आई गेली


जितका मी माझ्यात रमत नाही. जितका मी रोजच्या दिवसात जास्त जगत नाही. जितका मी कुणाचा विचार करत नाही. तितका आईच्या आठवणीत हरवून असतो. आईच्या जाण्याने आठवणीशिवाय मागे काय उरत ? तिला कितीदा बोललो असेन रागाच्या भरात, कधी सूर ओढला असेल नाहक हट्टाचा, कधी हक्क गाजवला हि असेल. जे काही असेल ते माझ्यात आणि तिच्यात असायचं. क्षणाला घडायच आणि क्षणात विसर पडायचा. ती मला सतत तिच्या काळजीच्या पदरात धरून असायची. आणि मी तिला कायम गृहीत धरून असायचो. ती आहे. ती असणार आहे. पण ती नसेल तर कधी विचार केलाच नव्हता. कित्येक श्रीमंत व्यक्ती बघितल्या मी. बिल गेट्स पासून  अबांनीपर्यंत पण गरीब लोक बघून वाईट वाटायचं. आज मी गरीब आहे मला आई नाही आणि माझी कीव कुणाला हि येत नाही. तीच माझी आई असती तर कीव सुध्दा तिच्या प्रेमापुढे दरिद्री वाटली असती. प्रत्येक माणूस एकटा जन्माला येतो आणि एकटा मरतो ऐकून होतो. मी मानत गेलो. शेवटी समाजाचे काही विचार खरेच असतात. सगळे नाही. पण मी एकटा मला म्हणताना त्यात माझी आई हि गृहीतच धरून असायचो. मी मरेन कधी मरेन माहित नाही. पण माझी आई माझ्यासोबतच असेल मी असेपर्यंत हेच माझ्या डोक्यात होत. मी नाही कधी विचार केला आई गेली म्हणजे कुठे गेली ? कारण तेवढा विचार करायला आईने मला तिच्या पुढे कधी मोठ होऊच दिल नाही. माझ लग्न झाल. मुल झाली तरी मी तिच्यासाठी अजून लहानच होतो. पण आता तिला शोधाव म्हंटलं तर कुठ शोधाव ? मी लहान असताना जागचा जरासा बाजूला सरकलो तर जागेवर आणून ठेवणारी इतक माझ्यावर लक्ष ठेवून असणारी आई, मी माझ्या पायावर चालतो, पळतो, गाडी चालवतो, चार-चौघांना ओळखतो इतक सगळ असताना पण अचानक माझी आई निघून गेली तर मी शोधू शकत नाहीये. खरच अजून मी लहानच आहे. आई म्हणायची काळजी घे. मी घ्यायला लागलो आणि तिने मला कळत्या वयात माझ्याच काळजीत गुंतवून ठेवल. त्यात मी गुंतलो. माझ मी बघायला लागलो न आईच्या काळजीकडे माझ दुर्लक्ष झाल. हिरव टवटवीत झाड एक दिवस पाणी मिळाल नाही म्हणून सुकत नाही. पण त्याची मुळच शुष्क पडली असतील तर पाणी कुठून शोषणार ते झाड ? माती खाली इतका त्रास आणि वर इतका देखावा. असच आई करायची त्रास व्हायचा तरी माझ्यासाठी सगळ करून स्वतःचा त्रास स्वतःत आत दाबून टाकत राहायची. आणि मी माझ्या काळजीत अडकलो तर तिच्या आतला तो त्रास वर कधी आला आणि ती कधी निघून गेली समजलच नाही. वाचवण्याचा प्रयत्न खूप केला पण मुळांनीच जीव सोडला तर रोपट कोणच्या भरोशावर जगणार होत ? अस म्हणतात माणसाच्या आयुष्यात एकच गोष्ट खूप वाईट असते ती म्हणजे स्वतःच मरण.
नाही...... मी माझ्या मरणाला घाबरणार नाही पण माझ्या आईच्या मरणाने एक समजल आयुष्यात वाईट गोष्ट एकच आहे. ते म्हणजे आपल्या आईच मरण. ती असण्याने बरच काही असत आणि ती नसण्याने काहीच नसत. वाईट माझ आयुष्य तिच्या संस्कारावर सध्या चालू आहे. पण आई तुझी आठवण खूप येते. दर दिवसाला तुझी आठवण डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. आता या वाईट जगात वावरताना कठोर मनाचा झालोय मी, पण तूच एकमेव आहेस जिच्या आठवणीत माझे हे कोरडे डोळे ओले होतात. आई तुझी खूप आठवण येते. पण...

copyrighted@2020

0 टिप्पण्या