फिरदोस.

भाग ०१
पुण्यात खाणावळीला मरण नाही. कुणाला पैशाची गरज आहे ? मग इथे बिनधास्त खाणावळ सुरु करा. कारण तुम्हाला जशी पैशाची गरज आहे तशी इथे बाहेरून येणाऱ्या मुला-मुली-माणसांना घरच्या जेवणाची गरज असते. बदल्यात चाळीस रुपये डब्याला ते ऐंशी पण देतात. आणि हाच विचार करून पुण्यात प्रत्येक पेठेत दोन घरांमागे एक खाणावळ हि असतेच-असते. अशाच एका विचाराला सत्यात उतरवल आभा मोरे यांनी. नवरा शिलाईच काम घ्यायचा. पदरी पाच मुल. मग त्या मुलाचं स्वतःच आणि नवऱ्याच शिलाईच्या दमडी पैशात भागेना म्हणून पहिल्या दोन लोकांना घरगुती जेवण बनवून देता-देता आज त्यांची स्वतःची मोठी खाणावळ आहे. मिस.मोरे इन नावाने. रोज सकाळी सातला नाष्टा इथे मिळायला सुरुवात होते. ते रात्रीच जेवण होऊन पावणे बाराला हि खाणावळ बंद होते. बरेच वाढपी आणि बाया इथ कामाला होत्या. रोज कोण-ना-कोण या खाणावळीत विचारपूस करून जायचं. आणि त्यातले निम्मे तरी एक ताट जेवून जायचे आणि चव आवडली कि इथलेच होऊन जायचे.
दुपारचे वाजले होते साडे तीन. या वेळेला माणसाच पोट खाऊन-पिऊन तृप्त होऊन मेंदू सुस्त झालेला असतो पण, सादिकच्या पोटात आत्ता भूक मारायला एक ग्लास पाणी जरी गेल ना तरी ते पोटाच्या कोणत्या कोपऱ्यात जाऊन पडेल सांगता यायचं नाही. इतकी त्याला भूक लागलेली. सादिक पुण्यात तसा नवीनच आलेला. जेमतेम सहा महिने झाले असतील त्याला इथ येऊन. एका हॉटेल मध्ये काम करत हॉटेलिंगच हि शिक्षण घेत होता. या आधी त्याने असच काही-काही शिकून घेतलेलं. साताऱ्यात नोकरी नाही. आणि मिळणार हि नाही याच विचाराने आणि इथल्या लोकांचे हे टोमणे रोजचे ऐकून त्याने पुणे गाठलं. इथे त्याने एक खाणावळ लावलेली. ती त्यांची खाणावळ दर रविवारी बंद असायची. पुण्यातला तो नियमच आहे. सहाजिकच तो त्या खाणावळीला हि लागू पडलेला. रविवार ठीक पण आज कोण मेल. आज कुठ कोण बाहेर गेल. आज काय तर जेवण बनवणाराच आला नाही. आणि कधी वाढायला कोण नाही म्हणून जेवण नाही. अशी क्षुल्लक कारण देऊन पोरांचे पोटाचे हाल करणारी खाणावळ सादिकला सहा महिन्यात बदलायला काही जमल नाही. का तर ती स्वस्त होती. पुण्यात सगळ मिळत हो बस पैसा पाहिजे. आणि तिथे जाणारे आपण बिनपैशाचे. पैसे कमवायला जाणारे लोक तिथ एक-एक रुपयाचा हिशोब लावत असतात. शनिवारी खाणावळ बंद होती. का ते माहीत नाही कारण काल रविवारी ऑफीशीयली सुट्टी होती. आणि आज कसली काय माहित. तीन दिवस नुसता वडापाव खाऊन त्याच पोट बिघडल. आणि म्हणून एकाच ऐकून तो आज मोरेंच्या खाणावळीत आला. बाहेर लिहिलेले दर वाचून सादिक विचारात पडला. आणि पोटाला पडलेला खड्डा, खड्डा कसला बोगदा आठवून तो आत शिरला.
त्याला बघताच,
आभा : काय पाहिजे ? जेवण तयार आहे. जावा बसा. आत.
सादिक : चौकशी करायची होती जरा.
आभा : एक वेळ डबा लावला कि दीड हजार. दोन वेळ लावला कि बावीसशे. घरपोच नाही मिळत.
सादिक : नाही मी येऊन खात जाईन.
आभा : नाव ?
सादिक : सादिक अब्दुल्ला रहीम शेख.
आभा : कोणते तुम्ही ? आणि आत्ता कुठ राहता ?
सादिक : सातारा. आत्ता इथ कर्वेनगरला राहतो.
आभा : कधी पासून लावताय ?
सादिक : आत्ता.
आभा : आगाऊ पैसे द्यावे लगतील.
सादिक : किती ?
आभा : हजार तरी.
सादिक : एवढे नाहीत पाचशे आहेत.
आभा : अस कस बर चालेल. बर ठीके तुम्ही आणलेत सोबत तेवढे तरी म्हणून चालतील.
सादिक पैसे देतो. त्या हि सगळा हिशोब वहीत नीट लिहून ठेवतात. सादिक टेबलावर जाऊन बसतो. आभा एका बाईला हाक मारतात आणि सादिकला जेवण वाढायला लावतात. एक गोरीपान बाई. त्याच्या समोर पेश होते. आणि एक-एक पदार्थ अलगद तिच्या गोऱ्यापान नाजूक हाताने वाढत असते. आणि सादिक तिचे फक्त हात बघत असतो. ती काय-काय कस वाढते एवढच बघायला. त्याच लक्ष तिच्या चेहऱ्याकड जातच नाही. 
भाग ०२
ताटात चपाती, कुस्करलेला पापड, काकडी, लोणच, सुक्का पिवळा बटाटा, दाटसर आमटी सगळ वाढून झाल. जेवण अनलिमिटेड होत. पण सुरुवातीला दोन चपाती वाढलेल्या आणि त्या दोन चपात्या निदान पाच-सहा घासातच त्याच्या संपल्या असत्या. खाणावळीत गर्दी होती. त्यामुळे सादिकला वाटल कि, या संपल्यानंतर लवकर पुढच्या चपात्या मिळणार नाही. म्हणून त्याने नजर वर उचलली आणि माघारी जाणाऱ्या त्या बाईला त्याने थांबवल.
सादिक : एक मिनिट.
बाई : ( मागे वळून बघत ) काय ?
सादिक : अजून दोन वाढता का चपात्या ?
बाई : बाकीच्यांना पण वाढायच्या आहेत, या खावा तोवर आतून गरम-गरम आणते.
सादिक : बर. पण लवकर आणा.
ती निघून गेली. सादिक जेवत होता. खूप दिवसाचा उपाशी असावा तसा अधाश्यासारखा तो जेवत होता.
त्याची सव्वा एक चपाती खाऊन झाली. ती आली. चपात्यांचा गठ्ठा घेऊन एका थाळ्यात.
बाई : चपाती ?
सादिका : दोन वाढा.
बाई : आज पुरते आहात का ?
सादिक : काय ?
बाई : आज पुरतेच जेवायला आलाय का खाणावळ लावलीय ?
सादिक : खाणावळ. खाणावळ लावलीय.
बाई : माहित असाव ना. म्हणून विचारल.
सादिक : हा नाही बरोबर आहे तुमच.
बाई : अजून काय आणू का ?
सादिक : भात आणा. आणि जरा पापड.
ती जाते. सादिक जेवतच असतो. ताटात वाढलेली अजुनच्या दोन चपात्या खाऊन भात खाऊन तो उठला. हात धुतला. आणि हात पुसत पुसत बडीशेप खायला आभा यांच्या काउंटरपाशी गेला. बडीशेप हातात घेतली. आणि तोंडात टाकली. आता कस पोटात जेवण गेल्यावर भरल्या-भरल्यासारख वाटत होत. बर वाटत होत.
आभा : संध्याकाळी या आठपर्यंत.
सादिक : मी सुटतो कामावरून आठला.
आभा : बर नऊला जमेल ?
सादिक : हो.
आभा : या मग तेव्हा.
मागून ती बाई येते आणि सदिकच्या मागे उभी राहते. आभा तिला विचारते काय झाल ? त्या आवाजाने सादिक हि मागे बघतो. तर तिच्या हातात त्याचा रुमाल असतो.
सादिक तो रुमाल हातात घेतो.
सादिक : आभारी आहे.
बाई : असुद्या.
आभा : तिकड बघ कुणाला काय पाहिजे.
ती निघून गेली. सादिक निघून गेला.
तासाभराने...............
जेवनाची सुट्टी झाली. ती जेवायला बसली. खाऊन पिऊन असलेली ती वाटत असली तरी तस नव्हत. तस आणि तेवढ तीच खाण नव्हतच. खाऊनच माणूस जाड होतो हा समज आहे लोकांचा पण तो मला गैरसमज वाटतो. आणि तिच्याबाबतीत हि तेच होत-होत. तिला टेन्शन इतके होते कि त्यात तिला जेवण कमी जायचं आणि त्याचा शरीरावर असा काही परिणाम झाला कि न खाता पिता पण ती तशी वाटत होती. हा पण ती जाड मुळीच नव्हती. जी होती ती बरोबर मापाची होती. ती तिथ एक चपाती आणि आमटी कशीबशी घाईत खाते. आणि पार्सलची पिशवी घेते. त्यात बटाट्याची भाजी भरते. आणि जरा भात दोन चपाती भरते.  शाळेत जाते. पेपरमध्ये गुंडाळून आणलेली ती पिशवी तिची मुलगी तशीच घेऊन वर्गात जाते. आणि आपल्या रिकामा दप्तरातला डबा काढून त्यात चपाती भाजी भरते. इकडे हि घरी येते. घरी नवरा नसतो. म्हणून जवळची कुलूपाची चावी शेजारी देऊन जाते. पुन्हा ती खाणावळीत येते. आणि कामाला लागते. तिची मुलगी वृंदा दुपारच्या सुट्टीत डबा खाते. इकडे तीच खाणावळीत पुन्हा काम सुरु असत. शेतात जस बैल दिवसभर जुंपावा तस ती त्या खाणावळीत गरजेमुळ अख्खा दिवस राबत होती. आणि तिचा नवरा ? तो बसून होता दुकानावर मालक बनून.
भाग : ०३ 
दुकानाचा मालक म्हणजे काय त्याच स्वतःच दुकान नव्हत. तो दारूच्या दुकानात दिवसभर पडून असायचा. पडून ? होय पडूनच. शुध्द असती तर उभारला असता. पण नसेल तर पडणारच ना इथ-तिथ. अशा या बे-मतलब नवऱ्याकडून काय अपेक्षा ठेवणार एक बाई ? समाजाला घाबरून धड नवऱ्याला सोडून लांब निघून जाऊ शकत नाही आणि गेलच तरी त्याच  अडकवण असलेल त्याच मुल ? त्याला तर एक आई कधीच सोडून देऊ शकत नाही. आणि अशा या अडकवण्यामुळे ती कित्येक दिवस चांगल्या दिवसाची वाट बघत ती कसेबसे दिवस काढत होती. दिसायला चांगल असून पण उपयोग नसतो या आजकालच्या जगात. गोर कातड बघून फक्त शरीराचे भुकेले आकर्षित होतात. पण साथ देणारे ? कोणीच नसत. हा जगाचाच नियम आहे. मी काय वेगळ अस बोलतच नाहीये. ती अशा परिस्थतीत जगत, वावरत असली तरी ते तेवढच तिच आयुष्य नव्हत. आजूबाजूचे, कोणी नात्यातले लोक तिचा पिच्छा पुरवत. कोणी तिला सेक्सची मागणी करत, अगदी बिनधास्तपणे, कोणी तिच्या घरी कसल हि कारण काढून दिवसदिवस बसायचं. कधी चान्स मिळतो याची वाट बघत. कोणी त्या एका गोष्टीसाठी आयुष्यभर साथ देण्याची खोटी वचन हि देत. पण तरीही आपल्या मुलीला डोळ्यासमोर आणून तीच भविष्य आणि आपल उरलेलं आयुष्य तिच्यासाठी वापरण्याचा विचार करून ती कित्येक अशा लोकांपासून स्वतःचा बचाव करत होती. नवऱ्याला मात्र याच काहीच घेण देण नव्हत. आज दुपारी ती घरी जाताना तिने मुलीला शाळेत जाऊन डबा दिला. घरी आली. घरी आज नवरा नीट शांत देवासारखा बसलेला होता. तिला बर वाटल. तिने त्याला जेवण वाढून दिल. त्याने हि मुकाट एक घास खाल्ला. आणि ती आता परत कामावर चाललीय बघून त्याने ताट अक्षरशः दारात उधळून दिल. सगळ जेवण फरशीवर दारावर भिंतींवर आणि तिच्या साडीवर पण उडल. तिला त्याने आत ओढलं. दार लावल. आणि खूप मारल. तो त्रास, ते दुःख, ते दुखण सहन होत न होत तोच तिच्यासोबत त्याने प्रणय केला. काय उरल होत शरीरात ? दारू पिऊन पुन्हा मुल होईल असे अंश हि त्याच्यात उरलेले नव्हते. अस असल तरी पुरुषार्थ गाजवायचा काय त्याचा थांबला नव्हता. 
 सादिकला आज उशीर झालेला. त्याने सगळ काम आटोपून खाणावळीचा रस्ता धरला. खाणावळीत येऊन बसला. त्याला वाढल गेल. चपाती खाऊन झाली. आता भात खायचा तो इकडे तिकडे नजरेने एखादा वाढपी किंवा बाई शोधत होता. आणि त्याच्या नजरेस पडली. ‘ती’.
ती आली तिने त्याच्या ताटात बघितल. भात हवा या अंदाजाने तिने जाऊन त्याला भात आणून वाढला. तो तिच्याकडे एक नजर टाकतो. त्याला दिसत तिच्या चेहऱ्यावर उटलेले व्रण. 
सादिक : काय लागलंय का ?
ती : हो ते जरा मगाशी घसरून पडले.
सादिक : तुम्ही डॉक्टरकडे जाऊन या ना. ते कपाळातून उजवीकडून रक्त येतय बघा. 
ती : हो का ? बर. बघते. 
सादिक : या तुम्ही. मी मागतो दुसऱ्याला. 
ती निघून गेली. सदिकच जेवण झाल. तो गेला आभा यांकडे. 
आभा : होत का जेवण आज नीट ?
सादिक : हो. त्या कोण आहेत ?
आभा : कोण ?
सादिक : त्या त्यांच्या डोक्याला लागलय.
आभा : ती होय. तीच नेहमीचच आहे. आठवड्यातून एकदा अशी असतेच तिची हालत हमखास. 
सादिक : का हो ?
आभा : काय सांगू... आता तीच. 

भाग ०४
आभा : तिच्या नवऱ्याचा तिला दारू पिऊन असा मारत असतो. तीच बाहेर लफड आहे अस त्याला वाटत.
सादिक : आहे का ?
आभा : आपल्याला वाटत तसच हव अस थोडीच आहे ? ती फक्त दिसायला चांगली आहे. बाकीचे हे विषय तिच्या डोक्यात पण नसतील. तीच आपल मुलीच शिक्षण त्यासाठी पैसा हवा एवढच तीच ध्येय पण पुरुष कसे हट्टी असतात. स्वतःचच खर. आणि स्वतःच खर करण्यातच पुरुष जात लयाला गेलीय. आणि नाव ठेवली जातात मात्र स्त्रीलाला. काय तर म्हणे कि बाई मुळे बाप्या बिघडतो. पण कोण विचार करत का ? कि इतके वर्ष पिढ्यान-पिढ्या बाई पुढ आली नाही... का ??? या पुरुषांमुळेच ना. असल्या त्यांच्या स्वभावामुळे. हा सगळ्यांसाठी नाही हे वाक्य लागू होत पण अशा स्त्रियांच्या अप्रगत आयुष्याला असले हे पुरुषच कारणीभूत असतात.
सादिक : मग त्या पोलीस केस का करत नाहीत नवऱ्याविरुध्द ?
आभा : सगळे पर्याय करून झाले आता फक्त सहन करण इतका एकच पर्याय तिच्याकड उरलाय. आणि तो तिने निवडला आहे.
सादिक : हम. बर ते मी उरलेले पैसे उद्या देतो. आज पगार होईल. आज हातात ठेवतो पैसे. उद्या देतो.
आभा : काही हरकत नाही. उद्या द्या परवा द्या पण द्या....
सादिक : नाही नाही बुडवणार नाही, मी खाल्लय इथल म्हंटल्यावर.
आभा : ते हि आहेच म्हणा. द्या मग.
सादिकला कॉल आला.
सादिक : हेल्लो अब्बू,... बोलिये.
अब्बू : सादिक बेटा शाम कु, तेरे कु मिलने वो काझी कि बेटी आ रहि है. उससे मिलना. बाते करना.
सादिक : क्यू मिलना है ?
अब्बू : बिना शादी के क्या फकीर बाबा बनेगा ? शादी कि उमर है तुम्हारी बेटा, अबसे देखेगा तो दो साल लगेंगे शादी कु.
सादिक : हा. मिलता हु अब्बू. आपके शब्दो के बाहर हु क्या मै ?
अब्बू : हा नाज है तुझपर. रख्खू क्या फोन ?
सादिक : हा. ध्यान रखना.
सादिक त्या खाणावळीतून बाहेर निघून गेला. संध्याकाळी कामावरून घरी आला. आज त्याला पगार मिळाला. तो घेऊन तो घरी येऊन आवरून बसला. आता जेवायला जायचं म्हणून घराबाहेर निघाला आणि त्याला कॉल आला. त्याने कॉल उचलला तर काझीची मुलगी साजिदा बोलायला लागली. ती त्याला भेटायला आलेली. तो विसरला होता. पण आत्ता आठवण झाली त्याला. भूक लागलेली. आता हि आपला वेळ खाणार आणि आपल्याला खायला काही नाही मिळणार या विचाराने त्याला भेटायचं नव्हत. पण वडिलांसाठी तो भेटायला निघतो. तो निघाला. सारसबागेजवळ ती थांबलेली असते. हा रिक्षातून उतरतो. इकडे तिकडे बघतो. तिचा कॉल येतो. तो उचलून सहज बाजूला बघतो आणि हेल्लो बोलतो. समोर त्याला एक मुलगी दिसते. ती तीच असणार असा अंदाज काढत तो तिच्याकडे जायला निघतो. ती साजिदाच असते.
दोघ सारसबागेत जाऊन बसतात. तिला काहीतरी खायला द्यायलाच हव. मुलाने मुलीला काहीतरी खाऊ घालाव आधी अशी रीतच पडलीय. कारण आधी आई म्हणून आणि नंतर बायको बनून मुलगी हि पुरुषाला खायला घालतच असते हव ते ते पण आयुष्यभर. त्यामुळे आधी जरा खायला घातल तर वाईट काय त्यात ? तो खिशात हात घालतो आणि नवीन करकरीत पाचशेची पगारातली नोट काढून तिला आईसक्रीम घेऊन येतो. तिला एकटीलाच. ते बघून ती त्याला हि घ्यायला लावते. तो नकार देत राहतो. कारण त्याला पगार सेव्ह पण करायचा असतो. एक-एक रुपया महत्वाचा आहे. पण शेवटी तो पण घेतो. दोघ खायला लागले. दोघांच्यात बोलन जरा हि अक्षर नव्हत. मूक-बधीर भेटले असावेत तस काहीस त्याचं वागण आणि तशी ती त्यांची भेट सुरु होती. या क्षणाला.
 आणि तिने विचारल.
साजिदा : मला तुझ्याशी लग्न करायचं आहे.

भाग : ०५
सादिक : माझा आत्ता लग्न करायचा विचार नाहीये.
साजिदा : का ?
सादिक : का म्हणजे कारण खूप आहेत. सांगण्यासारख एकच अस नाहीये.
साजिदा : पण तुझे अब्बू बोलले होते माझ्या पप्पांना. कि आपलच लग्न होणार म्हणून. मी त्या हिशोबाने स्वप्न रंगवत बसले. मी विचार करत बसले. मी माझ्या मैत्रीणीना पण तुझ्याबद्दल सांगून सगळ बसले आणि तू म्हणतोस लग्न करायचं नाही. का ? मी चांगली नाही का दिसत ?
सादिक : मी अस कुठ म्हणालो आहे. आणि नवरा बायको, प्रियकर प्रियासी, एखाद मुल आणि त्याची आई या तिन्ही नात्यात सौंदर्य महत्वाच नसत आणि नसावच. कारण या तीन नात्यात आपण भावनिक प्रेमात असतो. भावनिक एकमेकांत गुंतलेले असतो. सहवास, स्पर्श, ऐकून घेण्याची मनसोक्त बोलण्याची पद्धत हे सगळ या नात्यात असत आणि हे सगळ इतक सुंदर आहे कि मला नाही वाटत कि त्यात आपण आपल्या साथीदाराची आणि आपल सौंदर्य यावरून फरक स्पष्ट करत बसावा.
साजिदा : मग ?
सादिक : माहित नाही का पण मला नाही होत इच्छा इतक्यात लग्न करण्याची. आणि नोकरी लागून आत्ताच मला सहा महिने झालेत. हि नोकरी सोडून मी दुसरी बघणार आहे. आपल लग्न झाल तर जबाबदारी वाढेल. ती मी घेईन. पण मनाविरुद्ध काम करून नोकरी करावी लागेल. मला तस नको आहे. मला नाही आवडणार तस काम करायला आणि याच वागण्याचा माझ्या कामावर परिणाम झाला आणि माझी नोकरी गेलीच तर ? मी काय तुला अस हलाखीत नाही ठेवू शकत. त्यामुळे एक सांगतो. तू नको माझ्यासोबत लग्नाचा विचार करू. हा नशिबात असेल आपल्या, अल्लाह मेहरबान झाला तर होईल न आपल लग्न पण आत्ता हा विचार नको. माहित आहे मला. आपले अब्बू एकमेकांचे मित्र आहेत. आपण लहानपणी एकत्र खेळलो आहे. पण म्हणून हि जवळीक लग्न करूनच टिकवता येईल अस नाही. समजतय का तुला माझ बोलन ?
साजिदा : मी पप्पांना सांगते. मला सादिक नाही आवडला.
सादिक : अस का बोलतेस ?
साजिदा : हम. उगीच आपल्या दोघांवर प्रेशर येणार घरातल्या लोकांच. त्या प्रेशर खाली आपण एकमेकांचे होऊ घरच्यांसाठी पण आपण एकमेकांचे होऊ शकणार नाही. कधीच.
सादिक : अगदी बरोबर.
साजिदा : आणि हो कधी वाटल. दोन वर्षात या कधी तर मला सांग. माझ दोन वर्षा नंतर लग्न लावणार आहेत. तुला वाटल किंवा कोण नाही भेटल तर सांग मला करू आपण लग्न.
सादिक : चालेल. thanks. समजून घेतलस मला त्याबद्दल.
साजिदा : हम. एक विचारू ?
सादिक : काय ?
साजिदा : तू एंगेज आहेस का कुणासोबत ?
सादिक : अजिबात नाही.
साजिदा : नक्की न ?
सादिक : हो नक्कीच. विषयच नाही.
साजिदा : निघायचं ?
सादिक : ऐक न घरच्यांना नको अस सांगू मी तुला पसंद नाही वैगरे. उगीच वेगळच काही वाटायच तुझ्या पप्पांना आणि माझे अब्बू मला बोलतील कि मी तुला नाकारलं आहे वैगरे. सो..
साजिदा : ते मगाशी मला वाईट वाटल म्हणून मी तस बोलले. मी सांगेन आम्हाला वेळ द्या. ठीक आहे. ?
सादिक : हो.
दोघ निघाली. सदिकने तिला रिक्षामध्ये बसवलं. तो हि बसला. तिला घराजवळ सोडायचं या हिशोबाने त्याने तिला तिचा पत्ता विचारला. तिने तो सांगितला रिक्षा तिकडे निघाली.
साजिदा : ऐक ना ?
सादिक : काय ?
साजिदा : लग्न नाही निदान आपण भेटू तरी शकतो न ?
सादिक : काहीच हरकत नाही. भेटत जाऊ.          

        


#या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत.

3 टिप्पण्या

  1. घेऊन आलो आहे पुन्हा एकदा एक अशीच जातीच्या पलीकडची आणि विचारात हि न येणारी अशी एक प्रेम कथा. जास्तिक जास्त शेअर करा. आपल प्रेम आशीर्वाद मिळत आहे ते असच राहू द्या.
    -अजिंक्य अरुण भोसले.

    उत्तर द्याहटवा