हर एक महादेव...!


कृत्तिकासति

कृत्तिका : आज खूप फिरलो आपण सति. घरी जायला हव आता लवकर.
सति : थांब गं. हे अस बाहेर आल कि निसर्गाच रूप बघून नाही जावू वाटत मला घरी. थांब काहीवेळ.
कृत्तिका : अग तुझ अगदी बरोबर आहे सति आणि तुझ्यासोबत वेळ असा व्यतीत करायला आम्हाला ही आवडत. पण आता संध्याकाळ होत चाललीय. सहा वाजायला आलेत. ध्यानात आहे ना तुला सात वाजता पूजा असते. प्रजापती महाराज तुला नाही पण आम्हाला नक्की विचारातील उशिरा येण्याच कारण. मग तेव्हा आम्ही काय सांगायचं त्यांना ?
सति : काही नको सांगू. असही माझे वडील माझ्यावर खूप प्रेम करतात इतक प्रेम दुसरे कोण कुणी या जगात कुणावर करत नाही. त्यामुळे ते मला आणि माझ्यामुळे तुम्हाला ओरडणे शक्यच नाही.
कृत्तिका : तरीपण आपण लवकर निघालेलच बर.
दुसरी कृत्तिका : हो ना. चल सति हव तर आपण उद्या येऊ इथेच परत.
सति : ए कसली गं घाई तुम्हाला ? मी जात नाही आणि तुम्ही जाताय.
कृत्तिका : बर थांबू आपण सतिसाठी.
त्या तिघी हि त्या वनात दगडी कट्ट्यावर बसल्या. उजवीकडे आणि डावीकडे कृत्तिका आणि मध्ये सतिसाठी जागा उरलेली असते. ते ओळखून सती बसते. ते वन अगदी सुंदर होत. सगळीकडे हिरवाई. पायाशी माऊशार आणि एकसारखं गवत. आजूबाजूला उडणारे भुंगे आणि रंगीत फुलपाखर. बुडलेला सूर्य पण तरी प्रकाश होता. आकाशात केशरी निळे पांढरे ढग होते.
कृत्तिका : हे बघ सति आम्ही दोघी थांबलोय तुझ्यासाठी पण जास्त वेळ नाही बर का.
सति : हा.
कृत्तिका : एक विचारू का सति तुला ? म्हणजे तुझी परवानगी असेल तर.
सति : हो नक्कीच. आणि तू परवानगी काय मागतेस गं ? मी तर तुझी मैत्रीण आहे ना. परवानगी तुम्ही कधी मागायची नाही मला आणि मी हि तुम्हाला मागणार नाही. मी राणी आहे तुमच्यासाठी फक्त महालात. ते पण वडिलांसमोर. त्यांच्या माघारी अस एकांतात मी तुमची मैत्रीण आहे. बर काय विचारत होतीस ?
कृत्तिका : नको जाऊदे.
सति : ए काय ग अस ? विचारू का म्हणतेस वर परवानगी पण मागतेस. आणि मी परवानगी दिली तर विचारायचं टाळतेस. इतकी दूरची आहे का मी कि तुला आता मला काय विचारताना इतक दडपण येतय ?
कृत्तिका : नाही ग. मला बस्स विचार आला आत्ता, कि तू एक राजकुमारी आहेस. तुझ्याकडे सौंदर्य आहे. तुझ्याकडे सगळ काही आहे. जे नाही ते तुला प्रजापती महाराज आणून देतात. तरीही तुला कशाचा हेवा नाही. पण मी तुला लहानपणापासून बघतेय. तू अशी या वनात किंवा इतरत्र कुठेही बाहेर फिरयला आलो कि तू सामान्य आमच्यासारखी मुलगी होतेस. म्हणजे राजवाड्यात असताना कुणी तुझ वावरण बघितल तर तो तुला बाहेर बघून चकवा खाईल. एका मुलीची पौंगड अवस्थेत जशी बालिश-चंचल वृत्ती होते तशीच तू बाहेर आलीस कि मला तू अशी चंचल वाटतेस. या इथल्या झाडांना, पक्ष्यांना अस काही तू बघतेस कि मला काहीच समजत नाही. पण एक कळत कि जस एखाद बाळ रांगत-रांगत जरास धरत-धडपडत उभ राहत आणि आईकडे ते चालत जात आणि हे सगळ त्या बाळाची आई डोळ्यात पाणी आणून बघत असते. कारण ते बाळ रांगत असताना तिला माहित असत कि ते बाळ आता चालणार आहे. अगदी तसच तुला हि या झाडांकडे पक्ष्यांकडे बघून माहित असत कि कोणता पक्षी कुठे राहतो. कोणत्या पक्ष्याला आता कधी पिल्ल होणार आहेत आणि बरच काही. पण मला एक कळत नाही तुला हे सगळ बघून काय मिळत ते तुझ तुलाच ठाऊक.
एक राजकुमारी म्हणून आणि प्रजापती महाराजांची लाडकी कन्या म्हणून तुला संरक्षणासाठी कायम राजवाड्यात आत रहाव लागत. त्यामुळे बाह्य स्वातंत्र्य तुला तस कमीच मिळत. अस तुला आठवड्यातून एकदाच बाहेर यायला मिळत. त्यामुळे तुला जगाबद्दल असलेल आकर्षण साहजिकच आहे. पण मला वाटत कि महाराजांबद्दल जितक तुला प्रेम आहे त्याहून जास्त तुझ्या मनात प्रेम-जिव्हाळा या निसर्गाबद्दल आहे. सति, आता तू मोठी झाली आहेस. कळती झाली आहेस. इथल्या राजवाड्यातून दुसऱ्या राजवाड्यात जाशील. इथ तू पितृ छायेत आहेस. म्हणून निदान एका आठवड्यातून तरी तुला बाहेर जायला मिळत आहे. पण तिथे कायम आतच महालात बसाव लागेल. तुझी इच्छा तुझी स्वप्न आणि हा फिरण्याचा छंद बाजूला ठेवून तुला संसार सांभाळावा लागेल. मग कस होणार तुझ ? काय करणार तेव्हा तू ? आणि आता महत्वाच हे विचारायचं होत मला कि तुझी काय अपेक्षा आहे तुझ्या होणाऱ्या नवऱ्याकडून ?
इतका वेळ गप्प-शांत बसलेली सति आता ताठ बसली.
सति : लहानपणापासून एकच वाटत आलय मला कृत्तिका. मी तुमच्यासारख्या साधारण वर्गात जन्माला आले असते तर मला हि हे जग हव तेव्हा हवा तेवढा वेळ बघायला मिळाल असत. तुला सांगू , लहानपणी एकदा मी, बाबा आणि आई एका लग्नसभारंभाला गेलो होतो. बाबांना खास निमंत्रण होत दुसऱ्या राज्यात. आणि मित्र राज्य असल्यामुळे आम्ही तिथे गेलो होतो. बाबांनी निमंत्रण स्वीकारलं. मी तेव्हा तशी लहान होते. त्या भव्य मंडपात तिथ सजावट केलेली. मंत्र उच्चारण सुरु होत. कैक शेकडो ब्राम्हण तिथे होम करून भोवती बसलेले होते. त्यांचा तो एक सुरात येणारा मंत्राचा आवाज कानाला कानठळ्या मारत होता. सर्व निमंत्रक एकत्र बसलेले. मला बाबांना आणि आईला खास पुढे बसवलेल. आणि मागे सर्व जण. त्या मंडपाच्या मध्यभागी लोकांच्या डोळ्याच्या रेषेत एक दगडी कट्टा होता. ज्यावर फुलांच्या माळांनी सजवलेलं. कट्ट्यावर जाणाऱ्या चार पायऱ्यांवर उंची किमतीच्या मखमली पायघड्या अंथरल्या होत्या. कट्ट्यावर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या पसरवून पसरलेल्या. त्या कट्ट्याच्या मधोमध पितळेचा जाड यज्ञकुंड पेटवत ठेवलेला. इतकच आठवतय मला. त्या कुंडाच्या दोन्ही बाजूला सर्वाना दिसतील अशा स्थिती चांदीच्या पाटावर वधु-वर बसलेले. एक भटजी ब्राम्हण लोकांकडे तोंड करून आणि एक पाठ करून बसलेले.
लग्न झाल. तो सगळा सोहळा बघून मला खूप मजा वाटली. कितीशी होते मी ? काय कळत नव्हत मला. पण एक गोष्ट माझ्या मनात आली कि, माझ्या बाबांनी सुद्धा माझ्यासाठी असाच सोहळा आयोजित करून सर्व राज्याला बोलावून सुंदर वातारण निर्माण करून सोबत पंचपक्वान्न रयतेला वाटून सोहळ्याची सांगता करावी. मी तिथेच त्या मंडपात माझ्या जागेवरून उठून बाबांजवळ गेले आणि हि कल्पना त्यांना सांगितली. बाबांना माझ बोलन ऐकून कौतुक वाटल. त्यांनी मला उचलून त्यांच्या डाव्या मांडीवर बसवलं आणि मला सांगितल कि या सोहळ्याला लग्न किंवा विवाह अस म्हणतात.
कृत्तिका : काय ? म्हणजे ते लग्न आहे हे हि तुला माहित नव्हत ?
सति : नाही ना. सांगते काय मी लहान होते. मला काहीच कळत नव्हत. मग बाबांनी सांगितल कि हा लग्न सोहळा मुलगा किंवा मुलगी वयात आल्यावर करतात. मला तेव्हा नाराजी वाटली. पण त्या मनात ठेवलेल्या स्वप्नाला मी अजून जपून ठेवलय आणि आता मी अखेर वयात आले आहे.
दुसरी कृत्तिका : म्हणजे याचा अर्थ असा कि तुला असच लग्न करायचं आहे तर. पण हे झाल लग्नाच तुला साथीदार कसा हवा ?


सति : मला लग्न अशा वराशी करायचं आहे जो माझ्यासोबत माझ्या लग्नाला त्या दगडी कट्ट्यावर माझ्यासोबत सात फेरे घेईल. माझ्या गळ्यात फुल माळ घालेल आणि तिथून पुढे शेवट पर्यंत माझ्यावर खूप प्रेम करेल. खरेतर मला काहीच नको माझ्या आयुष्यात. लहानपणापासून एकच माझ स्वप्न होत कि मला अगदी तसच लग्न करायचं आहे. त्यासाठी मी महालात बसून का होईना पण दिवस घालवले. लवकर मोठ होण्यासाठी. आणि तेही स्वप्न पूर्ण होईल या साली बहुदा.
कृत्तिका : मग काय एकदाच लग्न झाल कि तू त्या राजबिंड्यासोबत त्याच्या महालात सिंहासनावर शेजारी त्याची राणी बनून राहशील. बाबा देतात त्याहून जास्त प्रेमसुख तो तुला देईल.
दुसरी कृत्तिका : मजा आहे बाबा एका राजकुमारीची.
सति : ए चल ग अस काही नाही. उलट इथ मिळत असलेल्या स्वातंत्र्याच्या बदल्यात मी अजून जास्त स्वातंत्र्य मी राजकुमारकडून मिळवून घेईन. खूप भ्रमंती करेन. जेवढ बघता येईल तितक जग फिरून बघेन. वरापेक्षा जास्त वेळ मी निसर्गसोबत घालवेन.
कृत्तिका : ( हसत ) मग तोपर्यंत राजकुमार काय करणार ? म्हणजे तू घरी येईपर्यंत.
सति : हे मिळवलेल स्वातंत्र्य मी माझ्या होणाऱ्या वरासोबतच व्यतित करेन. मी त्याला निसर्गातल्या काही गोष्टी शिकवेन काही त्याच्याकडून शिकेन. निसर्ग जिथे-जिथे सुंदर रूप घेऊन वसला आहे तिथ त्याला घेऊन जाण्याचा हट्ट मी करेन आणि माझ्यासारख्या सुंदर वधूचा हट्ट नक्कीच कोणताही वर पुरा करेल.
कृत्तिका : छान. सति तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत.
दुसरी कृत्तिका : बर चला आता सात वाजायला आलेत. अंधार पडत आलाय. पुजेची तयारी सुरु झाली असेल.
त्या तिघी उठतात आणि राजमहालाकडे जायला निघतात. अंधारलेल आहे सगळीकडे. सूर्य कधीचाच बुडला आहे. आणि उरले सुरले प्रकाशित ढग हि आता डोंगरामागे जायला निघाले आहेत.
पूर्ण अंधार झाला. आणि दिव्यातली वात पेटली. सति आणि कृत्तिका राजमहालात पोचल्या आणि पूजा सुरु झाली.           


तलफ.

वर करड्या-निळ्या ढगांनी भरलेलं आकाश. खाली मोकळा मार्ग. विस्तीर्ण जमीन. उजव्या बाजूला शांत वाहती नदी. चकचकीत निळीगार नदी आत्ता मात्र या वातावरणात काळीमिट्ट झालेली. पाण्याच्या आवाजावरून वाटत होत कि इथ नदी आहे. बाकी द्रुक पुरावा असा कोणता नव्हता. डावीकडे मोकळीक होती. पण तिकडच हि काही दिसत नव्हत. वाटेवर कोणी चीटपाखरू नाही. वाऱ्याचा येणारा आवाज फक्त. आणि अशात धाप टाकत चालत असताना पायात काही येणार नाही किंवा आल तरी त्यातून सावरत घेण्यासाठी पाय सावधगिरीने टाकत त्याचं चालन सुरु होत. पुढे खूप चालत गेल्यावर आग दिसली. ती शेकोटी असेल असा विचार आला. कारण आग कमी होती आणि त्यांच्यापासून लांब पण नव्हती. जवळ गेल्यावर दिसल ती चिता होती. एक चिता पण तीही विझत आलेली. थोडीशी आग आणि जास्त धूर त्याचा वास आणि त्यातून वाऱ्यासारखी पसरलेली ऊब त्यांना आवडली. अशीही थंडी होतीच. मग ते तिथेच बसले. काळ्यामिट्ट अंधारात त्या चितेजवळ बसून त्यांनी ऊब घेतली. पण तरी थंडी हि बोचतच होती. मग उजवा हात त्या विजलेल्या चितेच्या भागात घालून त्यांनी कोमट राख कपाळाला लावली. काय होत मनात त्यांच्या ठाऊक नाही पण त्यांनी हि अशी राख तीही चितेतली कपाळाला लावली. लागलेली राख कपाळाला त्यांच्या धरून राहिली आणि उरलेली कपाळ सोडून नाकावरून खाली ओघळत सांडली. मग पुन्हा थोडी राख घेऊन दोन्ही हातात समान धरून दोन्ही गालाला फासली. हातातली उरलेली छातीला लावली. मग अजून जराशी राख घेऊन हाताचे गुणिले चिन्ह करून दोन्ही दंडाला राख लाऊन तसेच हात दोन्ही मनगटापर्यंत आणले. अंधारात आत्तापर्यंत फक्त चिता दिसत होती. आणि त्या प्रकाशात सावळे रंगाचे ते आता करड्या रंगाने झळकत होते. त्यांना काहीतरी जाणवल. आणि त्यांनी वर बघितल. वरच काय घेता आजूबाजूला ते काही दिसत नव्हत पण चुकून नजर वर गेली आणि जोराने पाण्याचे थेंब त्यांच्या तोंडावर पडले.

त्यांनी पटकन दोन्ही हाताच्या मुठीत घट्ट राख धरली आणि ते उठले तोच जोरात पाऊस सुरु झाला. ते आता माघारी निघाले. मोठी-मोठी पावलं त्या अंधारात अंदाजाने टाकत असताना पाऊस वाढत चाललेला. चेहऱ्यावरची राख सगळी पाण्यासोबत ओघळली. केसं ओलीकिच्च झाली होती. हात ओले झालेले पण मुठीतली राख मात्र कोरडी-दमट झालेली. ती पुन्हा ओल्या चेहऱ्यावर लावली. आणि पायासोबत हात झपाझप टाकत त्याचं चालन सुरु झाल. पण किती दूर आलोय हे त्यांना कळत नव्हत. पुढे गेल तरी भिजणार आणि मागे आल तरी भिजणार. त्यांनी काहीतरी विचार केला. थांबलेली पावलं मागे वळली. पुन्हा त्या चितेकडे. चिता विजलेली. निखारे विजण्याचा आवाज करत प्राण सोडत होते. त्यांनी आजूबाजूला बघितल मिणमिणत्या प्रकाशात त्यांना चितेसाठी आणलेल्या लाकडातली तीन लाकड उरलेली दिसली. त्यांनी ती व्यवस्थित अंदाजाने एकावर रचली. कमरेला लावलेल्या कपड्यातून त्यांनी चिल्लम काढली. नशिबाने उरलेल्या एका जिवंत निखाऱ्याला एका टोकदार दगडाने उचलून त्यांनी चिल्लम पेटवली. दगड आणि मृत निखारा पायाशी टाकला. आणि एक झुरका घेतला. पाऊस थंड सुरु होता. तसे त्यांचे डोळे मिटले गेले. अगदी एकच क्षण अगदी अंगात गर्मी तयार झाली आणि अंगावर काटा आला. उजव्या हातात चिल्लम धरून डाव्या हाताने केसाची जट सोडली. ओलीकिच्च केसं पाठीला टेकली आणि अजूनच थंडी वाढली. मग चिल्लम तोंडात धरून झुरका घेण सुरु झाल. डाव्या हाताला चिल्लमच्या वर धरलेल पावसापासून वाचवण्यासाठी. झुरके घेण सुरु होत. गांजा संपत आलेला. नशा चढत चाललेली आणि यात कधी पाऊस कमी झाला त्यांना कळालच नाही.
     

महादेव.

आज खूप दिवसांनी महादेवांनाला कंटाळा आल्यासारखं वाटत होत. सतिशी बोलून जरी इतरवेळी मनाला शांती मिळत असली तरीसुद्धा या शरीराला गांजा ओढूनच अधिक शांती मिळत. त्या नशेनेच तर हे शरीर आणि मन मोकळ व्हायचं. सति तिच्या कामात व्यग्र होती. महादेव घराबाहेर पडले. सतिला भनक लागली. मागून लागलीच सति आली.
सति : कुठे निघालात ?
महादेव : आलोच जरा रानातून फेरफटका मारून .
सति महादेवाकडे बघत होती. महादेव पाठमोरे होते. सतिने त्यांना आपल्या टपोऱ्या पाणीदार डोळ्यांनी नीट निरीक्षण करून बघितल. महादेव स्तब्ध उभे होते पण त्यांचे हात एका विशिष्ठ लयीत थरथरत होते. अस महादेवाचं हात थरथर कापण सतिने या आधी हि खुपदा बघितल होत. तिला त्यामागच कारण सुद्धा माहित होत.
महादेव गांजा ओढायला जात होते. त्यांना तलफ आलेली. गांजा ओढायची वेळ निघून गेलेली. आणि म्हणूनच त्यांच्या शरीराने त्यांना आठवण करून देण्यासाठी हि हाताची थरथर सुरु ठेवलेली. सतिला महादेवाचं अस नशा करण आवडत नाही. पण ते त्यांना बोलून दाखवण हि तिला जमत नाही. मग काय मनातल मनातच ठेवून ती इतकच बोलली.
सति : लवकर या.
महादेव तिला काहीच प्रतिउत्तर न देता झपाझप पावलं टाकत रानाच्या दिशेने निघून गेले. एखाद किलोमीटर चालल्यावर तोच तो ओळखीचा वास त्यांना आला. तो गडद दर्प उत्तरेकडून येत होता. महादेव त्या वासाच्या दिशेने गेले. तिथे गांजाची छोटी-छोटी झाड त्यांना दिसली. त्यांनी त्यातली थोडी पान तोडून आपल्या कमरेला लावलेल्या बटव्यात ठेवली आणि काही हातात धरून ते बसायला जागा शोधू लागले. एक बसण्याजोगा मोठा दगड त्यांना दिसला. त्या दगडाच्या बाजूला मोठी मोठी झाड होती. टिटवी पक्षांचे आवाज येत होते. एक छोटासा शांत झरा बारीकसा आवाज करत त्या दगडाला घासून उताराने पुढे जात होता. कशाचा हि विलंब न करता महादेव त्या दगडावर मांडी घालून बसले. याकच्या कमरेच्या हाडाची नळी हातात धरून दुसऱ्या हातातली गांजाची पान त्या झऱ्यात जराशी बुडवली. जराशी ओलसर पान झाली आणि तितक्याच वेगाने कोरडी हि झाली. महादेवांनी त्या पानांना दोन बोटांत चोळून त्याची अर्धवट गोळी बनवली. आणि ती त्या याकच्या हाडाच्या नळीत भरली. दोन गुळगुळीत दगडांना घासून त्यातून त्या नळीतल्या पानांना पेटवल. दगड खाली टाकली. आता राहवत नव्हत. हातात चिल्लम आली आणि हात थरथर कापायचे कधीच थांबले.
त्या नळीला तोंडात धरून एक झुरका घेतला. डोळे गच्च मिटले गेले. चेहरा वर झाला. बंद नजर आकाशाकडे गेली. तोंडातून पावसाआधी जमणाऱ्या ढगांप्रमाणे धूर येऊ लागला. डोळे अजून मिटलेलेच होते. त्या झुरक्याची तलफ मेंदूपर्यंत पोचलेली. मेंदूचा आता शरीरावरचा ताबा सुटला काही क्षणापुरता. त्यात मांडी घातलेला एक पाय सुटला आणि खाली पायाचा तळवा थंड झऱ्यात बुडला. अंगावर काटा आला. तो थंडावा मेंदू पर्यंत पोचला आणि महादेवांना जाग आली. त्यांनी खाली बघितल आणि तसाच झऱ्यात पाय ठेवून दुसरा झुरका घेतला.
इकडे सति दारात दिवा घेऊन उभी असते. महादेव आणि तीच लग्न झाल नाही. पण ते एकत्र राहत असतात. त्याच कारण अस कि, पशुपती महाराजांना म्हणजे तिच्या वडिलांना कळत कि, सति प्रेमात आहे. त्यांचा आनंद गगनात मावला नाही. त्यांनी लग्नाची तयारी सतिला न विचारताच सुरु केली पण जेव्हा त्यांना कृत्तिकांकडून समजल कि सति ज्याच्या प्रेमात विचारात आहे तो कुणी राज्याचा राजा-राजकुमार नाही तर एक असा माणूस आहे ज्याला घरदार नाही. काही प्रपंच नाही. त्याला कुणी वडीलधारे नाहीत. त्याच्याकडे धन नाही फक्त एक बैल आहे. आणि एका बागेत कट्ट्यावर झोपतो असा हा माणूस महादेव आहे. आणि तेव्हापासून सतिशी भांडण झाल. आणि सति महादेवाकडे राहू लागली. आणि महादेव तिच्यासोबत कमी एकटेपणात जास्त राहू लागले. सतिला वाटायचं महादेवांना जाब विचारांव त्यांची हि नशा बंद करावी पण त्यांना समोर बघून तिला त्याचं प्रेम, एकत्र घालवलेले क्षण आठवायचे मग तीही विचार सोडून द्यायची. या विचारात असताना दिव्याच्या मंद प्रकाशात महादेव येताना तिला दिसले. तिने दिवा मालवला.   

2 टिप्पण्या