GOD FATHER : छत्रपती शिवाजी.वर्तमानपत्र, बॉम्बे टू सुरत. 1674

पुण्यासारख्या छोट्या मावळ गावातला एक राजा मेला. मोठ्या ठळक अक्षरात लिहिलेलं. “सिवाजीचा देहांत झाला.” बातमी महाराजांना पण कळाली. हो त्याच महाराजांना जे या जगात नाहीत. महाराजांनी केलेले गनिमी कावे इतके असरदार होते की, पाण्यात गळ टाकावा आणि बाहेर गळ काढला तर त्याला छोटाबिटा नाही मोठा मासा लागावा असच काहीस महाराजांचं गनिमी काव्याच फेकलेल जाळ बरोबर निशाण्यावर जाऊन पडायचं. महाराजांनी उठवलेली अफवा जगभर पोचली. पोर्तुगीज, डच, इंग्रजांनी आनंद व्यक्त तर केलाच पण सोबत दुखः हि व्यक्त केल कि चांगला राजा मेला. डोळ्यात पाणी, वर्तमान पत्रात पहिली बातमी अशा पद्धतीने श्रद्धांजली वाहून महाराजांना निरोप या परप्रांतीयांनी दिला. पण महाराज गेले नव्हते. ते रायगडावरच होते.  आणि याच काळातली महाराज आणि औरंगजेब यांच्यातल्या विचारांची एक छटा.
महाराज : सत्ता आपली, हुकुमत आपली, चर्चा सुद्धा आपली आणि वेळ वाया कोण घालवणार ? तर तो शत्रू. तो हि आपलाच. गाफील होणार. आणि आपण गाफील करून शत्रूला पराभूत करण हे काही पाप नाही. पाठीवरून वार करण कोणत्याच हिंदू पुराणात मान्य नाही. आणि एक राजा म्हणून मागून वार करून स्वतःचा जयजयकार करन मला शोभत नाही. शिवाजी मेला असा जरी परकीयांचा भ्रम असला तरी यातून औरंगजेबाला वगळायला हव. कारण, शिवाजी भोसलेला दोनच व्यक्ती अगदी इत्तम्भूत ओळखतात एक आमच्या आऊसाहेब आणि एक तो औरंगजेब. सबंध भारत राष्ट्र जरी मला श्रद्धांजली देऊन पुन्हा आपापल्या स्वाऱ्या माघारी घेऊन गेल तरी औरंगजेबाची स्वारी नक्कीच दख्खनेत धाड घालणार. रयतेला त्रास देऊ पाहणार. आणि पडताळणी करणार की, मी त्याच्या सैन्यासमोर येतो कि नाही. पण ठीक आहे. सध्या तरी परकीयांची व्याप्ती कमी झालीय. उरला सुरला पण आयुष्यभर पुरून उरेल असा औरंगजेब आणि त्याच सैन्य आहेच. दाद द्यायला हवी त्याच्या या पुन्हा पुन्हा होणाऱ्या पराभवाला.
औरंगजेब : दाद देनी पड़ेगी उस... सिवा को. यहाँ हम दिन में पांच बार नमाज पढकर खुदासे एक एक नया दिन भिक मांग रहे है. मौत शब्द सुनकर भी गले मे जान अटक जाती है, और ये सिवा, खुदको कितनी बार मार देता है. और खुदा भी कैसा उसूलो वाला है. हम नमाज पढकर अपनी नमाज उसे दुवा अदा करते है. ये औरंगजेब कभी किसे के आगे झुकता नही लेकिन खुदा के सामने बार बार, हर रोज झुक कर भी कभी एक दुआ कबूल नही करता, और वो सिवा, जब याद आए तब उस तुलजाभवानी को पूजता है और उसे वो एक रात में मिल भी जाती है. उसकी दुवा तो कबूल करती भी है और उसे तोहफे भी देती है.
महाराज : अफवा तशी गनिमी काव्याचा मोठा तीरच. एकदा का कुणाच्या कानात घुसला कि न वाजता गावभर दवंडी पिटती. सिवा गेला. हि एकच अफवा आहे का ? मुघल आणि परप्रांतीयांना चकवा द्यायला आधी हि एक अफवा पसरवलेलीच कि, सिवाजीला देवी तुळजाभवानी प्रसन्न आहे. ती सिवाला रात्री बे रात्री प्रतापगडावर भेटते. तलवारी देते. शत्रूला हरवायचा सल्ला देते. शत्रूची ठिकाण सांगते. आणि बरच काही. मुस्लिमांचा मौलाना जेवढा त्यांच्या अल्लाहला ओळखत नाही तितका हा सिवा त्याच्या देवीला ओळखतो. युरोपची तलवार साताऱ्याला प्रतापगडावर आणली. आणि अफवा पसरवली महाराजांना देवी प्रसन्न झाली.   नेहमी गा-फी-ल होतो औरंगजेब पण बेसावध नाही. आमच्या अचूक हालचाली टिपून आमची गळचेपी करायची संधी एक काही तो सोडत नाही. बादशाह असलेला दिल्लीच्या तख्ताचा राजा. सबंध भारत राष्ट्र ज्याला घाबरते ज्याला बघून बिथरते जायचा उठता-बसता-झोपता विचार करते. तो बादशाह प्रत्येक प्रहर न प्रहर विचार करतो पुण्याच्या गावतल्या एका राजाचा. धडकी आहे त्याच्या मनात मराठ्यांबद्दल. आणि कुठेतरी शंका ही आहे त्याला आपल्या होणाऱ्या आकस्मित मृत्यूची.
औरंगजेब : त्या सिवाला मारूनच मला आयुष्याची शांतता मिळणार आहे. हे आयुष्य सबंध भारतावर मला राज्य करून आणि खुदाच्या सेवेत घालवून संपवायचं आहे. पण आत्ता ह्यातल दोन्ही होत नाहीये. या आसनावर बसतो तर माझे बुड स्वस्त राहत नाही. एकसारखं हे आसन थरकापत असलेल जाणवत. का माहित अस का होत ?  का माझे विचार हा मला असला अनुभव देतात ? आणि माझी नमाज ? खाली झुकताना अस वाटत कि मागून मानगुटीवर तलवारीचा वार होईल सिवाच्या. पण तो मागून वार करणाऱ्यातला नाही. पण मग अस हि वाटत कि जेव्हा जमिनीला टेकवलेल डोक वर घेऊ तेव्हा पुढे तो उभा असेल तर ? तो कुठे हि आहे. पण मला माहित नाही तिथ आहे.
महाराज : माहित नाही माझ हे स्वराज्य कितवर जाईल. पण एक मात्र नक्की मी असलो नसलो तरी हि माझी रयत नक्कीच हे राज्य जगवत राहील. जो मराठी बोलतो किंवा ज्याला मराठी येत असे हे मराठा मावळे भारताला महानराष्ट्र बनवतील. आणि मी इतक्यात कुठे हि जाणार नाही. काहीतरी माझ्या हातून मोठ होण्याचा हेतू आई जगदंबेचा आहे. आणि त्याला टाळण म्हणजे देवीचा कोप. आणि देवी देवतांच्या भक्तीपेक्षा मला इथल्या प्रजेच्या डोळ्यात दिसणार दुखः सुखात बदलून त्याचं स्वप्न सत्यात आणायचं आहे.
मावळा : महाराज मानल तुम्हाला. या जगात तुमच्यासारखा कोणी राजा नाही. आणि पुन्यांदा होणार बी नाही.
महाराज : मी मोठा नाही. शत्रून मोठ मानल मला. मी तर तेव्हा हि सिवा होतो आणि आज हि सिवाच आहे. बस फक्त वयासोबत आदर वाढला आणि सिवाचा सिवाजी ( शिवाजी ) झाला. 


raje marataha muk morcha hot news treanding marataha bhagava
( image by google )
भाग पहिला : प्रतिक्रिया. ( अ )

मावळा : महाराज आत येऊ ?
महाराज : हा.
मावळा : हे बघा तुम्ही सांगितली तशीच कापड आणलीत.
महाराज : अगदी खरे. आता पेहराव करणे बाकी. सायंकाळच्या प्रहराला किल्ला डोक्यावर करू. सोबतीला तुम्ही असालच आणि आणि तीन तलवारबाजीत निपुण असलेले मावळे घ्या. दगाफटका वेळी अकेले नको. पण हो , कुठे हि वाच्यता नको.
मावळा : नाही महाराज. महाराज एक विचारू ?
महाराज : हं..?
मावळा : तुम्ही इतके मोठे राजे. दिसायला पण अगदी तसेच सुंदर. आणि मग पेहराव करताना हा असा साधा का ?
महाराज : कुणी बी करल असा कुणबी पेहराव. लवकर लक्षात येत नाही शत्रूच्या आणि आपल्यातल्या लोकांना.
महाराजांनी मावळ्याला आज्ञा दिली. नुस्त त्यांनी माग वळून बघितल आणि वारा यावा आणि गवताची कांडी अगदी आदबीन झुकावी तसच काहीस झाल, मावळा खाली झुकला आणि त्याने महाराजांना मनातून नाही आपल्या स्वतःच्या आत्म्याला स्मरून मुजरा केला. इतर वेळी किल्ला खाली करताना महाराज पालखीचा उपयोग करायचे. पण आत्ता ते खाली जाणार हे जग जाहीर नव्हत. गुप्त होत. आणि म्हणून आज ते स्वतः आणि एक खात्रीचा मावळा दोघ किल्ला खाली करायला लागले. तीन मावळे बरच अंतर ठेवून कुणाला कळणार नाही अस माग चालत होते. गरज पडलीच तर चित्त्याच्या वेगाला ही मागे टाकतील असा त्यांचा वेग होता.
किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत चालत चालत येऊन मग महाराज आणि तो मावळा घोड्यावरून गावाच्या वेशीला उतरले. कुणी आसपास नाही न याची खात्री करून मग त्यांनी चालन सुरु केल. घोडे त्या तीन मावळ्यांच्या करवी जंगलात आडबाजूला नेण्यात आले.
महाराजांनी फक्त पेहराव नव्हता केला. तर लहानपणापासून बघितलेला शेतकरी स्वतःत उतरवलेला. म्हणजे जर का त्यांना रोज बघणारा व्यक्ती जरी त्यांच्या डोळ्यातडोळे घालून बघत बसला तर तो हि चकवा खाईल इतक्या खोलवर त्या व्यक्तीरेखेत महाराज बुडाले होते. त्याचं चालन अगदी शेतकऱ्यासारख. थकलेल थोड थोड अंतर कापत पावलं टाकल्यासारख. आणि महाराजांना एक माणूस शेतात उभा दिसला. महाराज आणि मावळा त्याच्या जवळ गेले.
शेतकरी : कोण पैजे ?
मावळा : काय नाही इथून चाललोय सहजच.
शेतकरी : बर बर. या वक्ताला आमच्यासारखे इथ फिरतात म्हणून म्हंटल.
मावळा : असस.. ?
शेतकरी : बर कोणत्या गावचे तुम्ही ? भाषा तर इथली वाटत नाही,
मावळा : आम्ही पण गावचेच आहोत.
शेतकरी : कोणत ?
मावळा : पुणे.
शेतकरी : काय भाग्यवंत आहात.
मावळा : का हो ?
शेतकरी : काय म्हणून काय विचारता, माझ्या सिवाजी राजाच्या गावात जन्माला आलात. लय मोठ पुण्य केल असणार बघा तुम्ही.
मावळा : हा... केल तर आहेच पुण्य. ( महाराजांकडे त्या मावळ्याने बघितल. अभिमानान ऊर भरून आल आणि डोळ्यात पाणी सुद्धा. डोळे चमकले. आणि पुन्हा त्या शेतकऱ्याकडे बघत ) म्हणून तर महाराजांच्या गावात जन्माला आलो. त्यांना बघायचं भाग्य मिळाल.
शेतकरी : काय ? तुम्ही राजांना बघितलत ?
महाराज : का तुम्ही नाही बघितल सिवाजी महाराजांना ?
शेतकरी : नाही. ते इकड कधी येतात न कधी जातात काही पण कळत नाही. आणि कळत तेव्हा त्यांच्या घोड्यांच्या पाऊल खुणा राहतात फक्त माग.
मावळा : मग तुम्हाला माहितच नाही का ? महाराज कसे दिसतात ?
शेतकरी : नाही माहित. पण एक सांगू, गावातल कोण कधी गेल तिकड महाराजांकड तर सांगत्यात त्याचं वर्णन. पण महाराज कसे असतील अस जर का कुणी मला विचारल तर मी एकच सांगीन, कि महाराज देवासारखे आहेत.
मावळा : ( महाराजांकडे अभिमानाने नजर टाकून पुन्हा शेतकऱ्याकडे बघत ) देव ? कि देवमाणूस ?
शेतकरी : नाही. देवच. महाराज माणूस नाहीत आमच्यासाठी. ते देवच आहेत. आज ते इथ नसले तरी त्यांच्या पासून कोसो दूर लांब असून पण आम्ही आमच्याच शेतातल धान्य घरात शिजवून खातोय. त्यांची कृपा आहे ती.
मावळा : कधी भेटायची इच्छा नाही होत महाराजांना ?
शेतकरी : खुप खूप होते. अस शेतात स्वातंत्र्य मिळाल्यासारख वावरत असतो तेव्हा महाराजांची आठवण येते. माझी माती आणि महाराज या दोनच गोष्टींनी माझ आयुष्य एक एक दिवस सरत चाललंय ते ही सुखान. पण कस आहे ना, मी म्हणालो तस महाराज आमच्यासाठी देव आहेत. आणि देव आपल्याला भेटतो का कधी ? सांगा ?
महाराज आणि मावळा एकदम : नाही.
शेतकरी : हा म्हणूनच तो दिसत नाही. भेटत नाही. तो कसा आहे हे हि आपल्याला माहित नाही. तरीपण तो आहे. त्याच आपल्यावर लक्ष आहे आणि म्हणून आपली त्याच्यावर श्रद्धा रोजे-रोज वाढत जाते. तसच माझ पण आहे. मला महाराज भेटले नाहीत पण त्यांना भेटायची उर्मी मला त्यांच्याबद्दल आदर वाढवत नेते. आणि मला भेटायचं पण नाही त्यांना.
मावळा : का ?
शेतकरी : कारण महाराज मला भेटले तर माझी श्रद्धा कमी होईल.
मावळा : मग अपेक्षा काय आहे तुमची महाराजांकडून ?
शेतकरी : त्यांनी फक्त एकदा माझ नाव त्यांच्या तोंडून घ्याव इतकीच माफक अपेक्षा आहे.
महाराज : नाव काय आहे तुझ ?
शेतकरी : कोंडीबा.
महाराज : कोंडीबा.
मावळा : कस वाटल ?
शेतकरी : काय ?
मावळा : महाराजांनी तुझ नाव घेतल.
शेतकरी : म्हणजे ?
आणि महाराजांनी त्याच्याकडे बघितल. आणि तो शेतकरी त्यांच्या पायाशी जाणार तोच महाराजांनी पाया पडण्यास नकार दिला. शेतकरी डोळ्यातल पाणी अडवून उभा होता. कारण, ज्या दोन गोष्टींवर तो जगत होता त्या दोन्ही गोष्टींचा आज संगम झाला होता. त्याची माती आणि महाराज एकाच वेळेला या ठिकाणी होते.....

shivaji maharaj
( image by google )

भाग दूसरा : संभाषण ( आ )

महाराज : संभूबाळ, काही गोष्टी तुम्ही वाढत्या वयानुसार शिकून घ्यालच पण काही गोष्टी वडिलांच्या तोंडून ऐकल्यातर दिक्षा घेतल्यासारखी होईल. संभूबाळ, राज्य चालवायच म्हणजे माणसांचा संबंध आला. मग ते आपले असो किंवा परके-शत्रू. आपल काम साधून घ्यायला जो तो गोड बोलतो आणि पाठीत खंजीर घुपसतो. गोड बोलण्याला बळी कधी पडू नका. या उलट तुम्ही गोड बलून तुमची सर्वांना भुरळ पाडा. विश्वास म्हणजे नाग. एखाद्या इसमावर विश्वास ठेवण म्हणजे नागाच्या शेपटीला धरण. जेवढा विश्वास जास्त तितकीच त्या शेपटावरची पकड घट्ट. पण जर कुठे कृतीत गफलत झालीच, तर घातपात अटळ आणि घातपात म्हणजेच विश्वासघात. नागाच्या शेपटीला धरल तरी तोंड त्याच मुक्त असतच. डसनारच तो. त्यामुळे सावध रहा हमेशा. विश्वास जास्त कुणावर ठेवणे नाही म्हणजे कुणाला जवळच करणे नाही असे नाही. माणूस आहोत माणसेच हाताशी धरा. पण कुणाला खांद्यावर चढू देऊ नका.
( सं ) महाराज : होय. पण आबासाहेब, तुम्ही प्रत्येकावर विश्वास ठेवता. तुम्हाला कुणाचा राग किंवा तिटकारा वाटत नाही. पण भीती नाही वाटत कि कुणी विश्वास घात करेल ?
महाराज : हे बघा, विश्वास जिथ, तिथ विश्वास घात. जस कि चंद्र तिथ सूर्य, नदी तिथ समुद्र, जमीन तिथ आकाश अगदी तसच, जिथ विश्वास तिथच विश्वास घात. असा ना तसा घात हा होणारच. पण बोकडाला भीती दाखवून त्याची कत्तल केली तर त्याच मांस माणसाला पचेल का बरे ? त्याला अंजारून गोंजारून प्रेम माया दाखवूनच मग त्याला कापाव लागत. त्याला जर सुट दिली तर ते बोकड मालकालाच धडक मारून कपाळमोक्ष करेल. माणसावर मी विश्वास ठेवतो. त्यांचा माझ्यावर असतो. आणि असेलच कुणी हरामखोर, तर तो मला फसवण्याची तरकीब शोधत राहील, आणि मी जेव्हा माणसावर कोणत्या विश्वास ठेवतो तेव्हा त्याला जिंकण्याची तरकिब शोधत असतो. होत काय ? त्यांची हार माझी जीत. विश्वास या पुढे ही काही गोष्टी आहेत. त्यातलीच एक म्हणजे स्त्रीचा आदर. तिच्यासाठी काही करायला जमले नाही तर करू नका पण तिचा मात्र आदर करा. क्षत्रिय म्हणून जगताना माणसाचं रक्षण करणे आपल कर्तव्य नाही तर धर्म आहे. आणि माणसात फक्त पुरुष येत नाही स्त्री सुद्धा येते. तिचा आदर हवा.
( सं ) महाराज : शत्रूची स्त्री असली तरी ? आणि जर का शत्रूने स्त्रीचा वापर करून काही घातपात करण्याचा प्रयोग केला तर ? मग तरी हि मृत्यू समोर दिसून हि आदर करायचा ?
महाराज : हो निश्चितच. स्त्री महान ताकदवर आहे. जी स्त्री रावणाला जन्म देते, तीच स्त्री यादवांचा कृष्ण आणि घोरपड्यांचा राम पण जन्माला घालू शकते. आणि उपकार, स्त्री हि केलेल्या उपकराची जान ठेवून असते. तिच्यावर उपकार एकच करा तिचा कायम आदर करा. जान ती ठेवेल. आणि गरज पडलीच तर तुमच्यासाठी शत्रूपुढे स्वतःची जान पण ठेवेल.
( सं ) महाराज : मी कधीच कोणत्या स्त्रीचा अनादर करणार नाही आणि कुणाशी लगट करणार नाही.
महाराज : हीच अपेक्षा आहे. उद्या कुणी हिनावायला नको. सिवाजी महाराज स्वराज्य बनवण्यात सफल झाले पण मुलाला राजपुत्र बनवण्यात निष्फळ ठरले. तुम्हाला आदर्श व्हायचं आहे. पुढच्या कित्त्येक पिढ्यांसाठी. स्वराज्य जपायचे आहे. कुणाचे गुण एकट्या खोलीत सांगू नका. ते चार चौघात सांगा. कधी कुणाचे दोष चार चौघात नको एकट्या खोलीत सांगा. माणसाला जिंकण तस कठीणच. एका कडवट शब्दाने आणि छोट्या कृतीने माणूस तुटतो. पण तोच माणूस जोडायला कित्येक गोड शब्दांचा शिडकावा त्याच्यवर करावा लागतो. तुम्ही हे जाणत नाहीत. जाणते व्हाल तेव्हा समजेल. कुणाबद्दल मनात राग नको. द्वेष नको. असावा फक्त कळवळा.
( सं ) महाराज : पण मला वाटते, कुणी आपल्यावर प्रेम केले नाही तरी चालेल पण आपली कुणी कीव करता कामा नये. जिथ माणसाला आपली कीव येते तिथ आपण संपलो याची पावती मिळते.
महाराज : इथ प्रेम आहे म्हणून जग आहे. जग गोल आहे. पुढून गेलेला सरळ वारा फिरून पाठीला बोचतो. संभूबाळा, तसच आहे कि तुम्ही प्रेम द्या प्रेम मिळेल, रगेल पणा तुम्हाला खड्ड्यात खेचेल. तुमच्या जिभेवर प्रेम हव. पुढचा अपोआप शरण येतो. जीभ हि फक्त खर बोलण्यासाठी दिली नाही. ती खोट बोलण्यासाठी दिली आहे. खर बोलायला आख्ख शरीर पुरे आहे. ती समज पैदा करा. कुणाच्या शब्दाला भुलून नाही त्याच्या हालचालींवरून त्याच खर खोट ओळखा. बाकी समज तर आहेच तुम्हाला कदाचित आमच्याहून जास्त. सिवाजी, एक नाहीत दोन आहेत या स्वराज्यात. आणि तुम्हि ते सिद्ध कराल हि खात्री आहे. बाकी खाण्याची वेळ झाली. तुम्ही खाऊन घ्या.
( सं ) महाराज : आणि तुम्ही ?
महाराज : येतो तुम्ही पुढे चालते व्हा. आलोच.

संभाजी महाराज निघून गेले. खोलीतल्या खिडकीच्या पडद्याला धरून त्याचा पोत चाचपत महाराज विचारात गढून गेले. 


( image by google )
विष्णू-अवतारी

पुणे जेव्हा पहिल्यांदा महाराजंच्या हाती आल तेव्हा त्याचा कारभार सांभाळण ते हि इतक्याश्या वयात कठीणच होत. वय अवघ वर्ष बारा. एवढ्याश्या हातात धारदार तलवार शोभून दिसत हि असेल पण ती पेलवणार कशी याचा विचार कुणी केला नाही. आणि का करावा ? मालोजी, विठोजी, शहाजी हे जरी मुगलादिल सेनेचे गुलाम असले तरी ते वरच्या पदावर होते. पण तरीही मनात असलेली स्वातंत्र्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. जे मालोजी-विठोजी-शहाजीला जमले नाही ते शिवाजी महाराजांनी करावे अस खुद्ध श्री शंकराच्या मनात होत.
शहाजी राजेंच्या मनात विचार असतील साहजिकच खूप सारे विचार. आणि या विचारांचं प्रतिबिंब म्हणा किंवा हकीकत, पण शहाजी राजेंना एक स्वप्न पडल. त्यात स्वतः भगवान शंकर येऊन त्यांना म्हणाले कि, “तुझ्या मुलाला जास्त दिवस तुझ्या जवळ ठेवू नकोस. त्याला पुण्यास पाठव. तुझ्या मनीच स्वप्न तो पुरे करेल. यवनांचा फक्त तोच नाश करेल.” आणि याच स्वप्नाच्या आधारावर त्यांनी शिवाजी राजेंना वयाच्या बाराव्या वर्षी पुण्यास पुणे भाग सांभाळण्यास पाठवले.
शंकराचं हे अस स्वप्नात येण आणि सल्ले देण शहाजी राजेंसाठी नेहमीची गोष्ट होती. शिवाजी महाराज एक महान राजा एक महान पुरुष पण मागच्या भागात सांगितल तस देवाचा अवतार होते. लोक त्यांना महाराज कमी देव जास्त मानायचे. आणि मानायचं तरी का नाही. कामच अस केलेलं त्यांनी कि देवाला पण त्यांना देव मानव लागल असेल.

मुळात भारतात जरी पाच सहा सत्ता मोठ्याने वावरत असल्या तरी. सगळ्या मुसलमानी सत्ता होत्या. बाकी इंग्रज आणि डच पोर्तुगीज अशा. आणि यात पिळवटला जायचा मराठी समाज. मराठी म्हणजे मराठा नव्हे. आणि जरी शिवा काशीद , बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, सारखे मावळे अजब लढवय्ये असले तरी स्वतंत्रपणे या सत्तांना तोंड देण त्यांच्या स्वप्नात हि नव्हत. पण मराठा फार पूर्वीपासूनच आक्रमक आहे. मराठा म्हणजे जात नाही तर शत्रूंचा कर्दनकाळ आहे. मराठा क्षत्रिय आहे. आणि स्वातंत्र्य बघण्याची धमक फक्त याच जातीत आहे. आणि म्हणून या जातीतलेच लोक फार पूर्वीपासून इतिहास रचताना आपल्यास दिसतात.

आणि म्हणून मालोजी, शहाजी यांना जरी बादशहा, पातशहा यांची गुलामगिरी सोडून एकट्याने जरी लढणे जमत नसले तरी त्यांच्या स्वप्नांच बीज त्यांनी एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे देत शिवाजी महाराजांपर्यंत आणून थांबवले. संभाजी हे जरी शिवाजी महाराजांचे मोठे बंधू असले तरी शहाजी आणि जिजाबाई याचं विशेष प्रेम हे शिवाजी महाराजांनाच मिळाल.
या मुसलमानी सत्तांच्यामध्ये फक्त मराठी माणूस पिळवटला गेला नाही तर स्वतः खुद्द पृथ्वीसुद्धा त्रासून गेली. आणि या त्रासाला कंटाळून पृथ्वी एकदा श्री ब्रम्हदेवाकडे गेली. पृथ्वीला अस त्रासलेल बघून त्यांनी तिला त्रासाच कारण विचारल. तिने सांगितल. पृथ्वीवर यवनांचा ( शत्रू ) माज वाढला आहे. यात पृथ्वीची स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. आणि ती स्थिती बदलण्यास मला तुमची गरज आहे. ब्रम्हदेवाने तीच ऐकून घेऊन तिला सल्ला दिला यातून तुला फक्त श्री भगवान विष्णू वाचवू शकतील. पृथ्वीने त्याचं म्हणन मानल. आणि दोघ वैकुंठास गेले. श्री विष्णू अगदी आरामात निजले असताना तिथे ब्रम्हदेव आणि पृथ्वीला बघून श्री विष्णूने प्रश्न केला कि काय झाले ? तेव्हा ब्रम्हदेवाने विष्णूला सर्व हकीकत सांगितली. आणि ती ऐकून ब्रम्हदेवाला श्री विष्णूने शब्द दिला कि हे काम फक्त श्री भगवान शंकर करू शकतील. मग श्री विष्णू भगवान शंकरांकडे कैलासावर गेले. तिथे जाऊन त्यांनी श्री शंकरांना सर्व सांगितले. आणि सगळ ऐकून घेऊन भगवान शंकरांनी विष्णूला भगवतगीतेची आठवण करून दिली. कृष्णाने अर्जुनाला सांगितल होत कि , “जेव्हा जेव्हा जगामध्ये पाप वाढेल, राक्षसांचा माज वाढेल, धर्माचा नाश होऊ लागेल तेव्हा तेव्हा मी पृथ्वीवर एक नवीन अवतार घेऊन येईन. आणि नऊ अवतार झाले आहेत राहिला दहावा अवतार तो म्हणजे कल्की. आणि तो अवतार घायची वेळ आता समीप आली आहे.” विष्णूने भगवान शंकराचं म्हणन मान्य केल. शंकरांनी सांगितल तुमच्या या कार्यास श्री भवानी देवी आपणास मदत करेल. आणि म्हणूनच पुढे तुळजाभवानी देवी शिवाजी महाराजांना दृष्टांत देत असत. श्री विष्णू माघारी येऊन ब्रम्हदेव आणि पृथ्वीला सांगतात कि , पृथ्वीचा त्रास कमी करण्यास आता आम्हीच अवतार घेत आहोत. पुण्याच्या शहाजी आणि जिजाई भोसलेच्या पोटी. आणि मग

“संवत १६८६ फाल्गुन वदी ३ शके उ. घटी ३०|९ जन्म: | र १०|२३ छ ४|२९ “
-ला विष्णू अवतारी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म सूर्यास्तानंतर झाला.
आणि म्हणूनच कि काय कलियुग सुरु होऊन कित्येक साल झाले तरी पुन्हा शेवटच्या बलराम    अवतारानंतर दैवी असा अवतार झालाच नाही. आणि तसे बघायला गेले तर शिवाजी जैसा राजा पुन्हा झाला ही नाही. काहीतरी यात सत्यता मानायल हवी. आणि आपण निट दशावतार पहिले तर दहावा अवतार कल्की, घोड्यावर बसलेल्या राजासारखा आहे. आणि तो राजा म्हणजे ?  


विष्णू दशावतार : मस्यावतार. विश्वकर्मा. वराह अवतार. नृसिंह अवतार. वामन अवतार. रामावतार. कृष्णावतार. परशुराम. बलराम अवतार. कल्की. इ.   

( image by google )


 पर-आक्रम.
कर्नाटकसारख्या मोठ्या प्रदेशातून येऊन पुण्यासारख्या थोडक्या प्रदेशाला उध्वस्त करणे अफजुल खानाला अशक्य नव्हत. खुद्द बादशाहने ठेवलेला विश्वास आणि स्वतःहून घेतलेलं पदरी काम अफजुल खानाला पूर करायचं होत. शिवाजी महाराजांना जिवंत पकडायचं होत. त्या आधी पुण्यात उधळा-उधळी करून शिवाजी महाराजांना आपली ताकद दाखवून द्यायचं असा विचार अफजुल खानाला आला. त्याने तस केल. पुण्यात झालेल्या पर-आक्रमणाचा संदेश महाराजांना पोचला. दहा हजार सैन्यासोबत आलेला अफजुल खान. विनाकारण रयतेला त्रास देत होता. त्याच्याशी सरळ मैदानावर दोन हात करण अवघड नव्हत पण तितक सोप्प हि नव्हत. कारण झाला तरी एकाचाच विजय आणि एकाचाच घात होणार होता.
घमेंडखोर अफजुल खानाने वकीला करवी पत्र पाठवल महाराजांना कि, “हे राजश्री सिवाजी, माझ्या म्हणण्यानुसार तू तुझे मी मागीन ते किल्ले आणि जावळीचा ( वाई ) प्रांत माझ्या हवाली कर. बदल्यात मी तुला जिवंत सोडेन आणि बादशाह करवी बरच सैन्य आणि बादशाहला सांगून तुला वरची पदवी देईन.” पत्रातला आशय नक्कीच घमेंडीतला होता. पण म्हणून उत्तर हि घमेंडीत देण योग्य नव्हत. महाराजांनी त्याला उत्तर पाठवल कि, “जावळीस ( वाई ) याल तर बरे होईल, आपण मागत आहात ते किल्ले आणि जावळी मी देतो. आपण याल तर माझी तलवार हि मी आपनांपुढे ठेवीन”
महाराजांच्या या उत्तराने अफजुल खान चकित होण्याऐवजी खुश झाला. त्याने केलेला प्रयत्न सफल झाला. त्याने रयतेला त्रास दिला. त्याने दहा हजारांच सैन्य आणल आणि शिवाजी महाराज त्याला भ्यायले. ( असा त्याचा तरी समज झाला होता ) त्याच्या वकिलाने त्याला सल्ला दिला होता कि आपण शिवाजीला इकडे भेटायला बोलवावे. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत अफजुल खान जावळीला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटण मंजूर करतो. ( यात कुठे हि महाराजांनी आजारी आहोत आम्हाला प्रवास होत नाही किंवा होणार नाही म्हणून तुम्ही इथे यावे असा कुठला हि उल्लेख असलेल पत्र खानाला पाठवलेल नाही )
तर मग खान जावळीकडे निघाला. वाटेत लुटमार, देवळांची मोडतोड करत तो वाईस पोचला. दहा हजार सैन्याची फौज इकड त्याच्या सोबत तळ ठोकून होती वर काही चाकण, शिरवळ, पुणे प्रांतात होती. महाराजांचा चौकशीचा खलिता आला. त्याला अफजुल खानाने उत्तर दिल. खलीत्यातून तर पूर्ण घाबरलेले शिवाजी महाराज खानाला अगदी डोळ्यांसमोर स्पष्ट दिसत होते. त्यात तो आणखीनच आनंदी होत होता. भेटीचा दिवस जवळ आला. आणि कलमांचा एक खलिता खानकडे फिरला. ज्यात अशी कलम होती कि,
दोघांनी सशस्त्र यावे.
खानाने पालखीतून येताना सोबत दोन-तीनच सेवक सोबत आणावेत.
दोघांच्या रक्षणासाठी दहा-दहा सैनिकांनी बाणांच्या टप्प्यावर मागे उभे राहावे.
 आणि अशा या सगळ्या स्थितीत दोघांनी ( अफजुल खान – शिवाजी महाराज ) गुप्त खलबत करावीत. इ.
खानाने कलमांना मंजुरी दिली. ठरल्याप्रमाणे खान निघाला तसा त्याच्या तळात असलेल्या निशस्त्र सैन्याला महाराजांच्या जंगलात लपलेला सैनिकांनी सळो-कि-पळो करून सोडल. अफजुल खान वर जात असताना आखणी करत होता. खरतर बादशाहने त्याला महाराजांना जिवंत पकडून आणण्याच काम सोपवलेल. पण मध्येच त्याच्या डोक्यात तह करण्याचा विचार आला. तह झाला तर प्रदेश हा जावळीचा आपल्याला मिळेल आणि आपण इथून दूरवर सत्ता चालवू. कारण सह्याद्रीच्या रांगेला मध्येच अडवणारा हा प्रदेश होता. त्यामुळे त्याला या प्रदेशाचा फायदा होणार होता. आणि वरीसवर शिवाजी महाराज हि त्या मिळणार होते ( स्वप्नात ).
त्याने ठेवलेला तहाचा प्रस्ताव महाराज नाकारतील अस त्याला वाटलेलं पण महाराज भिऊन त्याला होकार देऊन बसले. या अशा सगळ्या गोष्टीत तो ठरवतो कि ठरल्याप्रमाणे शिवाजीला भेटायचं. पण त्याचा विचार होता कि, मला भ्यायलेला शिवाजी माझ्या अंगाशी भिडेल तेव्हा माझा डाव पक्का पडेल का ? शिवाजीला जवळ घेऊन गुप्तपणे आणलेली कट्यार त्याच्या पोटात घुसडून त्याला अर्धमेलं करायचा कट तो रचवत चालत होता. आणि या विचारात तो ठिकाणावर पोचला.
समोर महाराज आणि त्यांचे तीन चार मावळे होते. त्यांच्या मागे बाणाच्या टप्प्यात दहा सैनिक होते. खान महाराजांना बघत होता. आणि शिवाजीने जवळ यायला हव म्हणून त्याने त्याची तलवार त्याच्या नोकराला जवळ दिली. दोघ भेटले. काही बोलण्या आत दोघांनी गळाभेट घेतली तोच खानाने महाराजांना डाव्या हाताच्या अग्रबाहूने घट्ट मानेला धरून छातीशी पकडल. उजव्या हाताने आणलेली गुप्त कट्यार बाहेर काढली. आणि पहिला वार महाराजांच्या पाठीवर केला. आवाज झाला अंगरखा फाटला. आत चिलखत होत. पहिला वार वाया गेला खान गडबडला नाही. त्याने अजून घट्ट ताकदीने महाराजांची मान आवळून धरली यात कुठे हि दोघांच्या तोंडून कसला हि आवाज नव्हता. आणि कलमांनुसार सगळे सैनिक वकील बाहेर उभे होते. कुणाला काही पत्ता नव्हता आत काय सुरु आहे.

खानाने दुसरा वार केला थेट महाराजांच्या पोटावर. महाराजांनी बड्या शिताफीन पोट आत ओडून धरल. बहुदा श्वास रोखून. आणि जरा कंबर हलवून तो वार हुकवला. आणि त्या हालचालीत महाराजंच डोक खानच्या हातून निसटल. त्या सरशी महाराजांनी एक क्षणहि न थांबता काही न बघता. तलवार थेट खानच्या पोटात घुपसली ती मागून पाठीतून बाहेर आली. ज्या ताकदीने आत घातली त्याच ताकदीन तलवार बाहेर काढताना त्यासोबत खानाची अर्धवट आतडी बाहेर आली. आणि तो ओरडला. नजीकचे वकील सरदार आत शिरले. आणि तेवढ्यात महाराजंच्या सैनिकांनी त्यांना पडकल. बाकीचे सैनिक पळून गेले. खानाच्या एका सैनिकाने महाराजांवर पुढून वार केला महाराजांनी डाव्या हातात असलेल्या रक्ताने माखलेल्या तलवारीने त्या सैनिकाचा वार अडवला. आणि उजव्या हातातल्या पट्ट्याने खानच्या डोक्यावर जोरात वार केला. अफजुल खानच घमेंडखोर डोक झटक्यात दोन तुकड्यात वाटल गेल. त्या सैनिकाला दुसऱ्या मावळ्याने पकडल. महाराज माग वळताच बडा सय्यद ( सय्यद बंडा नाही ) आला आणि महाराजांना वाचवायला मध्ये जीवा महाले मध्ये आला. आणि पुरा झाला हा खेळ आणि जिजाबाईंनी घेतलेली शपथ. कारण त्यांच्या मोठ्या मुलाला मारणारा हाच तो अफजुल खान होता. शिव-वर्णन ( अ )


शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा जितकी शोधावी तितकी वेगळी भासत राहते. साडे तीनशे वर्ष होऊन हि या राजाबद्दलची चिकित्सा कमी न होता वाढतच चाललेली आहे. शोधाव तर काय ? जगात जितका वारा आहे तितका शिवाजी महाराजांचा पराक्रम होऊन गेलेला आहे. त्यात शोधेल तितका सापडेल असा इतिहास आहे. महाराजांची ते हयात असताना आणि नसताना अशा दोन्ही काळात त्यांची चित्रे काढण्यात आली. जी काही तंजावर शैलीत आणि मुघल शैलीत काढण्यात आली. त्या आधी जरी हुबेहूब चित्रे काढण्याची कला जन्म घेऊन  दीडशे वर्ष आधी आली असली तरी ती कला भारतात आत्ता अलीकडे दहा एक वर्ष आधी समृद्ध झाली आहे. लिओनार्डो द विन्सी, मायकल अन्जेलो सारख्या चित्रकारांनी महाराज जन्माच्या आधी दीडशे वर्ष आधी चित्रकला समृद्ध केली. पण महाराजांची चित्रे काढताना मात्र ती द्विमितीय काढण्यात आली. मीर महंमदने काढलेलं शिवाजी महाराजांचं अश्वारूढ चित्र प्रसिद्ध आहे. बाहेरच्या देशात असलेल महाराजांचं एका बाजूला चेहरा असलेल चित्र भारत सरकार मान्य आहे. त्यावरून एक अंदाज माहित आहे कि, महाराजंची उंची ५.५ फुट इतकीच आहे. महाराज जिरेटोप घालत. गळ्यात कवड्याची माळ. हातात सोन्याचे कंडे. अंगात अंगरखा. पायजमा. राजेशाही पायात मोजडी. कमरेच्या पट्ट्यात खोचलेली कट्यार. आणि बाजूला अडकवलेली तलवार. कपाळाला लावलेली फिकटशी चंद्रकोर. नाक अगदी सरळ. म्हणजे कपाळातून बाहेर येऊन थेट ओठांच्या वर थांबलेलं. मिशी अगदी तिरकस आणि त्याला धनुष्यबाणासारखा पीळ. हनुवटीला टोकदार दाढी. आणि भले मोठे पण अगदी रेखीव गोलाकार कल्ले. शांत गंभीर डोळे आणि एका स्त्री सारखे कोरीव भुवया. तेही त्रिकोणी. अशी काहीशी महाराजांची प्रतिमा त्यांची चित्र बघून डोळ्यांसमोर येते. आणि आपल्याला माहित आहे. पण सध्या महाराजांच्या तयार पुतळ्यांकडे बघितल असता महाराजांचे चेहरे हे म्हातारे आणि अगदी मलून झालेले दिसतात. वाईट वाटत. कुणा कोणत्या लोकांचे पुतळे अगदी देखणे आणि चेहऱ्यावर काही न मोठ काम करता आलेल तेज बघून उगाच मनातून रडतो मी महाराजांकडे बघून. बर आता चित्र झाल. पण काही तेव्हाच्या लोकांनी महाराजांचे वर्णने लिहून ठेवले आहेत.
जगातलं महाराजांचं पाहिलं चरित्र हे मराठी नाहीतर पोर्तुगीज भाषेत १६९५ ला म्हणजे महाराजांच्या महापरिनिर्वाणानंतर पंधरा वर्षांनी प्रसिद्ध झाल. कोस्मी द गार्द हा त्या चरित्राचा लेखक होता. त्याने स्वतः महाराजांना बघितलेलं होत. महाराज सुरतेच्या मोहिमेला असताना त्याने महाराजांना अगदी निरखून बघितलेलं होत. त्यातली त्याची एक नोंद आहे कि, शिवाजी महाराज सुरतेत असताना पायी शत्रुत फिरत. एका बाजूला तलावर घेऊन फिरणारे महाराज एका हातात दौत घेऊन फिरत. आणि एखादी अशी नोंद किंवा गोष्ट जी ते विसरून जाणार असतील अशी नोंद ते तलवारीवर हात रेलून दौतीने काहीतरी तळहातावर लिहित असत. आणि हे स्वतः कोस्मी द गार्दने बघितलेलं आहे. त्याच्या बघण्यातून महाराज हे दिसायला मध्यम उंचीचे होते. गोरे होते. विशेषतः त्यांचे डोळे पाणीदार मोठे होते. १६६६ साली थेव्ह्नाने लिहिलेली महाराजांची माहिती अशी कि, महाराज बुटके आणि पिवळसर रंगाचे गोरे होते. ते दिवसातून एकदाच जेवण करायचे तरीही त्यांची तब्येत उत्तम आहे. त्याच साली परकलदासने लिहून ठेवले आहे कि, पहिल्यांदा महाराजांना बघितले तर ते कमी उंचीचे वाटतात. तब्येतीने सडपातळ वाटतात. दिसायला गोरे आहेत ते. पण तरीही कुणीही चटकन ओळखू शकतो कि ते राजे आहेत. महाराजांना पाहिल्याबरोबर हा माणूस हिम्मतवान व मर्दाना आहे अस समजत. महाराजांना दाढी आहे. या नंतर महत्वाचा लिहिणारा आणि सर्वाना माहित असलेला, राज्याभिषेकाला रायगडावर भेट देणारा परप्रांतीय हेन्री ऑक्झेंडन याने महाराजांना तेव्हा नजराणा दिला होता. तेव्हा महाराजांना समोर बघून त्याने अस लिहील होत कि, महाराजांचा चेहरा सुंदर व पाणीदार आहे. इतर मराठ्यांच्या मानाने त्यांचा रंग गोरा आहे. डोळे तीक्ष्ण, लांब नाक, बाकदार आणि जरासे खाली आलेले. दाढी नीट कापून हनुवटी खाली टोकदार केलेली. मिशी बारीक विरळ आहे.
एवढे जरी पुरावे वाचले तरी महाराजांची एक छबी डोळ्यांसमोर येते. महाराजंची सध्या असलेली सर्व चित्रे हि द्विमितीय आणि एकाबाजूने काढलेली आहेत. ज्यात महाराजांचं तोंड समोर नाही. एक आत्ता इंग्लंड म्युझिअम मध्ये मिळालेलं महाराजांचं चित्र समोरून काढलेलं आणि अगदी हुबेहूब त्रिमितीय आहे. पण त्यातले वर्णन आणि लेखी वर्णन पडताळून इतिहासकार आणि संशोधनकार यांनी अभ्यास करून मान्य केल कि ते चित्र शिवाजी महाराजांचंच आहे. आणि नेहमीसारख ते चित्र भारत सरकारने मिळवण्यासाठी काही ठोस प्रयत्न केला नाही. ते चित्र तिकडेच आहे. त्याची प्रत म्हणून इकडच्या चित्रकारांकडून त्याची नक्कल करून भारतात ते नक्कल चित्र आणल गेल आणि प्रसिद्ध करण्यात आल. मी इतिहासकार संशोधनकार नाही. मी लेखक हि नाही. पण कायम त्या चित्राकडे बघून मला त्यात शिवाजी महाराज नाही संभाजी महाराज दिसतात. शोध नक्की राहील मला खऱ्या चित्राचा. बाकी महाराजांना बघायला त्यांची मूर्ती किंवा चित्राची गरज नाही. शिवाजी महाराज कि जय म्हंटल तरी प्रत्येकजण शिवाजी महाराज होतो. अंगात आहेत महाराज. रक्तात आहेत महाराज. त्यांना बघायला चित्राची नाही त्यांचा विचार सत्यात वापरण्याची गरज आहे. 


          
   नकला बी अस्सल हाय.

“अरे रगात बी निघाल तरी भगवं येतय आणि तो फडकणारा ध्वज, त्याचा रंग बी भगवच असतय. तरी बी ह्यो हिरवा दुतोंडी मांडूळ वरून आन खालून स्वराज्यात घुसायचा प्रयत्न करतोय. मिळणार काय हाय त्याला हि भगवी माती पोखरून ?”
“जाऊन दे बा रामा. बिनविषारी मांडूळ ते किती बी आल तरी आपला नाग काय विष गिळून बसला हाय काय ? डसलच कि. अंगात मर्दानी वार फिरतय अस कस म्हणतो तू लेका ?”
“त्ये बी हायच म्हणा. पण मांडूळाच एक थोबाड चेचल तरी दुसर असतयच कि. नागाच तस नसतय ना. उगा धास्ती वाटती बग बाकी काय नाय.
चारी बाजूने गर्दी झालेली. हे बोलन ऐकायला. गावात सगळीकडे शुकशुकाट होता. ऊन खूप होत. म्हणजे अनवाणी कुणी चालल तर पायाची सालटच निघाली असती. इतक ऊन होत. अगदी गावातली चिल्लीपिल्ली ते अगदी बढे-बूढ़े गोळा झालेले. एका सावलीला.
“मग माना वर करून ताठ मानेन जगायचं कधी ? त्ये दिवस मिळणार कधी जगायला आपल्याला ? का असाच जीव मारून टाकायचा ? हा ? बोल कि आता ?
“आरर जी गोष्ट मिळत नाय ती वढून घ्याची असती बग. जमाना सफशेल खोटा आहे. मानली तर दुनिया छोटी नाय तर मग लयच मोठी हाय. मिळत नाय ना व आपल्याला आपला हक्क. मग जबरी वढून घ्याचा.”
“बास ठरल तर मग आता मान तव्हाच झुकवायची जवा आपण थेरड हु, तो वर खाली झुकायच नाय.”
“अंगा अस, आता बग कसा बोललास गड्या.”
“पण कोणीतरी पायजे का नको आपल्याला म्होरक्या ?”
“म्होरक्या तिथच हवा जिथ असे सेना. इथ आपण दोघच दिसतोय बाकी दुसर कोण बी ‘दि’सेना ?”
टाळ्यांचा कडकडाट झाला. छोटी मुल टाळ्या वाजत होती. मोठी माणस डोळ्यात स्वप्न जाग झाल्यासारखी हे बोलन ऐकत होती. ते बोलन स्वातंत्र्यावर होत. पण ते कोणा दोन व्यक्तींचं नव्हत तर एकटा माणूस दोन पात्र रंगवत होत. डोळ्यांची पापणी बंद होऊन परत उघडली तरी फरक तो काय दिसतो ? काहीच नाही. आणि झाला तरी तो लक्षात येत नाही. पण हा माणूस एका एका क्षणाला आपल रूप आणि आवाज दोन्ही बदलत होता. लोकांना समोरच सगळ घडत असलेल बघून सुध्दा स्वतः वर विश्वास बसत नव्हता.
त्या माणसाच आपल काही बाही बोलन सुरुच होत. तेवढ्यात कसली तरी चुळबुळ सुरु झाली त्या उभ्या गर्दीत. आत्ता पर्यंत गोलाकार गोळा झालेली गर्दी झटक्यात बाजूला झाली.
त्या माणसाच मात्र या गर्दीकड दुर्लक्षच होत. त्याच आपल बोलन सुरु होत. तेवढ्यात त्या माणसांच्या गर्दीत एक नवीन माणूस उभा राहिला. विस्कटलेला गर्दीचा गोलाकार पुन्हा आहे तसा झालाच नाही.
“पण संगतीला अजून असतील कोण तर एकेकाला पळवून पळवून मारायला सोप्प पडल. काय म्हणतोस ?”
“नागाला शिकव विष कस वकायच. काय तू पण लेका.”
“तस नाय रे पण असाव वाटतय कुणीतरी”
“आपणच आपला राजा. नको प्रजा नको त्यांना मरणाची सजा. कोय बोलतोस ?”
“अस बोलायला सोप्प. ऐकायला भारी वाटत पण तस करण मुश्कील हाय मुश्कील”
"बर बर चल आता इथच बोलत बसलो तर स्वराज्य पुढच्या जन्मी तयार व्हायचं”
त्या माणसाने एवढ बोलून माघारी वळायला गिरकी घेतली. आणि मागे बघून त्याचे डोळे मोठे झाले. त्या माणसांच्या गर्दीत सगळेच सारखे होते. पण एक कोण तरी जरा वेगळच दिसत होत. अगदी राजबिंडा. आणि त्या राजबिंड्याने डोळ्यानेच इशारा केला. तो माणूस त्यांच्या पुढे जाणार तोच त्याने त्या डोळ्यांना बघितल आणि तो आपली गती वाढवून पुढे गेला.
अंगात सोन-नाण घातलेली व्यक्ती साहजिकच साधारण नव्हती. म्हणून आपल्या पायरीला ओळखून तो जरा लांब आणि खाली मान करून थांबला.
“अगदी हुबेहूब नकला करता आपण. भावले मनाला. पण इतकीच कर्तबं येतात कि अजून काही ?”
“येत कि सरकार, दांडपट्टा येतो, तलवारबाजी येती.”
“शाब्बास. पण ती कर्तब नव्हे. या नकलांमध्ये दोनच पात्र जमतात काय ?”
“तस व्हे ? नाय. नाय. साधू, भिकारी, सरदार, फकीरबाबा संमद हुबेहूब उतरवतो. कोणी जाणता आला म्होर तरी बी ओळखणार नाय मला. इतकी खऱ्यान रंगवतो पात्र. आन नुस्ता वेश नाय बर का आवाज बी साफ बदलता येतोय.”
“म्हणजे कामाचे दिसताय.”
“व्ह्य नक्कीच. कामचा तर हाय मी पण काम नाय मला अजून. हे अस नकाला करत असतोय.”
हातातल सोन्याच कड काढून त्या राजबिंड्याने त्या माणसाला दिल. त्याने ते घेतल. एकदा मुजरा केल्या सारख खाली वाकून काहीतरी केल. आणि आता गर्दीत तो पर्यंत चुळबुळ सुरु झाली. आणि इतक्यात मागून आवाज आला “आपल सिवाजी महाराज हायत हे”
आणि त्या कड घेतलेल्या माणसाचे कान टवकारले गेले. त्या राजबिंड्याने मागे वळून बघितल. “सिवाजी महाराज बोलणारा पटकन खाली नजर करून राहिला. राजबिंडा पुढे बघतो आणि तेवढ्यात कड घेतलेला नकलाकार पुढे सरकतो.
“महाराज, किती हि मोठी शाबासकी हाय हि माझ्यासाठी. रोज हि पोरसोर, मोठे बघायला येतात नाटक माझ आणि कौतुक करता. आज चक्क तुमची उपस्थिती. काय बोलायचं कळना बी झालय.”
“बोलू नका आता करा.”
“म्हणजी ?”
“आमच्या सोबत काम करा. आम्हाला आनंद होईल”
“मला बी राज.”
“नाव काय आपल ?”
“बहिर्जी नाईक.. राज”
“बहिर्जी आमची उद्या भेट घ्या. तुम्हास तुमचे काम देण्यात येईल सोबत आपल्याला योग्य मानधन दिले जाईल. तुमचे सोबत तुमच्या आई वडिलांचे सारे ओझे आता आमच्या सोबत आहे. तुम्ही फक्त मन लाऊन काम करा. तुमची दुखः हलकी होणारच त्यात काही वाद नाही.”
“खूप उपकार झाले राज. कधी विसरु नाय शकणार. बगा.”
“तुमच हे नाटक आम्ही पण नाही विसरू शकणार. बहिर्जी”

छत्रपती शिवजी महाराज तिथून निघून गेले. त्या पाठोपाठ बहिर्जीच्या भोवती लोकांनी एकच गराडा घातला आणि त्याच कौतुक सुरु झाल. तापत्या उन्हात आता महाराजांच्या कौतुक भऱ्या शब्दांच वार बहिर्जी अंगभर वाहून नेत होता. सगळे घामाजलेले चेहरे आणि बहिर्जी ? एकटा सुखावलेला दिसत होता.  


    

उपभोगशून्य राजा.

कारकून आणि हुजरे आसपास खडे आहेत. बाहेर आभाळ भरून आलेले आहे. थंड वारा आहे पण दमट बैचेन आहे. रोजच्या खुल्या खिडक्यांचे पडदे आता बंद आहेत. सगळी काय ती जगाची शांती सारीच्या सारी एकाच खोलीत बंद झाली आहे. पृथ्वीची कंपण आतून जाणवत आहे. शरीर कापत आहे. थरथरत आहे. वरून नव्हे ते आतून. पृथ्वीचा कंप ही जमिनीवर नाही आतून होत आहे. ज्वालारस अगदी विझत चालला आहे जणू.
पशूंची घालमेल होत आहे. कुत्र्यांची व्हिवळनी सुरु आहेत. राजा सोबत राज्याचाही ऱ्हास होतो आहे असेच काहीसे वाटत आहे. सुरज किरण मेघांमागे दडले आहेत. चांदणे चंद्र यांचे येणे बहुदा क्वचितच आहे. हे रक्ताचे अतिसार होणे निमित्तच आहे. तरी त्या रोगाला किती दवा-दारू झाली. किती वैद्य हकीम झाले. प्रहर न प्रहर मात्रा घेऊन हि कोणत्या हि एका प्रहरी राजा ठीक झाला नाही. उलट आपले अंग टाकत राहिला.
चपळ हलके शरीर आता जड होण्यास सुरु झाले. शरीराने ठीक असून देखी मनाने वार्धक्य आले. ‘स्व’चे विचार सोडून प्रजा-कारकून-हुजरे-कुणबी यांचे विचार मनी येऊ लागले. त्या विचारांनी अजूनच मन खचत चालले होते. जवळी गरजेला पुत्र संभाजी हजर नाही. पुत्र राजाराम आहे पण तो थोरला नाही. मग ऐन वेळी हा शरीराचा वाढत जाणारा जडपणा आणि पुत्र संभाजीचे येणारे विचार पित्यास अजूनच अंथरून धरण्यास भाग पडत होते. चाळीस हजार होनांच्या महालावर आज एक क्रोड होन इतक्या किमतीच इतक राज्य उभारलेल. जवळीचे मोजके किल्ले असता आता तीनशेहून अधिक किल्ल्यांचा डौलारा आहे. तो कोणास वाटून देणे हा हि प्रश्न आहे.
पुत्र संभाजी थोरले पुत्र. त्यांस हा डोलारा देणे साहजिकच पित्याच्या मनात होते. पण पुत्र संभाजी जितका हुशार तितकाच डोक्याने तापट. कमावलेली गमावणार नाही. पण माणसांशी हि पित्याने जोडलेली दोर त्यांस जपता येणार नाही. लवकरच ती तुटेल हा विचार पित्यास आला. पुत्र राजाराम धाकटे पुत्र. वयाने लहान. ताजे लग्न झाले असून सध्या बालिशपणा अजून अंगी आहे. भोसल्यांचे रक्त अंगी असल्याने कमरेची तलवार कायम वेळेवरच बाहेर येते. राज्य सांभाळण्यास राजराम हि योग्य आहे.
पण पुत्र संभाजी आणि पुत्र राजाराम यांच्यात पुढे राज्याची वाटणी होऊ नये हि चिंता. अन्यथा अनर्थ घडेल. ब्राम्हण लोकांचे शाप लागतील. कुणबी लोकांचे तळतळाट लागतील. कारकून कारस्थाने रचतील. हुजरे गुलामीत मरून जातील. औरंग दिल्लीस सोडून इकडे स्थायीक होईल आणि मिळवलेले सारे भोसले साम्राज्य, भगव्यास हिरवे फासून वाटून खाईल. मिळाले तर एकतर पुत्र संभाजी यासच. त्या नंतर राजाराम अथवा पुत्र संभाजीस पुत्र प्राप्ती झाली तर त्यास हे साम्राज्य सांभाळावे लागेल.
विचारांच्या या गर्देत राजा गहिरा वेळ हरवला. अंथरुणाची घडी पडली नाही. इतका राजा मलून पडलेला. तोंडात कडवट दव्याची मात्रा रेंगाळत होती. डोक्यावरचा डौलदार जिरेटोप बाजूला जागा घेऊन बसलेला. मोकळ्या रेशमी केसांत अंगाऱ्याचे निखारे उडालेले. कपाळावर भस्मआदी काहीसे लावलेले. गळ्यात कनक नाही फक्त रुद्राक्षाची माळ. हातात जीव नाही. पायाच्या तळव्यात नरमपणा नाही. चेहऱ्यावर तेज नाही. निस्तेज चेहरा आठवण करून देत होता “ग्रहणाची.”
ग्रहण लागणार होत आता चंद्र वा सूर्याला नाही तर राज्याला. यमदूत वरून निघाले होते. विमान अर्ध्यावाटेवर पोचले होते. श्वास कमी होत चालले. महाराजांनी आपले काही शब्द हजर कारकुनी आणि हुजरे यांच्या कानी घातले.
राजे बोलिले, “तुम्ही चुकुर होऊ नका हा तो मृत्युलोकच आहे. या मार्गे किती उत्पन्न झाले तितके गेले. आता तुम्ही निर्मल सुखरूप बुद्धीने असणे. आता अवघे बाहेर बैसा. आपण श्रींचे स्मरण करतो.” असे बोलून सर्वांस बाहेर पाठवले. खोली रीत झाली. पण मन अजून रिते होत नव्हते. खूप काही बोलायचे होते. पण तितका वेळ उरला नाही. यमदुताचे विमान केव्हाही येणार होते. तेव्हा कैलासास जाण्यास सज्ज होणे सिवाजी राजास अनिवार्य होते. राजा सज्ज झाला.
हृद्य धीमे झाले. डोळे मिटत चालले. पायाचे तळवे अगदी गारठले. हाताचे पंजे अकडले. मिशीत लपलेले बंद ओठ उघडे झाले. रयत पोरके झाले. शालिवाहन शके १६०२ रौद्र्नाम संवत्सरे, चैत्र शुद्ध १५ रविवारी दोन प्रहरी काळ रायगड किल्ल्यावर राजाने प्राण त्यागला. रायगडाचे बुरुज ओलांडून. आकाशाला फाडून. सूर्याला बाजूला सारून राजाला घेऊन ते यमदूताचे विमान निघून गेले. उरले ते इथे राजाचे जड शरीर. त्यास पहावयाला राज स्त्रिया आल्या. कारकून, हुजरे आणि दुसरे काही लोक जमा झाले. जगदीश्वराच्या दारात शरीर ठेवण्यात आले. तुळस आणि बेलपत्रांनी शरीर झाकले गेले. जे कोणी कधी राजास काही देऊ शकले नाही ते ते लोक तुळस वा बेलपत्र सोबत घेऊन आले होते. उरलेल्या जड शरीरातला फक्त मुख(वटा) दिसत होता.
एकामागे एक हंबरडा ऐकू येत होता. जो तो रडत होता. मेघ सोडून. त्याने आत्ता रडायचे ठरवले तर राजास अग्नी मिळणार कशी ? या साठी तो आपले दुःख मनात अडवून होता. राजास अग्नी दिली. एक राजा सोडून गेला. कमवलेला हा डोलारा रयतेस सोपुन. लहान-थोरांचे आशीर्वाद-दुवे घेऊन राजा स्वर्गात गेला. तिथे त्यास देवा शेजारी जागा मिळाली. आणि पुढल्या जन्माची साखळी इथेच थांबली. त्यास मुक्ती मिळाली. देव हि आनंदी झाला. राजा सिवाजी अमर झाला.
शोकाकूळ रयतेत पुत्र संभाजी नव्हता. राजाराम सोबत अजून एक त्रयस्थ व्यक्ती बैसली. राजरामास हक्क नाही. पित्याचे दशक्रिया विधी करण्याचे. ते हक्क थोरल्याचे. पुत्र राजाराम थोरले नाही. तरी जड शरीर जास्त काळ ठेवणे बरे नाही. म्हणून लवकर विधी उरकून घेतेले. जगदीश्वरासमोर दिलेली अग्नी त्यात सिवाजीच्या पराक्रमाची ज्योत पेटलेली दिसत होती. डोळ्यातले अश्रू आटत नव्हते. यमदूताचे विमान शोधून हि कुणास वर दिसत नव्हते. वाटून पण राजास पुन्हा धर्तीवर येता येत नव्हते.
मग उरली सुरली रयत माघारी फिरली. वरवरची प्रजा कार्यविधीत गुंतली. शोक दूरवर पसरला. रयतेपासून इंग्रज अधिकारी ते औरंगपर्यंत शोक पाळला गेला. शत्रूची वाहवा होते. जिवंतपणी आणि माघारी असे कुठे लिखित नाही. पण राजा सिवाजी त्यास अपवाद खरा. त्या बंद खोलीचा पडदा तेरा दिवसानंतर उघडा झाला. पलंगावर अंथरून अगदी कोर तसच होत. जिरेटोप हि अगदी तसाच विसावलेला जणू राजा सिवाजीची वाट बघत आहे.

पण कळत्या वयापासून स्वप्नांना सत्यात घडवणारा राजा जेव्हा एवढा मोठा डौलारा उभारतो. आणि सुखाने आता तो डौलारा उपभोगावा म्हणतो तर यमदूत त्यास नेऊन जातो. काय अर्थ त्याला ? अति किमती राज्याचा अतिशय किमती राजा पण शेवटी नशिबी “उपभोगशून्य राजा” अशीच एक इच्छा उरली. पावसाने जोर धरला. पृथ्वीवर प्रलय आला. आता तर काय दुनियेचा नाशच होणार ऐसा प्रलय येऊ लागला. त्यात रयत दुखावली आणि मग राजा सिवाजी देवास सांगून तो प्रलय थांबवतो आणि इतक्यात पुत्र संभाजी स्वराज्यात परततो. 


         

तुळजाभवानी प्रसन्न झाली पण...

कोकणचे वारे कोणाला भावत नाही ? आणि अशा या मन भावणाऱ्या कोकणावर डच, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, मुघल आणि मराठे सगळेच आपला पाय रोवून बसलेत. अशात आज या भारतराष्ट्रात असलेल्या भारतीय दिखाव्याचा पण फिरंगी चेहऱ्यांच्या कोकणात महाराज आले. जमीन पावन झाली. रोजच्यापेक्षा आज वातावरण जरा मोकळ झाल. रोज दमट असत ना. महाराजांना बघून कुठून कुठून लोकं येत होती. सावंताने इंग्रजांची केलेली मोठी लुट महाराजांनी बघितली. बक्कळ सामान लुटलं गेलेलं. सावंत त्या खुशीत होता. पण त्याला अजून ख़ुशी झाली जेव्हा त्याने महाराजांना प्रत्यक्ष बघितल.
एवढा मोठा माणूस आपल्या धरतीवर आल्याने काहीतरी नजराणा देणे योग्य वाटले त्याला. त्याच्या मुलाकरवी त्याने लुटमारीत लुटलेली एक रत्नांनी जडलेली, सोन्याने मढलेली, मखमलीच्या पदराने गढलेली, आणि चमचमत्या चक्क पात्याने सजलेली अशी तलावर महाराजांना भेट दिली. महाराजांनी देखील ह्या नजराण्याचा स्वीकार केला.
सावंतचा मुलगा : महाराज हि तलावर इंग्रजांची लुट करताना आम्हाला मिळाली. अशी सुंदर तलवार म्हंटल कि त्याला शूरवीर राजा हवाच. आणि मी मोठा हि नाही पण तरी मला वाटत कि हि तलवार तुमच्याचसाठी बनलीय. आणि म्हणून समुद्रापलीकडची हि तलवार मला इथ मिळाली. आता तुम्हाला सुपूर्त करतो मी. म्हणजे मी मोकळा. नजराण्याचा स्वीकार करावा.
महाराज : नजराणा तर स्वीकार होईल पण विना मोबदला नाही. याचे मोल झाले पाहिजे. बदल्यात मी काहीतरी देऊ इच्छितो.
सावंतचा मुलगा : नाही काही नको महाराज तुम्ही इथे आलात. वेळ काढून माझ्याशी बोललात. त्यापुढे या तलवारीचे मोल काहीच नाही.
महाराज : महाराज म्हणून काहीही किंवा कोणतीही गोष्ट विना मोबदला मी घेऊ शकत नाही. आणि या अशा अप्रतिम तलवारीच्या बदले मी तुम्हाला तीनशे होन अदा करतो.
सावंतचा मुलगा : हि तर खूप रक्कम होत आहे महाराज.
महाराज : मोल तर या तलवारीची हि आहे.
सावंतचा मुलगा : पण या दोन्ही मोलांपेक्षा तुमचे मोल अगणित आहे राजे. आभारी आहे तुमचा.
त्याने महाराजांकडून तीनशे होन भरलेला बटवा घेतला. आणि मागे गेला. महाराज कोकण आवरून पुन्हा पश्चिमेकडे निघाले. महाराज इकडे आले. आणि अफजूल खानाचे काही डावपेच गुप्तहेरांकरवी त्यांना समजले. भेट तर निश्चित होणार होती. आपल्या भावाचा संभाजीचा बदला घेणे उरलेच आहे. खरेतर हा बदला माता जिजाबाईंना घ्यायचा होता. वयानुसार माता जिजाबाईंच मनगटातल बळ कमी झाल होत. अंगातल बळ कमी झालेलं पण डोक्यातली सूडबुद्धी नाही. पोटच्या गोळ्याला मारणारा नराधम जिवंत राहिलेला त्यांना सहन होत नव्हत. आता वेळ झालेली. अशात महाराजांना बरेच विचार प्रश्न पडलेले. भेट होईल तेव्हा होईल, त्यात काय होईल याची खात्री हि नव्हती पण न गाठता आणि न भेटता आधीच अफुजल खानाला घाबरवायचा महाराजांचा विचार होता. विचारा-विचारात काही दिवस गेले आणि तोंडावर आलेले दिवस काही दोन तीन महिने उरलेले आणि एका रात्री महाराजांना कल्पना सुचली. गड डोक्यावर करून ते साताऱ्यात पोचले. प्रतापगडावर. आई तुळजाभवानी समोर जाऊन त्यांनी नमस्कार केला. ठरवलेल्या कल्पनेला यश मिळूदे यासाठी मनातल्या मनात प्रार्थना केली. एका मावळ्याकरवी ती सावंतच्या मुलाने भेट दिलेलं तलवार मागवली. तिला देवीच्या मूर्तीसमोर ठेवल. पुजल. आणि त्यांनी मावळ्याला काहीतरी सांगितल. मावळा बाहेर गेला. महाराजांनी गाभाऱ्याच आतून दार लावलं.
आरतीचा आवाज येऊ लागला. घंटा वाजत होती. आणि थोड्यावेळाने शुकशुकाट झाला. मावळे जरी महाराजांच्या बाजूने असले तरी काही मावळे फितूर होतेच. एक जरी दगाबाज निघाला तर कल्पनेचा अंत निश्चित आणि म्हणून महाराजांनी मग बोलणे सुरु केले.
महाराज : आई...! जगदंबे. मला तू दृष्टांत दिलास ? मी तुझे हे रूप कधी विसरू शकत नाही. तुझ्या या सुंदर आणि तेजस्वी रुपाची मी कुठेही वाच्यता करणार नाही.
आणि तू दिलेली हि तलवार मी यवनांचा अंत करण्यासाठी वापरेन. आणि तू दिलेल्या या भेटीच्या तलवारीला मी तुझेच नाव देईन. या क्षणापासून या तलवारीला मी “भवानी” तलवार म्हणेन.
आणि महाराज शांततेत तलवार एका मखमली कापडात गुंडाळून बाहेर आले. आणि दरवाज्यातला मावळा महाराजांना बघतो आणि हलकाच हसून खाली जातो. आणि सगळीकडे एकच अफवा पसरते महाराजांना तुळजाभवानी प्रसन्न झाली. आणि तिने महाराजांना एक तलवार दिली. सोबत ती महाराजांना शत्रू कुठे लपून बसलाय हे हि सांगते.
तलवार कुणी बघितली नव्हती. नाहीतर त्यांना कळाल असत कि तलवार तुळजाभवानी बनावटीची नाही तर स्पेन देशाच्या बनावटीची आहे.

असे इतके हुशार महाराज या गोष्टीत हि सहज यशस्वी झाले.          
संभाषण ( इ )
जिजाई : सिवा, एक ध्यानात ठेवा. सोप्पी कामे कुणी हि करू शकतो. त्या कामात यश मिळवून त्यात रमून आयुष्य सफल झाल्याचा आनंद मिरवण्यापेक्षा अवघड कामासाठी कष्ट घेतले तर ते खरे आयुष्य. त्यात हार आली तरी काही हरकत नाही. पण ती हार सुध्दा आपले स्थान इतरांपेक्षा वेगळे करून सोडते. तुम्ही हि असेच काहीसे करावे हि आमची इच्छा आहे. वडिलांप्रमाणे मुघलांचे सरदार बनून आपले ध्येय, स्वप्न यापासून अलिप्त न होता, त्या स्वप्नांचा ध्येयाचा पाठ पुरावा करून त्यांना सत्यात जर का आणले तर त्याहून मोठे सुख कोणते हि नाही. जे काही कराल त्यात सत्यता हवी. खोट्याचा लवलेश जरा हि नको. खोट्याला जग साथ देते. वेळ पडली कि साथ तेच जग साथ हि सोडते. सत्याला तसे साथी कमीच, पण जे असतात ते जीवाला जीव लावणारे. तुम्ही हि सत्याचे साथी मिळवा. आणि स्वतःचे नवीन विश्व बनवा. वडिलांनी मिळवलेली धन दौलत त्याचा वापर करून मौज करून जगण्याला आयुष्य म्हणत नाहीत. स्वतःचे कमवा. भले थोडे कमवा पण ते स्वतःचे असु दे. तुम्ही आता वयात याल. जाणते व्हाल. वयाचा वापर कामासाठी लावा. जाणतेपणा लोकांना जाणण्यासाठी करा. लोकांची दुःखे जाना.
आपले वडील राजा होण्याची स्वप्ने बघत ती पुरी करायला जोखीम घेऊन शत्रूंत काम करत आहेत हे सतत ध्यानात असु दे. भोसले भले ही शूर असले. मोठ्या हुद्द्यावर असले. स्वतःच्या ताब्यात कित्येक परगणे-प्रदेश घेऊन असले तरी स्वतःच अस त्याचं राज्य नाही. माझी इच्छा आहे. ते राज्य तुम्ही साकाराव. तुमच हि रक्त भोसल्यांच आहे. तुम्हाला हि राजाचे स्वप्न मनात उत्पन झाले असावे. ते नुसते बघू नका. त्यावर काम सुरु करा. त्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या वाटतात त्या ऐकाव्यात.
आयुष्य लहान आहे. माणसाचा आकार आणि आवाका लहान आहे पण त्याची स्वप्न, त्यांना सीमा नाही. त्यामुळे आधी स्वप्न मोठी बघा. सुरुवात भलेही लहान असोत. मोठ्या स्वप्नांनी आपला आवाका वाढतो. फसवणूक करणे आणि करून घेणे या दोन्ही गोष्टींपासून सावधान. कुणाचे तळतळाट नको. घेतले तर आशीर्वाद हवेत. जगात जितके लोक वाईट त्याहून कमी चांगले. आपण चांगल्यांशी चांगल वागतोच पण वाईटांशी हि चांगली वागणूक ठेवणे काही हरकत नाही. आपल्या कामाप्रती निष्ठा हवी. कुणावर लगेच विश्वास ठेवणे नाही. कुणाचा विश्वास तोडणे नाही. माणसे जोडणे. संवाद राखणे. नाती जपणे. माणूसच माणसाला उपयोगी येतो. त्यामुळे माणसाचा वावर आपल्या भोवती असणे गरजेचे. पण त्यांचा असर आपल्यावर पडू न देणे. व्यसनाधीन कधी न होणे. स्वप्नाधीन व्हावे. त्याने सुख मिळते आयुष्यभराचे. व्यसनात हि सुखे नाहीत. स्त्रीचा आदर करणे. तिचा अपमान किंवा छळ करणे म्हणजे पुरुषार्थ नव्हे. जगाच्या पाठीवर कोणी हि असा पुरुष नाही जो स्त्री विना जन्मला. पुरुषाचा पुरुषार्थ कितीही मोठा असला तरी त्याला आसरा स्त्रीचाच लागतो. आणि जगात जसे आपल्याला कुलदैवताचे आशीर्वाद लाभतात. आईचे लाभतात तसेच प्रत्येक स्त्रीचे हि लाभतात. तसेच त्याहून जास्त श्राप हि लागतात ते एका स्त्रीचेच. स्त्रीचा आशीर्वाद घ्या तिचा आदर करून. वाईट नजर नको. हातात घेतलेले काम अर्ध्यात सोडायचा विचार नको. त्याचा शेवट करूनच थांबावे. त्यात यश येवो अगर अपयश. यश मिळवण्यासाठी खूप मार्ग असतात. पण सिवा, पण एक सांगते. स्वप्न नुसती बघायची नसतात त्यासाठी झटायचं हि असत. स्वप्न चांगली आणि त्यामागचा हेतू योग्य असेल तर मार्ग मिळत जातात. आपला चांगुलपणाने आपल नशीब आपल्याला साथ देत. स्त्रीचा आदर केला तर सबंध जग तुमचा आदर करेल. स्त्रीचा अनादर करणारे लोकांच्या तोंडी फक्त अवमानास्पद शब्दात आढळतात. मनाचा वापर कमी करून डोक्याने जास्त काम करा. पण तसे करत असताना कुणाचे मन दुखावेल, असे मात्र कधी करू नका. इतकेच सांगेन. तुम्ही जे कराल योग्य कराल. भोसले नाव तुम्ही नक्की तुमच्या कामाने उंचवाल. आमचे आशीर्वाद सदैव सोबत आहेत.
छ.शिवाजी महराज : हे स्वराज्य व्हावे हि तुमची इच्छा आहे. आणि तुमच्या इच्छेपेक्षा या आयुष्यात आम्हाला काहीही महत्वाचे नाही. आम्ही असे राज्य स्थापन करू ज्या राज्यात तुम्ही आम्हाला जी शिकवण दिलीत त्या शिकवणीचे त्या प्रतीचे लोक असतील.
जिजाई : तथास्तु. आता झोपी जा राजे. या रात्री लवकर जातात आणि मुले लवकर मोठी होतात. आणि आम्हाला तुम्ही लवकर मोठे झालेले पहायचे आहे.
  
  


यातील कथा या एक तर माझे तर्क आहेत किंवा खऱ्या इतिहासातल्या गोष्टींना कल्पनेने रंगवून लिहिलेल्या आहेत. तरी यातील प्रसंग अथवा वर्णन आपल्या नावाने कुठेहि प्रदर्शित करण्यास परवानगी नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. 

8 टिप्पण्या

  1. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी शहाजी राजे भोसले यांना हि कथा अर्पण.

    उत्तर द्याहटवा