तुला मी

love breakup
( image by google )

तू दिलेल्या त्या गिफ्टला अजून ठेवलय मी जपून. घरात आणि माझ्या मनात दोन्हीकडे. तुझ्या आठवणींना साठवून ठेवलय माझ्या मनात. उद्या कधी तू विसरलास त्या तर ये माझ्याकडे देईन मी तुला. तू बोललेला प्रत्येक शब्द कानात सतत घुमत असतो. तू आता कुणाशी जरी बोललास तरी मला वाटत माझ्याशीच बोलतोयस. तुझा तो स्पर्श. काय बोलू त्याबद्दल ? सुरुवात हातात हात घेण्यापासून मग गालावरून छातीपर्यंत. आणि हाताची जागा ओठांनी घेतली. तो स्पर्श वर दिसत नसला तरी आत मुरलाय. अगदी खोलवर. रक्तातून माझ्या हृदयापर्यंत. तुझ्या डोळ्यात दिसलेलं प्रेम माझ्याचसाठी होत. माहित आहे मला. तस प्रेम पुन्हा मला कुठ दिसल नाही. माझ्या बाबाच्या आणि आईच्या पण डोळ्यात. ती तुझी गोष्टच वेगळी आहे. तुझा आवाज, त्यात जो आपलेपणा होता. नाही वाटत मला कुणाच्या आवाजात. बस सगळे मला परके वाटतात. त्या कडक उन्हात फक्त तुला आवडतो म्हणून चहा पिलेला आठवतो मला. मी घरी बनवलेला कि. पावसात खाल्लेली कांद्याची भजी आणि त्यावर खाल्लेल्या तिखट मिरच्या. आता साधी घरातली आईची बनवलेली ताटातली वांग्याची भाजी पण तिखट लागते. त्या थंडीत सगळे चहाच्या-मसाला दुधाच्या गाड्यावर उभे असायचे गर्दी करून. आणि मी वेडी तुझ्यासारख्या वेड्यासोबत आईसक्रीम खात बसायचे. मग मला सर्दी व्हायची. आणि तू मला गोळी घेऊन द्यायचास. म्हणजे आजारी तूच पडायचास आणि तूच काळजी पण घ्यायचास. पण मला ते आवडायच. माझा अगदी नवरा वाटायचास. मला गाडीवर थंडी वाजायची. पुढून माग बघायचास आरशातून. एका हाताने गाडी चालवत म्हणायचास माझ जर्किंग काढ. आणि ते तू मला घालायला लावयचास. आता रूममधला पंखा जरी फास्ट सुरु असला तरी कोण तो कमी करायला नसत.
दिवाळीत नवीन कपडे घालून पहाटे सोबत देवाला जायच. गणपतीत गणपती बघायला जायचं. गर्दीचा आणि अंधाराचा फायदा घेत हातात हात घेऊन फिरायचं. फिरण पण कसल. जितके गणपती बघत नव्हतो तितके आपण एकमेकांना बघत होतो. त्या दहीहंडीला आपण थांबायचो तर तू माझ्या खांद्यावर मागून हात ठेवून उभा रहायचास. देवीला माझ्यासाठी उपवास करायचास. बिना-चपलीचा. किती आणि काय त्या आठवणी आहेत. सांगत बसले तर वाचणारा पण तुझ्या प्रेमात पडेल. पण ठीके. तुझ्या दूर जाण्याला मी माझी चूक मानते. तुला दोषी धरण मला नाही आवडणार. बाकी कित्येक गोष्टींचा हिशोब अजून तू देण बाकी आहे मला.पण मला हिशोब द्यायला तू काही घेतल नाहीस आणि मी काही दिल नाही. मी प्रेम केल जे कि तू पण केल होत. तू दुसरीवर प्रेम केलस आता पण मी नाही करू शकत दुसऱ्याकुणावर. पुन्हा फसवू नकोस कुणाला. आणि तू फसला तर एकटा पडू नकोस. माझ्याकडे ये मी तुझीच आहे. तुझ्याचसाठी आहे. मी करेन आपलस तुला. माझी आठवण काढ. मी पाणी जास्त पिते. पण तरी जर का मग मला उचकी लागली तर समजेन तूच आठवण काढतोयस माझी.
तुझीच, जानू.

0 टिप्पण्या