My Gift


लॉकडाऊन काही दिवसासाठी काढल गेल. संधी साधून लागलीच दुकानात दुरुस्तीला दिलेला मोबाईल जाऊन आणला. मोबाईल हातात घेऊन अंग सोफ्यावर टाकून एक एक APP मोबाईलमध्ये डाउनलोड करण आणि नंतर त्यांना लॉगीन वैगरे सगळ करण्यात एक तास गेला. मोबाईल चार्जिंगला लावला. जेवण करत करत टीव्ही बघन सुरु होत. टीव्हीवर काय खास लागल नव्हत. म्हणून मग उठून मोबाईल चार्जिंगचा काढला आणि त्यावर युट्युब सुरु करून व्हिडीओ बघत एक एक घास तोंडात जात होते. मेसेज आला. बघितल क्लिक करून तर मित्रांच्या ग्रुपवर मेसेज आलेला. पुन्हा मागे येऊन युट्युबवर व्हिडीओ बघण सुरु केल. ताटातली चपाती संपली नवीन आणण्यासाठी आत किचनमध्ये गेलो. बाहेर मोबाईल वाजला. एकदा. दोनदा आणि सलग पाच सहा वेळा. मेसेज ग्रुपवरच आले असणार म्हणून मग तो ग्रुप उघडून त्याला एक आठवड्यासाठी म्युट केला.

मग पुन्हा युट्युब सुरु करून बसलो. एक एक घास खात ती कॉमेडी व्हिडीओ बघत हसत जेवण सुरु होत. आणि पुन्हा मेसेज आला. मी लक्ष नाही दिल. आणि पुन्हा एकदा मोबाईल वाजला. ग्रुप म्युट करून पण मोबाईल वाजला म्हणून डोक फिरल. मेसेज बघायला वर क्लिक केल आणि हातातला घास हातात, पोटात जाणारा घास मधेच छातीशी अडकला. तिचा, मेसेज आलेला. काय ऐवजी का आला ? असा प्रश्न पडला. मेसेज उघडला. हाय, तू कसा आहेस ? डीपी तिचा अजून हि दिसत नव्हता. तरी मी तिला हाय म्हणून मी ठीक पाठवून तू कशी आहेस म्हणून प्रश्न केला. वर डीपी दिसत नाही तुझा हे हि सांगून टाकल. तिने डीपी ठेवला. किंवा माझा नंबर सेव्ह केला असेल. पण मला डीपी दिसला. गणपतीचा.

मी नाही ठीक. ब्लॉकलिस्ट मध्ये तुझे मेसेज दिसले म्हणून तुला मेसेज केला. म्हणजे तू मला ब्लॉक केल होत का ? अरे तस नाही. म्हणजे, जाऊ दे न जुन सगळ...बर. काय करतेस ? काही नाही मेसेज करतेय तुला. तू काय करतो ? जेवतोय..ये तू पण म्हणून तिला ताटाचा फोटो काढून पाठवला. (तिने एका पुस्तकाचा फोटो पाठवला), हे वाचत होते. मूड गेला म्हणून मेसेज बघताना तुझे मेसेज दिसले सो मेसेज केला तुला. बर. काळजी घेत जा. आणि मूड नीट नसायला काय झाल ग तुला ? घरात बसून कंटाळा आलाय. ऑफिस अजून सुरु व्हायला वेळ आहे त्यामुळे घरीच असते. मग जेवण बनवायला शिकलीस का ?

नाही, चहा जमतो फक्त. पण दर वेळीस तो चहा चांगला होईलच अस नाही. हम..जमेल. प्रयत्न कर. मी असतो तर शिकवल असत सगळ आणि मुळात मी तुला काय करूनच दिल नसत. बाय द वे, आत्ता हि मला काहीच कराव लागत नाही. हो ते हि आहेच. मी नसल्याने काही फरक नाही पडत तुला हो ना ? हम...मी काय बोलले जुन नको काही बोलू, मी दिलेला कप ? चहा पितोस का त्यात ? हो... परवा फुटला माझ्याकडून मी फेवी क्विकने चिटकवला पण त्यातच पितो अजून. लॉकडाऊनमुळे बाहेर जात नाही पण तू दिलेलं पाकीट त्यात पैसे ठेवलेत. आणि मी दिलेले तो शर्ट, घालतोस का ? हो.. घालतो. तुला आवडतो त्या वासाचा सेंट फक्त त्याच शर्टवर मारून घालतो. मम्मी ओरडते घरात सेंट मारून कशाला बसतो वैगरे पण सवय लागलेली सुटत नाहीये. टेडी कसा आहे ? टेडी...तो आहे कि ठीक.

बघू न त्याचा फोटो मी तुला दिल्यापासून खाऊन पिऊन गुटगुटीत झालाय का ? अरे सॉरी...... का ? नवऱ्याने माझ्या बर्थ डे ला मला मोठा टेडी दिला. आणि तुझ्या टेडीचा पाय माझ्याकडून फाटलेला जरासा. नवऱ्याला सांगिलत होत शिवून आणायला तर त्याने मोठा टेडी आणला. त्याच अचानक एवढ प्रेम तुझ्यावर कस काय ?? असच... आम्हाला बाळ होणार आहे ना आता. बर, चांगली बातमी आहे. हा thanks...... मग मी दिलेला टेडी ? अरे त्याने तो घंटागाडीत टाकून दिला. आणि त्याजागी तो नवीन टेडी ठेवलाय. बर.... मी जरा कामात आहे. नंतर करतो तुला मेसेज. बर, चालेल. मला पण काम आहे नंतर बोलू. हो चालेल काळजी घे. आणि त्यांनी डोळ्यात आलेल पाणी अडवून एक ग्लास आत जाऊन पाणी पिल.

copyrighted@2020

2 टिप्पण्या