उरलं काय आहे ?


 

इथ राहून गेलेले तुझे माझे क्षण पुन्हा नव्याने आठवून मी तुला आत्ता बघतोय. किती बदल झाला न मीरा आपल्यात ? आयुष्यात, शरीरात, आपल्या नात्यात आणि आपण दोघांनी बघितलेल्या प्रत्येक त्या स्वप्नांत ? मी हल्ली खूप विचार करतो सगळ्या गोष्टींचा. पेपर वाचताना चोरून तुला बघतो आणि देवाचे आभार मानतो कि तू माझ्या नशिबी आलीस. तुला माहितीय का मीरा ? ( मोहन )

काय ? ( मीरा )

त्या प्रेमाच्या दिवसात मला कमवायची अक्कल हि नव्हती आणि दोन वेळा पोटभर खायची ऐपत हि नव्हती. तू तुझ्या वाटणीचा डबा मला भेटताना घेऊन यायचीस. बस स्टोप वर बसून तू मला तो बळजबरी सगळा खायला भाग पाडायचीस. नव्हती गं भूक माझी एवढी कधी. फक्त दोन चपात्यांची भूक माझी भात पण वर जायचा नाही पण तू चार कधी साडेचार चपात्या आणून भरपूर भाजी अणायचीस कधी-कधी कोशिंबीर, काकडी, गाजर, लोणच, चटणी हि आणायचीस. तुझ्या घरी वाटत असेल इतक खाऊन पण मीरा वाढत कशी नाही. पण मीरा का वाढत नाही हे फक्त मलाच माहित होत. माझी पहिली नोकरी आणि तुझा आनंद. नंतर तुझ कॉलेज संपल्यावर तुला चांगली नोकरी लागली आणि माझा आनंद. भार कमी केलास माझा तू. आपल्या लग्नाच तो पर्यंत माझ्या काही अस मनात नव्हतच पण तुझ्या पुढाकाराने मी आणि तू पळून जाऊन लग्न केल. सगळ कमावल, सगळ काही मिळवलं. जी स्वप्न बघितली त्या काळात आपण भरपूर त्यातल्या निम्म्या स्वप्नांना साकार हि केल. निम्म्या स्वप्नांचा बालिशपणा होता आपला. प्रेमात काय कळत होत तेव्हा तुला नि मला ? ( मोहन )

गप्पच बसा.... मला सगळ कळायचं तुम्हीच बालिश होता. एक अन एक गोष्ट मला सांगायला लागायची तुम्हाला तेव्हा कुठ करायचात. विसरलात वाटत. ( मीरा )

नाही. पण खरच. लग्नानंतर तू अजूनच माझ्यावर प्रेम केलस. मला साथ, आधार सगळ-सगळ दिलस. मला सांभाळलस, वर घर सांभाळलस आणि त्यात कमी म्हणून आपल्या अमितला हि तू सांभाळलस. ( मोहन )

हो मग... नको होत का सांभाळायला ? का संसार प्रेम फक्त तुमचाच होता ? ( मीरा )

नाही म्हणजे खूप सोसलस तू माझ्यासाठी खूप केलस माझ्यासाठी. तुला जे-जे हव ते-ते मी देण्याचा प्रयत्न केला आणि मला, अमितला जे-जे हव ते-ते तू माझी बायको म्हणून आणि अमितची आई बनून प्रयत्नच नाहीतर पूर्णपणे आम्हाला हव ते दिलस. मागच्या एक्केचाळीस वर्षांचा विचार केला मी तर आता काय स्वप्न बघावीत किंवा ती पूर्ण करावीत अस वाटत नाही सगळ आहे जे हव होत आपल्याला. आपला अमित आपली सून हि चांगली आहे. आपल हक्काच घर आहे. पुरेसा पैसा, दागिने आपल्याकड आहेत. मुलाच लग्न. त्याचा संसार आपला नातू हे बघायला आपण दोघ हि आहोत. पांग फिटलय या जन्माच फक्त तुझ्यामुळे. ( मोहन )

पण एक स्वप्न राहिलय माझ पूर्ण व्हायचं ( मीरा )

कोणत ? आणि मला कस माहित नाही ? बोल मी पूर करेन मीरा.

माझ्या आधी तुम्ही जायचं नाही. कारण मी अमितवर पण करत नाही इतक प्रेम तुमच्यावर केलय. अमित नव्हता, आपल लग्नही झाल नव्हत तेव्हा एखाद्या लहान मुलासारखी तुमची काळजी घेतलीय तुम्हाला जपलय. मला वचन द्या ( मीरा )

मीरा ए-ए काय होतंय तुला घाम का फुटतोय इतका. बघू इकड... ( मोहन )

मला वचन द्या. मी तुमच्यासाठी जे-जे केल ते माझ प्रेम आहे. तुम्हीही मला प्रामाणिकपणे साथ दिली ते पण तुमच प्रेम होत. पण एक शेवटची इच्छा पूर्ण करा माझ्या आधी चुकून हि जायचं नाही. कारण तुम्ही जर गेलात तर मी मेली तरी मरणार नाही. तुम्हाला रहाव लागेल माझ्यासाठी जीव स्वतःचा स्वतःत अडकवून ( मीरा )

पण मी काय करायचं ग मीरा तुझ्या माघारी ? मला जगता येणारे का ?

( मोहन )

दोघांच्या अश्रूंच्या धारेत मीराचे अश्रू सुकतात आणि प्रयत्न न करताच माधव मीराच स्वपन पूर्ण करून जातो. माधवचा एक मोठा आक्रोश होतो. अमित आत पळत येतो आणि बघतो. एका मेलेल्या प्रेमाला एक जिवंत प्रेम कवटाळून पुन्हा जिवंत करू पाहत होत.

भाग ०२

मीरा, सवय लागलेली मला तुझी. उठता बसता मीरा-मीरा करून ओरडायची. समोर वस्तू असली तरी ती तूच आणून द्यावी अशी माझी खोड असायची. माझा रुमाल, माझा शर्ट,  माझ्या चपला, माझ पाकीट त्यातले पैसे जे तूच मोजून ठेवायचीस. माझा डबा भरून ठेवण आणि जाताना पुन्हा तूच आठवनीने माझ्या हातात देण. भाजी तुझी अगदी तिखट, “तवंग आहे जपून न्या. डबा हेंकाळू नका” अस बजावायचीस तू मला. मला उशीर झाला तर पाण्याचा ग्लास घेऊन वेटर सारखी उभी राहायचीस तू माझ्या पुढ. मला कपडे बदलायला दुसरे कपडे आणून द्यायचीस तू आणि दुपारी झोपण्याऐवजी माझे सगळे कपडे स्वच्छ धुवायचीस तू.

त्या भिंतींवरच्या जाळ्या स्टुलावर चढून काढताना मला तुझी मदत लागायची. आणि मी नाही केल ते काम तर तू मी नसताना एकट सगळ घर साफ करायचीस. खरच बायको म्हणून तू किती काम करायचीस मी लक्षच दिल नाही. कधी जाऊन दळण अणायाचीस आणि दळण कमी पडलच कधी तर मला अमितला खायला घालून अमितला आणि मला डबा देऊन स्वतः मात्र दुपारी चहा बिस्कीट खाऊण झोपायचीस. टेंशन फक्त मीच घेतो म्हणून मला ओरडयचीस रागवायचीस आणि तू काय केलस? लो बी.पी.चा त्रास लाऊन घेतलास स्वतःच्या पाठीमागे.

आणि | हि कथा वाचण्यासाठी क्लिक करा 

आज तुला जाऊन दोन दिवस झालेत. आणि मी मगाशी चुकून २०१६ च कॅलेंडर उघडून बसलो. विसरूनच गेलो दोन दिवस झालेत दोन वर्ष नाहीत. अमित बसलाय रडत. खात नाहीये. मी समजावलं त्याला पण ऐकतच नाहीये. खूप जीव होता तुझ्यावर त्याचा. तरी मघाशी त्याला बायकोने थोड जबरदस्ती खायला घातलच. आता कुठ त्याचा डोळा लागलाय मीरा. पण मीरा आता मला भूक असताना हि आणि नसताना हि कोण खायला आणून देणार गं पुढ्यात ? कोण म्हणणार आहे मला झोपा आता अकरा वाजलेत. कोण मला न चुकता मला आवडणारा तुझ्या हाताचा दीड चमचा साखरेचा चहा आणून देणारे ते पण तुझ स्पेशल आल घालून. ? कोण घेणार आहे उराशी अगदी घट्ट कधी न सुटणाऱ्या मिठीत ? कोण पुसणारे हे माझे अश्रू तुझ्यासाठी येणारे ? आणि कोण विचारणार आहे कि डोळ्यात अश्रू का नाहीत ? धड बोलत हि नाही तुम्ही ? मीरा......ए-ए-ए मीरा.

अग ऐक ना गं ? नाही का येऊ शकत तिथून तू आत्ता परत ? मी एकटा झालोय पुन्हा. जसा पूर्वी होतो. आता भूक हि खूप आहे पण भरवणारी, बनवणारी तू नाहीस. चार चपात्या तुझ्या देखत बसून खातो गं पण तुझ्याशिवाय आता एक तुकडा हि जाणार नाही. ये ना तू. मी नाही म्हणणार नाही. तुला मदत करीन. माझ्या पाठीचा त्रास विसरून मी रोज घरातला केर काढीन पाणीही भरीन जमलच तर तुझ्यावर अजून जास्त प्रेम करीन. तू ओरडायचीस न माझ्यावर कि मी तुमच्यावर इतक प्रेम करते तुमच्यासाठी घर सोडून आले आणि तुम्ही काय करता तर माझ्याशी भांडता... बसस..! नाही भांडणार मीरा. फक्त तू ये. काहीच उरल नाहीये आता माझ्यात. उरलय फक्त तुझ माझ्यावरच प्रेम आणि त्या प्रेमाच्या ऑक्सिजनमुळे मी श्वास घेतोय.

भाग ०३

मीरा. एक प्रेम एका प्रेमाला बोलावतय. ऐकू येत नाही का तुला ? आज याच दिवशी मागच्या वर्षी तू गेलीस मीरा मला सोडून. या वर्षात सतत आठवत राहिलो तुला. मी काही मोठ काम केल अस काही नाही किंवा बोलून हि दाखवत नाही पण मी ऐकून होतो कि प्रेम कधी उरत नाही जर आपल प्रेम आपल्या जवळ नसेल तर. मी ठरवूनच तुझ्या प्रेमात पडलो होतो कि केल तर प्रेम मनापासून करायचं. माझ्या शेवटापर्यंत करायचं. असही मी ठरवलेलं मी तुला सोडून आधी जाणार नाही. विधवापणा तुझ्या नशिबी द्यायचा नाही. पण आज बघितल तर पटतय मला आता. असत प्रेम कायम आपल्या मनात आपल्या साथीदाराबद्दल. श्रीखंड, पुरी, पिवळ्या बटाट्याची भाजी, ती चिंच घालून केलेली गोडाची आमटी. भाताची मुद, कांद्याची आणि बटाट्याची वर घोसावळ्याची भजी, काकडीची कोशिंबीर, गाजराची दह्यातली चटणी, लसून खोबऱ्याची चटणी, ताक, लिंबाची फोड, मीठ सगळ तुझ्या आवडत बनवल त्या स्वयंपाकवाल्या बाईने. केल कस तरी तिने. निम्मीतर मीच मदत केली तिला. अमितला आणि त्याच्या बायकोला दोघांना वेळ नव्हता. सुट्टी नाही मिळत म्हणत होते दोघ. मी म्हंटल “पहिलच श्राद्ध आहे निदान अमित तू तरी थांब” पण त्यान ऐकून न ऐकल्यासारख केल. मग मीच कस तरी स्टुलावर चढून खिडकीच्या पडद्याला धरत कपाटावरचा कागदात गुंडाळून ठेवलेला तुझा फोटो काढला. या आधी तुझा कधीच मला त्रास झाला नाही. पण हा तुझा फोटो डोळ्यासमोर आला कि मात्र त्रास होतो मला. जिवंत असताना दिला असतास तर चालल असत पण आता त्रास द्यायला प्रत्यक्ष तू नाहीस मीरा आणि त्रास सहन करायला पहिल्यासारखी ताकद हि उरली नाहीये माझ्यात. तरी मग तुझ्या फोटोवरचा कागद काढून फोटोची काच पुसून घेतली. फ्रेमच्या कडा पुसून घेतल्या आणि मागून हि पुसला निट फोटो.

मग फोटोला आपल्याच खोलीत ठेवल. बाहेर हॉलमध्ये ठेवल तर आल्या-आल्या सुनेला, अमितला ते सगळ बघायला मिळेल. बिचारे काम करून येणार दिवसभर थकून आणि परत त्यांचा मुड जायचा. म्हणून मग माझ्याच खोलीत ठेवला तुझा फोटो.

s मीरा ऐक कि... रात्री येशील का ग मला भेटायला याच फोटोतून बाहेर ? मला उठवू नकोस. पण एकदा मला बघून तरी जा. टेन्शन नाही कसलच मला. पण त्रासाने तुझ्या विरहाने इतके विचार सतत डोक्यात असतात कधी छातीत दुखत, कधी कमरेला, कधी गुढग्याला दुखत तर कधी डोक फुटायची वेळ येते. पण हे सांगणार मी कुणाला ? कोणीच नसत घरी. आज श्राद्ध आहे तुझ. अस म्हणतात पित्र खाली येतात. मला वाटतय तू पण येशील आणि मी तरी निदान तुला नीट दिसायला हवा म्हणून काल काळा रंग लावलाय बघ केसांना. पण कमी झालेल्या केसांना परत जोडू शकत नाही. प्रत्येक प्रश्नांची उत्तर हल्ली मिळत नाही. मी जगतोय का ? मी जगू किती ? आणि मला मरण आलच तर ते चटकन याव कुठल्या त्रासात नाही. कारण माझ करायला कुणाला आता वेळ नाही. अस वाटत बटण दाबल्यावर जशी ट्यूबलाईट विजते इतक सहज पटकन मरून जाव.

पण खर सांगू तुझी खूप आठवण येतीय मीरा. तूच सांग मला आठवणी काय आपल्या एक दोन दिवसाच्या आहेत का ?  चांगल्या एक्केचाळीस वर्षाच्या आहेत. आणि सतत प्रत्येक आठवण मला आठवत राहते. मी हि त्यात रमून असतो. पण मग भानावर आल कि समजत आयुष्यात माझ्या आत्ता नक्की उरल काय आहे ? ( मोहन )


copyrighted@2020
2 टिप्पण्या