तुझ्यासाठी लिहावंसं वाटत.मी तुझ्याकडे बघायचो. मी तुझ्या मागे मागे यायचो. घरापाशी तुझ्या घिरट्या घालायचो कधी चालत कधी सायकल वरून. कारण नसताना उगीच तू जाशील त्या दुकानात जायचो. आवडत नसताना डेरीमिल्कची कॅडबरी खायचो. खिशात पैसे जास्त नसताना उगीच दहाच्या दोन-तीन नोटा गुंडाळून मित्रांपुढे नाचवायचो ते पण तेव्हाच जेव्हा तू हि तिथेच कुठे आसपास असशील तर. तू जो क्लास लावलास तोच मीही लावला. फी जास्त होती अभ्यास खूप द्यायचे तरी मी आईच्या मागे हट्ट करून तोच क्लास लाऊन घेतला. शाळेत तुझा वर्ग मिळाला नाही मला. तू “क” मध्ये मी “ग” मध्ये. तुझ अर्ध संस्कृत अर्ध हिंदी आणि माझ पूर्ण हिंदी. 
दर बुधवारी तुमच्या वर्गातली मुल आमच्या तुकडीत यायचे अर्ध हिंदी शिकायला आमच्या हिंदीच्या तासाला. आम्ही दोघ दोघ बसणारी पोर तेव्हा तीघ तीघ बसायचो एकाच बाकावर. तुही यायचीस. तू तिकड मुलींच्यात मी इकड मुलांच्यात बसलेलो असायचो. सगळी मुल सरांकडे बघत बसायचे आणि मी तुझ्याकडे. प्रेम करायचो मी तुझ्यावर. ( अजून हि करतो म्हणजे ) प्रेम हा शब्द आणि भावना मराठीत. तू मराठी मी मराठी. मी मराठा तू ब्राम्हण. पण तास सुरु असायचा हिंदी. प्रेमाला हिंदीत मोहब्बत,मुहब्बत,महोब्बत, काय म्हणतात नक्की समजायचं नाही मला. बोलायला फक्त स्पष्ट यायचं पण लिहिताना बोंबाबोंब व्हायची. मग बाकावर करकटकने अजिंक्य इश्क़ *** अस नाव कोरल. कुठ ते प्रेमाला हिंदीत काय म्हणतात आणि कस लिहितात याचा अभ्यास करू ? हळू हळू दिवस जात गेले. पण तू जेव्हा एका तासासाठी यायची वर्गात तो अर्धातास मात्र पाच मिनिटासारखा भूरकन जायचा. अस वाटायचं सगळे विषय तोंडी असावेत. आणि हिंदी फक्त लेखी असावा. भारताची मातृभाषा जशी हिंदी आहे तशी महाराष्ट्राची पण मातृभाषा हिंदीच घोषित कराव कुणीतरी अस वाटायचं नेहमी. पण ते कुणाच्या हातात असत माहित नव्हत. परीक्षा झाल्या सुट्ट्या लागल्या शाळेला, क्लासला आणि अभ्यासला आणि झाल......तुझ दिसण बंद झाल. घरापाशी, शाळेत आणि सगळीकडेच दिसण बंद झाल. आणि सुरु झाला विरह. आज इतक्या वर्षांनी दिसलीस मला तू. उरात अगदी धडधड वाढली. तू चालत चालली होतीस. मीहि चालत होतो. तुझ लक्ष समोर आणि माझ मोबाइलमध्ये. मी तसाच रस्ता क्रॉस केला आणि माझ समोर लक्ष गेल तर तू. तुझ्यासोबत कोण तरी मुलगी होती आपल्याहून मोठी. तीच दूसरीकड लक्ष होत. मी तुला बघून मोबाइल खिशात घातला. आणि तुझ्याकडे बघितल आणि तू माझ्याकडे बघत बघत पुढे गेलीस. शेजारून गेलीस आणि माहित आहे मला तो सेंट माझी मम्मी पण तोच लावते. रॉयल काळ्या रंगाची उभी बाटली आहे. तोच होता शंभर टक्के. पण अस वाटल तुला ओढाव जवळ आणि मिठीत घ्याव आणि विचारव कुठ हरवली होतीस इतके दिवस. पण ते शक्य नव्हत आणि तुझ्या माग येण बरोबर वाटत नव्हत मग पुन्हा खिशातून मोबाइल काढला आणि माझा ब्लॉग ओपन केला आणि पुढ चालत गेलो तुला सोडून आणि तुही गेलीस एका क्षणात मला विसरून.......

2 टिप्पण्या