डों-भारी.


एकदम बारीक पडणारा पाऊस. जाणवत हि नाही. पण दिसतोय तो डोळ्याला असा पाउस. रस्त्याच्या दोन्ही बाजूला फक्त माणसांची वर्दळ. आणि मधोमध “वन-वे” मार्गाने चालणारी वाहन. जो तो आपापल्या विचारात आपापल्या विश्वात जगत वावरत असताना कुणाला कुणाच काय चाललय ? काय होतय ? का होतंय ? काही काही जाणून घ्यायचं नाहीये. पाउस बारीक पडत होता. वार सुटल नव्हत त्यामुळ गरम होत होत जरा. तस रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द उंची झाड होती पण दिखाव्या पुरती. स्थळ, “एफ-सी रोड पुणे”. खायचं आणि कपड्यांच प्रसिध्द ठिकाण.  मगाशी म्हणालो तस गाड्या-माणस, वर्दळ सगळी सुरु असताना माणसांच्या गाड्यांच्या आणि त्यांच्या “होर्न”च्या आवाजात एक अजून एक मोठाला आवाज येऊ लागला. कधी न ऐकलेलं पण चालीने जरा चांगल अस एक हिंदी गाण वाजु लागल. लक्ष गेल माझ तिकड. आणि बहुतांशी तिथल्या बऱ्याच लोकांच. एक सात वर्षांची मुलगी लाकडी कळकांना बांधलेल्या बारीक दोरीवर अधांतरी चालत होती. हातात तिच्या हाताच्या दंडापेक्षा जाड कळकाला घेऊन स्थिरपणे त्यावर इकडून तिकड चालत होती. खूप सारी लोक तो “डोंबारी” खेळ बघत होते.
आता बघा, फरक काय आपल्यात आणि त्यांच्यात ? ती माणस आपण सुध्दा माणसच. पण तरी सुद्धा तुच्छतेणे त्या मुलीकडे बघून तरूण मुली तोंड फिरवत होत्या. त्यामागच कारण मला माहित नाही पण बहुतेक त्या मुलीचे कपडे बघून तस वागत असतील का त्या तरुण मुली ? आणि जर कपड्यावरून तिची पातळी ठरवली जात असेल तर, मी जिथ उभा होतो त्या “एफ-सी” रोडला दीडशे दोनशे रुपयाच्या कपड्यांना ऐटीत विकत घेऊन घालणाऱ्या याच मुली होत्या. दीडशे रुपयाच्या त्या ड्रेसवर साजेसा मेकअप करून त्या ड्रेसवरची नजर चेहऱ्यावर खिळवून ठेवायची हि पातळी या मुलींची आणि त्यांनी फक्त त्या मुलीकडे बघून तिला हिणवल.
तीच वय तिची ती अप्रतिम कला तीच साहस राहील बाजूला पण तिची जात बघून तिला हिणवल. तो पर्यंत साहसी पराक्रम करताना त्या मुलीने हातात कळक डोक्यावर दोन तांब्या आणि पायात चाकाची रिम ( रिंग ) धरून आता ती कसरत करून चालत होती. अचानक एक बाई येऊन खाली उभ्या असलेल्या त्या मुलीच्या भावाला वीस रुपये देते. तो ती नोट त्या मुलीच्या हातात द्यायला वर हात करतो. ती मुलगी कसरत करतच ती नोट हातात घेते. मग एकेक करत सगळे पोकळ दानशूर लोक दहा वीस अस आपल्या ऐपतीच्या शून्य टक्के इतकी रक्कम अभिमानाने देत होत. आणि काही लोक ते पैसे द्यायला हि आपल्याला कोण बघतय का याचा अंदाज घेत होत. 
बारा मिनिटात त्या मुलाने पूर्णपणे दोनशे रुपये जमवले. एक रिक्षा आली. त्यात एक बाई आणि पुरुष होता. बहुतेक नवरा बायको असावीत. बाईने त्या माणसाला पैसे दिले दहा रुपये. तो माणूस रिक्षातून उतरला. आणि त्याने त्या मुलाला पैसे दिले. मुलाने ती नोट मुलीला वर दिली. आणि त्या माणसाने त्या मुलीच मोबाईलमध्ये शुटींग करायला सुरुवात केली. आपल्या मुलाने किंवा मुलीने जरा काही फालतूची कर्तब केली ( म्हणजे कुठून खुर्चीवरून उडी मारली, बेडवर चढलं, जागेवर उंच म्हणजे अर्धाफुट उडी मारली ) तर घर डोक्यावर घेणारे आपण इतक्या आणि तितक्याच लहान वयात इतक साहसी काम करणाऱ्या मुलीच एका वाक्यात कुणी कौतुक करू शकत नाही. बर कौतुक लांब राहीलच पण तिच्या कामची वाहवा करण्याऐवजी सोशल साईटवर आपली फोटोग्राफी, विडीओग्राफी दाखवायला तिची व्हिडीओ काढत होते. इतकीच जर कला येत असेल तर मग माझ म्हणन आहे कि दहा रुपये देऊन तिची विडीओ बनवून सोशल साईटस वर शंभर-दीडशे लाईक मिळवण्यापेक्षा, मल्टीप्लेक्सला जाऊन दिडशेच पिच्चरच तिकीट काढून आत शुटींग करत बसा ना. 
बर तो माणूस निघून गेला. खेळ थोड्यावेळात संपला. जमलेला पैसा आणि सामान घेऊन तो मुलगा मुलगी आणि एक माणूस ( त्यांचा जन्मदाता नसावा. चेहरा वेगळा वाटत होता ) तिघ निघाली असताना त्या मुलीला एका मुलाने अडवल आणि तिचा फोटो काढला. पुन्हा रस्त्यवर तोच पहिला आवाज मला तरी यायला लागला. ते सगळे निघून गेले. पण एक प्रश्न पडला मला कि अजून हि या प्रगत जमान्यात कुणी माग कुणी पुढ आहे. मागचा कधी तरी पुढ जात आहे. पुढचा माग येत आहे. तरी सुद्धा आपण अशा लोकांना कमी का लेखतो. ज्यांच्यात आपल्या पेक्षा पण जास्त बरच काही आहे. पण परिस्थितीने त्यांचे हात बांधले गेले आहेत.
“एफ-सी” रोडला खूप चांगली कपड्यांची दुकान आहेत. खूप चांगल वाडेश्वर सारख हॉटेल आहे. खूप आजूबाजूला फिरणाऱ्या भारी मुली आहेत. पण एक सांगू त्या क्षणाला मला सगळ्यात  “ती” डों-भारी वाटली..

Copyrighted@2018
 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Hollywood Movies