बजी

( image by me )
01
जोरदार पाउस पडत असतो. दुपारीच संध्याकाळ झाल्याचा भास होत असतो. इथ जवळच काय दिसेना मग तर लांबचा विषयच सोडून द्या. अशा या पावसाच्या जोरात मोकळ्या रस्त्यावरून जोरात बजी पळत असतो. त्याच्यामागे तेरा लोक पळत असतात. कुणी हातात खंजीर, भाला आणि तलवार घेऊन पळत असतात. एका लोहाराच्या भट्टीत बजी लपून बसतो. भट्टीत कुणीच नसत. बजी कमरेला लावलेल्या छोट्या गाठोड्यात काहीतरी शोधत राहतो.
ते तर लोक तिथून जातात. त्यांच भट्टीत लक्ष जात पण तिथ बजी दिसत नाही. एक माणूस असतो जो भट्टीत निखारे बाजूला करत असतो. त्याकडे दुर्लक्ष करून ते लोक पुढे निघून जातात. बजी भट्टीतून पळत जाऊन एका ठिकाणी जातो. समोर त्याला तीन लोक दिसतात जे बहुतेक कुणालातरी शोधत असतात. कुणीतरी म्हणजे बहुतेक बजीलाच शोधत असावेत असा त्याला शक आला आणि त्याने मागच्या रस्त्याने जायचा विचार केला आणि तो मागे फिरला. आणि त्याच अंग थंड झाल. श्वास गळ्यातच अडकला. डोळे मोठे झाले. कारण माग एकजण अगदी त्याच्या समोर एक वीत अंतर सोडून उभा होता बजीला पकडण्यासाठी. त्याने कुणाला तरी बोलवायला तोंड उघडल होत तोच बजीने डाव्या कमरेचा खंजीर काढून त्याच्या पोटात खुपसला. पावसाचा आवाज फक्त येत होता बाकीच सगळ शांततेत सुरु होत. त्याने बजीला घट्ट खांद्याला धरल.
बजीने त्याला जवळ ओढून अजून दोन वेळा खंजीर त्याच्या पोटात आत बाहेर खुपसला आणि त्याला ढकलून दिल. त्याच्या पोटात खंजीर तसाच होता अडकलेला. तो माणूस मरून खाली रस्त्यावरच्या पाण्यात पडला. कुणी बघायच्या आत बजी तिथून निसटला. तिथून तो एका घराच्या आत गेला.
इकडे लोकांना खुनाचा वास पावसाच्या मातीसोबत यायला लागला. एक दोन जणांच्या दारात तर त्या मेलेल्या माणसाच रक्त पण वाहत आलेले. एकच दंगा झाला. लोकांनी त्या पावसात भिजत त्या मेलेल्या माणसाभोवती गोल केला. मग मीरअजमल महंमद तिथ आला. त्याने नीटस त्या मेलेल्या चेहऱ्याकडे बघितल. आणि आपल्या साथीदाराला विचारल,
मिरअजमल : ये तो बिरुलद्खान् है ना ?
साथीदार : जी हुजूर.
मीरअजमल : किसने मारा होगा ?
साथीदार : कोई दुश्मन वगैरा पैदा किया होगा.
मीरअजमल : वो तो हमे भी लगता है लेकीन किसकि इतनी मिजाज कि वे बिरूदलखान को मार सके ?
त्या गर्दीतला एक माणूस पुढे येत,
शिंदे-पवार : हुजूर, परवानगी असेल तर एक सांगू शकतो का ?
मीरअजमल : जी ?
शिंदे-पवार : एक माणूस मी इथून पळत जाताना मगाशी बघितला आहे.
मिराअजमल : तो फिर ? बारीश है चलके थोडी कोई चलेगा ?
शिंदे-पवार : नाही हुजूर. तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे पण ते तथ्य-सत्य नाही.
मीरअजमल : मतलब ?
शिंदे-पवार : त्याच्या अंगरख्याचा पोटाचा भाग आणि तळहात रक्तात माखलेला. आता बोला ? आता तर पावसाच नाही न तुम्ही कारण देणार ?
मीरअजमल : सही बता रहे हो ?
शिंदे-पवार : जी हुजूर, खोट बोलणाऱ्याची जीभ झडल...
मीरअजमल : नाम क्या है तुम्हारा ?
शिंदे-पवार : इथलाच आहे मी. शिंदे-पवार नवान ओळखतात मला इथ.
मीरअजमल : कबुली द्यायला याव लागेल दरबारी.
शिंदे-पवार : हो येणार ना. अशा खुनशी लोकांच्या मुसक्या आवळल्या गेल्याच पाहिजे.
साथीदार : हुजूर, ( त्या मेलेल्या बिरूदलखानच्या पोटातला खंजीर काढून नीट बघत ) ये तो मुसलमानी बनावट कि है.
मीरअजमल : मतलब खुनी भी हमारा हि गद्दार है.
ते दोघ जातात. मागून पाच माणसे येतात आणि बिरूदलखानाला एका बैल गाडीत ठेवतात. त्याच रक्त वाहून जातच असत. पाउस थांबायचं नाव घेत नाही. त्याला घेऊन ते एका पहाडावर पुरायला जातात. जमलेली गर्दी सगळी विरून जाते. आणि शिंदे-पवार पण निघून जातो.
दुसऱ्या दिवशी मीरअजमल पठाणला कालच्या ठिकाणी पाठवतो. तो तिथ येऊन शिंदे-पवारकडे येतो. घराच दार बंद असत. आज पाउस उघडलेला. पण ऊन नव्हत. ढगाळलेलच होत वातावरण. पठाण दार वाजवतो. दार उघडल जात.
पठाण : शिंदे-पवार इथच राहतो का ?
बाई : का काय काम आहे ?
पठाण : विचारल ते सांगायचं.
बाई : नाही. इथ शिंदे-पवार नाही राहत कोणी. हे तर कांबळेच घर आहे.
पठाण : खर बोलतीस का ?
बाई : मी का खोट बोलू ?
पठाण : मग शिंदे-पवार इथ कोण राहत ?
बाई : हुजूर, महारांच्या वस्तीत येऊन मराठ्याची नाव विचारता ?
पठाण : म्हणजे ?
बाई : हि वस्ती मराठ्याची नाही आणि इथ कोणी पण शिंदे-पवार नाही.
पठाण तिथून तावातावाने निघून गेला. बाईने त्या दार लावल. पठाण थेट मीरअजमलच्या दरबारात गेला.
मीरअजमल : क्या हुआ ? किधर है वो आदमी ?
पठाण : वो गद्दार शिंदे-पवार नाही था.
मीरअजमल : मतलब ?
पठाण : आपको फसाया है. वहा तो कोई भी उस नाम का आदमी नही रहता.
दोघे हि विचारात आणि तितक्याच चीड भावनेत पेटले.
इकडे बजी घरी हिरव्या मिर्चीच पिठलं आणि भाकरी खात होता. तेवढ्यात एकजण तिथे आला. बजी त्याला जेवायचा आग्रह करतो पण तो नकार देतो. मग बजी जेवत असताना त्याच्या पुढे बसून बाळजी तो बोलू लागतो.
बाळजी : कुठ होता रे तू काल ?
बजी : वर्दीवर होतो. का ?
बाळजी : गरज होती तुझी मला.
बजी : माझी पण गरज होती राजाला.
बाळजी : कसली ?
बजी : बिरुद्खालन आलेला चालून इकड. संपवला त्याला.
बाळजी : एकट्यान ?
बजी : हो मग काय ? तो एकटा आला मी पण एकटाच होतो. आणि अवघड असत का कुणाच जीव घेण ?
बाळजी : हो मग तुला काय खेळ वाटतो का ?
बजी : जीवाशी खेळून खेळला तर खेळ काय मरण भारी वाटत. आणि राजासाठी हा खेळ खेळायला मागपुढ बघत नसतो मी.
बाळजी : मग मेला का खान ?
बजी : माझ रूप बघायला पुन्हा पुढचाच जन्म घ्यावा लागतो असल्या खानांना.
बाळजी : हे बघ तू आता बाहेर पडू नकोस..
बजी : का ?
बाळजी : तेच सांगायला आलोय. मला महित नव्हत त्यामागच कारण पण आता स्पष्ट झाल. कुणाचा तरी खून झालाय आणि मीरखानने लोक सोडलीत त्याचा मारेकरी शोधायला. आणि त्याचा मारेकरी मुस्लीम आहे असा त्यांचा संशय आहे.
बजी : असू दे कि. मी कुठ मूसलमान आहे ?
बाळाजी : पण कशाला स्वतःच्या नाटकाची परीक्षा घ्यायची ? तू इथेच राहा आज तरी. त्यांना त्यांचा गुहेगार सापडला कि मग पड तू बाहेर.
बजी : ते मुसलमान नाही शिंदे-पवार शोधतायत.
बाळाजी : कस काय ? आणि हे तुला कस माहित ?
बजी : सांगतो एवढे घास संपु देत मला.


02
बजीच जेवण झाल. त्याने ताट मोरीपाशी सरकवल. कळशीतल पाणी पेल्यात घेतल. बाळजीला ओलांडून तो बाहेर गेला आणि दारात बाजूला हात धुतला. हात धुताना बजीच्या लक्षात आल काहीतरी. म्हणजे काल सकाळी हातात घातलेली अंगठी आज सकाळी आत्ता बोटात नाही... मग गेली कुठ ? बजीला आता काय ठीक वाटत नव्हत. पुरावा माग राहिला कि काय असा त्याला विचार आला. त्याने पाणी पण प्यायल नाही. हात धुवून तो पेला आत घेऊन आला. बाळजी तो पर्यंत उठून उभा राहिलेला. बजी आत आला. त्याने मुसलमानि पठाणी पगडी डोक्याला बांधली. आणि मोकळ्या हनुवटीवर जड भारदस्त कुरळी दाढी लावली.
बाळजी : कुठ चालला ?
बजी : काम फत्ते केल मी पण गडबड झालीय.
बाळजी : कसली मला तरी सांग मी पण येतो हव तर मदतीला.
बजी : नाही नको. तिथ गडबड झाली तर आपली जान जाईल. जे काय ते मी निस्तरतो. तू थांब इथ मी आलो जाऊन.
बाळजी : नकोच का येऊ मी ?
बजी : नको. ( आवाज बदलून ) आता हुं जनाब में.
बजी निघून गेला. बाळजी दाराला कडी लावून निघून जातो. बजी काल खून झालेल्या ठिकाणी आला. रस्त्यावर माणसांची वर्दळ होती. काहीतरी शोधल्यासारख तो रस्त्याकडे एकटक बघत चालत होता. एवढीशी अंगठी ती दिसणार थोडीच होती ? त्यात ती सोन्याची. मग तर कोणी तिथच पडून देणार होत का ? काहीवेळ शोधून पण न मिळाल्यामुळ बजी माघारी फिरला. एका मिठाईवाल्याच्या दुकानापाशी येऊन त्याने जवळचे दोन तांब्याचे होन काढून मिठाई विकत घेतली. तो मिठाईवाला एका कागदात ती मिठाई भरत असताना तिथ एक म्हातारी बाई आली. अंगाने बारीक. कमरेतून वाकलेली. तोंडावर नाक काय ते स्पष्ट दिसत होत बाकीचा चेहरा सुरकुत्यांनी झाकलेला.
बजी तिला बघून दुर्लक्ष करतो. एवढ्यात ती बाई एक सोन्याची अंगठी मिठाईवाल्या समोर धरते.
बाई : याच किती होतील ?
मिठाईवाला : मी सोनार नाही आजे. सोन्याचा भाव इकड होत नसतो. जा पलिकड सोनाराच दुकान आहे.
बाई : मला पैसे नको खायला हवय. हि अंगठी घे आणि मला खायला दे.
मिठाईवाला : कुणाची अंगठी आहे हि ?
बाई : वाटेत घावली.
मिठाईवाला : मग तर नकोच नको मला. तू जा इथून.
बजी : ( मधेच त्याचं बोलन तोडत बोलला ) ती मला दे अंगठी आजे, मी तुला दहा तांब्याचे होन आणि मिठाई देतो.
आणि तसच झाल. ती बाई बजीकडून दहा तांब्याचे होन आणि मिठाई घेऊन गेली. बजीने पुन्हा नवीन दुसरी मिठाई घेतली आणि एक देऊळ गाठलं. शंकराला मिठाई देऊन तो बाहेर आला. देवळाच्या पलिकड एक मोठा तलाव होता. आणि तलावाच्या बाजूल मोकळी पडीक जमीन होती. त्या जमिनीला एकसारखं खोदुन त्यावर चौकोनी कट्टा बनवून त्यावर एक मशीद बांधलेलं होत. अस म्हणतात त्या जागेवर आधी शंकराच देऊळ होत. ते औरंगजेबाने पाडून त्यावर मशीद बांधली. आणि तो राग मनात धरून शहाजी राजाने तलावाशेजारी जागा त्याची होती म्हणून तिथ सुंदर शंकराच दगडात कोरीव मंदिर बांधून घेतल. बजी बाहेर आला देवळातून आणि त्याला बिरुद्लखानची माणस देवळाबाहेर एका मौलवीशी बोलताना दिसतात. असहि बजी मुसलमानी वेषातच होता. तो तिथे गेला. तिथ गेल्यावर समजल कि, बिरुद्लची बायको खूप दुःखी झालीय नवऱ्याच्या खुनामुळे. म्हणून तिने त्याच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून एका मौलवीला बोलावण पाठवल होत. ती लोक गेली. बजीने काहीतरी त्या मौलवीशी बातचीत केली.
बजी तिथून बाजारात निघून गेला. तिथ काही काही सामान विकत घेतल. एक बाहुली हवी होती ती मात्र मिळत नव्हती. ती फक्त काही ओळखीच्या लोकांना मिळत होती. बजी सामान घेऊन घरी आला. एका पेटीत ते सामान लपवल. आणि दाराला कडी लावून निघून गेला. सरळ त्या सकाळच्या मशिदिपाशी जाऊन मौलवीला काही सोनेरी होन दिले. त्या मौलवीने स्वतःजवळची बाहुली दिली. बजी बिरुद्लखानच्या वाड्यापाशी निघाला. तिथ आजूबाजूला गर्दी होती. त्याने आत प्रवेश केला. आत्ताचा त्याचा वेश मागाससारखाच होता फक्त दाढी नव्हती. एकाने त्याला अडवल.
रखवालदार : ओ साहब किधर चले ?
बजी : वो मौलानाजी ने भेजा..
रखवालदार : शु.....क ! शांत रहिये. समझ आया. क्या काम था ?
बजी : जी उन्होने ये गंडा-दोरा मालकीण को पेह्ने के लिये कहा है.
रखवालदार : ठीके. मुझे देदो. में देता हु उनको.
बजी ते देऊन निघून जातो. घरी येऊन एक पुस्तक वाचत बसतो. तोपर्यंत संध्याकाळ होत आली. त्याने पेटीतून समान काढल आणि सोबतीला गरज लागली तर असाव म्हणून पुस्तक घेतल. ती बाहुली पण सोबत होतीच.
तो बिरुद्लखानच्या वाड्यात गेला. तिथ त्याला काहीवेळ थांबायला लागल. त्याला जेवण दिल गेल. ते जेवून मग बिरुद्लची बायको जेवण करून बसली. आणि मग एका खोलीत दोन रखवालदार तालावर घेऊन, बिरुद्लची बायको आणि बजी होते. सगळीकडे अंधार होता त्यासाठी एक मशाल मंद चालू ठेवलेली.
बिरुद्लची बायको आणि तिच्या समोर बजी आणि दोघांमध्ये एक विचित्र बाहुली ठेवलेली.
बजी काही मोठ्या आवाजात मंत्र सुरु करतो. “यफुल्लग काझमी वेग्तीर खान साहेबा, वजफ्फर आली बेतम कुर्मा विशेस बक्षा, या खुदा...” आणि त्याने बिरुद्ल खानाचं नाव घेतल. आणि बिरुद्लच्या बायकोच्या हातात एक लिंबू दिल. त्या लिंबूला काळा बुक्का लावला. आणि तिला विचारल काय करायचं आहे ?
बिरुद्लची बायको : मेरे हुजूर को जिसने भी मारा है उसे मौत तडप तडप के आये. रूह यहा हि भटकती रहे.
बजी : ठीक है. ऐसी मौत मरे के जिंदगी कि दुबार वो ख्वाईश ना रखे. “या मेरे खुदा इलाही बाबा ये बंदा आपको पुकार रहा है, उसकी मदद कि जिये गा. और बिरुद्लकि बेगम को खुश रखना.”
आणि बजी ने पुस्तक उघडल त्यातली बघून एक आकृती काढली. आणि मंत्र उच्चार करून त्या विचित्र बाहुलीला त्या आकृतीवर ठेवल. आणि त्यात एक एक सुई टोचायला सुरुवात केली. बेगम खुश होत होती. सगळी क्रिया झाली. बजी निघाला.
बिरुद्लची बायको : आपको कितना धन दु ?
बजी : धन लिया तो काम कैसे होगा ? खुदा मुझे माफ नाही करेगा.
बजी तिथून निघून गेला. त्याच्या मागावर दोन लोक असल्याच त्याला जाणवल. म्हणून तो घराऐवजी माशिदिपाशी गेला. आणि मशिदीतला मौलवी दुपारीच बजीच्या घरी जाऊन बसलेला.


03
बजी मशिदीत जाऊन झोपला. म्हणजे नुस्त एका कुशीवर पडला. थोड्यावेळाने कुशी बदलायच्या बहाण्याने मागे बघितल तर दोन लोक अजून हि मशिदीबाहेर थांबलेले. मग ते निघून गेले. ठरल्याप्रमाणे नमाजाची वेळ झाली. मौलाना बजीच्या दाराला कडी लाऊन आला. आणि लपतछपत मशिदीत आला. बजीच्या जागी मौलाना झोपला. आणि बजी घरी निघाला. वाटेत त्याला मगाशी होते ते दोन लोक दिसले. बजी एका झाडामागे लपला आणि हनुवटीवरची दाढी काढली. झाडाच्या खाचेत ती दाढी लपवली. खाली पडलेल्या चुनखडकाच्या दगडाने झाडावर त्याने एक रेष काढली. डोक्याला बांधलेली पगडी सोडून ते कापड खांद्यावर घेतल. आणि तो त्या दोन लोकांसामोरून गेला तरी त्यांना समजल नाही. बजी घरी आला आणि झोपला.
सकाळी ऊन पडलेलं. बजी झोपूनच होता. दारावर थाप पडली. झोप मोडली. जरा झोपेत बजी दाराशी गेला. दार उघडल. दारात बाळजी.
बजी : काय झाल ?
बाळजी : त्या तळ्यावरच्या मशिदीतल्या मौलानाला काय केल तू ?
बजी : काय नाही का ?
बाळजी : तो तुझी आठवण काढतोय. चल लवकर.
बजी खांद्यावर कापड घेऊन गेला.
बजी आणि बाळजी तिथे गेले. तिथ खाटेवर मौलाना झोपलेला. त्याच रक्त खाली सांडत होत. गळ्याला घट्ट एक कापड बांधलेलं. त्याचे शेवटचे धीमे श्वास सुरु होते. बजीला बघून मौलाना तोंडाचा आs करतो. बाळजी बजीच्या पाठीला हात लाऊन पुढ ढकलतो. बजी त्या मौलाना जवळ जातो.
तेवढ्यात एक मुस्लीम सरदार त्याला अडवतो.
सरदार : जानते हो तुम मौलाना साहब को ?
बजी : जी नही.
सरदार : तो फिर तुम्हे क्यू याद कर रहे है ?
बजी : माहित नाही हुजूर.
बजी मौलाना जवळ गेला.
मौलाना बोलू शकत नव्हता. मौलाना बजीच्या तळहातावर बोट ठेवतो आणि डोळ्याने बजीच्या मागे बघतो. बजी सहज मागे बघतो. काल संध्याकाळी त्याच्या मागे मशिदीपर्यंत आलेले दोन लोक असतात त्यातला एक तिथ असतो. बजी पुढ बघतो मौलाना डोळे उघडे ठेवून मेलेला असतो. एक मुसलमान पुढे येऊन मौलानाचे डोळे बंद करतो.
सरदार : इस मौलाना को मारके उसके कातीलने तो खुद खुदाको दुखाया है. अल्लाह माफ करे या ना करे मै खुद अब उस कातील को ढूंडने वाला हूँ.
बजी तिथून उठला. कुणाला शक येऊ नये म्हणून तिथे काहीवेळ थांबून तिथून निघून गेला.
संध्याकाळी बजी मशिदीत झोपलेला असतो. दोन लोक बाहेर असतात. बिरुद्लखानची बायकोचा निरोप घेऊन एक घोडेस्वार येतो. मग ते दोन लोक मशिदीपासून निघून जातात आणि तळ्यापाशी काहीतरी बोलतात. आणि ते दोन लोक निघून जातात. घोडेस्वार घोड्याला तळ्यापाशी थांबवून माशिदिपाशी येतो. त्याचं बोलन होईपर्यंत बजी घराकडे निघालेला असतो. आणि मौलाना त्याच्या जागी येऊन झोपतो. बिरुद्लखानच्या बायकोच्या निरोपानुसार केलेली काळीजादू कुणाला कळू नये कारण तो गुन्हा आहे आणि म्हणून मौलाना मारून टाकायच असा निरोप ती एका माणसाकरवी पाठवते. आणि आलेलाच माणूस मौलानाला मारायचं ठरवतो. कारण ती दोन लोक मुसलमान होते आणि एका मुसलमानाने मौलानाला मारायचं ते पाप घेणार नव्हते आणि निरोप घेऊन आलेला माणूस मराठा होता. आणि मग तो आत मशिदीत गेला. त्याने सुरा मौलानाच्या गळ्यावर सफाईतपणे ओढून तो तिथून पळून गेला. आणि मौलाना तिथच स्वतःच्या रक्तात पडून राहिला.
आणि इकड बजी सतरंजीवर निवांत पडून राहिला. बजीला कळाल काल अस झाल असाव असा बजीला विचार आला आणि तसच घडल होत. बजीच आता अवघड होत. आता फक्त एक कळायचं होत कि तो मुसलमानी सरदार कुणाला पाठवतोय.
दिवाण-ए-खास मध्ये गोंधळ सुरु होता. सगळ्यांच्या तोंडावर बिरुद्लखान हा एकच विषय सुरु होता. कसा ? कुणी ? आणि का ? मारलं असेल त्याला. इतक्यात त्यांचा बादशाह तिथ पेश झाला. सगळी शांतता एका क्षणात झाली.
बादशाहचा एक खास माणूस होता खवासखान. तो त्यांच्या पुढे गेला.
खवासखान : हुजूर-आलमपनाह, भारत के बादशाह...
बादशाह : बस करो तारीफ-ए-छुट मेरी. बस बताओ मेरे वजीर को मारनेवाला कौन है हरामजादा ?
खवासखान : माफ किजीये. मालूम नही आलमपनाह.

तेवढ्यात त्या सरदारांच्या गर्दीतून एक माणूस उठला. आणि तो पुढे येऊन उभा राहिला.
04
औरंगजेब : क्या करने का इरादा है ?
करतलब खान : उसको मै ढूंड सकता हूँ एक मौका दीजिए.
औरंगजेब : जो कोई है उसने दो लोग मार डाले अब क्या तुम मरने जा रहे हो ?
करतलब खान : जी नही जहापनाह. एक तो उसे मारके आऊंगा या फिर उसे जिंदा लाउंगा. बस एक बार भरोसा करके देख लीजिये.
औरंगजेब त्याला खुणावतो. करतलब खान निघून जातो. दिल्लीतून थेट पुण्याला.
पुण्यात आल्यावर करतलब खान बिरुद्लखानच्या खास सरदारांना भेटतो. त्यांच्याकडून बिरुद्ल खानच्या मरणाची माहिती निट माहित करून घेतो. तिथून मग अजून काही लोकांकडून मौलानाच्या मृत्यूची माहिती काढतो. यात कुठेच त्याला धागा दोरा मिळत नाही. एक आठवडा झाल तरी करतलबने कोणतीच कर्तब दाखवली नाही म्हणजे नक्कीच तो मेला असा समज औरंगजेबाचा झाला. म्हणून त्याने एक पत्र करतलब खानाला पाठवल.
‘अगर जिंदा हो तो खबर करना. और दुश्मन को मार सकते हो तो हि वहा रुकना. वरना कोई जरुरत नही उधर रहने कि..’
त्याला उत्तर करतलब खानाने पाठवलं. औरंगजेब तरीही विचारातून मुक्त झाला नाही.
औरंगजेबाचा वरून दबाव वाढत चाललेला आणि घेतलेलं काम पूर्ण करायचं असा पणच करतलब खानाने मनाशी धरलेला. मग त्याने पुन्हा एकदा बिरुद्लखानच्या घरी जाऊन  खानाच्या बायकोशी बोलणी केली. आणि मग त्याला समजल कि, मौलानाला तर तिने मारल होत. म्हणजे एका प्रश्नातून तर तो मोकळा झाला.
पण मग बिरुद्लखानाला कुणी मारलं हा प्रश्न काही सुटायला मार्ग नव्हता. करतलब खान त्याच्या वाड्यात असताना सतत त्याच विचारात होता. जेवण हि त्याच नीट नव्हत. मग काही विचार आणि सहकार्यांशी सल्ला-मसलत करून त्याने असा निष्कर्ष काढला कि, मौलानाचा विषय बाजूला करू आता बिरुद्लखानाचा खुनी शोधायचा. त्याने त्याचा एक गुप्तहेर महादेव याला बोलावल आणि त्याने माहिती काढायला पाठवल.
महादेव गेला. आणि दोन दिवसांनी आला.
करतलब : काय माहिती ?
महादेव : बिरुद्लखान आणि मौलाना दोघांना मारणारा एकच व्यक्ती असावी.
करतलब : कशावरून ?
महादेव : बिरुद्लखानला जेव्हा भरपावसात मारल गेल तेव्हा एक माणूस तिथून पळून गेला आणि त्याच चेहरापट्टीचा माणूस मौलाना मरताना तिथ हजर होता.
करतलब : कशावरून ? आणि मग नाव काय त्याच ? कोण आहे तो हरामजादा ?
महादेव : त्याला बघणारा एक माणूस पुरावा म्हणून मी शोधला आहे. नाव आणि माणूस दोन्ही अजून गुप्तच आहे. पण एक दिवस अजून द्या मी उद्या कळवतो.
करतलब : नक्कीच.
महादेव गेला. आणि एका ठिकाणी जाऊन तो एका माणसाला भेटतो. आणि दुसऱ्यादिवशी संध्याकाळपर्यंत करतलब खान वाट बघत होता. महादेव आलाच नाही. महादेव अट्ट्ल होता गुप्त बातम्या काढण्यात. त्यामुळे महादेव उशिरा का होईना येईल या विचारात करतलब खान बसला होता. बाहेर घोड्याचा आवाज झाला. करतलब खान जागचा उठला. आणि एक माणूस आत आला.
करतलब : काय ?
माणूस : हुजूर महादेव मारला गेला.
करतलब : कुणी मारला ?
माणूस : नीरा नदीच्या किनाऱ्यावर सापडला.
करतलब : बस...बस..... आता मीच जातो. अख्ख पुणे आता उडवून टाकतो.
माणूस : हुजूर. शांत. मला वाटत तो जो कुणी आहे तो एव्हाना पुणे सोडून गेला असेल.
करतलब : खामोश.. मला अक्कल शिकवण्या एवढा तू कोण आहे ?
माणूस : जी.. मी महादेवच्या हाताशी असतो.
करतलब : नाव ?
माणूस : बजी.
करतलब : चल निघ. बातमी गुप्त ठेव.
बजी बाहेर गेला. त्याच्यासोबत करतलब खानाचे तीन लोक त्याच्या सोबत गेले. ते तीनही लोक शिवाजी महाराजांचे होते. हे त्यांना माहित होत करतलब  खानला नाही. बजी एका ठिकाणी घोड्यावरून उतरला आणि एका घरात गेला. इकडे करतलब खानची माणस सगळीकडे शोधाशोध करत होते. बजी आणि महादेव दोघ आपला अवतार बदलतात. आणि ठरल्याप्रमाणे महादेव शिवाजी महाराजांकडे गेला. महादेव मेलाच नव्हता. करतलबला दहशत बसवण्याची बजीची हि एक चाल होती. आणि बजीने आपला मुक्काम आठ लोकांसोबत सातारा रस्त्याकडे वळवला. बजी तिथ थांबला. आणि त्याने एका माणसाकरवी माहिती पुरवली कि, खुनी साताऱ्याला निघाला आहे.
करतलब खान चवताळून उठला त्याने माहिती काढली आणि त्याला समजल खुनी एकटा आहे. म्हणून करतलब खान पन्नास लोकांना घेऊन साताऱ्याकडे निघाला आणि त्याची ती फौज नेमकी बजी आणि बाळजीच्या दारावरून गेली. आणि बाळजीला अंदाज आला. आणि त्याने करतलब खानाला अडवल.
इकडे पहाट झाली तरी करतलब आला नाही म्हणून अंदाज घेऊन बजी पुन्हा पुण्याकडे रवाना झाला. पुण्यात जाऊन हि काहीच समजल नाही. बजी घराकडे वेषांतराच समान न्यायला आला. समान गाठोड्यात भरताना मागच्या घरून रडण्याचा आवाज येत होता. बाळजीची आई आजारी होती. ती गेली असावी या अंदाजाने बजी मागे गेला. पण तिथ करतलब खानची माणस होती. बजी लांबूनच बघायला लागला आणि त्याला समजल बाळजीची आई नाही स्वतः बाळजी मेला होता.
तीन दिवस बजी दुःखात पुण्यातच रोज एक एक वेश करून वावरत होता. आणि तेव्हा त्याला त्याच्या हाताखालच्या सदाशिवकडून समजल कि, करतलब खान पन्नास एक लोकांना घेऊन महादेवच्या मारेकऱ्याला मारायला निघाला होता. आणि तेव्हा बाळजीने करतलबला अडवल आणि त्याने खोटी कबुली दिली कि, त्याने महादेवला मारल. आणि म्हणून करतलबने त्याला जागीच मारून टाकल. आणि म्हणूनच करतलब पुढे पुणे सोडून साताऱ्याकडे गेला नाही.
सदाशिव : आपल्या या कृत्यात बाळजीचा नाहक बळी गेला.
बजी : त्याच मरण अस वाया जाणार नाही. त्या करतलबने बाळजीला जितक्या सहज मारल तितक्या सहज आता तो एक घटका पण नाही बसणार.
सदाशिव : का काय करणार आहेस ?
बजी : आता करायचं काहीच नाही. आता फक्त एक वाक्य आणि त्याची अफवाच सगळ काही करणार.
सदाशिव : कोणती अफवा ?
बजी : आपल्या तेरा लोकांकरवी अफवा पसरव महादेवचा मारेकरीच बिरुद्लखानचा मारेकरी होता.
सदाशिव : त्याने काय होईल ?
बजी : तो निवांत होईल. स्वतःचा विजय तो औरंगजेबाला सांगेल. औरंगजेबहि त्याची प्रशंसा करेल. आणि मग तो जेव्हा शेवटचे क्षण जेव्हा इथे पुण्यात असेल तेव्हा दिल्लीला जायच्या आधल्या रात्री त्याला मारून टाकायचं. कारण त्याच्या पराक्रमाने आणि औरंगजेबाच्या कौतुकाने तो निवांत होईल. त्याची फौज सगळीकडे विखुरलेली असेल आणि त्याचाच आपण फायदा घ्यायचा.
सदाशिव : अफवा काम करेल ?
बजी : नक्कीच. एकदा का करतलब मेला कि त्याची फौज हादरेल आणि तेव्हाच अजून एक अफवा पसरवू कि, शिवाजी महाराज पुण्यात उतरतायत. मग बघ एक माणूस काय घोडा पण इथ दिसणार नाही.

सदाशिव त्याच्या दिल्या कामाला निघाला. बजीने घोड्यावर टाच मारून तलवारीच्या कारखान्यात भेट दिली.  
 05 
ठरल्याप्रमाणे अफवा पसरली आणि ठरल्याप्रमाणे करतलब खान खुश झाला. त्याने एक विजयाच पत्र औरंगजेबाला पाठवल. इकडून पत्र तिकड पोहचेपर्यंत आणि तिकडून इकड उत्तर येईपर्यंत दोन आठवडे गेले. औरंगजेबाने बक्षीस देण्यासाठी करतलब खानला दिल्लीला बोलवल होत. करतलब दिल्लीला मंगळवारी निघणार होता. त्याची निघण्याची तयारी सुरु होती. तोच सगळ्या फौजेत अफवा पसरली कि शिवाजी महाराज पुण्यात सैन्यासकट आलेत. आणि त्याच भीतीने निम्मी फौज निजामशहाकडे आश्रय घ्यायला निघून गेली.
राहिलेली फौज करतलबशी एकनिष्ठ होती. ती त्याच्यासोबत थांबली. मंगळवार यायला तीन दिवस होते. आणि एक दिवस आधी अफवा पसरली कि शिवाजी महाराज करतलबच्या हद्दीत शिरले आहेत. उद्या मंगळवार होता. आणि आज अमावस्या.
अर्थातच ती अफवा असली तरी त्यात चुकीच काही नव्हत. शिवाजी महाराज फक्त अमावस्येलाच हल्ला करतात हे आता औरंगजेबाला आणि त्याच्या अधिकाऱ्यांना पण माहित होत. मग काय करतलब दहा हजार सैन्य घेऊन निघून पळून गेला. आणि बारा तेरा हजाराची फौज मागे रक्षण करायला थांबवली.
बजी निश्चिंत झाला. त्याचा करतलबला मारायचा विचार त्याने मग रद्द केला. करतलब तिकड पोचला. दिवाण-ए-खास मध्ये त्याच शाही स्वागत झाल. पराक्रम असा काय मोठा नव्हता. पण त्याने ज्याला मारलं तो मराठा होता. आणि एक मराठा माणूस एक हजार लोकांशी लढतो हि खात्री औरंगजेबाला होती. आणि इथ तर करतलबने त्या मराठी बाळजीला त्याच्याच दारात लोकांसमोर मारून टाकल होत. सन्मान तर व्हायलाच हवा न त्याचा. त्याचा सत्कार सोहळा झाला. पुन्हा सगळी शांताता. बजी पण शांत झाला. त्याने पण आराम घेतला.
रोजच्या सारखा बजी बाजारात गेला. तिथ त्याला फिरायला आवडत असे. म्हणजे तिथ येणारी माणस त्यांचे पोशाख, हावभाव, बोलण, त्यांचे वेगवेगळे आवाज बघून-ऐकून बजीला खूप काही शिकायला मिळत. बजी तिथ तासभर रेंगाळला. आता काय कराव बजीला समजत नव्हत. म्हणून तो तिथच एका कट्ट्यावर बसून होता. तेवढ्यात तिथ काही फ्रेंच लोक काही सामान घेत होते. तेव्हा त्यात तिथ बाचाबाची झाली. मराठी माणूस बोलत असलेला त्या फ्रेंच माणसाला काही समजत नव्हत आणि त्या फ्रेंच माणसाला मराठी माणसाच काही समजत नव्हत. मग तिथे एक अधिकारी येऊन दोघांच बोलण ऐकून घेतो. आणि दोघांना एकमेकांच भाषण भाषांतर करून तो अधिकारी दोघांचे भांडण मिटवतो. मग तिथून तो फ्रेंच माणूस निघून जातो. बजी सगळ बघतो आणि पुन्हा लोकांकडे लक्ष देतो. कोण भाजी घेत होत. कोण मिठाई. कुणी कुणाशी हुज्जत घालत होत. कोण विचारात बुडून रस्त्याने चालत होत. कुणाला कसलातरी आनंद होता आणि अस सगळ असताना बजी तिथून निघाला असताना तिथे एक बजीच्याच वयाची एक मुलगी आली. तिने बजीला अडवल.
बजी : काय पाहिजे ?
मुलगी : ( डोळ्यात पाणी आणून ) मला तुमची गरज आहे. मला मदत कराल का ?
बजी : हो नक्कीच.
मुलगी : माझ्या आईला साप चावला आहे. मदतीला कोण वैद्य-बुवा ओळखीचा नाही. आणि जवळ इतके पैसे पण नाही कि बैलगाडीतून तिला कुठे घेऊन जाऊ शकते.
ती ढसाढसा रडायला लागली. बजी तिला शब्दानेच सावरतो.
बजी : नको रडू. हे बघ माझ्याकडे घोडा आहे आणि पैसे पण. तुझ घर कुठ आहे ?
मुलगी : जांभळाच्या झाडापाशी.
बजी : इथच तर आहे. साप कधी चावला आईंना ?
मुलगी : आत्ता थोडा वेळ झाला.
बजी : तू घरी जा मी आलोच क्षणात वैद्याला घेऊन.
मुलगी गेली. बजी जाऊन एका वैद्याला आणतो. वैद्य काही काढा बनवतो. आणि जखमेवर लावतो. आई निपचितच होत्या.
मुलगी : बुवा. माझी आई वाचेल का हो ? ( ती रडायला लागली )
वैद्य : मुली, घाबरायचं कारण नाही. साप चावला हे नक्की पण तो विषारी नाही. कारण विषारी चावला असता तर आईने अजून तग धरला नसता इतका वेळ.
मुलगी डोळे पुसायला लागली. वैद्याला पैसे देऊन बजी त्या मुलीच्या घराबाहेर पडला. घोड्याला कुरवाळत त्याने घोड्यावर बैठक टाकली. तेवढ्यात मुलगी पळतच दारात आली आणि एका आशेने तिने बजीकडे बघितल. बजीच तिच्याकडे लक्ष नव्हत.
मुलगी : जी, खूप उपकार केलेत तुम्ही...
बजी : उपकार कसले ? माणूसच माणसाला मदत करतो. आणि हे जग महाराजांचं आहे. इथ प्रत्येकाला सुख मिळाव याचसाठी आमचा प्रयत्न असतो.
मुलगी : म्हणजे तुम्ही सिवाजी राजांचे सैनिक का ?
बजी : होय.
मुलगी : मला एक बोलायचं होत.
बजी : बे-झीजक बोला.
मुलगी : तुम्ही मदत केलीत मला. आपली ना ओळख ना पाळख. तरी आलात. वैद्यांना आणलत. त्यांना पैसे दिलेत. बस बदल्यात उद्या जेवायला याल का घरी ?
बजी : आलो असतो. पण मी कुणाच्या घरच खात नाही.
मुलगी : का ?
बजी : काही त्याला कारण आहेत. पण माफ करा. मी जेवणच काय पाणी पण पीत नाही. माझ घर सोडल तर.
मुलगी : मग मी तुमचे उपकार कसे फेडू ?
बजी : बस आठवण ठेवा. बाकी काही नको. आणि कधी गरज लागलीच तर बजीला बोलवा.
मुलगी : चालेल.
बजी निघून गेला. त्याच्या जात्या घोड्याला ती डोळेभरून बघत होती. आत आई शुद्धीवर आली. तिने मुलीला हाक मारली. आणि ती आत गेली.06   
दोन फ्रेंच लोक एकमेकांशी बोलत असतात. दुपारचे किमान एक वाजले असतील. ऊन डोक्यावरून अगदी जरास पुढ सरकलेल. दोघ दोन्ही बाजूने आलेले आणि वाटेत एकमेकांना भेटलेले हे दोन फ्रेंच अधिकारी. पुढे दोघांच बोलन सुरु झाल.
अल्बर्ट : तुमच्या वखारीला तुम्ही समुद्रकिनारी उभारलं अस समजल आम्हाला.
मसिओ : होय. वखारीला जास्त गिऱ्हाईक हे बंदरावर मिळत. तस बघता बाजारपेठ ही तितकीच फायदेशीर. पण जेव्हा बाहेरून सामान आणल जात तेव्हा ते बंदरावरून बाजारपेठेत आणेपर्यंत खूप काळजी घ्यावी लागते. वर ज्यादा प्रवासाचे नि गडीमाणसाचे पैसे जातात आणि सिवाजीची भीती ही असतेच.
अल्बर्ट : हा ते तर आहेच. पण मग तो समुद्र किनारा आता सिवाजी राजाच्या प्रदेशात मोडतो ना ? मग तुम्ही शत्रुत्व राखून राजाच्या प्रदेशात व्यवसाय करताय ?
मसिओ : नाही. नाही. आम्ही पहिल्यांदा सिवाजीच्या काही अधिकाऱ्यांना भेटलो होतो. त्यांनी जागा देण्यास नकार दिला. मग आम्ही कर जास्त देतो अस सांगून ती जागा मिळवली. जागा मिळाली आणि वर सिवाजीची आता भीती नाही.
अल्बर्ट : कर किती टक्के आकारला जातो आता ?
मसिओ : आधी बघा एक टक्का होता आता अडीच टक्के आहे. मराठा लोकांसोबत मैत्री राखून ठेवायचा आदेश ही आहे.
अल्बर्ट : आम्ही हि ठरवत आहोत मुंबईच्या बाजूला वखार सुरु करायचे. त्या साठी अर्ज केला होता आम्ही औरंगजेबाला. त्याने तो मंजूर केला पण सिवाजी राजाची परवानगी शिवाय आम्ही व्यवसाय नाही सुरु करणार...
तितक्यात एक माणूस वर्तमानपत्राचा गठ्ठा घेऊन तिथून जात असतो. मसिओ त्याकडून एक वर्तमानपत्र विकत घेतो. तो माणूस निघून जातो. वर्तमानपत्र होत “बॉम्बे टू सुरत”.
सुरुवातीलाच मोठी ठळक अक्षरात लिहिलेली बातमी असते.
“काहीच वेळा पूर्वी सिवाजी राजा निधन पावला”
मसिओ : हे काय झाल ?
अल्बर्ट : काय झाल ?
मसिओ : सिवाजी राहिला नाही.
अल्बर्ट : अस कस ? कशामुळे ?
मसिओ : थांबा वाचतो मी बातमी.
वर्तमान पत्र जवळ धरून,
मसिओ : बॉम्बे, काही वेळा पूर्वीच पुण्याहून आलेल्या बातमीनुसार पुण्याचा राजा सिवाजी भोसले हा एकेकी झोपेत मरण पावला. मृत्युमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. काही मंत्र्याच्या बोलण्यानुसार सिवाजी राजाला काळ ताप आला आणि त्यात आज सकाळी मरण आले. अस बोलले जात आहे. रायगडावर संध्याकाळी क्रियाविधि असेल.
अल्बर्ट : खूप वाईट झाल.
मसिओ : होना. इतक्या धडाडीच्या राजाचे असे हलके मरण ? पटत नाही.
दोघ निघून गेले. मसिओ त्याच्या वखारीत आला. वखारीत कामगार काम करत होते. त्यांना त्याने हि बातमी दिली आणि श्रद्धांजली म्हणून सगळ काम काही वेळासाठी थांबवल गेल. तिकडे अल्बर्टनेही अर्धादिवस काम बंद ठेवल.
बजी बाजारपेठेतून जात असताना त्याला वर्तमानपत्र मिळाल. त्यात महाराजांच्या निधनाची वार्ता बघून त्याला खूप दुःख झाल आणि तो निजामशाहिच्या सैन्यस्थळावर गेला. तिकडची हालहवाल बघायला.
बजी एका भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाच रूप घेऊन एका छोट्या रस्त्यावर एका झाडाखाली बसला.
तिथून एक निजामशहाचा माणूस काफिक खान चालला होता.  अचानक ज्योतिषी बघून त्याला शंका आली. बजीला ही मनात काहीतरी होत होत. पण जे काही वाटत होत ते मनात ठेवून चेहऱ्यावर शांतात ठेवली.
काफिक खान : ( म्यानातून तलवार बाहेर काढत ) काय चालल आहे ? तू कोणचा हेर आहेस का ?
बजी : हुजूर हेर आणि मी ? नाही हो. मी तर साधा ज्योतिषी आहे आणि तुम्हास जर का मी हेर वाटत असेन तर हो आहे मी तेहत्तीस करोड देवांचा, येशू ख्रिस्त आणि तुमच्या अल्लाहचा.
काफिक खान : मग भविष्यहि सांगतच असाल ?
बजी : हो अगदी तंतोतंत खरे. खऱ्या आयुष्याला मिळते-जुळते आणि हो माझे शब्द कधी खाली पडत नाहीत. ब्रम्हदेव जिभेवर आहेत माझ्या.
काफिक खान म्यानातून तलावर बाहेर काढून उभा असतो. बजी खाली बसलेला असतो. काफिक खान तलवार म्यानात भरून. थोड वाकून हात पुढे करतो.
बजी त्याचा हात बघतो,
बजी : तुमच नाव ‘क’ पासून सुरु होत. बरोबर ?
काफिक खान : हो... तुम्हाला कस माहित ?
बजी : हात बघितला ना तुमचा आता सगळ कळाल आहे मला. तीन-दोन वेळा औरंगजेब बादशाह कडून सन्मान झाला आहे. पण काही लोकांच्या कुरघोडी आणि कटांमुळे तुम्ही निजामशाहीची नोकरी पत्करली. खूप दिवस काही पराक्रम करण्याच्या विचारात आहात. पण पराक्रम हातून घडत नाही. तशी संधी मिळत नाही. त्यामुळे निराश आहात. आणि हो. त्या निराशेला आशा म्हणून आज एक आनंदाची बातमी समजेल.
काफिक खानने बजीला काही पैसे दिले आणि बाजारपेठेकडे निघून गेला. तिथ त्याला शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी समजली. आणि तो खूप खूप खुश झाला. तसाच खुशीत ज्योतिषाला शोधायला आला. पण तो तिथ नव्हता. काफिक खान कित्येक वेळ तिथे फेऱ्या मारत होता. पण ज्योतिषी येईनाच. बजी केव्हाचाच तिथून जांभळाच्या झाडाजवळच्या घराकडे निघाला होता.  


 07 
काल गावभर नुसती बातमी पोचली शिवाजी महाराज गेले. आज लागलीच त्यांच्या एका विजयाची बातमी वर्तमान पत्रात छापून आली. हे काय नक्की ? कुणाला काहीच कळेना. दोन इंग्रज बोलत असतात. त्यांचा विषय व्यवसाय असा असतो. पण शिवाजी महाराज हा विषय प्रत्येकाच्या तोंडी हमखास असायचाच. व्यवसायावरून विषय शिवाजी महाराजांवर घसरला. आणि बोलता बोलता तो इंग्रज कधी मराठी झाला समजलच नाही. तो बोलत होता,
इंग्रज : अखंड हिंदुस्तानाच्या जमिनींवर कित्त्येक सत्ता येऊन पडल्या आणि या अशा जमिनीवर एक दिल्लीचा तो बादशहा, पातशहा, सम्राट औरंगजेब आपला दबा धरून बसला आहे. त्या निडर बादशहाने स्वतःच्या बापाला सोडल नाही. भावाला सोडल नाही असा तो निडर आणि क्रूर औरंगजेब त्याच्या नजरेत कायम गहिरा दबदबा, दरारा आणि दहशत दिसते. विहिरीतल्या पाण्यासम जमिनीतल्या तळहाताएवढ्या पाणीसम जमिनीचा राजा सिवाजी. त्याची दहशत औरंगजेबाच्या डोळ्यात अगदी स्पष्ट दिसते. काय आहे तो सिवाजी ? साडेपाच लांब उंचीचा तो रस्त्यावरच्या गर्दीत मिसळला तर ओळखू हि यायचा नाही. खड्या पठाणी लोकांच्यात उभा राहिला तर छातीशी पुरणारा सिवाजी. मात्र पिवळसर रंगाच्या डोळ्यात जर का कुणी एक नजर टाकली तर पुढचा कुणी हि असो क्षणात कसा ओळखून जाईल कि हाच तो सिवाजी.
कायम उंचावलेली डावी भुवई, नाकाच्या पुड्या फुगवून कसल्या तरी विचारात गढलेला सिवाजी डोक्यात विचार एक करतो, डोळ्यांने इशारे एक करतो आणि जिभेने वेगळेच काही बोलतो. कि समोरचा भ्रमात पडतो कि नक्की समजायचे काय ? कमी बोलतो. हसत कधी नाही. कुणाला जवळ सहजासहजी येऊ देत नाही. आणि आला तरी मिठ्या वैगरे काय मारत नाही. नाहीतर ते मुसलमान गले लागतात एकमेकांच्या आणि खंजीर घुपसतात पाठीत एकमेकांच्या. सिवाजी त्या बाबतीत चाणाक्ष. तो बोलतो कमी काम करतो जास्त बहूतेक त्याच हेच रहस्य आहे सतत विजय मिळवण्याच.
गेली वर्षभर मी त्याच्या सारखी माझी सोनेरी मिशी ओठांपासून वर पिळून उचलून धरली पण मिशीच्या केसांनी खाली माना टाकल्या. हनुवटी खालची दाढी कोरून त्रिकोणी केली पण गालावरती केस खाससे उगवत नाहीत. सिवाजी सारख नुस्त दिसून सिवाजी कुणी होत नाही हेच खरे. सिवाजी म्हंटले कि शांत व्यक्ती समोर येते. पण तो शांत नाही. चेहरा फक्त शांत पण मनात विचारात वादळच्या वादळ सुटलेली असतात. माणसाला याच त्याच उनधून पडलेलं असत. पण सिवाजी फक्त स्वतःच बघतो आणि तो तेच करतो. सिवाजी म्हणजे औरंगजेबाच्या डोळ्यातली दहशत. वरचा औरंगजेब उजवीकडचा निजामशहा डावीकडचा आदिलशहा खालचे आम्ही इंग्रज, पोर्तुगीज, डच आणि मधी दाढेत अडकलेला सिवा. पण तरी तोच महाराज या हिंदुस्तानाचा. सिवाजी मरून कित्येक खुशीत वावरतात आणि फसतात. तीन वेळा मरून जिवंत झालाय सिवाजी. माणूस एकदा जन्म घेतो आणि एकदा मारतो. सिवाजी मरतो आणि पुन्हा जिवंत होतो. आणि म्हणून मला सिवाजी देव वाटतो. कारण देवच फक्त या जगात अमर आहे. आणि देवानंतर हा सिवाजी.
दुसरा इंग्रज : औरंगजेब हि काही कमीचा नाही.
इंग्रज : तो कमी नाहीच. पण सिवापेक्षा जास्तहि नाही. हे खरे. लोकांच्या समोर गुन्हा करून त्यांच्यात दहशत निर्माण करून मोठा झालेला हा औरंगजेब याने आपली वाह वा आपल्याच पासून सुरु केली. सिवाजीला मोठा मात्र लोकांनी केलाय. त्याची काम बघून लोकांना तो आपलासा वाटला. औरंगजेब कायम परका शत्रू वाटला. चारी बाजूची सत्ता जर का काही वर्षात हा जमीनदोस्त करत असेल तर विचार करायला हवा पुढच्या काही वर्षात सिवाजी काय काय करेल ?
दुसरा इंग्रज : कितीही मोठा झाला राजा शिवाजी तरी आपला सिकंदरच जगात मोठा आहे.
इंग्रज : मी कमनशिबीच खरा जो सिकंदरच्या युगात जन्मलो नाही. आणि सिवाजीहि सिकंदरसे कम नाही. बघता बघता जग जिंकेल हा सिवाजी आणि त्याला बघितल्याच भाग्य मी घेतल आहे. सिकंदरसुद्धा भारतात येऊन मेला पण हा सिवाजी याच भयंकर भारतात आपली गाजवतोय. इतिहास हा कुणाचा नसतो. इतिहास हा त्याचाच असतो जो असामान्य असतो. सिवाजी त्यातलाच एक.
दुसरा इंग्रज : बर बास मराठी मावळा व्हायची इच्छा आहे का ?
इंग्रज : इच्छा असून उपयोग नाही मराठी असायला नशीब लागत आणि ते माझ्या वाट्याला नाही.
दोघ बोलत असताना त्याचं सामान घेऊन बोट आली. ते सामान उतरवायला ते दोन इंग्रज जहाजेपाशी गेली. त्यांनी सामान काढल आणि ते लावत बसले. तिकडून दोन हिजडे जात असतात. ते औरंगजेबाचे नोकर असतात. थोडक्यात पहारेकरी. त्यातला एक बोलत असतो “आपले खुदा औरंगजेब अल्लाहचा अवतार आहेत. ते कधी मरणार नाहीत आणि त्यांना मारणारा कधी पैदा होणार नाही. बादशहा अमर आहेत.”
ते पुढे निघून गेले आणि हे दोन इंग्रज एकमेकांना बघतात.
इंग्रज : सिवाजी आजपण कुणाला समजणार नाही आणि पुढे सुद्धा नाही. आणि ज्या खुदाला हे अल्लाह म्हणतात तो अल्लाह नसून शैतान आहे आणि खुद खुदा सिवा आहे कारण मरून जिवंत होणाराच अमर असतो. आणि औरंगजेब अजून एकदाही मेला नाही. उलट तोच मरणारा भितो. हेच एक सत्य.
 आणि दोघ काम करू लागतात.  


08   
भाव्या : बहिर्जीला बघितल का ?
बजी : नाही हो. का काय काम आहे का त्यांच्याकडे ?
भाव्या : होय. विनाकारण का मी शोधेन ? आणि आमच काय काम असणार त्याच्याकडे ?
बजी : तुमच काम नाही मग कशाला धुंडत आहात त्याला ?
भाव्या : त्याच अस आहे कि ?
बजी : कस आहे ?
भाव्या : गुप्तता बरी.
बजी : असस.. म्हणजे आम्हाला पण नाही का कळू देणार ? आम्ही पण शिवाजी महाराजांचेच मावळे आहोत म्हंटल. आणि काम सांगितल असत तर दिल असत धुंडून बहिर्जींना.
भाव्या : असाल मावळे. मग ?
बजी : असाल काय ? हे अंगावरचे कपडे बघा कि भगवे आहेत. ओठांवर जाडजूड मिशी आहे अजून काय पुरावा देऊ मी मराठी असल्याचा ?
भाव्या : हि असली भगवी कापड बाजारात मिळतातच कि. त्यात वेगळ अस काय ?
तेवढ्यात तिथुन फळ विकणारा माणूस पुढे निघून जातो. ती फळ विकत घेणार कोण नव्हत पण तो बराच वेळ तिथ घुटमळत होता. अखेर निघून गेला. बजीने लागलीच भाव्याचा हात धरला आणि दोघ एका बाजूला गेले.
बजी : ( दबक्या आवाजात ) काय झाल ? महाराजांनी का बोलावलं आहे मला ?
भाव्या : ( आवाज वाढवून ) मी का सांगू ? कोण तू ? मी ओळखत नाही तुला ? आणि मला हात लावण्याचा हक्क कुणी दिला ? ऐक मी एकहजारी वेतनाचा सेवक आणि तुझा वेतन तितका नाही आणि तुला माझ्या जवळ येण्याचा हक्क ही नाही. याची शिकायत राजेंकडे केली तर माहित आहे न सजा काय असेल ? तुझ्या नोकरीवर गदा येईल.
बजी : मला माफ करा. पुन्हा अशी चूक नाही होणार.
आता एव्हाना तो फळवाला तिथून पूर्ण नाहीसा झाला. आणि मग भाव्या बजी जवळ गेला.
भाव्या : बजी, महाराजांनी आपली आठवण काढली आहे. आणि माफी असावी मी तुम्हाला एकेरी बोललो. महाराजांचा जसा निरोप मिळाला तसा रायगडला निरोप देऊन तुम्हाला शोधायला आलो. बहिर्जी नाईक इथेच असल्याच कळाल मला म्हणून मी आलो. तुम्ही दिसलात. पण तो फळ विकणारा संशयित वाटल्याने बजी नावानेच पुकारल तुम्हाला.
बजी : ते ठीक आहे. पण घोळ केलात तुम्ही. या गावात बजी हा खुनी आहे. म्हणजे खुनी होता. त्याने करतलब खानाला मारल आहे. आणि त्या सुडातून त्याच्या बायकोने बजीला मारून टाकल आहे. बजीचा मृत्यू झाला आहे आणि मी इथे आता  भिवजी नावाने वावरत होतो. बर ते मरू दे. देव पण स्वतःच रूप बदलायला एक एक युग घेतो पण हा बहिर्जी काही क्षण. बर काय म्हणत आहेत माझे देव ? काय निरोप आहे त्यांचा ?
भाव्या : औरंगजेब पन्नासावा वाढदिवस साजरा करत आहे. आग्र्याला.
बजी : होका. पन्नाशी गाठली तर सैतानाने.
भाव्या : हो. भले हि सैतानाला जास्त वय असेल पण आपला देव अमर आहे.
बजी : ते तर आहेच पण त्याला मरण दिल पाहिजे ना लवकर आपल्या देवाने तरच रयत आणि स्वतः देव सुखात जगतील.
भाव्या : तशीच नियोजनं विचारात घेऊन महाराज आग्र्याला जाणार आहेत.
बजी : कशाला ?
भाव्या : औरंगजेबाने महाराजांना खास पत्र पाठवल आहे. वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणाच..
बजी : वाढदिवस आणि त्याचा कार्यक्रम ? लहान आहे का आता तो ?
भाव्या : अस म्हणतात बालपण आणि म्हातारपण सारखेच. चालायचं तेवढ.
बजी : मग कधी निघतायत महाराज ?
भाव्या : पक्क नाही झाल अजून. पण त्या औरंगजेबाच्या काहीतरी मनात विचित्र आहे. अपवित्र काम तो त्या पवित्र दिवशी करू शकतो असा महाराजांचा अंदाज आहे.
बजी : साहजिकच. कितीही अपवित्र काम केली तरी नमाज पढून पवित्र होतात मुसलमान.
भाव्या : होय. पण महाराज खूप चिंतेत आहेत आणि म्हणून काही बातम्या काढण्यासाठी, तिथल्या हालचाली आधीच पकडण्यासाठी महाराजांनी तुम्हाला निवडल आहे. तुम्ही आणि सात अजून गुप्तहेर लोकांचे टोळके घेऊन तुम्ही आग्र्याला आधी रवाना व्हावे अशी महाराजांची इच्छा आहे. सोबत लागणारी जनावर, त्याचं खाद्य, तुमचा खुराक सगळ सोबत मिळेल.
बजी : निघायचं कधी आहे ?
भाव्या : म्हंटल तर उद्या ? आणि म्हंटल तर आत्ता ?
बजी : महाराजांसाठी माझ्याकड उद्या, परवा काय नसत जे काय ते आत्ताच. मी घरी जाऊन सामान घेतो नकलांच आणि निघतो.
भाव्याने महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्या सगळ्यांची जायची तयारी करून ठेवली. बजी घरी जाऊन सामान घेऊन लोकांसोबत आग्र्याला पोचला. वाटेत बरीच माहिती काढत तो निघाला होता. म्हणजे काही शत्रूंची तळ बघितली. गरजेला लागली तर पाण्याची तळी बघितली. वाटेतल्या लोकांची भाषा बघितली. लोकांच राहणीमान बघितल. हिंस्त्र प्राण्यांची रोजची वाट बघितली. बऱ्याच लोकांनी चालून केलेली मोठी वाट बघितली आणि शत्रूने ये जा करून बनवलेली फिकटशी पायवाट पण बघून ठेवली. औषधी-विषारी झाड बघून ठेवली. गोड आणि विषारी जिभेची लोक ओळखून घेतली. आणि अशा पद्धतीने बहिर्जी नाईक अर्थातच बजी आग्र्याला पोचला.
आग्र्याच्या वेशीवर काही बोलण्यासाठी बजी आणि त्याचे साथीदार थांबले.
बजी : हे बघा या क्षणापासून मी तुमचा नाही ना तुम्ही माझे. काळजी घ्यावी. कुठेही चूक वा गफलत होता कामा नये. तसे झाल्यास दोन शिक्षा मिळतील. एक माझ्याकरवी आणि दुसरी महाराज देतील ती. एका विशिष्ठ हद्दीत आपण वावरायचं. भेटायला एखाद ठिकाण कायम न ठेवता प्रत्येक भेटीला ते बदलत रहाव. प्रत्येक हालचाल अशी टीपावी कि, जणू उंच आकाशातला पक्षी जमिनीवरचे काही धान्याचे दाने बघतो. नजर तीक्ष्ण हवी. कान सदा टवकारलेले असावेत. कुठे पकडले गेल्यास डोक्यात बहाणे तयार हवेत. हजरजबाबी पण हवा. कुठे अडखळता कामा नये. शक्यतो मुसलमानी पेहरावच असावा. कितीही भय येवो, मुखी परमेश्वर किंवा ईश्वर नाही अल्लाहच आणाव. महाराजांचा विषय कुठेही आणि कुणासोबत हि काढू नये. उगीच औरंगजेबाची तारीफ करू नये किंवा द्वेष हि करू नये. पुढच्या व्यक्तीच्या हो-ला-हो मिळवणे. एखाद छुप शस्त्र सोबत अंगी बाळगणे. रस्ता अनोळखी असला तरी चालीत फरक नको. कोणत्या हि स्त्रीशी बोलणे नाही. तिच्याशी लगट करणे नाही. महाराजांचा हा तसा खास आदेशच आहे. कुणाचे उसने घेणे नाही. कुणाला देणे नाही. काम करण्यास आलोय एवढच डोक्यात ठेवून वावरणे. दुसरे कोणतेही विचार मनात आणून कामात कसूर ठेवणे नाही.
विशेषतः अंधाऱ्या रात्री वटवाघळाची नजर करून मांजरीसारख्या दब्या पावलांनी सर्वत्र वावरणे. कुणाच्या हि बोलण्यावर चटकन विश्वास न ठेवणे. आता राहिला महत्वाचा मुद्दा. कुणाचा हि मुडदा पाडू नये. अंगाशी आलेच कुणी तर आधीच काटा काढावा. गावर भर झाल्यावर मग असा पराक्रम करू नये. गोत्यात येण्याची शक्यता असे. महाराज इथवर येतील. सुखरूप कार्यक्रम जगतील आणि पुन्हा रायगडावर सुखरूप पोचतील हि जबाबदारी आपली. त्यामुळे दिलेले काम चोख निभावणे. त्यात जरा जरी कमी पडलो तर देवास याद करणे. महाराजांना फसवणे म्हणजे खुद्द देवाला फसवणे होय. बर आता निघुयात आत. ज्यादाचा अंधार झाला तर घुसखोरीचा संशय यायचा. लवकर चला.
आणि सगळे निघाले. पुढे तीन रस्ते वेगवेगळ्या दिशेला जात होते. आणि हे आठ लोक वेगवेगळ्या दिशेला विभागून गेले. महाराज आग्र्याला पोचायला वेळ लागणारा होता. या गुप्तहेरांच्या माहितीवरच तर महाराज तिकडे गनिमी कावा बनवणार होते. कामाला सुरुवात झाली. खूप दिवस प्रवास करून आग्र्याला गेलेली हि गुप्तहेरांची टोळी आज तरी शांत झोपून गेली. कामाला सुरुवात सकाळपासून करायची होती. काही गरीब लोक रस्त्यावरच झोपत तिकडे. कारण ती जागा औरंगजेबाची होती महाराजांची नाही. महाराजांच्या राज्यात जो तो चार भिंतींच्या आत असायचा. औरंगजेबाच्या रयतेच तेवढ नशीब नव्हत. त्या रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या लोकांच्यातच अंगावर शाल घेऊन बाजी त्यांच्यातलाच एक झाला. 


 09  
आग्र्याचा पहिला सूर्योदय या गुप्तहेरांनी बघितला. अगदी सकाळीच बाजारपेठ सुरु झालेली. लोकांची गजबज-गडबड सुरु होती. सकाळच्या सगळ्या क्रिया उरकून बजी कामावर निघाला. त्याने पहिली बाजारपेठेत काय खबर मिळते का म्हणून तिकडे तो गेला. बाजारपेठ बघून बजी अवाक झाला. म्हणजे आपल्या दक्षिणेत एवढी मोठी बाजारपेठ नव्हतीच मुळी. सर्वात मोठी बाजारपेठ एक होती ती रायगडावर. पण हि इथली बाजारपेठ तर त्याहून खूप मोठी होती. गुजराथी-मारवाडी-हिंदी-उर्दू-मराठी-इंग्रजी-पोर्तुगीज-डच-संस्कृत सगळ्या सगळ्या भाषांची इथ सरमिसळ होती.
बजीचा पेहराव अगदी साधा होता. एखाद्या घोड्याच्या मालकाचा असावा असा. बजी इकडे तिकड बघत होता. तो पर्यंत मागे एक इंग्रज येऊन उभा राहिला. बजीला ते जाणवल तरी त्याने काही न समजल्याचा आव आणून तसा पुढे बघत राहिला.
इंग्रज : तुझा घोडा कुठे आहे ?
बजी : ( मागे फिरून ) जी हुजूर घोडा तर माझा साथी घेऊन गेलाय. त्याचीच वाट बघत आहे.
इंग्रज : आज काय आहे का इथ ?
बजी : जी का काय झाल ?
इंग्रज : त्या टोकापासून मी घोडा शोधतोय माझ हे सामान वहायला पण एकाचा हि घोडा त्याच्या जवळ नाही.
बजी : अस किती लोकांना विचारलत तुम्ही ?
इंग्रज : तू धरून पाच.
बजी : बस इतकेच ? खूप आहेत असे घोडेवाले पुढे भेटील ना तुम्हाला.
इंग्रज : हो पण मला माझ्या मुक्कामावर पोचायचे आहे. माझे जे ऑफिसर आहेत ते इकडे येणार आहेत. त्यांची रहायची व्यवस्था मला नीट करायची आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे आणि हे सामान ही इतक जड आहे कि, नाही जमत.
बजी : व्यवसाय सुरु करताय का कुठला इथे ?
इंग्रज : नाही. अभ्यास करायचा आहे ऑफिसरना.
बजी : कसला ?
इंग्रज : मागच्या वेळी राजा सिवाजी सुरतेला लुट करून गेले होते. त्यावेळी डच ऑफिसर कॉस्मी यांनी राजा सिवाजी बद्दल काही टिप्पण्या आपल्या डायरीत लिहून ठेवल्या. त्या आम्हाला तोंडी याच्या-त्याच्या कडून समजल्या. आणि आम्ही त्या आमच्या ऑफिसर पर्यंत पोचवल्या.
बजी : म्हणजे शिवाजी महाराजांना सातासमुद्रापार पण ओळखतात का ?
इंग्रज : ओळखत नाही घाबरतात सुद्धा आणि आदर हि करतात. आणि त्यांच्यावर अभ्यास हि करतात. तर त्या टिप्पण्या आमच्या ऑफिसरना समजली त्यांनी लागलीच माहिती काढायला सुरुवात केली. आमच्या काही लोकांची गोव्याला वखारी आहेत. ज्या राजा सिवाजी यांच्या भू-प्रदेशात आहेत. त्यामुळे त्या वखार मालकांना राजाची माहिती ठाऊक असते. त्यांच्या कडून माहिती घेत घेत गोवा ते अलिबागपर्यंतच्या वखारमालकांकडून काही माहिती मिळवली असता अस समजले कि, राजा सिवाजी आग्र्याला औरंगजेबास भेटीला जाणार आहे. आणि म्हणून माझे ऑफिसर खास सिवाजी राजाला बघायला येत आहेत.
बजी : चांगली गोष्ट आहे.
इंग्रज : यु नो ? स्पेनला सिवाजी राजामुळे पुन्हा नवा जन्म मिळाला. नाहीतर तो संपल्यातच जमा होता.
बजी : बरीच माहिती दिसते तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल ?
इंग्रज : ठेवावी लागते. काय करणार जरा का दुर्लक्ष झाल तर कधी काय होईल सांगता येत नाही. आम्हीतर हे हि ऐकून आहोत कि, राजा सिवाजी जेव्हा अफजल खानला भेटला, तेव्हा त्याने राजावर वार केला पण राजाला लागल नाही. म्हणजे साध एक थेंब रक्त हि आल नाही. उलट राजाने अफजल खानला मारून टाकल. त्याच तोंड धडापासून कापून टाकल आणि त्याला मारण्याच्या आधल्या रात्री सिवाजीला एका देवाने ( देवी ) दोन अदृश्य पंख दिले होते आणि एक तलवार. त्याच तलवारीने अफजल खानाला मारले दुसऱ्यादिवशी आणि आधल्या रात्री शत्रूचा तळ बघण्यासाठी राजा देवाने दिलेल्या अदृश्य पंखाने उडत उडत तिथे गेले होते. तिथे खानने ठोकलेला तळ बघितला आणि दुसऱ्या दिवशी राजाने आपल सैन्य त्या तळाच्या चारी बाजूने लावल. हे खर आहे का ?
बजी : आता आम्हाला तरी काय माहित. तुम्हाला जितकी माहिती माहित तितकी मला हि माहित नव्हती. पण हे मात्र नक्की महाराज कुठेही जाऊ शकतात. एकाक्षणात. पंख आहेत कि नाही माहित नाही पण मी एकदा बघितल होत. म्हणजे मी एकदा दक्षिणेत गेलो होतो. राजगडावर. तिथ काही कामानिम्मित गेलो असता मला शिवाजी महाराज दिसले होते. त्यांना भेटू शकलो नाही मी. कारण महाराज कुणाला जवळ करत नाहीत. शेवटी ते महाराज आहेत कुणी ही उठ-सुठ त्यांच्याजवळ जाऊ शकत नाही. मी आपल त्यांना लांबून बघितल. ते एकटेच चालत होते. त्यांच्या सोबत कुणीच नव्हत. त्यांच संरक्षण करायला एक हि माणूस सोबत नव्हता. मला आश्चर्य वाटल. पण महाराजांना बघून बर हि वाटल.
इंग्रज : मग ? त्यात काय एवढ ?
बजी : आहे न ऐका तर, मी राजगड उतरून खाली आलो. एका घराजवळ थांबलो. पाणी प्यायला म्हणून एका घरी गेलो तर आत एक बाई रडत होती. मला वाटल कुणी तर मेल असेल. म्हणून मी आत गेलो. पण आत ती एकटीच बाई होती. मला बघून तिने डोळे पुसले आणि मला विचारलं काय हव. मी पाणी मागितल. तिने ते मला दिल. मग मी रडायच कारण विचारल त्यांना. त्यांनी सांगितल आणि मी थक्क झालो.
इंग्रज : का ? अस काय सांगितल त्यांनी ?
बजी : त्यांनी सांगितल कि, शिवाजी महाराजांवर विषप्रयोग झालाय. सातारा किल्ल्यावर.
इंग्रज : हे कस शक्य आहे ? तू तर त्यांना राजगडावर बघितल होत ना ?
बजी : तेच तर, म्हणूनच मला धक्का बसला. महाराज बरे झाले. तिथून ते दुसऱ्या किल्ल्यावर सुखरूप आले. पण या सगळ्या वेळात मला तुमच्या बोलण्यानुसार प्रत्यय आला. कि, महाराज एकाच वेळीस कुठे हि असू शकतात.
इंग्रज : आभारी आहे. एक नवीन गोष्ट तू सांगितलीस. हि सुद्धा टिप्पणी मी ऑफिसरना सांगतो.
बजी : नक्की नक्की आणि तुम्ही मला नक्की सांगा जर का तुम्हाला शिवाजी महाराजांचे पंख दिसले तर.
इंग्रज : कुठे असतो तू रहायला ?
बजी : कधी हि या इथे. असतो मी. आणि मी बघितल तुम्हाला एकदा आता नसतो विसरत. भेटू पुन्हा कधी. चला मी तुम्हाला घोडा बघून देतो.
बजी व तो इंग्रज घोडा बघायला गेले. बजीने एका घोड्यावर इंग्रजाला बसवलं आणि त्याचा निरोप घेऊन बजी पुन्हा कामावर निघाला.  
 10 
महादेव एका व्यापाऱ्याच रूप घेऊन बजीकडे आला.
बजी : काय माहिती ?
महादेव : महाराजांना दगाफटका होण्याची चिन्ह दिसत आहेत.
बजी : दगाफटका म्हणजे ? वरवरचा कि जीवित ?
महादेव : जीवित बहुदा.
बजी : बहुदा ? हे किंतु परंतु चालत नाहीत मला माहित आहे ना ? आणि अशा या अर्धवट माहितीला मी काय समजू ? आणि महाराजांना सांगितल्यावर ते तरी काय नियोजन बनवणार ?
महादेव : मी दोन मुस्लीम पठाण लोकांना बोलताना ऐकलय. औरंगजेब म्हणे शिवाजी महाराजांना इथे मारून टाकू शकतात.
बजी : अर्थातच. इथे एवढ्या लाखो सैन्यात आपले महाराज हजार लोक घेऊन येणार. हा आपले लोक लढतील हि. त्या सगळ्यांचे मुडदे हि पाडतील पण महाराजांना औरंगजेब मारता यायचं नाही.
महादेव : का ?
बजी : शक्य नाही होणार. इतक्या लोकांच्यात महाराजांना औरंगजेबाला मारता कस येईल आपली लोक त्यांच्या सैन्यावर लक्ष ठेवेल ? महाराजांचं रक्षण करेल का ? अजून काय करेल ? त्यात महाराज सोबत किती आणणार आहेत लोक माहित नाही. अशक्य आहे. एवढच कि, महाराजांना दगाफटका होता कामा नये. कामावर लक्ष दिले पाहिजे आपण. उद्या रोजी इथल्या एका शेततळ्यावर भेटता. वेश बदलून या.
महादेव : तुमच्याकडे काही माहिती ?
बजी : मी एक रस्ता शोधला आहे. जो शांत आहे. कच्चा आहे आणि तो थेट औरंगजेबाच्या महालापाशी पोचतो.
महादेव : अरे वाह.. मग महालात कधी प्रवेशताय ?
बजी : आज रात्रीचा बेत आहे.
महादेव : काळजी घेऊन करावे. निघतो.
बजी : होय.
दोघे निघून गेले. संध्याकाळ झाली. बजी पठाण झाला. उंची वस्त्रे. उंची किमतीच अत्तर आणि गळ्यात बांधलेला गोफ. डोळ्यात गडद सुरमा भरलेला. हनुवटीला वाकडी तिकडी कुरळी दाढी लावलेली. पायात चंदेरी मोजडी. अंगात मोती रंगाचा पोशाख. हातात कट्यार आणि बजी निघाला. महालात आज काही कार्यक्रम नव्हता त्यामुळे औरंगजेब हि नव्हता. पण लोक खूप होते. लोक म्हणजे सगळे सरदार त्याचे. त्यांच्यात बजी सामील झाला.
एक पठाण बजी जवळ आला आणि त्याला मिठी मारून, बाजूला झाला.
पठाण : हुजूर आपण इथे नवीन दिसत आहात.
बजी : नवीन इथे या महालात आहे. पण तसा आग्र्यात केव्हापासून मी राहत आहे.
पठाण : इकडे काय काम काढलत ?
बजी : एक भविष्य सांगणारे बाबा आहेत त्यांची आणि माझी रस्त्यावर भेट झाली.
पठाण : अस्स.. मग ?
बजी : त्यांनी मला सांगितल. कि माझे चांगले दिवस सुरु होतील. बस एक यात्रा करावी लागेल.
पठाण : कसली यात्रा ? हजची?
बजी : नेमका हाच प्रश्न मी त्यांना केला. ते बोलले हज अशक्य आहे पण त्याचे तीर्थरूप आलमगीर बादशाहच्या महालात आहे. इथे एक पीरसाहेबांचा दर्गाह आहे ना ?
पठाण : हो आहे. महालाच्या आतल्या वाटेला.
बजी : तिथे जाण्यास परवानगी आहे का ?
पठाण : तशी नाहीये. पण मी माझ्या ओळखीने ती काढून देऊ शकतो.
बजी : अगदी उपकारच होतील.
पठाण : मला फक्त तो अत्तर द्यावा. मला त्याचा वास अगदी नाकात बसला आहे.
बजी : बस एवढाच ? हे घ्या कुपी. अजून हि लागली तर बेशक मागा. आपली भेट होत राहीलच.
दोघे गेले. त्या पठाणाने परवानगी काढून दिली. बजी तो परवानगीचा कागद घेऊन महालाच्या आतल्या बाजूला गेला. तिथ दर्गाह होता. तिथे एक माणूस उभा होता त्या दर्ग्याची राखण करत. बजी तिथे गेला. मुसलमानी रिवाजाप्रमाणे त्याने पीरबाबांना नमस्कार केला आणि कपाळ जमिनीला टेकवून तिथून उठला आणि माहिती काढायच्या उद्देश्याने तो त्या रखवालदाराजवळ गेला.
बजी : तुम्ही कायम इथेच असता का ?
रखवालदार : हो. आम्ही इथे तीन भाऊ असतो. सकाळी, संध्याकळी आणि रात्री अशा तीन वेळेत.
बजी : हा..का ? या खोलीतला माहोल खूप शांत आहे. पण इथे कसलासा वाऱ्याचा आवाज येतो.. तो कसा काय ?
रखवालदार : जनाब, तो वाऱ्याचा आवाज या फटीतून येतो.
बजी : देवाच्या खोलीत भिंतीला चीर ? अस का बर ?
रखवालदार : ती फट नाही ती पोकळ सरकती भिंत आहे. त्यातून गेल कि बाहेरच्या एका मशिदीत आपण पोहचतो.
बजी : ओह... पण अस का ?
रखवालदार : हे पीरबाबांची थडगी मशिदीतून वाचवून इथे आणली आहे. आणि तिथे नुसता दगडी कट्टा बांधून पुजला आहे.
बजी : अस्स. काय कहाणी आहे का याची ?
रखवालदार : हो. आलमगीर बादशाहने आपल्या वडिलांना कैद करून भावाला मारून टाकण्यासाठी याच पीर बाबांना नवस केला होता. आणि तो पुरा झाला. त्यांनी त्यांचा भाऊ मारून टाकला. आणि त्या नवसाच्या बदले पीरसाहेबांना इथे आणून जपून ठेवल. आणि आता इतक्या वर्षांनी आलमगिर बादशाहने एक नवस केला आहे.
बजी : शिवाजीला मारून टाकायचा ?
रखवालदार : तुम्हाला कस ठाऊक ?
बजी : कारण मीही तोच नवस करून आलोय..
रखवालदार : मग तर तुम्ही बादशाहना भेटून घ्याच खूप खुश होतील तुमच्यावर ते.
बजी : नक्की.

आणि बजी बाहेर निघाला. बाहेर उभ्या असलेल्या पठाणाला भेटून बजी निघून गेला.      
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातल्या एका पात्राला समोर घेऊन लिहिलेली हि एक निव्वळ काल्पनिक कथा आहे. यातील उल्लेख, नावे आणि संवाद एक तर काल्पनिक किंवा खऱ्या इतिहासाला अभ्यासून लिहिलेले आहेत. तरी यातील कोणताही भाग सोशल साईट, ब्लॉग, फिल्म, लेखात अथवा वेब सिरीजमध्ये आपल्या नावाने दाखवू किंवा लिहू शकत नाही. याचे हक्क लेखाकडे आहेत ते मागूनच कथेचा वापर करा ( कायदेशीर गुन्हा ). 

6 टिप्पण्या

  1. ब्लॉगला भेट दिल्यबद्दल तसेच कथेला आपलेपणाने वाचल्याबद्दल धन्यवाद....

    उत्तर द्याहटवा