suicide & me


०१ 


जिंदगी फ़िलहाल चल रही है.काही नशिबातल्या गोष्टी जेव्हा मिळण्याच्या टप्प्यावर येतात. बघितलेली स्वप्न आणि घेतलेली मेहनत जेव्हा सत्यात यायला अवघा काही वेळ उरतो आणि ती वेळ येते तेव्हा कळत घडलेल्या घटनेतून मी केव्हाच वगळलो गेलो आहे. जिद्द तिथेच संपते. प्रयत्न, अपयश, पुन्हा प्रयत्न आणि हजार वेळा अपयश या दोन गोष्टींशिवाय दिवस जात नव्हते. हळू हळू अपयश आणि अपयश एवढच उरलेलं. मनातल बोलायला कुणी ऐकून घेणार तर हव ? माझ सांगायला म्हणून सुरुवात केली तर स्वतःच सांगून निघून जाणारे कैक भेटून गेले. किंबहुना त्यांना मीच मुर्खासारखा भेटायला जात होतो. अशात माझ्या विचारात त्यांच्या दुःखाची भर पडून अजून मी खचत चाललेलो. रस्ते म्हणायला असतात पण ते सापडायला अवघड असत. बरेच ज्ञानी मला रस्ता दाखवण्याच्या नादात दिशाभूल करत होते. इच्छा होती काहीतरी व्हायची म्हणून मी हि भुलत गेलो. भानावर यायचो तर पुन्हा कैक अंतर मागे आयुष्य सरकलेल जाणवायचं. 
कुणाशी बोलाव तर काय बोलाव याच एका प्रश्नाने स्वतःशीच बोलायची सवय लावली. अशात एकाने मला धीर दिला. वयाने मोठी असली तरी ती व्यक्ती मला त्याचा मित्र मानायची. संतोष(काका)नी जेवढ मला ओळखल होत समजल होत इतक मला माझी आई आत्ता समजत नाही. कारण इतका संवाद आमच्यात होत नाही. एकाकीपणात संतोष(काका)नी कित्येक माझ्या स्वप्नांना साथ द्यायची तयारी दाखवली. त्या स्वप्नांना पूर्ण व्हायला फक्त सहा महिने उरलेले. त्याच्या नियोजनासाठी गुरुवारी दोन मिनिट फक्त अचानक रस्त्यात आमची भेट झाली आणि ठरवल पुढच्या गोष्टींसाठी एक भेट घेऊ शनिवारी. माझ्या घरी. मी खुश होतो. आता काहीतरी होईल आयुष्यात चांगल म्हणून शनिवारी संध्याकाळ लवकर व्हायची वाट बघत होतो. आणि सकाळी अकरा वाजता मला शुभम नावाच्या मित्राचा कॉल आला. अजिंक्य, संतोष सर गेले. HEART ATTACK आला त्यांना मगाशी. 
त्यांनी माझ्यावर इतका जीव लावलेला कि कित्येक लोकांना हे माहित होत. सकाळी गेलेल्या व्यक्तीला बघून कित्येक लोक गेले. पण मी उरलेलो. आणि मी गेलो नाही. मला जायची हिम्मतच होत नव्हती. ज्या माणसाला मी कायम हसताना बघितलेलं. त्या व्यक्तीला मी नाराज होऊन झोपलेलं बघण मला जमणार नव्हत. जी व्यक्ती मला बघून मोठा माणूस आल्यासारखं आदराने उठून हातात हात द्यायचा. चार चौघात माझी ओळख हा अजिंक्य मोठा चित्रकार होणार आहे. भारी कविता पण लिहितो. असा सांगणारा माणूस मी गेल्यावर तसाच झोपून राहणार असेल तर मला कस चालेल. मी मोबाईल बंद केला आणि माझ मांजर माझ्याजवळ घेऊन पूर्ण दिवस बसलो. त्याच्या जाण्याने माझ्यासोबत निसर्ग पण नाराज झाला असेल. बाहेर पाऊस सुरु झालेला. त्या दिवशी देव-दिवाळी होती. रात्री सव्वा बारा वाजता मी मोबाईल सुरु केला. मला वाटल होत आत्तापर्यंत त्यांची क्रियाकर्म झाली असतील. म्हणून मी त्या विचारात पुन्हा हरवून गेलो आणि मला कॉल आला. अजिंक्य, अरे कुठे आहेस. संतोष सरांची आई तुझी वाट बघतायत. सरांची बॉडी अजून माहुलीला नेली नाहीये. तुझी वाट बघतोय आम्ही. आणि मी बोललो मी नोकरीच्या इंटरव्हिवसाठी कराडला आलेलो मी उद्या साताऱ्याला येणारे. मला आत्ता यायला वेळ लागेल. त्यांनी विचारल मग बॉडी नेऊ का आम्ही ? मी म्हणलो हो. 
दुसऱ्यादिवशी समजल त्यांना रात्री एक वाजता अग्नी दिली. आणि माझी सगळी पूर्ण होणारी स्वप्न त्यांच्यासोबत निघून गेली. त्या नंतर मी पुन्हा माझ्या स्वप्नांना पूर्ण करायच्या प्रयत्नात राहिलो. पण त्यांच्या आठवणीशिवाय सुरुवात कधी झालीच नाही. आणि तरी हि पुन्हा अपयशच येत राहील. कायम ते मला मोठा चित्रकार होशील म्हणायचे. चित्रकला सोडू नकोस. लिखाण ठीक आहे पण चित्रच काढत जा. पण ते गेल्यापासून आजवर मला चित्र काढावस वाटतच नाही. पण कधीतरी मी काढतो त्यांची आठवण आली तर. खूप आठवण येते त्यांची पण करू काहीच शकत नाही. प्रयत्न आणि यश मिळालं तर त्यांच्या मनासारखं झाल्याच सुख मला भविष्यात कधी जगायला मिळो हेच एक स्वप्न माझ. 
02 
पुन्हा त्याच सगळ्या गोष्टी आणि प्रयत्न करावे लागणार होते. वडील नाहीत म्हणून आयत काही मिळेल किंवा वडिलोपार्जित काही मिळेल याचा दूर दूर संबंध नव्हता. लहानपणीच वडील मला आणि मम्मीला सोडून गेले त्यामुळे वडील, बाप, पप्पा हे शब्द माझ्या ओठात आणि मनात कधी आलेच नाहीत. इंग्लिश बोलताना माझी जीभ लवकर वळत नाही पण बाबा पप्पा वडील हे शब्द मला बोलताच येत नाही. चित्रकार होण्याच्या इच्छेपायी कित्येक चित्र काढली. कित्येक अभ्यास केला. गुरू कुणी नाही. म्हणून लिओनार्दो विन्सी या चित्रकाराच्या चित्रांचा अभ्यास सुरु केला. तीन वर्ष एकलकोंडा झालो. मम्मी पुण्याला असत तेव्हा. दोन बहिणी हॉस्टेलला होत्या. भाड्याच्या घरात मी आणि माझी तीन मांजर. बस. अस्ताव्यस्त पडलेली कागद ज्यावर पुढे लिहिलेल्या कविता आणि मागे काढलेली चित्र. नक्की करायचं काय आहे मला अशात मी ठरवलं आपण चित्रकारच व्हायचं. इंटरनेट होत. मोबाईल होता आणि नुकतंच तेव्हा डिजिटल पेंटींगलावाव वाव मिळालायला लागलेला. त्या आधी मी चित्रकार कुर्लेकर याना भेटलो होतो. आशा होती ते काही मला सल्ला देतील काही माहिती देतील पण सराव कर एवढं बोलून त्यांनी बोलण्या बोलण्यातून पूर्ण नकार दर्शवला. बहुदा त्यांना माझं स्वप्न वर वरच वाटलं असावं. मग पुढे  हे अस डिजिटल पेंटिंग बघून जाणवलं कि हातच्या पेंटिंगला पुढे भविष्यात वाव मिळणार नाही. 
या काळात मग पुन्हा मी चित्रकला सोडली. एकटा पडलो. एक जी कला होती जिच्या जीवावर मोठा व्हायचा विचार होता त्याच कलेने धोका दिल्याचा समज माझा मला झाला. या दरम्यान एक मुलगी आयुष्यात आली. जिच्याकडे बघून खूप काहीतरी व्यक्त व्हावं अस वाटायचं. पण त्या मुलीने कायम माझ्याकडे दुर्लक्ष केलं. एक तर्फी प्रेम मी तरी सुरूच ठेवलं सुरुवातीला तीच चित्र काढू वाटायचं पण ते नीट जमत नाही या रागाने नंतर मला आतल्या आत त्रास व्हायला लागला. रोज तिच्या घरापाशी जायला आणि परत घरी यायला रोज वीस किलोमीटर वैगरे चालयचो. गाडी नव्हती तेव्हा. कित्येकदा भर पावसात तिला फक्त बघण्यासाठी रस्त्यावर मी असायचो. रस्ते सामसूम असायचे. लोक बाजूला आडोशाला असायचे आणि ती पुढे छत्रीत आणि मी मागे अंतर ठेवुन भिजत तीच्या मागे असायचो. प्रेम वाढत होत पण व्यक्त करता येत नव्हतं. आणि मग एक दिवशी सहज एक गाणं ऐकताना मला एक कविता सुचली. त्या कवितेनंतर फक्त त्या एका मुलीवर आठ हजार पेक्षा जास्त मराठी कविता लिहिल्या. हे तिला अजून हि माहित नाही. मग रोज कविता दिवसरात्र तिचा विचार आणि कविता. चित्रकला कधीतरीच. अजिंक्यतारा किल्ल्यावर जाऊन झाडांची चित्र करायचो. आणि शांत बसून वरून तीच घर बघत बसायचो. यात कुठेच आता पुढचा मार्ग दिसत नव्हता. लेखक आणि चित्रकार हे दोघ हि भिकारडे असतात. भिकेचे धंदे आहेत अस मामा आणि मम्मी मला बोलायचे. 
अशात एक दिवस मला एका माणसाचा कॉल आला ज्याने मला एका सिरियलसाठी कथा लिहून मागितलेली. त्या कॉलनंतर आनंदून मी तीन कथा लिहून त्यांना पाठवल्या ज्याचे पैसे आठवर्ष झाले अजून येतायत. त्यातल्या एका कथेवर त्यांनी लघुकथा बनवलीय जी मला दोन वर्षपूर्वी चुकून युट्युबला दिसली. बाकी दोन कथांच काय झालं मला माहित नाही. पण तेव्हा त्यांनी मला टाळायला सुरुवात केली. आणि मी पुन्हा आतून तुटून गेलो. कुणाला कधीच मी लिहिलेलं काय द्यायचं नाही ठरवलं. आणि अशात अजून एक मुलगी आयुष्यात आली. जी माझी प्रियसी झाली.जिने माझ्यासाठी लघुकथा बनवल्या आणि माझ्या कथा वापरून माझं नाव वापरून. खूप बर वाटलं तेव्हा. आम्ही वेब सिरीज आणि मोठे सिनेमे  करण्याच्या प्रयत्नात होतो. वेबसिरीज तेव्हा नुकत्याच सुरु झालेल्या नेटफ्लिक्स तर इकडे सुरु नव्हतं.
आम्ही सुरुवात केली. पण तिच्या घरी आमच्याबद्दल समजलं. आणि त्यांच्या घरी मराठा मुलगा चालत नाही अस तिच्या आज्जीने सांगितलं आणि आम्ही वेगळे झालो. दोन वर्षात त्या मुलीने प्रमाणाबाहेर मला स्वप्न दाखवली आणि त्याची सुरुवात करून दिली. पण ती गेली आणि माझी इच्छा मेली. पुन्हा मी एकटा झालो. सगळ्यांच अस लांब जाण सवयीच झालेलं. घरून आणि बाहेरून साथ मिळत नाही म्हणून मग मी एकदा पीक फवारणीच्या औषधाची बाटली घरी आणून ठेवली. प्यायचा फक्त अवकाश होता.
03 
त्या वेळेस माझ्याकडे एक मांजर होत. त्याची तीन छोटीशी पिल्ल होती. दोन दिवसापूर्वीच त्यांनी डोळे उघडलेले. त्यांना ड्रॉपने दूध पाजलं. त्यांची आई घरात नव्हती म्हणून. मग मी ती पीक फवारणीची बाटली, पाण्याने अर्धा भरलेला ग्लास घेऊन बाल्कनीत बसलो. स्टुलावर बसून मी मोबाईलमध्ये मम्मीचा फोटो बघत बसलो. नंतर लक्षात आलं, मी दरवाजा लावून घेतलाय. पिल्ल लहान आहेत. त्यांना आईची गरज आहे. लवकर जर कुणाला मी केलेलं समजलं नाही तर बिचारी पिल्लं उपाशी मरतील म्हणून मी आतून कडी काढली. दारामागे डबा ठेवला. मांजर दार ढकलून आत यायच. त्याला सवय होती. मी मग पुन्हा बाल्कनीत आलो. मोबाईल सुरु होता. मम्मीला एकदा बघितलं. शिवाजी महाराजांचा एक फोटो बघितला आणि मी मोबाईल ऑफ़ केला. जेव्हा औषध आणायला गेलेलो तेव्हा त्यांनी सांगितलं होत कुणाच्या हि हातात देऊ नका विषारी आहे. दोन टोपणात जीव जाईल माणसाचा इतकं विषारी आहे. मी विचार केला दोन टोपण पिलं आणि मेलोच नाही तर उगीच दवाखान्याचा खर्च मम्मीला होईल अन त्रास होईल तो वेगळाच म्हणून मी बाटलीच झाकण उघडलं. घाण वास येत होता. मी श्वास रोखून धरला आणि सगळी बाटली त्या ग्लासात ओतली. तेवढ्यात दाराचा आवाज झाला. मांजर मला बघून पळत माझ्या जवळ आल. मांडीवर उडी घेऊन मांडीवर बसलं. मी हातातला ग्लास पुढे बाल्कनीच्या कट्ट्यावर ठेवला.
30 जून 1996ला माझा जन्म झाला. जन्म झाला आणि काही मिनिटातच माझ्या नाकात दोन आणि तोंडात एक अशा तीन प्लास्टिकच्या नळ्या घालून मला कृत्रिम श्वास द्यायला सुरवात केली गेली. जन्मतः मला स्वतःला श्वास घेता येत नव्हतं. श्वसननलिकेत अंतर असल्यामुळे डॉक्टरांनी मी जास्तीत जास्त चोवीस तास जगू शकतो कृत्रिम श्वासावर अस सांगितलं. सगळं वातावरण खराब झालं. घरची परिस्थिती अगदी बेताची. डिलिव्हरीचे पैसे पण हप्त्याने द्यायचे ठरलेले. अशात ऑपरेशन म्हणजे हजारो रुपये लागणार. त्यात त्या दिवशी छत्रपती उदयनराजेंच्या समर्थनासाठी पूर्ण सातारा बंद केला गेला होता. रस्त्यावर कोणतीही गाडी दिसली तर ती फोडली जात होती. इतका कडकडीत बंद पाळला गेला होता. ऑपरेशन पुण्याला करायला सांगितलं होत. आणि सातारा दुसर्यादिवशी उघडणार होता. सगळ्यांचे विचार थांबले. मम्मीने माझी आशाच सोडली. तेवढ्यात घराजवळ राहणारे एक रिक्षाचालक त्यांच्या ओळखीने एका माणसाला फोन लावण्यात आला. जो माणूस छत्रपती उदयन राजेंचा पी.ए. होता. पी.ए. ने महाराजांना सगळं सांगितलं आणि स्वतः राजेंनी दखल घेऊन आनेवाडी टोलनाक्या पर्यंत सुरक्षित गाडी जाऊ द्यायची हमी दिली. त्यांनी फोन करून त्यांच्या माणसांना सांगितलं आणि ऍम्ब्युलन्स आली मला आणि मम्मीला घेऊन ती गाडी पुण्याकडे निघाली. वाटेत कुणीही अडवलं नाही. गाडी जेव्हा साताऱ्याच्या बाहेर पडली तेव्हा महाराजांनी पी.ए.ला सांगून सुखरूप साताऱ्याबाहेर आम्ही पडल्याची खात्री करून घेतली.
त्या दवाखान्यात मोठ्या खोलीत ज्या बाळाचं ऑपरेशन होत त्या सहा बाळांना प्रत्येक एका टेबलावर काचेच्या पेटीत ठेवलेलं. सगळी बाळ शेवटच्या टप्प्यावर होती. त्यात तिथे माझी भर झाली. प्रत्येक बाळाचं ऑपरेशन झालं. सात पैकी सहा बाळ दगावली. आणि शेवटी माझा नंबर आला. चौतीस कि छत्तीस तास ऑपरेशन झालं. आणि तिथल्या एका नर्सने मम्मीला येऊन सांगितलं तुमच बाळ आता ठीक आहे. त्या सात बाळांमध्ये माझा जीव वाचला तेव्हा डॉक्टरांनी मम्मीला सांगितलं होत हा यातून वाचला आहे ना याला आता लवकर मरण नाही. खास म्हणजे ते ऑपरेशन करणारे एक मुस्लिम डॉक्टर होते. डॉक्टर अखिल खान. लहान नाजूक अंगावर झालेल्या ऑपरेशनमुळे प्रतिकारक शक्ती येण्या ऐवजी संपून गेली.
आणि लवकरच दम्याचा त्रास सुरु झाला. ज्याला बालदमा म्हणतात. ज्या वयात लहान मूल कॅडबरी, वेफर्स, कुरकुरे खातात त्या वेळेस मला पथ्य होती. कॅडबरी मी पाचवी नंतर खायला सुरुवात केली. त्या आधी भक्त भात खावा लागायचा.तूप खाल्लं कि खोकला व्हायचा. वरण खाल्लं कि उलट्या व्हायच्या. पार्ले बिस्कीट खाल्लं तर कफ त्यामुळे फक्त मारी खायचो. मोनॅको सारखे खरी बिस्कीट खाल्ली तर खोकला यायचा. शेजारून गाडी धूर सोडत गेली तर खोकला सुरु व्हायचा. फटाक्याच्या वासाने श्वास घ्यायला त्रास व्हायचा. खाल्ली तर कोरडी भाकरी चपाती छातीला चितकायची अशा कित्येक गोष्टींची पथ्य पाळत असताना देखील पुढे सहा वेळा मृत्यूदारात जायची वेळ आली. सहा वेळा हि डॉक्टरांनी मी जगण्याची आशा सोडलेली पण नशीबात आयुष्य अजून खूप असावं. 
मी मांजराला कुरवाळत होतो. तेवढ्यात मांजर उठून कट्ट्यावर गेलं. आणि त्याच्या धक्क्याने तो भरलेला ग्लास वरून दोन मजल्यावरून खाली पडला. आणि आत्महत्येचा प्रयत्न तिथेच थांबला.
04
आता काय करायचं पुन्हा प्रश्न. जवळचे काही ठराविक लोक सोडले तर कुणाला मी कोण आहे माहित नव्हतं. आणि जे ओळखत होते ठराविक, ते हि उगीच वर वर कौतुक करायचे. चित्रकला सोडून दिली होती. लिखाणसुद्धा काय कामाच नाही म्हणून बरेच दिवस असे विचारात गेले. घरची परिस्थिती ठीक नव्हती. आयत मम्मीच्या पैशावर बसून खाण बर वाटत असलं तरी नंतर ते पैसे हि पुरेनासे झालेले. घालायला कपडे नीट नव्हते. जवळ गाडी नव्हती. कुठं जायचं तर पायीच. दिवाळीत वैगरे कपडे घेतले तर मी आणि माझी बहीण ठरवून काळी किंवा निळी जीन्स पँट घेत असू. आमची दोघांची तब्येत सारखी असल्याने तिच्या पँट मला बसत म्हणून मग दोघांना घालता येईल अशा पँट आम्ही शक्यतो घेत. मनात सतत काहीतरी उगाच भास होत होता. मन शांत नव्हतं. काही हातून घडत नव्हतं म्हणून स्वतःवरच राग यायला लागला. अशात ओळखीने एका ठिकाणी गाडी धुवायचं काम सुरु केलं. तिथं दिवस अगदी सहज जात होते. मन रमत होत. पण अजून दोन वर्षांनी मी कुठे असेन असा विचार केला तर मला मी तिथेच गाडी धुताना दिसायचो. जास्त दिवस तिथे मन रमल नाही. मी ती नोकरी सोडून दिली. आणि एक मित्र झाला. तो टॅटू काढायचा. त्याच्यासोबत मी डिझाईन्स बनवायला लागलो. आणि त्याचा स्टुडिओ खूप चालायला लागला. साताऱ्यात जेव्हा दोन तीन आर्टिस्ट नुकतेच स्टुडिओ काढून बसलेले तेव्हा आम्ही घरात बसून खूप टॅटू काढायचो. खूप लोक आम्हाला ओळखायला लागले. आणि कलाकाराला अजून काय हवं असत ? पैसे? अजिबात नाही फक्त तारीफ. ती हि मनापासून केलेली. आणि मी खुश झालो. काही सात, आठ महिने आम्ही एकत्र काम केलं. मग पुढे आम्ही ठरवलं मोठा स्टुडिओ काढायचा. त्यासाठी मी टॅटू काढायचं प्रशिक्षण सुरु केलं. सगळं मनासारखं होत होत. त्याला एक गर्लफ्रेंड होती. आणि माझा मित्र दारूच्या नशेत मला न विचारता कित्येक लोकांचे टॅटू काढायला नकार देऊ लागला. ज्यामुळे कित्येक गिऱ्हाईक माझ्याकडे यायला लागलं. पण मित्राला फसवून काम करण मला आवडलं नाही. मी मित्राला समजावत राहिलो पण तो पैसेवाले असल्यामुळे त्याला पैशाची गरज नव्हती. मला काही करावं सुचत नव्हतं. पण त्याने खात्री दिलेली कि स्टुडिओ काढू. आणि खरच त्यासाठी त्याने प्रयत्न सुरु केले. मला आता पुढच सगळं ठीक वाटत होत. दरदिवशी सारख मी सकाळी त्याला कॉल केला आणि मोबाईल बंद आहे असा समोरून आवाज आला. कामात असेल म्हणून मी नंतर पुन्हा कॉल केला. आणि तिथून पुढे संध्याकाळी पर्यंत मी त्याला कॉल केले पण बंदच. म्हणून मी त्याच्याकडे चालत गेलो. जेव्हा मी टॅटू काढत होतो तेव्हा एक पोलीस आमच्याकडे टॅटू काढायला आलेले. त्यांना माझी चित्रकला आवडली आणि म्हणून त्यांनी मला एकदा गुन्हेगाराच चित्र काढायला पोलीस स्टेशनला बोलवलं. पोलीस म्हंटल कि मला भीती वाटायची. समोर दिसले तरी अंग थंड व्हायचं. आणि जेव्हा मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो हवालदार पासून पी.आय. साहेबांपर्यंत सगळे माझी वाट बघत बसलेले बघून अजूनच भीती वाटायला लागली. तेव्हा एका बाईच्या गळ्यातील गंठण एका चोराने गाडीवरून ओढून पळवून नेलं होत. त्या बाईला त्या चोराचा चेहरा लक्षात होता. वर्णनावरून चित्र कस करतात मला माहीत नव्हतं. अजून हि माहित नाही. पण त्यांनी सांगितलं तस मी काढत गेलो. सगळे पोलीस बाजूला माझ्या उभे राहून बघत होते. हात थरथर करत होते. तरी कसबस दहा मिनिटात मी ते चित्र पूर्ण केलं. ती बाई निघून गेली. बऱ्याच पोलिसांनी माझा नंबर घेतला. पी. आय साहेबांनी माझा नंबर घेतला. काही पैसे दिले आणि माझ्यासोबत चहा घेतला. गप्पा मारल्या. आणि मग तिथून पुढे मी चार साडे चार वर्ष सातारा पोलीस स्टेशन साठी काम केलं. मी केलेल्या चित्रांवरून कित्येक गुन्हेगार सापडले.जेव्हा मित्राकडे चाललो होतो. दोन पोलिसांनी मला रस्त्यावर ओळख दिली आणि मला अडवलं. मित्राबद्दल विचारायला लागले. मला काय समजत नव्हतं. नीट विचारलं तेव्हा समजलं तो मित्र त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन लग्न करायला पळून गेला होता. सातारा सोडून. तो गेला ते तीन चार महिन्यांनी परत साताऱ्याला आला पण आमचा संपर्क पुन्हा कधीच नाही झाला. माझं टॅटू स्टुडिओच स्वप्न आणि  शिक्षण वाया गेलं. मी दोन महिने फक्त घरात बसून काढले. घरी कुणी नसायचं. दार उघडून खाली जाऊन कधी माणूस हा प्रकार बघीतला नाही. फक्त मी आणि मांजर. खूप तुटत चाललो होतो आतून. जी गोष्ट करायला मनापासून सुरुवात करायचो त्या गोष्टीचा शेवट हा अपयशानेच व्हायचा. याची आता सवय लागलेली. पण प्रयत्न सोडून माझं नाव होणार नाही हे हि मला कळत होत. तेव्हा गणपती काही दिवसांवर आलेले. मग विचार आला गणपती बनवावे. काही पैसे मिळतील आणि आनंद हि. साताऱ्यात जिथे जिथे गणपती बनवतात तिथे जाऊन विचारलं पण त्यांनी सरळ नकार दिला म्हणून मग एका ज्वेलर्समध्ये कामाला लागलो. काम होत काउंटरवर थांबून गिऱ्हाईक बघणं. पण जेव्हा कामाला लागलो तेव्हा, पहिल्याच दिवशी पूर्ण दुकानाचा केर ( कचरा ) काढायला लावून फारशी पुसायला सांगितली. लाज वाटत होती पण जास्त वाईट वाटायला लागलं होत कि स्वप्न मोठी बघून हे काय करावं लागतंय. पण यातून हि चांगले दिवस येतील म्हणून काम सुरु ठेवलं. वर्षभर तिथे काम झालं असेल पण मन अजून हि त्या कामात लागत नव्हतं. अशात एका मुलाचा कॉल आला ज्याला मी कधी टॅटू काढला होता. त्याला नवीन डिझाईन काढून हवी होती. त्याने मला भेटायला बोलावलं. आम्ही भेटलो. त्याने माझी माहिती विचारली आणि मला सांगितलं तू डिप्लोमा कर व्ही. एफ. एक्स चा. पैसे नव्हते. खर्च खूप होता. त्याने ओळखीने बरीच फी माफ केली जी होती ती थोडी थोडी करत मम्मीने भरली. आणि डिप्लोमा करायला लागलो. डिप्लोमा झाल्यावर आता आय.टी. कंपनी शिवाय कुठे काम मिळणार नव्हतं. मनातच खूप खुश होतो. मन लावून एक हि दिवस कॉलेज न बुडवता मी ते सगळं शिकायला लागलो.
05
मित्र जग सोडून गेल्याच दुःख होत. ज्या रस्त्याने आम्ही फिरायचो शक्यतो तिथून सारख येण जाण व्हायचं. त्यामुळे डोक्यात सतत विचार यायचे. आता सगळं ठीक चाललं आहे एवढं डोक्यात पक्क झालेलं. पैशाची चणचण भासत होतीच. मम्मी पुण्याला नोकरी करत होती. त्यातून दोन्ही बहिणींचा हॉस्टेलचा खर्च आणि माझं मन नोकरी न करता कलेत वेळ घालवायला बघत होत. खूप दिसत होते हाल पण तरी मनाची तयारीच होत नव्हती. त्यात पहिल्यांदा नोकरी केली तर फरशी वैगरे पुसायला लागली. त्यामुळे तर आता बसून नोकरी मिळाली तरी भीती आतून वाटायला लागली. जे पैसे असायचे किंवा पोलीस स्टेशनला चित्र काढून जे मिळायचे त्यातून मी मग दिवसभर दोन तीन वेळा चहा प्यायचो. दुधात पाणी घालून ते दूध चहात घालून चहा बनवायचो. आणि चांगलं दूध त्या मांजराला देऊन त्याला नीट संभाळायचो. या लोकांच्यात ते एकट मला माझ वाटत होत. दिवसभर कॉलेजला जाऊन संध्याकाळी यायचं. सकाळी एक कप चहा. दुपारी सगळे डबा खाताना मी बाहेर फिरत बसायचो. संध्याकाळी घरी येऊन भात वैगरे बनवून खायचो. अशात नंतर आठ ते नऊ वेळा मी घरातच बेशुद्ध पडलो होतो. ते हि एक ते दोन दिवस पूर्ण. जेव्हा जाग यायची तेव्हा कधी बेडरूम किंवा हॉल न एकदा बाथरुममधून मी उठलेलो नळ सुरु होता मी भिजलो होतो. मी शेवटचा मोबाईल बघितलेला तेव्हा रविवार होता दुपारची वेळ होती न जाग आली तेव्हा सोमवार होता आणि रात्री साडे नऊ वाजलेले. खायला कमी मिळत होत म्हणून अस झालं असेल मला अस वाटलं पण जेव्हा मी माझ्या घालवलेल्या संधीचा विचार केला तर झोपेत मला ते सगळं दिसायचं. विचार केला तर छातीत दुखायच. जो त्रास अजून हि होतो.  डिप्लोमा होत आलेला. लहानपणी वडील सोडून गेल्यामुळे त्यांचं आडनाव लावून होतो पण त्या नावाच ओळखपत्र नि पुरावा कधी निघाला नाही. जेव्हा आयटी कंपनीत इंटरव्हीवसाठी गेलो तेव्हा दारातच मला ओळखपत्र नसल्यामुळे अडवलं. सगळे मित्र आत गेले. मी एकटा बाहेर उभा होतो. सगळं संपल होत. कसे तरी पैसे जमवून मम्मीने दिलेले वाया गेले होते. तेवढ्यात मित्र आले आणि त्यांनी खूप विनवणी करून मला जन्मदाखला दाखवून आत घ्यायला लावलं. मी तो जन्म दाखला दाखवला मला आत घेतलं. त्यां मित्रांचे उपकार कसे फेडू यावर विचार करत मी आत गेलो. स्वर्ग. अस कधी कुठेच बघितलं नव्हतं मी. सगळे बाहेरच्या देशातले लोक तिथे फिरत होते. मी गेलो. आम्हाला प्रत्येक एका कॉम्प्युटर वर बसवलं. आणि आमची परीक्षा सुरु झाली. पूर्ण दिवस गेला. जे जमत होत त्यातून मी परीक्षा दिली. सगळ्यांच काम आम्ही एकमेकांचं बघत होतो. आणि पास होण्यामध्ये आम्ही तिघेजण दिसत होतो. मी खुश होतो कि मला नोकरी लागणार. आणि जे बघायला आलेले सर त्यांना हि माझ्या कामात काही चूक नाही दिसली. आम्ही सगळे घरी आलो. पुन्हा कॉलेजला जाऊन रोज प्रॅक्टिस करत होतो. आणि सरांना कॉल आला. त्यात सगळे पास होते मी सोडून. आणि हे ऐकून मला काय करावं कळायचं बंद झालं. माझ्यासोबत अजून एक होता ज्याला ऐकायला आणि बोलायला येत नव्हतं म्हणून त्याला रिजेक्ट केलेलं. आणि मी पूर्ण नापास झालेलो. सगळे गेले. मी कॉलेजवर जायचं बंद केलं. आता सगळे मार्ग संपलेले. काय करायचं राहिलेलं नव्हतं. आणि केलंच तरी यश अजिबात मिळत नव्हतं. मी एकटा मागे राहिलो म्हणून सरांनी तिकडे कॉल करून विनवणी केली. आणि मला पुण्याला बोलवलं. पण पैशाकची अडचण होती. मम्मीने इकडून तिकडून गोळा करून मला मोजके पैसे दिले. मी गेलो. काम सुरु झालं. ऑफिस स्वारगेटजवळ होत आम्ही राहायला बालजीनगर कात्रज जवळ. आम्ही सगळे चालत रोज ऑफिसला जायचो. संध्याकाळी. आणि सकाळी पहाटे घरी यायचो. खूप चांगलं चाललं होत आता सातारा मी सोडलाच होता. आणि पुण्याने मला आपलसं केलं यातच मी खुश होतो. या नोकरी सोबत अजून काहीतरी माझ्या कलेला वाव मिळवा या प्रयत्नात एक मुलगी आयुष्यात आली. जिने इतकं काही माझ आयुष्य बदलून टाकलं कि, इतकं मम्मीनंतर माझ्यासाठी फक्त तिनेच केलं आहे. तिच्यासोबत दिवस घालवत रात्रभर नोकरी सुरु होती. पहिलीच नोकरी असल्याने पगार कमी होता पण तरी मला मान्य होत. सकाळी फक्त चहा पिऊन संध्याकाळी एकदिवसाआड जेवण सुरु होत. मित्र कधी त्यांच्यातल खायला द्यायचे. ती मुलगी कधी जमेल तस बनवून द्यायची. आणि एके दिवशी अचानक पगार व्हायच्या आधल्या दिवशी कंपनीच शिफ्टिंग होणार आहे अस समजलं. आणि त्यांनी काही लोक तिथून कमी करायचं ठरवलेलं ज्यात आम्हा नवीन मुलांची नाव होती. पगार बुडला, काम आणि वेळ वाया गेलं. सगळ्यानी ठरवलं आता साताऱ्याला जाऊन दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न करायचे. सगळयांनी ठरवलं आणि ते दुसऱ्याच दिवशी निघाले. माझे खायचे हाल त्यात मी टू बी.एच. के. भाडं कस भरणार होतो?  मला रात्रभर सुचेनासे झालं. रात्रभर विचारात अंग ओल झालं. छातीत दुखणं सुरु झालं. आणि पहाटेपर्यंत मी पूर्ण तापात हरवलेलो. सगळ्यांनी मला सोबत यायला विचारलं पण मला डोळे उघडायची पण ताकद नव्हती. ते गेले. मागे एक माझ्यासाठी मित्र थांबला. माझ्याकडे पैसे नव्हते. त्याला मी मागितले त्याने तिकीतला दिले. आणि तो हि निघून गेला. मी दुसऱ्या दिवशी  कसाबसा घरी आलो. तिकीट काढेपर्यंत कसाबसा डोळे उघडून बसलेलो. नंतर जे झोपलो ते डोळे उघडले तेव्हा मोळाचा ओढा ( सातारा ) आला होता. बस स्टँड वरून घरी चालत गेलो. किमान अडीच तास चालून घरी गेलो आणि झोपलो. आणि दुसऱ्यादिवशी सकाळी उठलो.
06
लहानपणापासून आज्जीकडे रहायचो. त्यामुळे वडिलांचं प्रेम आईची सोबत कधी जास्त मिळाली नाही. लहानपणी हर एक गोष्ट आज्जीला सांगायचो. मी इतक्यावेळा मरता-मरता वाचलोय म्हणून तिचा माझ्यावर खूप जीव होता. लहानपणी सांगण्यासारखं इतकं काही नसायचं. जेव्हा गरज होती म्हणजे अगदी नववी दहावी किंवा त्या नंतर, ते ऐकायला ती नव्हती. मी आठवीत असताना माझ्यासमोर तिने माझा हात पकडून जीव सोडला. तिला हार्ट अटॅक आला होता. आधी पहिले दोन आलेले पण तिसरा जोरात आला आणि ती गेली. ती गेली आणि मला रडणं हा प्रकार पुन्हा जमला नाही. त्या आधी मी जरा काही झालं तरी रडायचो. पण ती गेली आणि माझा निम्मा जीव गेला असच वाटायला लागल. नववी आणि दहावी मी पूर्ण एकटा पडलेलो. कुणाजवळ व्यक्त होण जमत नव्हतं. तेव्हा माझ्या मनात मी तीन व्यक्ती तयार केल्या ज्यांच्याशी मी आज हि बोलतो. गेली अकरा बारा वर्ष झाले. एक व्यक्ती म्हणजे मी स्वतः. मी स्वतःशी फार कमी बोलायचो. पण जास्त करून डोळ्यात पाणी न आणता मी स्वतःजवळ एकट्याशी बोलून रडायचो. वयात आलेलो. एक मुलगी आवडायची पण तिला मी नव्हतो आवडत.  ( बहुतेक ) म्हणून मी तिच्याशी मनात बोलायचो. जिचं नाव मी प्रतीक्षा ठेवलेलं.  मला आनंद झाला कि तिला सगळं सांगायचो. आणि खूप एकटम वाटलं कि मी शिवाजी महाराजांशी बोलायचो. एखाद्याला पटणार नाही पण जे आपण माणसाशी एका बोलतो ते सगळं ए टू झेड सगळं महाराजांना सांगायचो. आज हि मला एकट वाटलं तर या तीन व्यक्तींशी मी मनात बोलतो. आणि मला बर वाटत. सातारा पुन्हा दिसला. पण नोकरी सोडून आल्यामुळे मम्मी नाराज झाली. तिने दिलेले कसेबसे पैसे वाया गेले होते. पण मी ठरवलं आता नोकरीच्या नादी लागायच नाही. काही दिवस असेच गेले. कल्पनेतल्या जगात वावरताना एक मुलगी आयुष्यात आली. जिने मला माझ्या कल्पनेतून मला बाहेर काढलं. त्या आधी मी कल्पनेत वावरत असताना मी सहज जिव्हार हि कथा लिहिली होती. जी एका मराठी फिल्मसाठी द्यायला मी तयार झालो होतो. आणि त्या फिल्मसाठीच खास मी ती पूर्ण लिहून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी कॉल येणार होता पण आला नाही मी केला आणि समजलं त्यांना दुसऱ्या कुणाची तरी कथा आवडलीय. त्यावर त्यांनी नंतर फिल्म बनवली जी फिल्म एक दिवस हि चालली नाही. जिच्यासोबत दिवस जात होते ती जास्त दिवस सोबत न राहण्याची चिन्ह दिसायला लागली. आणि मी पुन्हा कल्पनेत जायला सुरुवात केली. मग कास पठारावर एकदा गेलो असता तिथल्या परिस्थितीवर एक खास लेख लिहिला. जो कि खूप लोकांना फेसबुकवर प्रसिद्ध केल्यावर आवडला. आणि मला वाटलं मी अजून लिहिलं तर लोकांत माझं नाव होईल.मी लिहित गेलो. पाच वैगरे लेख लिहिले. आणि मला अचानक समजलं कि ब्लॉग नावाचा काही प्रकार आहे ज्यावर लिखाण करता येत. आणि लोकांपर्यंत पोचता येत. मी ब्लॉग बनवला. त्यावर दोन पोस्ट केल्या. खुश होतो मी. काहीतरी नवीन करत होतो. ब्लॉग बनवला पोस्ट केल्या. पण त्याला प्रसिद्धी कशी द्यायची ? हे समजत नव्हतं. मग दररोज किमान पन्नास एक मोठ्या पेजेस आणि ब्लॉगर्स किंवा वेबसाईट ऍडमीन्सना मेसेज करून माहिती विचारायचो. पण एकानेहि त्या पंधरा दिवसात मला सल्ला किंवा प्रतिसाद दिला नाही.  ब्लॉगला आता एक महिना होत आला होता. अपेक्षा होती दोनशे तीनशे व्हीव्जची आणि मी ब्लॉग उघडून बघितला तर पंचवीस का एकोणतीस असे काही व्हीव्ज होते. मला काय करावं सुचेना. म्हणून मी जिव्हार हि कथा पोस्ट केली. जितके नंबर होते जवळ त्यांना लिंक सेंड केली. काही दिवस वाट बघितली. मला माहित होत जिव्हार हि कथा वाचून लोक शेअर करतील कथा आणि कथेला व्हीव्ज जास्त मिळतील. पंधरा दिवसांनी मी जेव्हा ब्लॉग बघितला. जिव्हार या कथेला व्हीव्ज होते शून्य.माझ्याच्याने काही होणार नाही म्हणून मी तो ब्लॉग विचार न करता डिलिट केला. आणि ठरवलं बस आता काय जगून फायदा नाही माझा. जे करू त्यात फक्त अपयशच येत असेल तर काय अर्थ आहे काही करण्याला ? मी ठरवलं मागच्या वेळेसारखं आत्महत्या करायची नाही. मेल तर त्रासानेच मरायचं. काही गोष्टींचा अभ्यास करून मी हृदयावर ताण कसा देता येतो याचा अभ्यास केला. तो इथे सांगू शकत नाही. पण मी तो सगळा अभ्यास आठवडाभर करून तयारी सुरु केली. मग एकदा ठरवून हार्ट अटॅक यावा इतका ताण हृदयावर दिला आणि तासाभरात माझ्या डाव्या बाजूला हळू हळू दुखायला सुरुवात झाली. डावा हात जड झाला. घाम यायला लागला. आता काहीच क्षणात अटॅक येणार म्हणून मी तयारीत होतो आणि अचानक माझा श्वास धिमा झाला आणि मला डोळ्यापुढे  अंधारी आली. जेव्हा डोळे उघडले होते बेडशीट माझ्या बाजूला पूर्ण ओल झालेलं. इतका घाम येऊन गेला. मी उठलो. छातीला हात लावला छातीत दुखत होत हलकस. पण हार्ट अटॅक आल्यावर माणूस स्वतःहून उठतो अस मी तरी ऐकलं नव्हतं. म्हणजे हा प्लॅन पण फेल गेला होता.
मी पुन्हा झोपलो आणि रात्री उठलो. त्या नंतर ठरवलं आता अस काहीतरी करायचं कि मरण पक्कच झालं पाहीजे पण सुचत नव्हतं काही. दिवस जात होते. अशात प्रेमाची शप्पथ आहे तुला हि कथा लिहित होतो. आणि मी एक वर्षाने पुन्हा नवीन ब्लॉग काढला. 'रायथॉलिक' नावाचा.
07
 ब्लॉग काढून मी ठेवला. पण त्यावर काहीच पोस्ट केलं नाही. आधी माहिती मिळवायची आणि मग काम करायचं ठरवलं. अशात एक नाटक लिहायची आणि बनवायची संधी मिळाली. त्यातच जमिनीच्या केस सुरु झाल्या. आणि आम्हाला सगळ्या कुटुंबाला पुण्याला जावं लागलं. अशात ते नाटक हातून गेलं. पुण्यात रहायचं म्हणजे भाडं जेवण सगळंच अवघड. मग मी मुलांच्या हॉस्टेलवर कॉट बेसिसवर स्वस्तात रहायला लागलो. मम्मी लेडीज हॉस्टेलवर. बहिणी त्या कॉलेज हॉस्टेलमध्ये होत्या. पुन्हा सगळं रिकामं झालेलं. काय करावं आणि कुठून सुरु करावं समजत नव्हतं. नोकरी शोधायला सुरुवात केली. अचानक जायच्या निर्णयाने जी मुलगी सोबत होती तिने मला कॉल करून पुण्याला जायच्या आधी भेटायला बोलवलं. काही मिनिट आम्ही फक्त शांत होतो. तिला वाटत होत मी पुण्याला जाऊ नये. आणि मी थांबावं हे माझ्या हातात नव्हतं. मी तिला तिच्या घराजवळ सोडलं. मी घरी आलो. तो पर्यंत मी सगळीकडे ब्लॉक झालेलो. तिचे डीपी दिसायचे बंद झाले. तिला कॉल लागत नव्हता. पुण्यात गेल्यावर हि खूप प्रयत्न केले. मी तिचा नाद सोडावा म्हणून तिने तिच्या मित्रांसोबत फोटो काढून मला पाठवले. तिचीच इच्छा नाही माझ्यासोबत रहायची म्हणून मग मीच नोकरी शोधण्याकडे लक्ष दिल. ब्लॉग अजून हि तसाच मोकळा पडून होता. आणि पुन्हा माझ्या आयुष्यात ती आली जिने मला फिल्म्स वैगरे बनवायची स्वप्न दाखवलेली. ती पुण्यातलीच. त्यामुळे पुन्हा भेटणं सुरु झालं. तिच्या सोबत आनंदात होतो. त्यामुळे नोकरी, सध्याची परिस्थिती आणि स्वप्न सगळं विचारामागे गेलं. तिच्या घरून आम्हाला केव्हाच विरोध होता तरी ती मला भेटत होती. काहीच महिन्यात आम्ही पुन्हा साताऱ्यात सगळे आलो. मधल्या काळात बऱ्याच लोकांचा सल्ला घेतला. मराठी ब्लॉग चालत नाहीत. प्रेमकथा वैगरे असलं थर्डकलास वाचायला लोकांना वेळ नसतो. नको असले ब्लॉग काढू. त्यापेक्षा फेसबुकला लिही आणि बरेच असेल सल्ले लोकांनी दिले. हे सल्ले ऐकून सगळा हुरूप गुडूप झाला. मग मी ठरवलं त्यांचं हि बरोबर आहे मराठी भाषा जगभर पोचणार नाही. त्यात आजकाल युट्युबच्या जमान्यात वाचन कोण करणार ? म्हणून मग मी तिच्यासोबत वेळ घालवत तिच्या प्रेमाला अनुभवत उर्दू शायरी लिहीन सुरु केलं. सोबत अचानक शिवाजी महाराजांवर लिहायची इच्छा होऊ लागली. म्हणून मग महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास सुरु केला. नोकरी शोधणं पुन्हा विसरलो. महाराजांवर काही लेख लिहिले. आणि ते फेसबुकवर प्रसिद्ध केले. खूप लेख लोकांना आवडले. त्यावर लोकांनी अभ्यास केला पण एक लेख लिहिला गेला माझ्याकडून ज्यात काही सवाल केलेले ज्याची उत्तर अजून इतिहासात ठामपणे लिहिलेली नाहीत. त्या लेखाच कौतुक न होता मला अनेक धमकीचे कॉल यायला लागले. कित्येक मेसेज यायला लागले. आणि मी जिथे होतो त्या पासून काही किलोमीटरवर काही लोक मला मारण्यासाठी थांबलेले. औरंगाबाद, नाशिक, पुणे येथून काही दादा (गुंड) लोकांनी मला मारून टाकण्याची धमकी पाठवली. मी पोलीस स्टेशन गाठलं. पण जी व्यक्ती मला मेसेज करणारी होती ती मोठी असामी असावी, पोलिसांनी मला फक्त घरी पाठवलं. आता मरेन का मग या विचाराने मला सुचत नव्हतं. ती पोस्ट डिलिट करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला. आणि मी ती पोस्ट अजून हि डिलिट केली नाहीये.आणि मग मला अजून उर्मी मिळाली राजेंचा इतिहास शोधायला. इतिहास शोधत असताना त्यात पाप नको म्हणून तिच्याशी बोलणं बंद केलं. भेटणं बंद केलं. इतिहास आणि ब्लॉगपोस्ट इतकंच आयुष्य जगत होतो. त्यामुळे तिनेत्यामुळे माझा विचार सोडला. आणि दुसरा त्यांच्या जातीतील बघितला. आणि दोघांचे किस करतानाचे फोटो मला पाठवले. त्यात मी पुन्हा कुटुंबासोबत साताऱ्याला आलो. साताऱ्यात मी राहतो म्हणजे वाचणारे सातारकरच असणार या विचारात होतो मी. पण जेव्हा पहिला महिना पूर्ण झाला तेव्हा सातारा सोडुन जवळ जवळ महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातून ब्लॉग वाचला गेलेला. महाराजांचा इतिहास वाचताना एक समजलं, आयत मिळत त्याची किंमत जगापुढे शून्य असते. आपण स्वतः मिळवलं काही तर ते बघून अख्ख जग अवाक होत. कारण ते त्याच्या विचारापलिकडच असत म्हणून. मी ठरवलं आता कुणाला काही विचारायचं नाही. मी माझा ब्लॉग स्वतः डिझाईन करत गेलो. लिखानासोबत ब्लॉग अपडेट करत गेलो. प्रतिसाद वाढत गेला. पेपरमध्ये लेख यायला लागले. लोक वाह वा करायला लागले. आणि एक दिवशी मला एक व्यक्ती भेटायला आली. माझ्याच एवढी. तो होता माझा सावत्र भाऊ. आणि पुन्हा डोक्यात कित्येक विचारांनी मला वेड करायचं ठरवलं. सगळी प्रश्न उत्तर शोधण्यात मला मदत करणार किंवा आयती उत्तर देणार कोणी नव्हतं. मम्मीने जेवढं सांगितलं त्यावरून बाप या शब्दाचा मला राग का येतो हे समजलं. पुन्हा एकट वाटायला लागलं. आयुष्यात येणाऱ्या जाणाऱ्या लोकात हा शिरलेला भूतकाळ आता कधी जाणार नाहीये. मी ब्लॉग लिहीत होतो. त्याला वाचून एक मुलगी माझ्या प्रेमात पडली. जिने ते व्यक्त केलं. मी राजी झालो. खूप प्रेम केलं तिने माझ्यावर आणि मी सुद्धा. माझं पहिलं प्रेम प्रतीक्षा. खरतर प्रत्येकाच पहिलं जे प्रेम असत ते आकर्षणच असत. एक मुलगा म्हणून मुलीच्या शरीराचं गूढ शोधण्यासाठी तिला हात लावण्याच्या बहाण्यासाठी जे काही नात बनवण्याचा आपला काल्पनिक विचार असतो ते म्हणजे पहिलं प्रेम. पण तरी ते खूप सुंदर, खर, आणि मनापासून केलेलं असत. भले प्रतीक्षा मला मिळाली नाही पण तिच्याकडे बघून लिहायला जमलं. ती पहिलं प्रेम असलं तरी हि माझं खऱ्या अर्थाने कळत्या वयातील खर आणि पहिलं प्रेम हि ऐश्वर्याच झाली होती.

शेवटचा भाग.
दरम्यान ग्राफिक डिझाईनर म्हणून नोकरी करत होतो. नोकरी व्यवस्थित चालली होती. ऐश्वर्यासोबत दिवस चांगले जात होते. भले आमच्यात अंतर असो पण वेळ मिळेल तेव्हा भेटून प्रेम टिकवण्याचा दोन्हीकडून प्रयत्न सुरु होता. ब्लॉग भारतासोबत आता नऊ देशात वाचला जाऊ लागला होता. लोकांच्या प्रतिक्रिया येत होत्या. त्या वाचून तिला आनंद वाटायचा. मी तिच्या आयुष्यात असल्याचा तिला आनंद वाटायचा आणि तो तिच्या चेहऱ्यावर दिसायचा. सगळं चांगलं चाललं होत. आधी ज्या मुली आयुष्यात आल्या त्या काही काळापुरत्या सोबत राहिल्या. प्रत्येकीच प्रेम खूप होत माझ्यावर. पण सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम मला ऐश्वर्यावर झालेलं. आणि ते तसच कायम आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी मी एक निर्णय घेतला. आम्ही भेटलो. आणि मी बोलायचा निर्णय तिनेच मला सांगितला. मनातलं ओळखता येत माणसाला हे तिच्याकडे बघून पटलं मला. मला जे वाटलेलं तेच ती बोलली. आपण लग्न करायचं का?
मी विचार न करता होकार दिला. पण तिला मुदत मागितली. कारण लगेच तिची जबादारी घ्यावी असा जबाबदार मुलगा मी नाही. माझ्या जगात मी जगताना बाहेरच्या जगाचे नियम शाळा कॉलेज मग नोकरी आणि लग्न या नियमांपेक्षा मला माझ्या कलेत हरवायला आवडत. त्यातून बाहेर येऊन आहे ती नोकरी टिकवून तिच्याशी लग्न करण्यासाठी मी तिच्याकडे एक वर्ष फक्त मागितलं. पण जवळीक इतकी वाढलेली कि प्रत्येक दिवस वेगवेगळं राहून जगण मुश्किल झालेलं. मी घरी मम्मीला सांगितलं आणि तिने नकार दिला. मी खूप प्रयत्न केला मम्मीला समजावण्याचा पण नाही शक्य झालं. यावर एकच इलाज म्हणजे लग्न करायचं आणि मग घरी यायचं कारण एकदा लग्न झालं कि करतात सगळे मान्य त्यामुळे आम्ही लग्न करायचं ठरवलं. अस हि दोघ एका जातीचे त्यामुळे जास्त काही त्रास होणार नव्हता. पण एक प्रॉब्लेम होता. ती माझ्याहून पाच महिन्यांनी मोठी होती. आणि तीच लग्न झालं होत. इतकंच. आणि म्हणून मम्मी मला नकार देत होती. तीच बरोबर होत. पण मला इतक्या विचारातून फक्त तिने मला बाहेर काढलं होत. या सगळ्या जगात तिने मला समजून घेतलं होत. तिनेच फक्त खर माझ्यावर प्रेम केलं होत. आणि त्या बदल्यात तिने माझ्याशी लग्न कर एवढंच मागितलेल ते जर मी तिला देऊ शकलो नाही तर माझ्या प्रेमाला मी खर कस म्हणणार ? 
मी ठरवलं काहीही झालं तरी आता आनंद मिळवायचा. रडत बसायचं नाही. सगळं मिळत जाईल. सगळे आपलसं करतील मला. आत्ता माघार घेतली तर पुन्हा अशी साथ मिळेलच अस नाही. आणि आम्ही ठरवलं दिवस वार सगळं. लक्ष्मीपूजनाच्या आधल्या दिवशी आम्ही भेटलो. माझं ठरलं होत. लग्न करून काही दिवस पुण्याला तिच्याकडे जायचं. आणि काही दिवसांनी मग घरी यायचं. लक्षमीपूजन झालं.भाऊबीज झाली. एक एक दिवस पटपट जात होता. वेळ कमी होता. एकत्र येण्याच्या विचारांनी सारख धडधड करत होत हृदय पण त्यात हि मजा येत होती. पाडवा, दिवाळीचा शेवटचा दिवस. सकाळी आमचं बोलणं झालं. दहा वाजता आणि अकरा वाजता माझा ऍक्सिडेंट झाला. खूप जोरात लागलं मला. मी पडलो होतो गाडीवरून. एका चारचाकीने मला धडक दिली होती. डोक्याला मार लागला. उजवा पाय पूर्ण कामातून गेला. मी उठलो पाय रक्ताने भरलेला. लोक गोळा झाली त्यांनी गाडी उचलून बाजूला लावली. आणि मी रक्तात पडलेला मोबाईल पुसून तिला कॉल लावला आणि सांगितलं माझा ऍक्सिडेंट झाला.
त्या नंतर ती मला वेळ कमी द्यायला लागली. मला गरज असताना ती अशी टाळत आहे बघून त्रास व्हायला लागला. आणि तीन दिवसांनी मला कॉल आला. आपलं नात इथेच संपवू. पुढे नको जायला. आणि मी आहे त्या स्थितीत झोपून रडायला लागलो. दोन महिने मी झोपून होतो. पाय उचलत येत नव्हता. फक्त तिचे फोटो बघून रोज रडत होतो. पण ठरवलं रडून उपयोग नाही. आणि झोपुनच मोबाईलवर लेख लिहून ब्लॉगवर टाकत राहिलो. लोकांना दुसऱ्याच्या दुःखाने बर वाटत. आनंद मिळतो. आणि हे खरच आहे. ती सोडून गेली आणि मनातल्या भावना मी लेखात उतरवून पोस्ट करत राहिलो. आणि लोकांचे मेसेज यायला लागले. आजकाल तू खूप भारी लिहितो. त्यांना वाचून आनंद मिळतो बघून मी मग स्वतःला त्रास करून घेत अजून हि लिहितो आहे. ती सोडून गेल्याच कारण समजलं नाही आणि तिने सांगितलं हि नाही. पण तिने दिलेला हा धक्का अजून हि सहन होत नाही. वाटलं मरावं पुन्हा. म्हणून मी मरण्यासाठी काही युक्त्या शोधत राहिलो. पण नाही सुचली. आता एकटा आहे पण लिहून स्वतःला मोकळं करत आहे. सुरुवातीला निवडक वाचक होते आज 32 पेक्षा जास्त देशातून ब्लॉग वाचला जातो. माझ्या दुःखाने आनंद वाटण्याचं काम मी करत असतो. लिहून मी स्वतःला बर वाटून घेतो आणि ते वाचून लोकांना बर वाटत.
आता यात खंड पडणार नाही.
असो, या लेखात लिहिलेलं प्रसंग हे शंभर पैकीशंभर एक ते दोन टक्के आहेत. भविष्यात जेव्हा मोठा होईन तेव्हा आत्मचरित्र लिहीन त्यात उरलेलं सगळं आयुष्य इत्तमभूत लिहीन. बाकी तुम्हा सर्वांच प्रेम आहे. आशीर्वाद आहेत. महाराज सदैव मनात आणि पाठीशी असतात. त्यामुळे आता पुन्हा आत्महत्येचा विचार येणार नाही. हे निश्चित.
तुमचाच 
अजिंक्य अरुण भोसले.
समाप्त.
4 टिप्पण्या

  1. अजिंक्य दादा देव करो तुझा ब्लॉग मधला आत्महत्या चा विचार आणि प्रयत्न हा शेवटचाच असो... परत असं काही करू नकोस, तुझे लेख खुप छान असतात. आणि नक्कीच ते हळूहळू 32 पेक्षा सुद्धा जास्त देशात वाचले जातील. Best of luck for your bright future, आणि असच तुझा छंद जोपासत जा.

    उत्तर द्याहटवा