमी याव्यात याची, पण पाऊस काय कधी आपल्याला वाटेल तसा पडतो का ? आठवणी ही त्याच्या मर्जीने येत राहतात. बस यायचा अवकाश की त्या सगळं अंग भरून टाकतात अंगावरच्या काट्याने. तुझी आठवण कायम प्रत्येक पावसात येते. तरी बरा असतो मी हिवाळा आणि उन्हाळ्यात फक्त. पावसाळा मी कसा जगतो माझं मला माहित. रोज आणि सारखा पाऊस असतो तेव्हा आणि तेव्हा तुझ्या आठवणीत असतो मी. किती ते प्रेम केलं आपण मोजुन सहा महिने. त्यात कधी भांडण झालं. कधी रुसवे आले. कधी बाहेर फिरायला जाण आलं. कधी एकमेकांना गिफ्ट देणं आणि कधी दिवसाच बेडवर प्रेम झालं. रात्रीला आपण आपल्या घरी असायचो म्हणून. किती बंधन असायची तुला मला. तरी सगळ्यांपासून लपून छपून संभाळलेलं प्रेम आपलं फक्त सहा महिनेच जगलं. मला कळत नाही माणूस हल्ली पन्नास वर्षे जगतो, पण त्याच खर प्रेम पहिले वीस सोडता तीस वर्षे का जगत नाही ? का खऱ्या प्रेमाच आयुष्य इतकं कमी असत ? खोटी प्रेम लग्नाचे वीस वीस वर्षाचे वाढदिवस साजरे करताना दिसतात. पण खरं प्रेम वर्षभराच सुख पण बघू शकत नाही. तरी मी खुश आहे मी खर प्रेम केलं आहे या एका गोष्टीवर. या खोट्या जगात वावरताना आपण एक खरे आहोत हे माहीत असण्यात सुखच काही वेगळं मिळत. मी त्या सुखावर आनंद मिळवत असतो. पण पावसात मात्र खूप दुःखी होतो. काय तू किती मला घट्ट जवळ घ्यायचीस. किती प्रेमाने मला प्रेम द्यायचीस. आणि हक्काने माझ्याकडून प्रेम करवून घ्यायचीस. जगासाठी तो सेक्स असेल पण अपल्यासाठी ते प्रेम होतं. ज्यात फक्त तू आणि मी होतो. ज्यात तुझं आणि माझं प्रेम होतं पण हे सगळं झालं गेलं. आता आठवणी शिवाय काहीच नाहीये. आहे त्या फक्त आठवणी. पावसासोबत त्या आठवत राहतात. पाऊस गेला की मी ही ऊबेच्या शोधात असतो पण तू मिठीत घ्यायला तयार नसतेस. मग सोफ्याच्या कोपऱ्यात किंवा मग बेडवर जाऊन बसून मांजरासारखी वर वरची ऊब घेऊन मी मला शांत करतो. थंड वार येत असत. तुझे विचार आता कमी यायला लागलेले असतात. उद्या होते आणि मी तुला विसरून गेलेलो असतो. बर वाटत असत मनाला तेवढीच डोक्याला शांतता पण...
पण फेसबुकवर अशाच पोस्ट बघत असताना चुकून कुणाच्या फोटोला लाईक केलेल्यांमध्ये तुझं नाव दिसत. आणि पुन्हा भर उन्हात माझ्या मनात तुझ्या आठवणी यायला लागतात. तुला कधी त्रास होऊन देणार नाही म्हणणारी तू आता खूप त्रास द्यायला लागलीयस आठवणीत येऊन. करतो मी तो त्रास सहन तुझ्यासाठी.
पण एक सांगू, खूप आठवण येतेय तुझी.

Copyrighted@2020


0 टिप्पण्या