Gift.


gift, couple gift, couple locket,

तू दिलेलं ते पहिलं गिफ्ट, एक वस्तू होती. पण खर सांगू त्या हि आधी तू मला एक गिफ्ट दिल होतस. ‘तुझ प्रेम’. तेच इतक आवडल होत कि, या मग नंतरच्या भेटवस्तू नाही इतक्या महत्वाच्या वाटल्या. पण त्याला ही किंमत होती. तुझ्या साठवलेल्या पैशातून घेतलेलं ते गिफ्ट मी जपून ठेवलेलं. घरी कुणाला कळणार नाही अस लपवून ठेवलेलं. त्या गिफ्टला बांधलेला रंगीत चकमकी कागद मी अगदी नीट काढलेला. तो तसाच अजून जपून घडी घालून ठेवलेला आहे मी. त्याला लावलेल्या चिकटपट्ट्या ? त्यापण तशाच ठेवल्यात. त्याचा चिकटपणा गेलाय पण आहेत जपलेल्या. गिफ्टला तू तुझ्या सैकमधून आणलेलं. तुझ्या त्या सैकमध्ये तो जो काय वास यायचा. आह...! अजून नाकातून गेला नाहीये तो वास. तो कॉस्मेटिक आणि सेंटचा मिक्स वास. म्हणजे डोळे बंद करून तुला लांबून ओळखण्याची कला येणारा जगात मीच एकटा होतो.

त्या गिफ्टच्या चकमकी कागदाला अजून पण तितका उग्र नाही पण मंद वास येतो त्या सेंटचा. वर्ष झाल असेल त्या गिफ्टला घेऊन तुझ्याकडून आणि हल्ली अलीकडे महिना झाल ते मी गिफ्ट वापरायला सुरुवात केलीय. माझ नाव असलेला मग (कप) तू मला गिफ्ट म्हणून दिलेला. पुण्याच्या मार्केटमधून पांढरा कप आणून त्यावर माझ नाव तू स्वतः डिझाईन करून ते छापून आणून मला गिफ्ट म्हणून दिलस. इतके दिवस मी जपून ठेवलेला. पण मी त्यात चहा पितो. जास्त नाही. दिवसातून एकदाच. उगीच गरमा-गरम चहामुळे कप माझा पातळ व्हायला नको म्हणून, आणि परत तो पाण्याने धुताना त्यावरची प्रिंट जाऊ नये म्हणून मी रोजच्या ऐवजी आता फक्त रविवारीच त्या कपात चहा पितो. बाकी रोज साध्या कपात चहा पितो.

गिफ्टला या वर्ष झाल. आणि तू मला सोडून सहा महिने. पण कित्येक गिफ्टमध्ये आवडलेलं मला हे एकमेव गिफ्ट. जे तू दिलेलं मला पहिलं गिफ्ट आहेस. आणि म्हणून माझ्यासाठी ते खास आहे. मी खूप जपतो या कपाला. सकाळी तुझी आठवण आली. आज रविवार नाही. हल्ली लॉकडाऊनमुळे रोजच रविवार असतो. मी चहा बनवला. विचाराच्या नादात मी तू गिफ्ट दिलेला मग (कप) घेतला. चहा त्यात गाळला. आणि सोफ्यावर येऊन शांत बसलो. एक एक घोट घेताना ओठांना लागणारा ओलसरपणा आपल्या किसची आठवण करून देत होता. आठवणी चांगल्या असतील तर कुणाला त्यात रमू वाटत नाही ? मी रमून गेलो. चहा पीत गेलो. चहा पिऊन झाला. जागचा उठून आत किचनमध्ये गेलो. तरी तुझ्या विचारातून बाहेर आलोच नाही. चहा संपला पण तुझी आठवण नाही.

आत जाऊन चहाचा गाळ गाळणीत भरून बाल्कनीतल्या कचऱ्याच्या टोपलीत टाकला. आत येऊन चहाच भांड घासल. मग गाळणी धुतली. आणि मग ‘तो’ कप घेऊन नळाखाली धरून त्याला विसळताना हातातून कप निसटला आणि बेसिनच्या बाजूला कट्ट्याला धडकून पायापाशी माझ्या पडला. मी खाली बघितल. कपाचे तुकडे झालेले. माझ हृद्य सेम तसच झालेलं. तुझ्या विचारातून बाहेर आलो. आणि डोक्याने पूर्ण रिकामा झालो. मम्मी आली आणि कप फोडला म्हणून ओरडून गेली वर सांगून गेली ‘सगळ उचल आणि दे टाकून कचऱ्यात’. तुझ्या ज्या प्रेमाला मी इतके दिवस जपून ठेवलेलं त्या गिफ्टला शेवटी कचऱ्यात जाव लागतय बघून डोळ्यात पाणी जमा झाल. ते तुकडे उचलताना नीट दिसत नव्हत मला. डोळ्यातल पाणी हातावर टप-टप टपकत होत. मी सगळा चुरा उचलून एका पिशवीत भरला. आणि त्या पिशवीला गाठ मारून माझ्या कप्प्यात ठेवल. डोळ्यात पाणी होत. नाकाला ओल आलेली. वर वर रडल तर फक्त डोळे ओले होतात. मनापासून रडल्यावर नाकाला ही ओलं व्हाव लागत. मी तो चकमकी कागद हातात धरून त्याचा डोळे मिटून वास घेतला. तुझी आठवण झाली. छातीत अस काहीतरी झाल कि डोळ्यात अगदी जोराने पाणी आल. बस रडण्याचा आवाज येणार होता म्हणून ओठांना ओठात दाबल. आणि कागद आत ठेवून कपाटाच दार लावून घेतल.    

copyrighted@2020

0 टिप्पण्या