प्रेम पत्र | जिव्हार( image by google )

प्रिय
धनु ,

आज पहिल्यांदाच मी असल पत्र लिहितोय. जर का तुला हे पत्र वाचताना माझी आठवण आली तर समज हे “प्रेमपत्र” आहे आणि नाही आठवलो मी तुला तर समज असच कसल तरी साध पत्र आहे. यात मी जास्त काही लिहिणार नाही कारण चुकून तुझ्या बाबांच्या हाताला हे पत्र लागल तर उगीच तुला त्रास नको. तुला बघितल्यापासून मला काहीच सुचत नाहीये. कधी हार बनवत असतो, कधी जेवत असतो, शाळेत चालू तासाला शांतात असली तरी नायतर मग दुपारच्या सुट्टीत कालवा जरी असला तरी मला फक्त तुझाच विचार डोक्यात येत असतो. माहित नाही का पण सारख सारख तुला मिठीत घ्याव वाटत. परवा तू माझ्या मिठीत आलीस आणि आता मला ती मिठी परत परत मारावीशी वाटतीय. मी काय करू ? आणि तू म्हणतेस सारख सारख नको करायला आपण हे. पण तरी रात्री झोपताना मी वर पत्र्याकड तोंड करून झोपतो. कारण जर का पालथा झोपलो तर उगीच कस तरी होत मला आणि डोक्याची उशी छातीला आली तर अस वाटत ती उशी नाही तूच आहेस.
तुझ्या माग माग शाळेत जाताना किंवा चोरून तुला बघताना खूप भारी वाटत मला. कुणाचीच भीती वाटत नाही मला. फक्त तुझी वाटते. कशी काय माहित नाही पण तू माझ्याकड एकदम बघितल कि जीव घशाशी येतो. आणि जर का तोंड उघडल मी तर मेलोच समजायचं. म्हणून मग मी आवंढा गिळतो आणि घशातला जीव पुन्हा छातीला ढकलतो.
एक सांगू ? मी गरीब आहे. श्रीमंत नाही. मी तुझ्यासारखा वरच्या जातीतला पण नाही. माझ मोठ घर नाही. साध पत्र्याच शेड आहे. पण त्यात पण तुला मी सुखात ठेवू शकतो. तुमच्या घरात गरम झाल तर तुम्हाला काहीही करून पंखा लावावा लागतो. आमच्या घरात नुस्त दार उघडल तरी चांगल वार येत. हा कधी कधी वाऱ्यासोबत त्या ओढ्याचा वास येतो. पण घरात फुल इतकी पडलेली असतात कि नाही काही जाणवत.
तूला भेटल्यापासून इतका मी बिथरलोय कि मला अस वाटत मी आता वेडा झालोय. असुदे पण वेडा असलो तरी तुझ्यासाठीच झालोय दुसऱ्या कोणत्या मुलीसाठी नाही. माझी पुन्हा इच्छा आहे तुला मिठी मारायची. त्या मिठीत पुन्हा हरवून जायची. हे पत्र मी लिहील नाही माझ्या मित्राने लिहून दिलय. खर ते सांगितल मला खोट बोलायला आवडत नाही आणि मला असल पत्र लिहायला येत नाही म्हणून मी त्याला लिहायला सांगितल. आणि त्यान हि माझ्यापुढ लिहील आहे. माझ तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. जमिनीपासून जितका लांब चंद्र आहे तितक माझ तुझ्यावर प्रेम आहे.
माणूस चालत अख्ख जग फिरेल पण चालत चंद्रावर जाऊ शकत नाही. तसच माझ तुझ्यावरच प्रेम फक्त वाढत जाईल संपणार नाही. तुझ्याशी लग्न करून मी नक्कीच चांगल घर बांधेन नोकरी करून. तू पुढ शिक मी शाळा झाली कि नोकरी करेन. तुला सांभाळेन. तुला काय हव नको ते बघेन. फक्त तू माझ्याशी लग्न कर. आणि आई बाबा नाही म्हणाले आपल्या लग्नाला तर....तर तू पळून ये माझ्याकडे. माझ्या घराची दार तुझ्यासाठी कायम उघडी आहेत.
अजून काय बोलू मी सुचत नाहीये. आणि मित्राला लिहायला पण जमत नाहीये. पत्र मिळाल कि नक्की उत्तर कळव. मी तुझ्या उत्तराची वाट बघत आहे.
तुझाच
शुभंम


जिव्हार या कथेवरून, शुभमच्या लग्नानंतर पाच वर्षांनी त्याला हे पत्र सापडलं. त्याने मित्राकडून धनश्रीला देण्यासाठी लिहून घेतलेलं पत्र. जे त्यान तिला दिलच नाही. आणि त्याला क्षणभर का होईन धनश्रीची आठवण झाली पण, मांडीवर बसलेल्या मुलीला बघून त्याला आठवण झाली बायकोची आणि त्याने ती चिट्टी पटकन फाडून टाकली......
लेखक : अजिंक्य अरुण भोसले
.https://artistaajinkya.blogspot.in/2018/04/blog-post_11.html

0 टिप्पण्या