विचारा तिला ०२ 
( image by google )
सकाळी सात वाजून गेलेत अजून पाणी आल नाही. आत सगळ्या बदल्या , टप रिकामे झालेत. पीप तर संपत आलाय, हांडे मोकळे आहेत. उन्हाळ्याचे दिवस आहेत. पाणी जास्त लागत आणि जास्त संपत. पण आज पाणी आल नाहीतर ? नवऱ्याला, मुलाला डबा नाष्टा बनवून द्यायचा आहे. कस होणार सगळ ? सगळ्यांच्या अंघोळा-पांघोळा व्हायच्या आहेत अजून. दिवस काढायचा आज. प्यायचं पाणी कस हि शेजार-पाजाऱ्यांना मागता येईल एखाद हंडाभर, पण वापरायच कोण देणार ? या विचारात नळातून हवेचा आवाज येतो आणि ती जाऊन गडबडीत बघते नळ सुरु आहे का ? आणि पाणी यायला लागत. तिला बर वाटत.
पाणी झाल कि फ्रीज मध्ये मोजक्याच भाज्या आहेत. सगळ्या निवडायच्या किंवा चिरायच्या. त्याला परत कांदा लसून आलाच. चटकन फोडणी टकून शिजवण्यासारखी भाजी नेमकी दिसत नाही. आणि त्यातून मग निवडायला वेळ लागेल पण पटकन बनेल म्हणून ती पोकळा ( लाल माठ ) निवडते. त्याला लसून सोलते आणि कशीबशी ती भाजी बनवते. सोबत चपात्या लाटते. आणि ती आत्ताची गडबडीची वेळ तरी मारून नेते.
सगळ आवरून स्वतःच आवरून मुलाला सोडायचं शाळेला. कस बसल सकाळच्या गर्दीच्या माहोलातून जागा काढत ती मुलाला शाळेत सोडते. आणि शाळेची घंटा वाजते आणि तिला बर वाटत वेळेत पोचलो आपण म्हणून.
दुपारी सगळी काम मग ते धुण भांडी करून कट्टा साफ करून फारशी पुसून इकड तिकड करे पर्यंत पाच वाजतात. आणि ती शाळेत जाते . घालमेल होतीय तिची. जेव्हा मुलाला आणताना शाळेत मुलगा दिसतच नाही. पण तो हरवला नाही. तरी सुध्दा तिच्या मनात धडकी भरते. थोडावेळ शोधाशोध करून चार चौघांना विचारून मग शाळेतल्या बाईना विचारताना चड्डी नीट सावरत तो आई जवळ येतो. शुs.. करायला गेलेलो अस तो सांगतो आणि तिच्या जीवात जीव येतो.  
तिथून घरी येऊन पुन्हा संध्याकाळच्या जेवणाचा विचार डोक्यात फिरतच असतो. मुलाला वांग , सासूबाईंना हलकी मेथी , नवऱ्याला ढबू मिरची खायची असते. आणि तिला ? तिला विचारणार कोणच नसत कारण ती बनवणारी असते. तरीपण सगळ्यांना पटेल अशी एकच भाजी करून उद्या तुमच्या आवडती करते भाजी अस समजावून सांगते. तारेवरची कसरत करत ती हि सुद्धा वेळ ती मारून नेते. आणि तिला बर वाटत.
रात्री मुलाचा गृहपाठ करवून घेऊन सासूबाईंना गोळयाचा ढोस देऊन मग नवऱ्याची विचारपूस करते. आणि मग जेव्हा ती बेड येऊन झोपते. तेव्हा तिला आठवत कि तीच तर अंग दुखतय खूप सारी काम करून. तीच तर डोक पण दुखतय खूप सगळे विचार करून आणि तीच मन हि दुखतय आतून खूप म्हणजे खूप कारण एकाच घरात राहून चारी दिशाला चार तोंड करून बसणारे घरातले आहेत तेहि जाऊ देत पण नवऱ्यान तिला आज किती काम केल किंवा काही त्रास होतोय का न विचारताच तो झोपून गेलाय म्हणून तिला त्रास होतोय. ती झोपते. आणि रात्री तिच्या अंगावर नवऱ्याचा हात पडतो. तिला बर वाटत. त्या हातावर आपला हात ठेवून हात फिरवते. नवऱ्यान विचारपूस नाही पण अस जवळ घेतल तरी तिला बर वाटत पण घडत काय ? बायको आपल्याला काही वेगळाच इशारा करते समजून तो तिला जवळ ओढून प्रेम करायला सुरुवात करतो.
केसापासून पायाच्या नखापर्यंत तीच अंग दुखतय. तिला प्रेम नको विचारपूस हवी. तिला शारीरिक नको मानसिक प्रेमाची गरज हवी. पण समजून घेईल का कोणता नवरा कधी आपल्या तिला ? माहित नाही. पण इच्छा असते तिची कि, नवऱ्याने विचाराव तिला. कि तुला काय होतय आणि काय हवय ? अंग दुखतय पण इतक नाही अस म्हणून ती नवऱ्याला त्रास देणार नाही स्वतः सोसेल. आणि साडी, ड्रेस शिवाय ती कधीतरी चार प्रेमाचे शब्द मागेल नवऱ्याला बाकी काही नाही. मुळात बायको असतेच अशी. थोडी नवऱ्याची मैत्रीण,आई,बहिण,नसेल नवऱ्याला वडील तर त्याचे वडील आणि या उपर निस्सीम त्याच्यावरच फक्त प्रेम करणारी बायको....... विचारा तिला कधी तरी... ती उत्तर देणार नाही. पण प्रश्न विचारला तर ती तुम्हाला त्रास हि देणार नाही.....लेखक : अजिंक्य अरुण भोसले. 

2 टिप्पण्या