एकटा आहे मीरात्रीला सारून दिवसाला जवळ करायची घाई तळमळ धडपड तडफड माझी. कारण एकटा आहे मी. रात्रीची मला भीती वाटते आणि दिवसाला हायस होत. रात्री अंधार असतो दिवसा उजेडात लोक दिसतात. म्हणून बर वाटत. त्या लोकांत कुणी जोडपं दिसलं तर पुन्हा  एकट वाटत. मी विसरून जातो की माझ्यासोबत माझ्यातला मन सुद्धा आहे. त्या जोडप्याला बघताना मन विसरून जात की ते माझ्या शरीरात आहे आणि मी विसरून जातो माझ्यात एक जिवंत मन आहे.  कुणाचे हात हातात दिसले की माझे मोकळे हात दिसतात. पण विसरून जातो मी की त्या हातासोबत हातावर कित्येक रेषा कित्येक वर्षांचं आयुष्य माझं  जगवत आहेत. कुणी कुणाला जवळ घेत मिठी मारताना दिसलं तर मला थंडी वाजून येते. पुन्हा विसरायला होत मला की दिवसाचा सूर्यप्रकाश माझ्या सोबत अगदी लहान पणापासून आहे. अंगावरचे कपडे मला भरीस भर उब द्यायला दिवस आणि रात्र सोबत आहेत. तरी मी एकटा आहे.  कुणाला चुंबन करताना बघणं जीवाला त्रास होतो. त्यांचं ते प्रेम असत पण मला इथं राग येतो. पण पुन्हा माझा विसरभोळे पणा , मी विसरून जातो की त्या चुंबनासारखे माझे ही ओठ एकमेकांसोबत जन्मजात सोबत आहेत. वरचा ओठ खालचा ओठ एकमेकांना टेकून सतत असतात. करण जास्त मी बोलत नाही. कुणा घरच्या बेडवरल्या बेडशीटचा वास बाईशी मिळता जुळता आला तर डोळे बंद होऊन मला पुढे काही वेळ तरी  वास यायचे बंद होतात. पण मी विसरून जातो की कित्येक जणींचे ते वास माझ्या नाकात अजून ही बसून आहेत. केव्हा तरी तास वास आला की मला त्या प्रत्येकीची आठवण येते पण मी हे विसरून जातो. मी मला एकटा वाटतो.
कुणी मोबाईल कानाला लावून बसलेलं दिसलं ओठांवर हसू आणून बोलत असलं की वाटत यात खर बोलणं किती असत ? मी विसरून जातो की माझं मन माझ्याशी कायम खर बोलत आलंय.  त्याच्या इतकं माझ्याशी खरेपणान कुणी बोलत नाही. तरी मी मला एकटा वाटतो कारण मी एकटा आहे. घेतलेला श्वास मी , माझा म्हणे पर्यंत तो वाऱ्यात मिसळून दुसऱ्या कुणाचा होऊन जातो. माझ्या डोळ्यांनी मी मला दिसत नाही मी दुसऱ्यांना जास्त बघतो. विचार माझा करताना मला वेळ मिळत नाही दुसऱ्यांच्या आठवणीत माझे चोवीस तास तासाभरात संपून जातात. माझं अस आता काहीच नाही. म्हणूनच म्हंटल मी एकटा आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Hollywood Movies