गणपतीत तू

 

 एक पूर्ण वर्ष झाल. तू मला चुकून हि दिसली नाहीस. मध्यंतरी चार महिन्यापूर्वी तुझ्यासारखी एक मुलगी दिसली मला. म्हणजे ती मुलगी एकाबाजूने तुझ्यासारखी दिसत होती. तिला बघून तुझी आठवण झाली तेवढी. बस पण तू अशी काही दिसली नाहीस. बहुतेक तू पुण्याला गेली असावीस. मागच्या वर्षी आपण रिलेशनमध्ये होतो. रिलेशनला वर्ष होत आलेल आपल्या आणि तेव्हा गणपती पण जवळ आलेले. तुझ्या घरापासून कुंभारवाडा जवळ होता. तुम्ही तिकडेच गणपती ठरवायचा. आमच्या गल्लीत  एका गाळ्यात गणपतीच्या मुर्त्या विकायला ठेवलेल्या असायच्या. दोन घर सोडली कि तिसऱ्या घराऐवजी तो गाळा होता. तिथे आम्ही गणपती ठरवायचो. तेव्हा प्रेमाचे दिवस आपले सुरु होते. मी सांगेल ते तू करायचीस आणि तू सांगशील ते मी ऐकायचो. तू म्हणालीस गणपतीत आपल्याला जास्त भेटता येणार नाही. आणि दहा दिवस तुझ्या मनाला आवर घालायला लागेल. एकतर सगळेच बाहेर असतात त्यामुळे आपल्याला बाहेर भेटता येणार नाही. आणि मिळालच भेटायला तरी कीस वैगरे करता येणार नाही. गणपती जाईपर्यंत तरी. म्हणून मग तू म्हणालीस दरवर्षी तुमच्या इथून घेतोस ना तू गणपती ? मग या वर्षी आमच्या इथून घे. मी सांगेन तो. आणि मी तुला काही प्रश्न विचारलाच नाही.

लागलीच आईशी बोललो. आणि जितक्या उत्साहाने मी आईला सांगितल तेवढ्याच रागात आई बोलली, ते काय जवळ आहे का ? गणपती आहे तो, शांत दिसत असला तरी कडक आहे तो देव. एकतर वर्षातून एकदा येतो तो निदान त्याच निट तरी कराव. आणि इतक्या लांबून कसा आणणार आहेस ? गाडीवरून तर अजिबात आणायचा नाहीस. आणि रिक्षाने वैगरे तर अजिबात नको. खड्ड्यातून वैगरे रिक्षा गेली तर मूर्ती सांभाळता येणारे का तुला ? एकतर तुझ सगळ धत्र काम असत. सतत हातातून तुझ्या वस्तू पडत असतात, नकोच, इथून घ्यायची मूर्ती. आणि आता मला जास्त प्रश्न नकोत.

इतक सगळ ऐकून घेऊन आईला प्रतिप्रश्न करायची मला हिम्मत झाली नाही. आणि हे आईच उत्तर ऐकून तुला नकार देऊन तुला नाराज करावस मला वाटल नाही. शेवटी एक दिवस उपाशी बसून मग जेवणाच्या बदल्यात आईला मनवल. आणि मग तुला मेसेज केला. तुही त्याच वेळेस तुझ्या बाबांना घेऊन तिथे आलीस. आणि मी माझ्या आईला घेऊन आलो. तुम्ही तुमचा गणपती ठरवला. मी नुसता आईला इकडून तिकडून फिरवत होतो. आणि मग तू एका मुर्तीपाशी थांबून तू मला खुणावल मग तू तिथून निघून गेलीस आणि मी आईला ती मूर्ती दाखवली. आईला हि आवडली. आणि त्या गणपतीच्या हाताला माझ्या नावाच लेबल लावल गेल. तू निघून गेलीस मी हि निघून गेलो.

गणपती घरी आणताना हि आपण ठरवूनच तिथे आलेलो. माझ्या हातात गणपती होता, तुझ्या बाबांच्या हातात गणपती होता आणि सोबत तू. देव सोबत असताना पण आपल प्रेम डोळ्यातून आणि लाजण्यातून व्यक्त होत होत. गणपती झाले. विसर्जनादिवशी हि संध्याकाळी आपण एकाच वेळी त्या तळ्यापाशी पोचलो. या वर्षी ही मी तुमच्या इथेच ठरवला गणपती. तुमच्या घरी दोन फुटी मूर्ती असते. म्हणून शंभर-एक दोन फुटी ठरवलेल्या मुर्त्या बघून काढल्या. प्रत्येक हातातले लेबल वाचले पण तुझ नाव दिसल नाही. गणपती दिवशी हि तुमच्यात बारा वाजता तिथून गणपती नेतात म्हणून मी बारा वाजताच माझा गणपती न्यायला आलो. पण तू नाही दिसली. पैसे देऊन मी मूर्ती उचलून मंडपाच्या बाहेर आलो आणि गाडीतून उतरताना  तू आणि तुझे बाबा दिसले. तुझ लक्ष माझ्याकडे गेल. तू हसलीस मला बघून. मीही हसलो. तुझ हास्य तुझ्या ओठांवर दिसल पण माझ हास्य माझ्या चेहर्यावर नव्हत. तुझ्यासारख नाटक करायला मला जमत नाही. कारण मी लेखक आहे अभिनेता नाही. तू शेजारून गेलीस. गणपती घेऊन पंधरा मिनिटांनी तू आणि बाबा बाहेर आलात. गाडीत अजून एक कुणीतरी होत गाडी चालवणारा. तुम्ही गाडीत बसला. तू काचेतून मला एकवार बघितल. गाडी निघून गेली. तू जाईपर्यंत मी हातात गणपती घेऊन तिथेच उभा होतो.

मग मी निघालो घराकडे. मनात तू आलीस. पण तुझ्याशी मला बोलूच वाटत नव्हत. मग घरापर्यंत मी गणपतीशी बोलत होतो. मी कित्येक प्रश्न त्याला विचारले पण तो हि तुझ्यासारखाच ! कोणत हि उत्तर त्याने मला दिल नाही. शेवटी मीच गप्प्प झालो आणि घरी येऊन गणपतीला मखरात बसवलं.   

copyrighted@2020 


0 टिप्पण्या