शाळा आणि तू


मुलाला घेऊन शाळेत गेलो. पाचवीला प्रवेश घ्यायचा होता. बऱ्याच शाळा आहेत इथे पण सगळा विचार करता घरापासून जवळ असलेली शाळा निवडली मी आणि बायकोने. बायको घरीच होती. मी आणि मुलगा गेलो शाळेत. ज्या शाळेत मी पण होतो.

गेटपाशी पोचलो तिथे तेच तेव्हाचे वॉचमन काका खुर्चीत बसलेले. मला बघून हसले. जगात बुध्दिमान प्राण्यात माणूस गणला जातो. माणसात एकदम बुध्दिमान माणूस म्हणजे शिक्षक. कित्येक मुल हाताखालून शिकून जातात पण शिक्षक त्या प्रत्येकाला कितीही वर्षानंतर अगदी नावासकट ओळखतात. आणि त्या नंतर बुध्दिमान असतात हे वॉचमन काका. बरीच मुल त्यांच्या लक्षात असतात अगदी नाव लक्षात नसल तरी चेहरा लक्षात ठेवून असतात. मी त्यांच्याशी थोडावेळ बोलून मग आत गेलो. वाह..... शाळेच ते वातावरण वेगळच होत. गेटच्या बाहेर उन होत आणि इथे आत सुख होत.

उन्हाळी सुट्ट्या सुरु होत्या. त्यामुळे मुल नव्हती मी म्हंटल आधी एक चक्कर शाळेत टाकून यावी. पाचवीचे सगळे वर्ग पहिल्यांदा ओळीत दिसले. पुढे पायऱ्या होत्या त्या चढून वर गेलो आणि कोपऱ्यात दिसला बंद चित्रकला वर्ग. आणि आठवलीस तू.

साधारणतः आपल्याला ‘आवडणारी’ हि आपल्या शेजारच्या वर्गात किंवा त्याच्या बाजूच्या वर्गात असते. आमचा शारीरिक शिक्षणाचा तास असायचा तेव्हा तुमचा चित्रकलेचा तास असायचा. आम्ही ओळीत सगळे मैदानावर जायचो. आणि तेव्हा तुमचा वर्ग समोरून येऊन आमच्या बाजूने चित्रकला वर्गात जायचा. सगळे जायचे पण जेव्हा तू शेजारून जायचीस माझी छातीची धडधड जी काय सुरु व्हायची ती मैदानावर जाईपर्यंत तशीच रहायची. मैदानावरून खेळून आल्यावर पुन्हा तसच ओळीत वर्गात जाताना तू दिसायचीस. क्वचित कधी दिसली नाहीस तर मी वर्गात न जाता तुझ्या वर्गासमोरून एक दोन घिरट्या घालायचो. सोबत एक मित्र असायचाच. उशीरा वर्गात आल्याबद्दल शिक्षा खायला कोणी तरी सोबत हवा ना म्हणून. पण तुला बघितल कि बर वाटायचं. तिथून पुढे गेलो आणि दिसली ‘स्टाफ रूम’. जिथे शिक्षक असायचे. तिथून जाताना भीती कायम वाटायची मला. आणि आत्ता हि क्षणभर वाटली. तेव्हा स्टाफ रूम लिहिलेला बोर्ड वर बघून दिसायचा आत्ता समोर दिसत होता. पुढे गेलो सहावी, सातवीचे वर्ग दिसले. तिथून उजवीकडे वळून पाच पायऱ्या चढून गेलो. आणि उजव्या हाताला दिसला एक बंद वर्ग. तो होता संगणक कक्ष. खिडकीतून आतले कॉम्प्युटर दिसत होते. संगणकाचा तास तसा आपला एकाच वेळी असायचा. तो वर्ग मोठा होता. पण ती खोली एका काचेने विभागलेली. मी माझ काम मित्राला करायला सांगून मी अधून मधून अर्धवट उभ राहून पाठमोरी बसलेली तू, ‘तुला बघायचो’. तू मैत्रिणीशी बोलताना बाजूला बघायची तेव्हा तुझा चेहरा दिसायचा. नाहीतर तुझे ते बांधलेले घट्ट केस बघून पण मी खुश व्हायचो. गालात हसू आल. मी पुढे गेलो. नववीचे वर्ग लागले. आणि जिथे शेवटची तुकडी होती तिथे पुढे प्रयोगशाळा वर्ग होता. तुमचा जेव्हा विज्ञानाचा इथे तास असायचा तेव्हा आमचा कार्यानुभवाचा तास असायचा आणि आमचे शिक्षक तेव्हा वर्गात यायला विसरून जायचे. कितीतरी कार्यानुभवाचे तास आमचे ऑफ व्हायचे. तेव्हा मी मित्राला तुला गोळा देतो, शेंगदाणे देतो अस लालूच दाखवून त्या प्रयोगशाळेपाशी न्यायचो. त्या दारावरून जाताना आम्ही आमच चालण अगदी मुंगीसारख धीम करायचो. आणि त्या दोन दोनच्या जोडीत उभ्या असलेल्या मुलींच्यात मी तुला शोधायचो. पहिल्या फेरीत मी तुला शोधायचो. आणि पुन्हा पुढे जाऊन माघारी फिरायचो आणि मग दुसऱ्यांदा दारावरून जाताना तुला नीट बघून घ्यायचो.

तुझ मी माझ्या बाकावर नाव कोरलेल. मला आठवल मी गेलो त्या माझ्या दहावीच्या वर्गात. दाराला कडी होती. मी ती उघडून आत गेलो. आत सगळ तसच होत. फक्त भिंतीवरचे तक्ते वेगळे होते. काळ्या फळ्या ऐवजी त्यावर ठोकलेला आता हिरवा फळा लावलेला. बाकडी तिशीच होती पण आमच्या वेळेची नव्हती. बहुतेक बाकडी एकमेकांच्या वर्गात अदला-बदली केली असेल. पण मी बसायचो त्या जागेवर एक वेगळा बाक होता. तुझ नाव नव्हत त्यावर पण तुझी आठवण आली.

बाहेर येऊन मी दाराला कडी लावली. आणि आलो तसा पुन्हा माघारी गेलो. जाताना एका खिडकीतून खालच मैदान दिसत होत आणि तिथे सायकल लावायची जागा दिसली. तिथे सावलीसाठी लावलेले पत्रे बघून आठवल, दुपारच्या सुट्टीत तू मैत्रिणीसोबत बाथरूमला तिथून जायचीस तेव्हा मी त्या पत्र्याच्या सावलीत सायकलवर बसून तुला बघत रहायचो. आणि तू जाऊन आलीस कि तुझ्यापासून बरच अंतर ठेवून तुझ्या मागे-मागे तुझ्या वर्गापर्यंत यायचो. तू आत गेलीस कि मी मग माझ्या वर्गात जाऊन डबा खायचो. शाळा सुटली कि, जमेल तितक्या जोरात पळत जाऊन गेट पाशी थांबायचो मी, आणि तुला बघितल कि खुश होऊन घरी जायचो. तुला ज्या दिवशी बघायचो नाही त्या दिवशी मी घरी गृहपाठ करायचो नाही. इच्छाच व्हायची नाही. पण तुला बघितल कि खूप-खूप अभ्यास करू वाटायचा. कारण शिकलो तर तुझ्याशी लग्न करता येणार होत. तुझ्या लायक व्हायला एवढच करायचं होत मला. आई सांगाते मला, मी बालवाडीत असताना रोज शाळेत जाताना रडायचो. अगदी सातवीपर्यंत मला कधी शाळेत जायला उत्साह वाटला नाही पण जशी तू आठवीत दिसलीस तेव्हा पासून मला शाळा हा प्रकार आवडायला लागला. चांगली आवड जपावी म्हणतात पण मला दहावी नंतर जमलच नाही. आणि तू पुन्हा दिसलीच नाहीस. खूप शोधलं तुला पण नाही सापडलीस. बहुतेक तू दुसऱ्या गावाला गेलीस पण आज हि तू जशीच्या तशी माझ्या नजरेसमोर आलीस. खूप बर वाटल. तू नाहीस निदान माझ्या मुलाच्या नादाने आज पुन्हा मी शाळेत आलो. शाळा जगलो आणि तुला इतक्या वर्षांनी या माझ्या विचारात बघितल. आणि मला तेव्हासारखच तुझ्यावर आत्ता खर प्रेम झाल.

आणि हो, “तुझी खूप आठवण येतेय”.copyrighted@2020

0 टिप्पण्या