तुझ्या लग्नात मी.


आपल प्रेम आपण टिकवून ठरवलेलं कि दोन वर्षांनी लग्न करायचं. लग्न ठरल. खूप खुश होतीस तू. कोणतही असो कुणाचही असो प्रेमाला पूर्णत्व हे लग्न करूनच मिळत. केसांची हेअरकट बदलून, काळ्या केसांना थोड रंगीत बनवून, फेशिअल, आयब्राउज, मेनिक्युअर, पेडीक्युअर अस सगळ उरकून तू तुझ्या शरीरावर चढवलेली सौंदर्याची चादर नाजूक वागून सांभाळत होतीस. पण नेहमीपेक्षा हल्ली खूप सुंदर दिसत होतीस तू. आपण एकदा आपल्या पत्रिकेच चित्र डिझाईन म्हणून काढलेलं. सेम तशीच पत्रिका बनवली गेली. तुझ्या घरचे खुश होते. शेवटी मुलीच्या सुखापुढे घरच्यांना दुसर काय हव असत ?

कित्येक वर्ष एक मुलगी सांभाळून आता तिला या घरातून दुसऱ्या घरी पाठवायचं हे मोठ दुःख, लग्न नावाच्या सुखी कार्यक्रमाने पूर्ण करायचं म्हणजे खरच खूप अवघड असत. पण शेवटी प्रेमासाठी सगळ कराव लागत. हेच तर आयुष्य आहे आणि हे आयुष्य जगणाराच माणूस असतो. तू आणि मी कित्येक वेळा चोरून भेटलोय. किती कारण घरी सांगून आपण कित्येक वेळ बाहेर राहिलोय. त्यात कधी नव्या गोष्टी बघितल्या, फिल्म्स बघितल्या, कित्येक सुंदर निसर्ग बघितले. आणि हे सगळ बघत असताना कित्येक वेळा एकमेकांच्या नजरेत हरवून मिठीत येऊन एकमेकांना उन्हापेक्षा जास्त ऊब देऊ केलीय. उन्हाळा असो किंवा मग पावसाळा. जे सूर्याला जमत नाही ते आपण अगदी सहज करायचो. तू आणि मी कित्येक कप चहा पिलोय, तुझ माझ प्रेम हे इतक गोड असताना आपण वर इतके कप चहा पिलोय कि मधुमेह व्हायची भीती मला वाटते. झाला तर झाला. अस ही तो इतक्यात काय व्हायचा नाही. अजून खूप वय जायचय. आणि एकावेळेस एकच रोग आपल्या शरीरावर जास्त हावी असतो. आणि सध्या तुझ प्रेम माझ्यावर हावी आहे. त्यामुळे दुसऱ्या रोगाची काय बिशाद कि तो मला त्याच्या जाळ्यात ओढेल. आपण कित्येक मेसेज, कॉल केलेत एकमेकांना, शंभरातले दोन-चार टक्के नफा तर आपल्यामुळेच होत असेल कंपनीला. काय त्या बोलण्याला सुमार होता का ? साधा कॉल झाला, कि लगेच मेसेज वर बोलायचं, तिथ कंटाळा आला कि व्हिडीओ कॉल असायचा, तो झाला कि पुन्हा मेसेज आणि नेट संपल तर साधे मेसेज आणि परत रात्री झोपायच्या आधी साधा कॉल. दिवसभर नुस्त तुझ्यासोबत जगून मी बाकीच जग विसरून गेलेलो. आणि आता तुझ्याशी लग्न होईल तेव्हा चोवीस तास तुलाच समोर बघून काय हालत होईल माझी या विचाराने मी विचारात पडायचो. खूप प्रेम करतो ना ग आपण एकमेकांवर. सगळ जगून घेतल आपण. जे जे हव होत ते. जे तुला घरी राहून करता येत नव्हत ते पण. आता उरलेलं लग्न फक्त. आणि ते आज होत. मी सगळ माझ आवरल. आणि ठरलेल्या कार्यालयात आलो. खूप गर्दी होती. गर्दीतून मी आत आलो. लग्नाला मी उशिरा येऊन कस चालणार होत. मी वेळेतच आलो. तू समोर होतीस. मी तुला बघितल. तू मला बघितल. तू पाटावर खाली बसलीस. आणि मी खुर्चीवर. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालत आणि मी तुझ्या अंगावर अक्षदा टाकल्या. पूर्ण या वेळेत पुन्हा तू माझ्याकडे बघितल नाहीस. आणि मी माझ्या डोळ्यात पाणी येऊ दिल नाही. तू खुश आहेस यात मी खुश झालो. प्रेम कुणाच का असेना. पूर्णत्व तुला मिळाल ना बस...

माझ काय मी राहीन एकटा असाच. तू पूर्ण झालीस आणि मी अर्धवट राहिलो. पण ठीके. मी जेवण केल तुला लांबून नजरेने बाय बोललो आणि तू नजरेने बोललीस सॉरी. जे कि मला नको होत.

मी निघालो, कार्यालयाच्या बाहेर आलो. गाडीवर बसून घरी आलो आणि शांत झोपलो. इतका वेळ डोळ्यात साठवलेले पाणी झोपेत कधी उशी भिजवून गेल कळाल नाही. उठलो जेव्हा उशी कोरडी होती. पण गालावर ओघळलेले पांढरे डाग दिसत होते. तोंड धुवायला बाथरूममध्ये गेलो. तोंडावर पाणी मारल आणि काय झाल काय माहित. पाण्याने पाण्याला जिवंत केल. आणि डोळ्यात भडाभडा पाणी यायला लागल. बाथरूमच दार मी आतून लावून घेतल आणि तिथेच दहा मिनिट मी रडून घेतल.

copyrighted@2020   


Post a Comment

7 Comments

close