Live on Instagram


कित्येक दिवस तुला शोधण्याच्या प्रयत्नात होतो मी. तुझे सगळे फोटो मी रागात डिलीट करून टाकलेले कधीच. ते आता गुगल ड्राइव्ह, गुगल फोटोजमध्ये मिळतात का हे रोज शोधून शोधून थकलो नाही मी. फेसबुकवर टाकलेले सोबतचे फोटो, ते डाउनलोड करावे तर तू मला ब्लॉक केलयस आणि तो एक होप होता तो पण निघून गेला. इंस्टाग्रामला मी तुला अन-फॉलो करून टाकलं. तू मला फॉलो केलेलं तसच आहे. पण तुझ्या अकाउंटला प्रायव्हसी आहे त्यामुळे तुझे फोटो मला दिसत नाही. त्रास व्हायचाच म्हंटल की सगळ्या बाजूने होतो. व्हाट्सअप्पला आपलं शेवटचं झालेलं बोलणं आणि त्या आधी बोललेलं किती ते बोलण सगळं डिलीट करून टाकलेलं मी. मागच्या आठवड्यात मी व्हाट्सअप्प डिलीट करून पुन्हा इंस्टोल केलं आणि बॅकअप पूर्ण वर्षाचा घेतला. सगळयांचे जुने मेसेज आले तुझे पण आले पण फोटो, ते व्हिडीओ, काहीच आलं नाही. कस काय ते माहीत नाही मला. नशीबच खराब आहे माझं. पण तरी तुला शोधायची इच्छा मनातून एकदा ही गेली नाही. रोज शोधतो तुला माझ्या नावात. माझ्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, मित्रांच्या फोटोंच्या कमेंट्स आणि लाईक मध्ये. मम्मीने माझं नाव घेऊन मला हाक मारली की त्या आवाजात पण तुला शोधतो. रस्त्याने प्रत्येक मुलीत तुला शोधतो. रात्री झोपताना माझाच हात माझ्या छातीवर ठेवून तुझा स्पर्श माझ्या स्पर्शात शोधतो. खूप शोधतो तुला पण सापडत नाहीस.

मगाशी देवापुढे दिवा लावला आणि निवांत येऊन सोफ्यावर बसलो. इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअप्प वापरायचा रस निघून गेलाय माझा, जेव्हा तू सोडून गेलीयस मला. पण तरी सहज म्हणून मी इन्स्टाग्राम उघडलं आणि पळत जाऊन मी आतल्या खोलीतून हेडफोन आणला. मला असं वेड्यासारखं घरातल्या घरात पळताना बघून मम्मीला काहीच समजलं नाही पण मी पुन्हा येऊन सोफ्यावर बसलो. हेडफोन कानाला लावला आणि इंस्टाग्रामचा तुझा फोटो त्यावर क्लिक केलं. आपल नात संपल्यापासून तू पहिल्यांदा लाईव्ह आलेलीस. तुला इतक्या दिवसांनी बघून हि धडधड काय थांबायला तयार नव्हती. श्वास हे भर भर धीमे व्हायला नाव घेत नव्हते. आजूबाजूला कोण आहे ? काय आहे ? का आहेत ? काही मला भान नव्हतं तुला बघत होतो फक्त. तू अकरा मिनिट लाईव्ह आलेलीस. तू कुणाशी तरी बोलत होतीस मी तुम्हा दोघांना बघत होतो पण तू मला पूर्ण दुर्लक्षित केलेलंस. जे जे तुला बघायला आलेले त्यांना तू हाय, अस म्हणून ओळख दाखवत होतीस पण मला नाही केलंस तू ‘हाय’. तरी मी अकरा मिनिट थांबलो आणि डोळे भरून तुला बघितलं. खुश झालो पण खूप दुःखी हि झालो आतून. डोळ्यात पाणी होत. त्यात तू धूसर दिसायला लागलीस. तू शेवटचं बोललीस वाक्य,

चला, गुड नाईट सगळ्यांना, भेटू परत... लवकरच. सगळ्यांनी काळजी घ्या.

मी ही मनात तुला बाय म्हणालो आणि तेवढ्यात तू बोललीस.

अजिंक्य तु पण काळजी घे रे.

आणि तुझी लाईव्ह व्हिडीओ थांबली.

आणि डोळ्यात साठलेल पाणी आलंच डोळ्यातून गालापर्यंत.

आणि या वेळेस मी ही व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डिंगने रेकॉर्ड करून ठेवली.

ती व्हिडीओ मगापासून बघून तुला खूप मिस करतोय. इतकं की जगात कुणी कुणाला इतकं मिस करत नाही...


copyrighted@2020

2 टिप्पण्या