खर प्रेम काय असत ? ज्यात कसलीच बंधन नसतात. ज्याला कसल्याही सीमा नसतात. ज्यावर कोणतीही वचन लादलेली नसतात. असते जबाबदारी फक्त जी आपण स्वतः स्वीकारलेली असते प्रेम निभवण्याची. बस इतकच. बाकी खर प्रेम करून त्याला कित्येक गोष्टीत अडकवणारे पाण्यात मिसळलेल्या रंगासारखे असतात. जे बेरंगी पाण्याला रंग देतात पण त्या पाण्याने कुणी चित्र रंगवत नाही. आणि अशा खोट्या प्रेमाच्या विरोधात आहे मी. प्रेम म्हणजे काय हे माझ्याहून चांगल कुणालाच माहित नसेल. भुकेलाच सांगू शकतो एका घासाच्या पदार्थाची किंमत.
ख्रिस्तिन : जगात भुकेले बरेच आहेत. आणि प्रत्येकाला त्याची किंमत माहित असते. आणि सध्याची परिस्थिती पाहता तू तुलाच श्रेष्ठ म्हणन कितपत योग्य आहे ?
योग्य अयोग्य अस काही नाही पण जे आहे ते मी बोललो. प्रत्येकात खोट निघेल माझ्यात नाही. निघाली तर मी माझी सगळी चित्र काही वर्षांसाठी माझ्या नजरेआड करेन आणि सध्या सुरु असलेला अभ्यास मी करण थांबवून टाकेन.
ख्रिस्तिन : इतका विश्वास ? बघ खोटा पडशील. आणि मी या जगात इतके लोक खोटारडे पाहिलेत कि पोलीस खोटारडा शोधून शोधू शकणार नाही पण मी नुस्त बोलून ओळखू शकते.
असेल ती तुझ्यात कला. मी हि कम कलाकार नाही. मी माझ्या या आयुष्यात माझ्या कलेशिवाय आणि माझ्या भावाशिवाय कुणाला मानत नाही. आणि त्यांचा त्याग माझ्या माघारीच करू शकतो मी. आणि मी त्यांना या आपल्या चर्चेत आणतो आहे आणि सांगतो आहे कारण खरच माझ्यासारखा प्रियकर कुठेच नाही.
ख्रिस्तिन : बर, तू तुला प्रियकर म्हणवून घेतो आहेस तर तुझी प्रियसी हि असेल कुणी एखाद. जी तुझ्यापेक्षा तरी नक्कीच सुंदर असेल. तू मनाने चांगला आहेस. खूप चांगला.
तू सुध्दा ख्रिस्तिन चांगली आहेस.
ख्रिस्तिन : हो, मी चांगली आहेच. आणि दिसायला सुध्दा. पण तू इतका खास नाही. बुटका वर हडकुळा, टक्कल पडलेला, डोळे खोबणीत गेलेला आणि गालफाड बसलेला वयापेक्षा प्रौढ दिसणारा एक दारुडा माणूस आहेस तू.
माणूस नाही. चित्रकार.
ख्रिस्तिन : तेच ते.
तेच ते नाही. माणूस मारतो. चित्रकार अमर होतो.
ख्रिस्तिन : जे काय ते. पण तुझ्या नशिबात मी नाही. आणि कुणीच नसेल. मी तुझ्याशी बोलतेय. हेच खूप आहे.
माझ्या आधी हजार लोकांनी तुझ्यासोबत रात्र घालवली. त्यातून येणाऱ्या पैशात तू तुझ तुझ्या आजारी आई आणि बहिणीच आणि एका मुलीच अर्धवट पोट भरतेस. तुझ्या अंगाला येणारा तेलकट वास, भूरकटलेली केस, आणि मळकट अंगावर हा शुभ्र ड्रेस पहिल्यांदा तू घातला असशील. सगळे तुला पैसे देऊन तुझ्यासोबत मजा घेऊन गेले. मी तुझ्यावर प्रेम केल. तुला हव ते देण्याचा प्रयत्न केला. तुझ्याशी लग्न न करता त्या आधीच तुला घरात घेतल. तुला बायकोचा दर्जा दिला. तुझी अमर होणारी चित्र काढली. तुझ्या आईचा इलाज केला. तुझ्यासोबत सात जन्म सोबत घालवण्याचा विचार मी करतो. हे माहित असताना पण कि तू माझ्या लायक नाही. आणि तू माझी होऊ शकत नाहीस तरी सुध्दा मी हा असा तुझ्यासोबत मिळेल तितक्या वेळात जगून घेतो. आणि तुला तुझ्या नशिबापेक्षा जास्त चांगल जगण अदा करतो. तुझ्या आईला माझी मानली. तुझ्या त्या सत्यात नसलेल्या बहिणीला माझी मानून तुझ्या मुलीला माझी मानून आणि तुझ्या पोटात असलेल्या बाळाला माझ नाव द्यायला मी तयार आहे. आणि हे सगळ तुझ्याशी लग्न न करता. मग आता बोल इतक खर प्रेम करणारा अख्या युरोपमध्ये कोण असेल का ?
ख्रिस्तिन : असतील लाख. मी जात नाही कुठे म्हणून. नाहीतर तुझ्यासारखे बरेच मिळतील मला.
माझ्यासारखे किंवा माझ्यापेक्षा चांगले मिळतील. पण विन्सेंट व्हान गॉग एकच आहे आणि एकच राहील.
0 टिप्पण्या